तंत्रज्ञानाने जगाचा उंबरठा ओलांडला अन् यातूनच विकास प्रक्रियेचा वेगही वाढला. मात्र, आपल्या देशातील एक वर्ग आजही या प्रगतीचा विचार आणि झगमगाटापासून कोसो दूर आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील बराचसा भाग सातपुड्याच्या पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. येथील आदिवासींचे जीवन, शेतीपद्धती आणि चालीरीती-परंपराही अगदी त्यांच्या संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या आहेत. त्यामुळेच अलीकडे कृषीक्षेत्रातील बदलांची 'चाहूल' या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलीच नाही. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांत या भागातील आदिवासी, त्यांची शेती अन शेती-पद्धती 'कूस' बदलू पाहतेय.... या सकारात्मक बदलांची जन्मदात्री आहे याच आदिवासी समाजातील एक 25 वर्षांची तरुणी.... नासरी शेकड्या चव्हाण असं या तरुणीचं नाव.



तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं बोरव्हा हे 100 टक्के आदिवासी असलेलं नासरीचं गाव. या तरुणीने आपल्या गावातील शेती, शिक्षण अन समाजजीवन यामध्ये गेल्या पाच वर्षांत 'क्रांतिकारी' बदल घडवून आणलेयेत. गाव, आदिवासी, शेती, विद्यार्थी या सर्वांच्या जीवनात उत्कर्षाच्या नव्या पहाटेची 'पेरणी' करणारा नासरीचा हा प्रयत्न आहे.

बोरव्हा गावात प्रवेश करताच तुम्हाला शेणा-मातीने लिपलेला अतिशय आखीव-रेखीव असा कसला तरी ढीग दिसतो... अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यांतील बोरव्हा आणि आजूबाजूंच्या गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हेच चित्र दिसेल. हा ढीग नेमका कशाचा असेल? हा प्रश्न अनेकांना पडतोही. हा ढीग असतो 'बायोडायनामिक कंपोस्ट खताचा... कधीकाळी या गावातील शेणाचे उकिरडे अगदी उघड्यावर अन रस्त्यावर आलेले. त्यामुळे गावातील स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला. पण गेल्या पाच वर्षांत हे चित्र पार पालटून गेले आहे. एक स्वछ आणि सुंदर गाव असा लौकिक आता हे गाव मोठ्या दिमाखाने मिरवू लागलं आहे.



तेल्हारा तालुक्यांतील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं आडवळणावरचं हे बोरव्हा गाव... 100 टक्के आदिवासी असलेलं हे गाव. सध्याही या गावाला जायचे म्हणजे मोठे दिव्यच... अनेक ठिकाणी कच्चा रस्ता अन् ओढ्यातून वाट तुडवत तुम्हाला हे गाव जवळ करावं लागतं... गावाची वाट जरी अडचणीची असली तर गेल्या पाच वर्षांत या गावाने शेतीतील सकारात्मक बदलांची नवी 'पाऊलवाट' तयार केली आहे... या गावाची लोकसंख्या जवळपास सातशे ते आठशेंच्या घरात.... गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेती सातपुड्याच्या पायथ्याशी. अधिक शेती ही उतारावरच केली जाणारी...या गावातील शेती अगदी पारंपारिकच. अलीकडे कृषी क्षेत्रातील आलेल्या बदलांचा कोणताही मागमूस नसलेली. त्यामुळे पारंपारिक पिके, खत आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर अन् अत्यल्प उत्पादन आणि कर्जाच्या खाईत कायम बुडालेला शेतकरी असं येथील कायमचं दुष्टचक्र... पण, पाच वर्षांआधी या गावात झालेल्या कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत 'सर्ग विकास समिती'च्या एका शेतीशाळेने गावात परिवर्तनाचे बीज रोवले. अन् गावातील शेतकऱ्यांनी रासायनिक खत आणि कीटकनाशकांना कायमची मूठमाती देण्याचा विडा उचलला... गावातच 'कंपोस्ट खत', 'एस. ९ कल्चर' आणि सेंद्रिय कीटकनाशक असणाऱ्या 'तरल खाद'ची निर्मिती सुरु झालीय. पण, गावाला या नवविचार आणि कृषी क्षेत्रातील नव्या बदलांना सामोरे जाण्याची प्रेरणा देणारी होतीय त्यांच्या गावातील अन त्यांच्यातीलच एक असणारी नासरी... नासरी शेकड्या चव्हाण ही पंचवीस वर्षीय तरुणी....



नासरीला आपल्या गावांतील शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या मार्गात सर्वात मोठा अडसर असणाऱ्या गावकऱ्यांच्या पारंपारिक शेतीचा मार्ग बदलायचा होता. तिने यासाठी प्रत्येक शेतीशाळा आणि त्यामाध्यमातून शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या बाबीवर लक्ष केंद्रित केले. सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणाऱ्या गोष्टी बारकाईने समजून घेतल्यात आणि त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतले आहे. येथील आदिवासींसाठी नवव्या बदलांसाठी सर्वात मोठा अडसर म्हणजे भाषेचा... येथील आदिवासींची मातृभाषा ही कोरकू... हिंदीचेही ज्ञान अगदी नसल्यासारखेच... त्यामुळे 'शेतीशाळे'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि प्रयोगाचे धडे द्यायचे तरी कसे?, असा प्रश्न होताय. मात्र, कोरकू बोलणाऱ्या नासरीमुळे हा प्रश्न मिटला. अन, तिने गावाला कमी खर्चाच्या शेतीचे महत्व सांगायला सुरुवात केली आहे. गावातील शेतकऱ्यांचा सर्वात मोठा खर्च व्हायचा तो खत आणि कीटकनाशकांवर... संपूर्ण गावात 'बायोडायनामिक कंपोस्ट खत' आणि फवारणीसाठी लागणारे सेंद्रिय 'बायो डायनामिक तरल खाद' कसे तयार करायचे याचे शास्त्रशुद्ध धडे तिने गावकऱ्यांना दिले आहे. पण, आधी काहीसा विरोध करणाऱ्या काही गावकऱ्यांचा विरोध त्यावर्षी शेतीचा कमी झालेला खर्च आणि वाढलेले उत्पादन यामुळे आपोआपच कमी होत गेलाय.



आधी गावातील उकिरडे रस्त्यवर आल्यामुळे गावात आरोग्य आणि स्वच्छतेची समस्या निर्माण झाली होतीय. मात्र, आज या गावात प्रत्येक घरासमोर कंपोस्ट खत निर्मितीचे ढीग शेणा-मातीने व्यवस्थित लिपलेले दिसतायेत. तर आपल्याच अवती-भोवती असलेल्या झाडांचा पाला वापरून शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या 'बायोडायनामिक तरल खाद' या सेंद्रिय कीटकनाशक निर्मिती आज घराघरामध्ये होतेय. सध्या या गावातील शेतकऱ्यांच्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांवर होणारा खर्च 90 टक्क्यांनी कमी झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न आणि पैसे मिळायला लागल्याने येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.



आता गावकऱ्यांच्या मदतीने नासरीने बायोडायनामिक कंपोस्ट खताचे फायदे आणि त्याच्या वापराबाबत प्रसार सुरु केलाय. गेल्या पाच वर्षांपासून अधिक उत्पादन आणि कमी खर्च अशा 'झिरो बजेट' शेतीकडे सध्या या गावाची दमदार वाटचाल सुरु आहे.

सध्या गावातील प्रत्येक शेतकरी सेंद्रिय शेती, एस. 9 कल्चर, बायोडायनामिक कंपोस्ट आणि बीजप्रक्रिया याबद्दल अतिशय आग्रही आहेत. गावातील जवळपास 1800 एकर जमिनीवर बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी होत नाहीय. या भागातील बरीचशी शेती सातपुड्याच्या पायथ्याशी डोंगराच्या उतारावर आहेय. उतारामुळे पाणी वाहून गेल्याने येथील शेतीचे मोठे नुकसान होते. नासरीने कृषी विभाग, कृषी विद्यापीठाच्या साथीने आता या भागात जलसंधारणाचे नवीन प्रयोग राबवायला सुरुवात केली आहे. उताराला आडवी पेरणी करण्याचे 'मिशन' आता तिने हाती घेतले आहे. त्यामुळे या भागातील जवळपास 40 टक्के भागावर गेल्या वर्षीपासून उतरला आडवी पेरणी होत आहे. त्यातून जमिनीत पाणी मुरण्याची आणि जिरण्याची प्रक्रिया अधिक गतिमान झाल्याने डोंगर उतारावरच्या शेतीतील उत्पादनही वाढले आहे.



नासरीच्या गावातील कृषी क्षेत्रात झालेल्या आश्वासक बदलांनी आता बोरव्हा गावाची 'शिव' ओलांडत आजूबाजूच्या आदिवासी गावांमध्येही झेप घेतली आहे. नासरीच्या गावाबाजूच्या पिंपरखेड, धोंडाआखर, भिली, चिपी, भिली या गावांतील शेतकऱ्यांनी आता आपल्याच गावांत 'बायोडायनामिक कंपोस्ट', 'एस.९ कल्चर आणि तरल खाद तयार करायला सुरुवात केली आहे. नासरी वेळोवेळी या गावांत जावून शेतकऱ्यांना यासंदर्भातील मार्गदर्शन करीत असतेय. नासरीचे गाव आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये कृषी क्षेत्रात होत असलेल्या आश्वासक बदलानंतर तिने आता आदिवासींच्या जीवनातील इतर महत्वाच्या प्रश्नांकडे आपला मोर्चा वळविला आहे. या भागातील कुपोषणाचा प्रश्न अतिशय मोठा आहे. तिच्याच दोन बहिणी आणि एका भावंडाचा याच्यामुळेच मृत्यू झालेला. कुपोषणाचे चटके सहन केलेल्या  नासरीने आता गावात गर्भवती महिलांना सकस आहाराविषयी जागृत करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच गर्भारपणात घ्यायची काळजी ती दारोदारी स्वतः जात महिलांना जागृत करते आहे. गावातील कुपोषणाचा प्रश्न लक्षात घेत तिच्या पुढाकाराने गावातील गरजू लाभार्थींना कोंबड्या आणि बकऱ्या शासकीय योजनेतून मिळवून दिल्या आहेत. आधी वेळकाढू धोरण स्वीकारणाऱ्या आरोग्य यंत्रणेलाही येथे नियमित लसीकरण आणि इतर आरोग्यविषयक कार्यक्रम राबवायला तिच्या पाठपुराव्याने भाग पाडले आहे.



नासरीच्या बोरव्हा गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत शिक्षण देणारी प्राथमिक शाळा आहे. मात्र काही दिवसांपर्यंत ही शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडलेली असायची. परिस्थिती आणि शिक्षणाच्या महत्वाची जाणीव नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडलेले....या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नासरीने आता कंबर कसली आहे. यासाठीच्या प्रसार ताकदीने व्हावा म्हणून नासरीने गावातील शाळा आणि शाळाबाह्य मुलांसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरु केलाय. यामध्ये शिक्षणासोबतच तिने  याचे महत्व तिच्या बोली भाषेतून समजावून सांगायला सुरूवत केलीय. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत या गावांतील शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये शाळाबाह्य असलेल्या मुलांनी शाळेत प्रवेश घेण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

नासरीच्या घरातील पाच बहिणी आणि दोन भावांच्या परिवारात चौथ्या क्रमांकाची मुलगी म्हणजे नासरी... गावात ना घरात शिक्षणाचे वातावरण. मात्र, आपल्या गावात असलेल्या प्राथमिक शाळेत नासरीने आपले चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. पुढच्या शिक्षणासाठी गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळेपर्यंत नासरी पायपीट करीत होती. बारावीपर्यंत नेटाने आपले शिक्षण तिने सर्व विरोध मोडून काढत पूर्ण केलेय. मात्र, पुढे परिस्थितीमुळे शिक्षण थांवावे लागल्याने आता अलीकडे तिने मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. इंग्लिश स्पिकिंग आणि व्यक्तीमत्व विकासाचे काही अभ्यासक्रमही पूर्ण केले आहेत.



घरातील, शेतातील सर्वच कामे नासरी पुरुषांच्या बरोबरीने करते. नासरीच्या या कामाची दखल अनेक ठिकाणी घेतल्या गेलीय. तिला आतापर्यंत एकूण विविध 33 पुरस्कार मिळाले आहेत. दोन वर्षांपूर्वी कृषी विद्यापीठात झालेल्या 'आंतरराष्ट्रीय शेतकरी परिषदे'त तिने सहभाग घेवून आपले अनुभव विशद केले. तिच्या कार्यामुळे भारावलेल्या केनियातील शेतकरी आणि तज्ञांनी तिला आता आपल्या देशातील शेतकऱ्यांना तिने केलेल्या प्रयोगांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण केले. विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या अनेक कार्यक्रम आणि प्रशिक्षणात नासरी आता प्रमुख वक्ता असते. आता तिच्या प्रयोगाच्या प्रसारासाठी तिने अकोला जिल्ह्याबरोबरच वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांमध्ये जागृतीचे प्रयत्न सुरु केले आहे. आपली 'लेक' मोठी होत असल्याचा तिच्या कुटुंबातील लोकांनाही सार्थ अभिमान आहे.

विदर्भातील शेतीतील नव्या बदलांची ओळख आज समाजमनाने घेणे आवश्यक झाले. विदर्भात फक्त शेतकरी आत्महत्येच्या वेदना नाहीत, तर त्यासोबतच नवनिर्मितीच्या संवेदनाही दडल्या आहेत... आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी विदर्भावरचं सारच आकाश अंधारून गेलंय असं नाही. नासरीसारखे नवनिर्मितीची 'पेरणी' करणारेही येथे अनेक आहेत. इतरांच्या दृष्टीने तिचा कृषीक्षेत्रातील नवबदलांची हा प्रयोग कदाचित छोटा असेलही, पण तो तितकाच आश्वासक आहे...  नासरीतील सकारात्मकता, जिद्द, चिकाटी, नाविन्याचा शोध घेण्याच्या दृष्टीला अन पुढील प्रवासालाही 'एबीपी माझा'च्या शुभेच्छा अन सलाम!.....