कधी तो पावसात भिजत भाषण करतोय, कधी तो रस्त्यावर उभ्या असलेल्या बैलगाडीतून ऊस काढून खातोय. तर कधी सिद्धरामैयांना सोबत घेऊन पळतोय तर कधी DK शिवकुमार यांना. राहुल गांधींची पदयात्रा सुरु होऊन आता जवळपास दीड महिना होऊन गेला. जवळपास हजार किलोमीटरच्या आसपास या पदयात्रेने आजपर्यंत प्रवास केला आहे. कर्नाटक ओलांडेपर्यंत ही पदयात्रा 1000 KM चा टप्पा पूर्ण करेल. पदयात्रा सुरु होताना कोणीच अपेक्षा केली नव्हती की राहुल गांधी एवढे चालतील. पण ते चालले, रोज चालत आहेत. 30 सप्टेंबरला यात्रेने केरळमधून कर्नाटकमध्ये प्रवेश केला. कर्नाटक काँग्रेसने जंगी सभा अन् कार्यक्रम घेऊन राहुल गांधी यांच्या हातात तिरंगा देऊन प्रवासाला सुरवात केली.
2 ऑक्टोबरला गांधी जयंती रोजी भर पावसात राहुल गांधींनी दिलेले भाषण प्रचंड viral झाले. यात महत्वाची गोष्ट अशी होती की राहुल पावसात भाषण करत असताना समोरची पब्लिक आसनव्यवस्था म्हणून असलेल्या खुर्च्या आपल्या डोक्यावर उलट्या धरून पावसापासून बचाव करत ते भाषण ऐकत होती. कोणी पाऊस येतोय म्हणून उठून गेले नाही. एके ठिकाणी कोविडने घरातील कर्ताधर्ता मृत्यू पावलेल्या परिवारातील महिला-मुली यांचा राहुल यांच्याशी संवाद ठेवलेला. त्यात एक चिमुकली राहुल यांच्या जवळ आली अन् म्हणाली 'माझे बाबा असताना मी त्यांना जे मागेल ते आणून द्यायचे, माझ्यासाठी शाळेच्या वस्तू आणायचे पण आता माझी आई मला काही आणून देण्यास असमर्थ ठरतेय, कोविडमध्ये वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्याने माझ्या बाबांचा मृत्यू झाला. मला कोणी शिक्षणास मदत केली तर मी डॉक्टर होऊन दाखवेन.' हे ती सांगत असताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. राहुल यांनी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांना मुलीच्या शिक्षणाला मदत करण्याचे सांगितले. अशा अनेक कथा तेथील महिला सांगत होत्या. राहुल गांधी यांनी कर्नाटक राज्य सरकारकडे यांच्या मदतीसाठी सरकार काय उपाययोजना करू शकेल ? याबद्दल प्रश्न उपस्थित केले.
दसऱ्या दरम्यान दोन दिवस पदयात्रेने मुक्काम घेतला. आपल्याकडे कोल्हापूरला जसा शाही दसरा होतो. तसाच काहीसा दसरा मैसूरला होतो. अनेक पर्यटक दसऱ्यात खास मैसूर पॅलेस पहायला येतात. यावेळेस सोनिया गांधी पण दसरा पाहायला मैसूरला आल्या. सुट्टीच्या त्या दिवशी सोनिया, राहुल अन काहीजण नागरहोल व्याघ्र प्रकल्प पाहण्यास गेले. कोडगू अन् मैसूर या दोन जिल्ह्यात पसरलेला हा प्रकल्प आहे. यावेळेस राहुल गांधी यांनी एका हत्तिणीसोबत तिच्या जखमी पिल्लाला पाहिले. त्याचे त्यांनी ट्विट केले. सफारीवरून आल्यावर त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमण्णा यांना पत्र लिहून त्या पिल्लाला वैद्यकीय उपचार लवकर मिळावेत अशी विनंती केली.
मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ताबडतोब राहुल गांधींच्या पत्राची दखल घेत आपल्या वनविभागाला मदतीचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी तज्ज्ञ, डॉक्टरांचे पथक तिथे पोहचून त्यांनी त्या पिल्लावर वैद्यकीय उपचार केले. असेच बदनावालू या गावात दोन समाजात निर्माण झालेल्या तेढीमुळे या गावातील एक रस्ता 1993 पासून बंद होता. जवळपास तीन दशकांपासून बंद असलेला हा रस्ता राहुल गांधी यांच्या पुढाकाराने सुरु झाला. रंगीबेरंगी टाईल्स लावून या रस्त्याचा शुभारंभ राहुल गांधींच्या हस्ते झाला. या गावातील शाळेतील एका भिंतीवर राहुल गांधी यांनी आपल्या हाताचे ठसे उमटवले. या रस्त्याला 'भारत जोडो' असे नाव देण्यात आले. दोन समाजातील मने जोडणे म्हणजेच भारत जोडणे होय. पुढे पदयात्रा पुन्हा सुरु झाल्यावर यात सोनिया गांधी यांनी चालण्यास सुरवात केली. त्या थोडा वेळ चालल्या नंतर राहुल यांनीच त्यांना विनंती करून गाडीत बसवून परत पाठवलं. यावेळेस राहुल यांनी आईच्या बुटाची लेस बांधणे, सोनिया यांनी पडलेल्या मुलीला हात देणे, मायेने जवळ बोलावून विचारपूस करणे याचे फोटो अन् व्हिडीओ तुम्ही पाहिलेच असतील.
यात्रा मांड्या जिल्ह्यात आल्यावर या यात्रेत पत्रकार, लेखिका गौरी लंकेश यांची आई व बहिणीने यात सहभाग घेतला अन त्या राहुलसोबत काही काळ चालल्या. सत्य, स्वातंत्र्य अन् धाडसाचे प्रतीक म्हणजे गौरी लंकेश होत्या. गौरी लंकेश यांची हत्या झाली तेव्हा राहुल त्यांच्या सोबत उभा होता अन् आज त्यांचा परिवार राहुल सोबत चालत होता. भारत जोडो यात्रा ही अशाच लोकांचा आवाज बनत आहे, जो आवाज कधी दाबला जाऊ शकत नाही. राहुल गांधींनी या यात्रेत पत्रकार परिषदा घेतल्या, कुठलाही आडपडदा न ठेवता ते पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांना अगदी हसत खेळत उत्तरे देत होते. तुम्ही काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत कोणतेही प्रश्न विचारू शकता पण भाजपमध्ये पत्रकार परिषदा होत नाहीत, जे घेतात त्यांना काहीही विचारण्याचे स्वातंत्र्य नाही, अशी मिश्किल टिप्पणी पण त्यांनी माध्यमांवर केली.
कर्नाटकात राहुल गांधी हे स्थानिक भाजप सरकारवर आपल्या भाषणातून जोरदार प्रहार करत आहेत. चिखल तुडवत, पावसाचे थेम्ब झेलत यात्रा सुरु आहे. अनेक जण आपली व्यवस्था स्वतःच करून राहुल सोबत चालायचे आहे म्हणून येत आहेत. पदयात्रेत लोकं स्वयंस्फूर्तीने सामील होताहेत. हे या यात्रेचे खऱ्या अर्थाने यश आहे. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळी लोकं यात सहभागी होताहेत. भारत कधी तुटला? असे कुत्सितपणे म्हणणाऱ्या लोकांसाठी ही खऱ्या अर्थाने सणसणीत चपराक म्हणावी लागेल. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची, धर्माची विशेषतः आहे. राहुल गांधी ही विविधता एककल्ली अजेंडा राबविणाऱ्या केंद्र सरकारला आणि पर्यायाने लोकांना यात्रेतून दाखवत आहेत. राहुल गांधींच्या फिटनेसची सुद्धा कमाल म्हणावी लागेल. वयाच्या 52 व्या वर्षी दररोज इतके चालणे ही काय सोपी गोष्ट नाही. याची परिसीमा म्हणजे परवा त्यांनी एका दिवसात तब्बल 44 किमी अंतर पादांक्रांत केले. या यात्रेकडे लोकं आशेने बघताहेत, पुढच्या वर्षी कर्नाटकात विधानसभेचा रणसंग्राम आहे. राहुल गांधींच्या यात्रेचा किती फरक पडला ते आपल्याला लवकरच कळेल. यात्रेला महाराष्ट्रात यायला अजून साधारण एक महिना लागेल.
टीप- लेखात दिलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. याच्याशी एबीपी माझा सहमत असेलच असे नाही.