प्रति,
आदरणीय जिल्हाधिकारी जी. श्रीकांतसाहेब,
सस्नेह नमस्कार.

मागच्या महिन्यात अकोल्यातील माध्यमांनी यश उमाळे या मेंदूच्या आजाराने ग्रस्त गरीब विद्यार्थ्यांच्या आजाराबद्दल बातम्या केल्या. ही बातमी अकोल्यातील अनेक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी प्रकाशित आणि प्रसारित केली. गरिबीमुळे उपचार थांबलेल्या यशची मदत करण्यासाठी त्याच्या वर्गातील मित्रांनी त्याच्यासाठी मदतफेरी काढत मदत करण्याचा प्रयत्न केला होता.

अकोल्यातील माध्यमांनी आपल्या बातम्यांमध्ये हे सर्व सविस्तर मांडलं-दाखविलं होतं. आमच्या बातम्यांनंतर यशला मदत करण्यासाठी संवेदनशील महाराष्ट्र धावून आला. मंत्री गिरीश महाजन यांचं 'गिरीश महाजन फाऊंडेशन', आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासारख्ख्या लोकप्रतिनिधीही तत्परतेनं यशला उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेत. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत साहेबांनी पुढाकार घेत हा खर्च सरकार उचलणार असल्याचं स्पष्ट केलं, अन तातडीने यशवर मुंबईच्या 'जे.जे.रुग्णालया'त उपचारही सुरु झाले.

हे सर्व माध्यमं, समाज आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या संवेदनशीलतेमुळे अगदी वेगाने घडत गेलं. मात्र, 'प्रगत महाराष्ट्र' असल्याचं दावा होत असतांना यश उमाळे हा मुलगा गरीब परिस्थितीमुळे उपचाराविना घरी बसला होता, ही बाब सरकार, प्रशासन यांच्यावर काहीसं  प्रश्न निर्माण करणारी होती.

सर, या दरम्यान आपण या बातमीच्या वार्तांकनासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करणारी एक 'पोस्ट' लिहिली होती. त्यात तुम्ही अकोल्यातील माध्यमांना ११ प्रश्न विचारले होते. तुम्ही ही संपूर्ण बातमी चुकीच्या आधारवर मांडल्या गेल्याचा आक्षेप यावेळी नोंदविला होता.

मी सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, आमची 'ही' बातमी कधीच चुकीची नव्हती अन नाही. या बातमीतील एखाद्या 'कन्टेन्ट'बद्दल कुणाला निश्चितच आक्षेप असू शकतो,  अन तो असल्यास कुणाचीच कधीच हरकत नसावी. मात्र, एक विनम्रपणे सांगू इच्छितो की, या बातमीच्या संदर्भात तुम्ही लिहिलेली त्या पोस्टमधील अनेक बाबी अपूर्ण माहितीच्या आधारे लिहिल्याचं जाणवतंय.


सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, अपवाद वगळल्यास एकाही वृत्तपत्र आणि एकाही चॅनलने त्या मुलाला 'ब्रेन ट्यूमर' झाल्याचं म्हटलं नाही. आम्ही सर्वांनी त्याला 'मेंदूशी संबंधित आजार' झाल्याचं म्हटलं होतं. त्याला मेंदूशी संबंधित आजार असल्याचे त्याचे रिपोर्ट्सही सांगतात. त्यामुळे आपण केलेला 'ब्रेन ट्यूमर'चा उल्लेख पूर्णतः चुकीचा आहे, तो आम्ही कधीच केला नाही.

तुम्ही या मुलाच्या वडिलांनी शासकीय यंत्रणा, दवाखान्याचा उपयोग का केला नाही, असं म्हटलं.

या मुलाचे वडील दीड वर्षांपूर्वी त्याला सर्वात आधी अकोल्याच्या जिल्हा रूग्णालयातच घेऊन गेलेत. मात्र, त्यांना अपेक्षित उपचार आणि प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना खाजगी रूग्णालयाची पायरी चढावी लागली. मात्र, दुर्दैवाने तेव्हा त्यांनी शासकीय रुग्णालयात फाडलेल्या पावत्या गहाळ झाल्याने सध्या त्यांच्याकडे उपलब्ध नाही.

सर, तुम्ही 'त्या' पोस्टमधील बाकीचेही प्रश्न उपस्थित केले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं देताही येतील. पण काही मुद्द्यांच्या तांत्रिक खोलात जाण्यापेक्षा माध्यमांची एकच प्रांजळ भूमिका आणि ध्येयय होतं, ते म्हणजे या गरीब मुलाला उपचार मिळावेत. त्याची सुरुवात होणं, हा यामागच्या तळमळीचा विजय म्हणता येईल. मात्र, हे सर्व होत असतांना तुम्ही काही लोकांजवळ बोललेली एक गोष्ट अतिशय अस्वस्थ करणारी होती. यासोबतच ती अकोल्यातील पत्रकारितेचा अन त्यांच्या मूल्यांचा अपमान करणारी होती.

तुम्ही काही लोकांजवळ म्हणाले की, " मला 'काही' लोक असं म्हणतात की, या बातमीनंतर त्या मुलाच्या पालकांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम ते पालक आणि ही बातमी करणारे पत्रकार वाटून घेणार आहेत".

सर, हे अतिशय अतिशय चीड आणणारं होतं. यापेक्षा कोणता मोठा अपमान असेल असं मला वाटत नाही. तुम्हाला असं सांगणारे जे कथित लोक असतील ते एक तर अशाप्रकारच्या विकृत विचारांनी ग्रासलेले असतील  आणि विशेष म्हणजे अशी कामं ते स्वतः करत असतील म्हणून त्यांच्या चष्म्यातून त्यांना सारं असंच दिसत असेल. असो!.

अशा विचारांच्या चार टाळक्यांना किती 'सिरीयस' घ्यायचं हे तुम्हीच ठरवा. मात्र, अशांना काय वाटतं याची फिकीर अकोल्यातील सचोटीनं काम करणारा पत्रकारितेतील कोणताच व्यक्ती करीत नाही अन करणारही नाही. मात्र, आपल्यासारख्या अतिशय संवेदनशील अधिकाऱ्यानं अशा गोष्टीवर विश्वास ठेवावा किंवा बोलून दाखवावं, याचं मोठं दुःख वाटतंय.

सर, आपलं पद, मान, प्रतिष्ठा अन कर्तृत्व अतिशय मोठं आहे. आम्हाला त्याचा नेहमीच अभिमान वाटतो. मात्र, प्रशासनाची बाजू राखण्यासाठी तुम्ही कुणाच्या निष्ठेवर, कामावर याप्रकारचं लांच्छन  निश्चितच लावू शकत नाही. कारण, कोणत्याही प्रतिष्ठा, पद आणि मानापेक्षा कुणा व्यक्ती, संस्थेची निष्ठा, सचोटी निश्चितच मोठी अन महत्वाची आहे.

प्रशासनाच्या चांगुलपणाची रेषा मोठी करतांना येथील माध्यमांच्या कार्याची, निष्ठा, सचोटी अन येथील पत्रकारितेतील दैदिप्यमान इतिहासाची रेषा पुसण्याचं अथवा लहान करण्याचा प्रयत्न कधीच कुणी करू नये असं विनम्रपणे नमूद करावसं वाटतं.

सर, याच 'पोस्ट'मध्ये या सर्व बातमीला 'इमोशनल ब्लॅकमेलिंग' हा शब्द जोडण्यात आला. सर, त्या मुलाची खरी परिस्थिती मांडणं याला तुम्ही 'इमोशनल ब्लॅकमेलिंग' म्हणणार का?

आपण प्रशासनाचा गाडा हाकताना अनेक धाडसी निर्णय घेता, प्रशासनातील मळलेली पायवाट सोडत सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी-उपक्रम केलेत अन करत आहात. मग ते आपल्या सेवानिवृत्त होणाऱ्या ड्रायव्हरला आपल्या जागेवर बसवत स्वत: गाडी चालवणं असो, एखाद्या शाळेत गेल्यानंतर शिक्षकांच्या भूमिकेत तल्लीन होणं असो, पदाचं मोठेपण न मिरवत एखाद्या शाळेत जाऊन भिंतीला दिलेला रंग असो,  या सर्व गोष्टी जी. श्रीकांत या अधिकाऱ्याच्या पलीकडे लपलेल्या एका संवेदनशील माणसाचे दर्शन घडविणारे आहे.

याबरोबरच शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतविणारे 'मिशन दिलासा अभियान' तर अकोल्यात शेतकऱ्यांना लढण्याचं बळ देणारी गोष्टही आपल्यातील अधिकाऱ्यांच्या पलीकडच्या माणसाचं दर्शन घडविणारी गोष्ट आहे. मात्र, आपल्या या चांगल्या गोष्टींनाही काही लोकांनी 'इमोशनल ब्लॅकमेलिंग' म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तुमची त्यामागची भावना चांगली आणि स्वच्छ होती म्हणून तुम्ही अशा हेटाळणीकडे दुर्लक्ष केलंच ना?... त्यामुळे आम्हीही नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करीत नेहमीच पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय.

या बातमीत काही माध्यमांनी त्या मुलाच्या वडिलांचा खातेक्रमांक दिला गेला. हे माध्यमांनी पहिल्यांदाच केलेय का?. असं या प्रकारच्या अनेक बातम्यांच्यावेळी होत असतं. त्याचा कुठे दुरुपयोग झाल्याचं माझ्यातरी कधी ऐकण्यात आलं नाही.

या खात्याचा खरंच गैरवापर होण्याची भीती तुम्ही व्यक्त केली होती. मग खरंच असं काही गैरवापर झाला का?, हे स्पष्ट होणंही आवश्यक आहे.

सर, या बातमीच्या अनुषंगाने तुम्ही त्या 'पोस्ट'च्या माध्यमातून  संपूर्ण माध्यमांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा काहीसा प्रयत्न केला. मात्र, यातून आम्ही बदनाम न होता आणखी उजळून निघालो. कारण, आमचा या मागचा हेतू, विचार अतिशय स्वच्छ होता आणि आहे.

सर, तुमच्या त्या 'पोस्ट' नंतर पत्रकारितेत सकारात्मक अन् चांगलं काम करणारा प्रत्येक पत्रकार अस्वस्थ होता. मात्र, त्या खात्यातील पैशांचा दुरुपयोग होऊ शकतो या समजाला बुधवारी यश उमाळेच्या वडिलांनी आपल्या खणखणीत कृतीतून 'बाणेदार' उत्तर दिलं.

उपचार सरकार करीत असल्यानं त्या खात्यात जमा झालेली पै अन पै त्या माणसानं त्याच समाजाला परत केली. ज्यांचे खातेक्रमांक मिळाले त्यांची रक्कम 'रिटर्न सेंड' केली. उरलेली ३६ हजारांची रक्कम अकोल्यातील एक अनाथाश्रम आणि एका एड्सबाधित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दान दिली.

विशेष म्हणजे आमच्या बातम्या पाहिल्यानंतर देशातील कला क्षेत्रातील एका मोठ्या घराण्याने पैशांच्या स्वरूपात दिलेली मदतही यशाच्या कुटुंबीयांनी अतिशय नम्रपणे नाकारली होती. तो व्यक्ती गवंडीकाम करणारा, घरात अठराविश्व दारिद्र्यात पिचलेला. हातावर आणल्यावरच चार घास पोटात ढकलू शकणारा. मात्र, गरीब असला तरी आचार-विचार, कृती आणि विशेष म्हणजे आदर्शांची प्रचंड 'श्रीमंती' असल्याचं दर्शन घडवणारा खरा आयडॉल' वाटतोय.

सर, जाता-जाता एकच विनंती आहे की, आपण या जिल्ह्याची सूत्रं सांभाळल्यानंतर येथील प्रशासन, वातावरणात एक सकारात्मक भारलेपण आलंय. तुमच्या लोकाभिमुख प्रशासनाचा, सामाजिक जाणिवेचा, कन्हवेचा अन तुमच्या जिंदादिल-दिलखुलासपणाचा नेहमीच अभिमान वाटतो. तुमच्यासारख्या संवेदनशील माणूस आणि अभ्यासू अधिकाऱ्याचं मार्गदर्शन आणि सल्ला नेहमीच आम्हाला परिपूर्णतेच्या आसपास जाण्यास मदत करणारा राहील. कारण, आम्ही सर्वच या क्षेत्रात दररोज नवीन शिकणारे कायम विद्यार्थीच आहोत.

आपल्यासारख्या समाजशिक्षकाने यासंबंधातील मार्गदर्शचे सदैव स्वागतच आहे. कारण, बातमीदारी करतांना एखाद्या बातमीतील एखादा 'कन्टेन्ट' निश्चितच चुकू शकतो. मात्र, संपूर्ण बातमी चुकीची ठरू शकत नाही. तुमच्या त्या 'पोस्ट'नंतर अनेक दिवसांपासून मनाला अस्वस्थ वाटत होतं. पत्रकारितेतील एक जबाबदार घटक या नात्याने याच अस्वस्थतेला वाट करून देत मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही यातील भावनानांना निश्चितच सकारात्मकपणे घ्याल, याच अपेक्षेसह.

तुमचाच पत्रकार भाऊ,
उमेश अलोणे,
अकोला.

अकोला जिल्हाधिकाऱ्यांची 'ती' पोस्ट :

#Akola #IAS #Collector
# responsiblejournalism
#Journalism #Journalist #Media

Dear friends,

In a hurry to cover or publish some sensational news , aren't you losing COMMON SENSE?.

Let me tell you with one example of one latest news of akola boy suffering from brain tumour require HUGE financial help. The media both print and electronic had covered it without verifying facts. Let me try what you guys missed out.
1. Did you verify whether he actually suffered brain tumour ?

2. Even if you believe the parents , did you check any medical papers relating to it ?

3. Did you cross verified with any of your medical friend or from a government functionary ?

4. Did you asked the parents,  how much they require the money ?

5. Was there any quotation from any private doctor or an certified or authorised medical institution ?

6. Did you check why they did not avail any of government medical services ?

7. Why an existing government scheme could not be availed ?

8. In the news it is said,  media said huge money but did not said how much. Huge means how much. It can range from 1 rupee to 100 CRORE. Who had decided ?

9. You have published account number,  who is there to cross verify how much money he got ?

10. Can anyone be sure that the money can't be misutilised ?

11. Actually he is suffering from vascular headache which is not tumour and does not require huge money. Do you have guts to tell again public that the news item is wrong and be apologetic.

So friends, by bypassing all the above things do you know what you had done .

1. You had misused media and EXTORTED money from the people by emotional blackmailing

2. When people get to know they had been cheated , the genuine people will also stop giving money for a real cause. Kahani mahit aahet na LANDGA AALA RE
Media has huge responsibility towards the society by bringing the genuine issues of the people to the government's notice and to the people wherein they can contribute and participate in SOLUTIONS. Please be responsible while covering the issues. You cannot cheat people because of your poor understanding of the issues.
Do you know what I had done after knowing the reality ? I will tell you after your view points. With regards
Your brother
*Sreekanth*
*Collector Akola*