सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक शब्द चांगलाच परवलीचा झाला आहे. तो म्हणजे 'यात्रा'... राजकीय यात्रा... सध्या राज्यभरात कुठे 'महा जनादेश यात्रे'चा माहोल सुरू आहे. कुठे 'जन आशीर्वाद यात्रे'तून नव्या नेतृत्वाच्या 'लॉन्चिंग'ची धडपड सुरू आहे. तर कुठे 'माऊली संवादा'तून मातृशक्तीला चुचकारण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबरोबरच, सत्तेतल्या लोकांच्या वलयांकित यात्रांना उत्तरासाठी विरोधकांची 'शिवस्वराज्य यात्रे'ची लगबग सुरू आहे.
राज्यात गावाकडल्या यात्रांचा 'हंगाम' हा तसा साधारणत: 'डिसेंबर ते मे' या काळातला. मात्र, सध्या राज्यातल्या राजकीय यात्रा घडवल्या, भरवल्या जात आहेत ऑक्टोबरमधल्या 'राजकीय हंगामा'साठी... राजकारणातल्या सत्तेच्या 'सुगी'साठीच्या या राजकीय 'हंगाम्यानं' राज्यातलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. गावाकडे भरणाऱ्या यात्रा या भक्ती, अध्यात्म आणि परंपरांवरच्या श्रद्धांची प्रतिकं आहेत. तर 'राजकीय यात्रा' या राजकारणातील सत्ता आणि मतांप्रती राजकीय पक्ष अन नेत्यांच्या असलेल्या श्रद्धांची प्रतिकं....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याभरात 'महा जनादेश यात्रा' काढणार असल्याचं जुलै महिन्यात जाहीर केलं. त्यानंतर राज्यात पुढे प्रत्येक पक्षानं आपला राजकीय खुंटा मजबूत करण्यासाठी त्याचंच अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या 'महा जनादेश'ला शिवसेनेनं 'जन आशीर्वाद' आणि 'माऊली संवाद'नं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तर या दोघांच्या यात्रांना राष्ट्रवादीनं 'शिवस्वराज्य यात्रा' काढायचं ठरवत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
बरं!, राज्यातल्या अशा प्रकारच्या या पहिल्याच राजकीय यात्रा आहेत का?. तर असं बिल्कुलच नाही. कारण, महाराष्ट्राच्या राजकारणात अशा राजकीय यात्रांचा फार मोठा वैभवशाली इतिहास राहिला आहे. अशा यात्रांमधून राज्यातील अनेक नेत्यांना 'लोकनेते' अशी मान्यताही मिळाली आहे. तर काही नेत्यांच्या राजकीय यात्रांनी थेट सत्तेच्या सिंहासनालाच हादरे दिल्याचा इतिहास राहीला आहे. राज्यात अशा राजकीय यात्रांमधून अनेक नेत्यांनी राज्याच्या राजकारणात स्वत:चं स्थान मजबूत केलं. यामध्ये अगदी शरद पवार, गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फूंडकर अशी आधीच्या पिढीतल्या नेत्यांचा समावेश आहे. सध्याच्या पिढीत पंकजा मुंडेंनंतर आता देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर आणि डॉ. अमोल कोल्हे या नवीन पिढीतल्या नेत्यांचाही समावेश आहे.
महाराष्ट्र आणि देशात अशा राजकीय यात्रांचा मोठा रंजक आणि वैभवशाली इतिहास आहे. त्यातील जनमाणस आणि सत्तेच्या सिंहासनावर परिणाम करणाऱ्या राजकीय यात्रांची आजही मोठी चर्चा होते. महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्या वर्तमान आणि भूतकाळातील काही अशाच यात्रांचा इतिहास जाणून घेऊयात.
देवेंद्र फडणवीसांची 'महा जनादेश यात्रा'
2014 मध्ये महाराष्ट्रात भाजपनं सर्वाधिक 122 जिंकत सर्वांना आश्चर्यचकीत केलं. या निवडणुकीनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आलं. त्यावेळी एकदम थेट 'आमदार ते मुख्यमंत्री' अशी भरारी घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कुवत अन कौशल्याबाबत सर्वांनाच शंका होत्या. मात्र, मागच्या पाच वर्षांत फडणवीसांनी या सर्व शंका खोट्या ठरवल्यात. सर्व विरोधकांना नामोहरम तर केलंच. सोबत सत्तेतील शिवसेनेचं बंड मोडीत काढत त्यांनाही सोबत येण्यासाठी बाध्य केलं. असं करीत फडणवीस यांनी भाजपसह महाराष्ट्राच्या राजकारणात आपली मांड सर्वार्थानं पक्की केली. राज्यात परत आपल्या नेतृत्वात सत्ता कायम राखण्याचा निर्धार भाजपनं केला आहे. अन त्याच निर्धारासाठी भाजपनं 'फडणवीस ब्रँड' हा आपला 'हुकुमी एक्का' पुढे केला आहे. राज्यातील जनतेशी संवाद साधत मतांच्या बेगमीसाठी ही यात्रा आहे. 1 ऑगस्टपासून अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या गुरूकुंज मोझरीपासून या यात्रेला सुरूवात झाली आहे. राज्यातील 30 जिल्ह्यांतील 150 विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा जाणार आहे. 'महा जनादेश यात्रे'चा संपूर्ण प्रवास 4231 किलोमीटर एवढा असणार आहे.
राज्यात या आधी अशा अनेक राजकीय यात्रा निघाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यानं काढलेली ही पहिलीच राजकीय यात्रा आहे. ती ही अगदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर. गेल्या वर्षभरात निवडणूक हंगामात देशभरात अशा चार विविध यात्रा निघाल्या होत्या. यातील तीन यात्रा या त्या-त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काढल्या होत्या. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी अशा यात्रा काढल्या होत्या. परंतु, सत्तेसाठी यात्रा काढणाऱ्या या तीनही मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत आपली सत्ता गमवावी लागली होती. तर आंध्रप्रदेशात राज्यभर पदयात्रा काढणाऱ्या जगनमोहन रेड्डी या विरोधी पक्षाच्या नेत्याला या राज्याची सत्ता मिळाली. 'महाजनादेश यात्रा' देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला नव्या वळणावर घेऊन जाणारी यात्रा आहे. याआधी त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीच्या जनजागृतीसाठी सुधीर मुनगंटीवारांसह विदर्भात अशीच एक यात्रा काढली होती. मात्र, ती यात्रा त्यांना विदर्भापुरतं मर्यादीत करणारी होती. ही यात्रा महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाला व्यापकता देईल का?, याचं उत्तर निकालानंतरच ठरणार आहे.
आदित्य ठाकरेंची 'जन आशीर्वाद यात्रा' :
आदित्य ठाकरेंची काहीशी ओळख शिवसेनेचे 'युवराज' अशीच. ठाकरे घराण्याची शेती, मातीशी फारशी ओळख नसल्याचा त्यांच्यावरचा आरोपही अगदी नित्याचाच. त्यातही शिवसेनेतलं पुढच्या पिढीतलं 'नेतृत्व' असणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यावरही कायम एक आरोप होत असतो. 'कॉर्पोरेट कल्चर', 'नाईट लाईफ' संस्कृती जपणारा अन त्याचं पुढारपण जपणारा नेता म्हणून. शिवसेनेने त्यांची हीच प्रतिमा बदलवण्यासाठी सध्या आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाचा 'मेकओव्हर' बनविण्याचे प्रयत्न जाणिवपूर्वक चालवले आहेत. सध्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरू असलेली 'जन आशीर्वाद' यात्रा त्याचाच एक भाग. राज्यात भाजपचं वाढतं आव्हान, सेनेचं मुख्यमंत्रीपदाचं असलेलं स्वप्नं याच्यावर उतारा म्हणून सेनेनं 'आदित्यास्त्र' जमिनीवर आणलं असावं. भाजपसह विरोधकांशी लढायला जमिनीवरून जमिनीवर मारा करायच्या दृष्टीनं आदित्य पहिल्यांदाच स्वत:ला झोकून देत जमिनीवर आल्याचं चित्रं या निमित्तानं समोर आलं आहे.
या यात्रेला 18 जुलैपासून जळगावातून सुरूवात झाली आहे. आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा जवळपास 4 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री' पदाचा उमेदवार म्हणून आदित्य यांना ' लॉन्च' करण्याचा सेनेचा यामगचा मानस आहे. सोबतच राज्यातील तरूणाईला सेनेकडे आकृष्ट करत भाजपाची ताकद कमी करण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच बांधावर जात शेतकऱ्यांशी बोलणारे, तासावर सरतं धरत पेरणी करणारे, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांत मिसळत त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या आदित्य ठाकरेंना राज्यातील 'जन'ता किती 'आशीर्वाद' देणार यांचं उत्तरही लवकरच मिळेल.
यासोबतच शिवसेनेचे उपनेते आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वात 3 तीन ऑगस्टपासून 'माऊली संवाद अभियाना'ला पालघर जिल्ह्यातून सुरूवात झाली आहे. 'झी मराठी'वरच्या 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमातून 'भावोजी' या नावान बांदेकर महिला वर्गात लोकप्रिय आहेत. त्यांची लोकप्रियता 'कॅश' करीत महिला वर्गाला सेनेसोबतच जोडण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिलं जात आहे.
डॉ. अमोल कोल्हेंची 'शिवस्वराज्य यात्रा'
महायुतीच्या या यात्रांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही मैदानात उतरली आहे. यासाठी राष्ट्रवादीनं 6 ऑगस्टपासून 'शिवस्वराज्य यात्रे'च्या माध्यमातून सेना-भाजपला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. या यात्रेचा चेहरा असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे. ६ ऑगस्टला जून्नर येथील शिवनेरी किल्ल्यातून ही यात्रा सुरू होणार आहे. सध्या पक्षातून भाजप-शिवसेनेत होत असलेल्या 'आऊटगोईंग'नं राष्ट्रवादी त्रस्त आहे. पक्षाच्या संस्थापक सदस्यांपासून मोठे नेते, आमदार, नगरसेवकांच्या पक्षांतरानं राष्ट्रवादी सैरभैर झाली आहे. अशा राजकीय परिस्थितीत राज्यातील युवक-युवतींना तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हे यांना यात्रांच्या मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा राष्ट्रवादीला नवी उभारी देणार का?. या माध्यमातून राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबेल का?. अन यातून आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा जनाधार वाढणार का?, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या यात्रेला द्यावी लागणार आहेत.
राज्यात गाजलेल्या इतर 'राजकीय यात्रा' :
शरद पवारांची 'कापूस दिंडी' (1980) :
शरद पवार हे राज्यातल्या आणि देशाच्या राजकारणातलं 'वादळी' व्यक्तीमत्व. त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात संघर्षाच्या काळातलं मोठ्या संघर्षाचं वर्ष म्हणजे 1980. देशात आणीबाणीनंतर परत सत्तेत आलेल्या इंदिरा गांधींनी शरद पवारांच्या नेतृत्वातलं 'पुलोद' सरकार बरखास्त केलं. याच काळात शरद पवारांचे अनेक आमदार त्यांना सोडून गेलेत. पवारांच्या राजकीय आयुष्यच यावेळी पणाला लागलं होतं. मात्र, या परिस्थितीतही पवारांनी फिनिक्स भरारी घेतली. त्यांना यासाठीचं बळ देणारी ठरली त्यांनी जळगाव ते नागपूर अशी काढलेली 'शेतकरी दिंडी'. वर्ष होतं 1980 चं. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्यांनी नागपूर विधीमंडळावर ‘शेतकरी दिंडी’ काढली होती. त्यावेळी या दिंडीमुळे राज्यात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. पायी निघालेल्या या दिंडीनं पवारांची 'लोकनेता' ही ओळख निर्माण केली. राजकारणासोबतच कला, साहित्य, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातले अनेक नवे मित्र शरद पवारांना याच दिंडीच्या माध्यमातून मिळालेत. त्यानंतर पवार यांची राजकीय कारकीर्द अधिकच बहरली. निवडणुकीआधी बरेच आमदार सोडून गेल्यावर फक्त सहाच आमदार त्यांच्यासोबत राहिले होते. मात्र, या यात्रेनंतर झालेल्या निवजणुकीत शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे 56 आमदार राज्यभरात निवडून आलेत. कालांतराने त्यांना पुन्हा राज्याचे मुख्यमंत्रीपदही मिळाले. पुढे ते देशाचे संरक्षणमंत्री, कृषीमंत्रीही झाले.
पांडुरंग फुंडकरांची 'कापूस यात्रा' (1980) :
दिवंगत भाजपनेते पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांची ओळख 'शेतकरी नेते' अशी. मात्र, त्यांना ही ओळख मिळायला कारणीभूत ठरली त्यांनी 1980 मध्ये 'खामगाव ते आमगाव' अशी काढलेली 'कापूस यात्रा'. खामगाव ते नागपूरचं विधान भवन अशी 350 किलोमीटरची ही पायी यात्रा होती. कापसाच्या हमीभावासाठी काढलेल्या या यात्रेमुळे तेंव्हाच्या सरकारला नागपूरच्या अधिवेशनात कापसाला भाववाढीची घोषणा करावी लागली. पुढे याच आंदोलनातून मिळालेल्या ओळखीमुळे फुंडकर पक्षाचे खासदार, प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे कृषीमंत्री झालेत.
गोपीनाथ मुंडेंची 'संघर्षयात्रा' (1995) :
गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं वादळी व्यक्तीमत्व अन खऱ्या अर्थाने लोकनेता. भाजपला राज्यात तळागाळात नेण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. त्यांच्या राजकीय आयुष्यातील 1995 मध्ये त्यांनी काढलेल्या 'संघर्षयात्रे'ची महाराष्ट्रात आजही चर्चा होते. त्यांनी 1995 मध्ये शिवनेरी ते शिवतीर्थ अशा काढलेल्या संघर्ष यात्रेमुळं महाराष्ट्र पेटला होता. तेंव्हाच्या शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकार विरुद्ध त्यांनी राज्यभरात वनवा पेटवला. याच यात्रेत त्यांनी शरद पवारांचे दाऊद इब्राहिम याच्यासोबत संबंध असल्याचं सांगत खळबळ उडवून दिली होती. "राज्यात सरकार आल्यावर दाऊदला पाकिस्तानातून फरफटत आणू"... "राज्यात सरकार आल्यावर एन्रॉनला अरबी समुद्रात बूडवू" अशा त्यांच्या घोषणांनी जनतेच्या थेट हृदयाला साद घातली. त्यांच्या या यात्रेमूळे 1995 मध्ये राज्यात सत्तांतर झालं. यावर्षी पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. मनोहर जोशींच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले होते.
दिवाकर रावतेंची 'कापूस दिंडी' (2011) :
कापसाला सहा हजार भावाच्या मागणीसाठी 2011 मध्ये दिवाकर रावते यांनी कापूस दिंडी काढली होती. अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं समाधीस्थान असलेल्या गुरूकुंज मोझरी येथून या यात्रेला सुरूवात झाली होती. विदर्भातील पाच जिल्ह्यांतून गेलेल्या या यात्रेचा समारोप सेवाग्राम येथे करण्यात आला होता. याआधीही शेतकरी आत्महत्या भरात असतांना रावतेंनी शेतकऱ्यांसाठी अशीच 'सांत्वना दिंडी' काढली होती.
पंकजा मुंडेंची 'संघर्षयात्रा' (2014) :
2014 मध्ये पंकजा मुंडेंनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत 'संघर्षयात्रा' काढली. गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर पंकजांना या यात्रेनं नवी राजकीय ओळख आणि बळ दिलं. सिंदखेडराजा ते चौंडी अशी ही यात्रा होती. सिंदखेडराजा वीरमाता जिजाऊंचं जन्मस्थान. तर चौंडी आहे अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान. चौदा दिवसांची ही यात्रा राज्यातील 21 जिल्ह्यांतून गेली होती. विधानसभेच्या 79 मतदारसंघातून ही यात्रा फिरली होती. पुढे विधानसभेत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यात. अन भाजपच सरकारात पंकजा ग्रामविकासमंत्री झाल्यात. आज भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव घेतलं जातं.
देशातील राजकीय यात्रांचा इतिहास :
आपल्या देशाच्या इतिहासात अनेक राजकीय यात्रांची नोंद आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांची दांडी यात्रा प्रसिद्ध आहेत. सध्या देशात भाजपचा बोलबाला आहे. केंद्रातल्या सत्तेसह अनेक राज्यातही भाजप सत्तेत आहे. मात्र, भाजपच्या आजच्या उत्कर्षाचा पाया घातला गेला लालकृष्ण अडवाणी यांच्या रामजन्मभूमी रथयात्रेमुळे. १९९०च्या दशकातील अडवाणींच्या या रथयात्रेमुळे देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला. अडवाणींच्या यात्रेनं हिंदू मतांचं धृवीकरण करत भाजपला सत्तेच्या परिघात आणलं. पुढे 1996, 1998 आणि 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आली. या यात्रेमूळे कायम पंतप्रधानपदाच्या 'रेस' मध्ये असलेल्या अडवाणींना फक्त उपपंतप्रधान पदावरच समाधान मानावं लागलं होतं. भाजपमधल्या आणखी एका यात्रेनं या पक्षाला मोठी उभारी दिलीय. 1991 मध्ये पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी 'काश्मीर ते कन्याकुमारी' अशी 'एकता यात्रा' काढली होती. या यात्रेचा भाजपला मोठा राजकीय फायदा झाला. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जोशींच्या या यात्रेत व्यवस्थापकाच्या भूमिकेत होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची भारत यात्रा बरीच गाजली होती. 1980 च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद्यांनी थैमान घातले होते. याच काळात चित्रपट अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांनी पंजाबमध्ये शांतीयात्रा काढली होती. या यात्रेमुळे पुढे पंजाबातील शांती प्रक्रियेला मोठं बळ मिळालं.
दक्षिणेच्या राजकारणात आंध्रप्रदेशातील बाप-लेकांच्या दोन पदयात्रांनी इतिहास घडवला. ही बापलेकांची जोडी म्हणजे आंध्रप्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी आणि सध्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी. या दोघांच्या पदयात्रांनी या दोघांनाही आंध्रच्या राजकारणात 'लोकनेता' आणि 'लोकनायक' ठरवलं. दोघांच्याही पदयात्रांनी राज्यात सत्ता उलथवत स्वत:ची एकहाती सत्ता आणली. 2003 मध्ये वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी तीन महिन्यांची पदयात्रा काढली. तेंव्हा राज्याच्या सत्तेत असलेल्या चंद्राबाबू नायडू सरकारविरूद्ध त्यांनी राज्यभरात रान उठवलं. उन्हाळ्यातील रणरणत्या ऊनात त्यांनी तब्बल 1475 किलोमीटरचा प्रवास केला. या यात्रेनं पुढे 2004 च्या निवडणुकीत आंध्रात चंद्राबाबूंची सत्ता उलथवत वायएसआर यांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेसची सत्ता आली. पुढे 2009 मध्येही त्यांनी मुख्यमंत्री असतांना अशीच यात्रा काढत 2009 मध्ये परत राज्याची सत्ता हस्तगत केली.
वायएसआर यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेसला सोडत स्वत:चा 'वायएसआर काँग्रेस' हा पक्ष स्थापन केला. 6 नोव्हेंबर 2017 रोजी जगनमोहन यांनी 'प्रजा संकल्प पदयात्रे'ला सुरूवात केली. या यात्रेला आंध्रच्या जनतेनं अभूतपूर्व प्रतिसाद दिला. तब्बल 14 महिने जगन यांनी तब्बल 3648 किलोमीटर अंतर कापत ही यात्रा पूर्ण केली. देशात एवढा काळ चाललेली ही सर्वात मोठी पदयात्रा होती. वडिलांप्रमाणे जगन यांनी 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वत:च्या पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिलं. आज आंध्रमध्ये दोन तृतीयांश बहुमतासह जगन यांनी वडिलांप्रमाणे चंद्राबाबूंची सत्ता उलथवून लावली.
'यात्रा' हा पावित्र्य जपणारा शब्द आहे. मतं आणि नेतृत्वाची बेगमी करू पाहणाऱ्या या राजकीय यात्रांनी राजकारणातलं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करावा. सत्तेचं उद्दिष्ट्य ठेवतानाही विकास आणि समाजहिताचा 'अजेंडा' यामधून मांडला जावा. राजकारणातील साचलेपणाचा निचरा करत जनता आणि राजकीय पक्षांमध्ये विचारांचं नवं पर्व यानिमित्तानं सुरू व्हावं. सध्याच्या आणि भविष्यातल्या अशा सर्वच राजकीय यात्रांनी स्वत:च्या राजकारणासोबतच 'राष्ट्रधर्म' अन 'महाराष्ट्रधर्म' वाढवण्याचा प्रयत्न यातून करावा, हिच सदिच्छा!
'नेतृत्व' आणि 'मतां'च्या बेगमीची 'जत्रा' : राजकीय यात्रा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Aug 2019 10:03 PM (IST)
राजकारणातील साचलेपणाचा निचरा करत जनता आणि राजकीय पक्षांमध्ये विचारांचं नवं पर्व यानिमित्तानं सुरू व्हावं. सध्याच्या आणि भविष्यातल्या अशा सर्वच राजकीय यात्रांनी स्वत:च्या राजकारणासोबतच 'राष्ट्रधर्म' अन 'महाराष्ट्रधर्म' वाढवण्याचा प्रयत्न यातून करावा, हिच सदिच्छा!
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -