Turkey-Syria Earthquake : मानवी इतिहासाच्या कालखंडात क्रौर्याची परिसीमा गाठल्या गेलेल्या सीरियामधील युद्धाला (Syrian civil war) येत्या 15 मार्चला तब्बल 12 वर्ष होतील. अमेरिका, इस्रायल आणि सौदी अरेबियासह पाश्चिमात्य राष्ट्रांच्या खुनशी आणि आपमतलबी राजकारणाने इराक तसंच सीरियामध्ये निष्पाप जीव कीड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले गेले आहेत. सीरियामधील जवळपास प्रत्येक शहरात रक्तरंजित संघर्ष झाला. सर्वाधिक संघर्ष होम्स व अलेप्पोमध्ये झाला. 


देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्म्या लोकांना आपल्याच भूमीतून परागंदा व्हावे लागले. या रक्तरंजित घनघोर संघर्षात 6 लाखांहून अधिकांचा बळी गेला इतकी भयावह परिस्थिती आहे. युरोपमध्ये जाण्यासाठी भूमध्य समुद्र पार करताना किती जण बुडाले असतील याची मोजदाद करता येणार नाही इतकी शोकांतिका झाली आहे. या 12 वर्षांच्या वेदना कमी म्हणून की काय त्यात शक्तिशाली भूकंपाने सीरिया आणखी बेचिराख झाला आहे. 


दररोज उघड्या डोळ्यांनी मरण पाहत असताना नियतीचा हा क्रूरपणा शब्दातही वर्णन करता येत नाही, असा झाला आहे. तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या धरणीकंपाने आतापर्यंत 21 हजारांवर बळी गेला असून यामध्ये सर्वाधिक जीवितहानी युरोपचे मध्य पूर्वेतून प्रवेशद्वार असलेल्या तुर्कीत झाली आहे. तब्बल 17 हजारांवर मृत्यू तुर्कीत झाले आहेत. साडे तीन हजारांवर मृत्यू सीरियात झाले आहेत. 40 लाख लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास 12 देशांसह (भारतासह) अनेक राष्ट्रांनी मदतीचा हात पुढे केला असला, तरी झुकते माप अर्थातच तुर्कीसाठी आहे. सीरिया मात्र नेहमीप्रमाणे मदतीसाठी तळमळतो आहे. सीरियावर जगभरातून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेक राष्ट्रांना मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे 12 वर्ष युद्धात होरपळलेला जीव आता चिरडत असूनही दया आलेली नाही. 


भय येथील संपत नाही


भूकंपानंतर उत्तर सीरियामध्ये (अलेप्पो, इदलीब, हमा आणि लताकिया) आतापर्यंत 4 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. सीरियामधील विनाशकारी भूकंपानंतर आपत्कालीन बचाव पथकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक इमारतींचे नुकसान झालं आहे. तसेच जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दुर्दैवाचा फेरा म्हणजे ज्या ठिकाणी भूकंपाने रौद्ररुप दाखवलं त्याच ठिकाणी युद्धामुळे प्रदेशाचा ठिकऱ्या उडवल्या आहेत. देश युद्धाच्या खाईत गेल्याने लाखो देशवासीय विस्थापित झाले आहेत. उत्तर सीरियाचे नियंत्रण सरकार, कुर्दिशांच्या नेतृत्वाखालील सैन्य आणि इतर बंडखोर गटांमध्ये विभागले गेले आहे. भूकंपाच्या आधीही या प्रदेशातील बहुतांश भागात परिस्थिती अत्यंत गंभीर होती. हाडे गोठवणारी थंडी, पायाभूत सुविधांची वाणवा तसचे कॉलराने केलेला उद्रेक यामुळे युद्धग्रस्तांची दैना झाली आहे. सीरियातील अलेप्पो शहराचा बराचसा भाग युद्धात उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शहराच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न सुरु असतानाच नियतीने घाला घातला आहे.


भूकंप झालेल्या भागात कोणाचे वर्चस्व?


सिरियामध्ये झालेल्या भूकंपग्रस्त भागात कुर्दिश फौजा, सीरियन सरकार, जिहादी फौजा, सीरियन विद्रोही तसेच तुर्की समर्थित सीरियन विद्रोही आणि तुर्की लष्कराचा समावेश आहे. त्यामुळे या परिसरात आतापर्यंत 20 वेळा विस्थापित झाले आहेत. 


सीरिया गेल्या 12 वर्षांपासून होरपळतोय 


सन 2011 मध्ये उफाळून आलेल्या अरब स्प्रिंग चळवळीनंतर सीरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्या यांच्याविरोधात त्रस्त जनतेकडून एल्गार करण्यात आला. तब्बल 40 वर्ष आणीबाणीची झळ सोसलेल्या जनतेच्या उद्रेकावर फुंकर घालण्याऐवजी असाद यांनी त्याला परकीय फूस असल्याचा जावईशोध लावत जनआंदोलन चिरडण्यासाठी प्रयत्न केला. तेथून सुरु झालेला हा रक्तरंजित संघर्ष अमेरिका, रशिया, इराण, सौदी अरेबिया आणि तुर्की यांच्या प्रतिष्ठेचा कधी होऊन गेला याचे उत्तर आजतागायत सापडलेले नाही. 


सीरियन भूमीत वर्चस्ववादाच्या या लढाईत शिया आणि सुन्नी यांच्यामधील सुप्त संघर्षाची जोड सुद्धा आहे. ताज्या आकडेवारीनुसार सीरियामधील एकूण भूभागापैकी 63 टक्के भाग सरकारच्या नियंत्रणात आहे. सीरियन डेमोक्रॅटिक फ्रंटच्या ताब्यात 25 टक्के तर इसिसच्या ताब्यात अजूनही 1.14 टक्के आणि इतर विद्रोही गटांच्या ताब्यात 11 टक्के भूभाग आहे.


युद्धग्रस्त सीरिया होता तरी कसा?


सीरिया आखातामधील सुन्नीबहुल देशांपैकी एक. लक्षणीयरित्या इतर धर्मांतील लोकही आहेत ज्यामध्ये कुर्दीश, अर्मेनियन, तुर्कमन, शिया, खिश्चन यांचा समावेश आहे. सन 1972 पासून सीरियाची सत्ता असाद कुटुंबात एकटवली आहे. राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांचे वडील हाफेज यांचे 1971 पासून ते मृत्यूपर्यंत म्हणजेच सन 2000 पर्यंत सीरियावर अधिराज्य होते. त्यांच्या पश्चात बशर अल असाद यांनी सत्ता हस्तगत केली. आखाती देशांमधील मागासलेपण लक्षात घेता सीरिया एकाधिकारशाहीने जात असतानाही विकासाची जोड होती. संथगतीने का होईना पण मध्यमवर्गाचा स्तर सुधारत चालला होता. देशातील नागरिकांचे सरासरी वय 72 होते. दोन कोटी लोकांकडे स्वतःचे छत होते. शैक्षणिक स्तरही उंचावत होता. पण देशामध्ये 1972 पासून लादण्यात आलेली आणीबाणी कायम होती. 


ट्युनिशियामधून अरब स्प्रिंगची चळवळीची ठिणगी पडल्यानंतर अनेक आखाती राष्ट्रात त्याचे लोण पसरले. लिबिया आणि इजिप्तमध्ये सत्तांतरे झाली. सीरिया पण या चळवळीला अपवाद राहू शकला नाही. कमालीची बेरोजगारी, बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानवी हक्क संघटना सीरियावर टीका करत होत्या. त्यातच आणीबाणी लादलेली असल्याने व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत होती. लोकांचे घटनात्मक हक्क नाकारले जात होते. माध्यंमाचेही पंख कापण्यात आले होते. त्याचबरोबर विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. अशा विपरित परिस्थितीमध्ये अरब स्प्रिंगमुळे बसाद कुटुंबियांविरोधात त्रस्त जनतेला कोलीत मिळाले. त्याच कालखंडात सीरिया दुष्काळाने होरपळत होता. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी पोटाची आग शमवण्यासाठी शहरांचा मार्ग पकडला होता.


सीरियात युद्धाची सुरुवात कशी झाली?


असाद राजवटीविरोधात अरब स्प्रिंगमधून प्रेरणा घेत काही लहानग्यांनी शाळेच्या भितींवर सरकारविरोधात ग्राफिटी रेखाटण्यास सुरुवात केली. सीरियामधील डेरा शहरात हा प्रकार घडला. या प्रकारानंतर त्या मुलांना अटक करुन त्यांचा छळ करण्यात आला आणि नेमका हाच प्रसंग सीरियाच्या विनाशाला कारणीभूत ठरला. 18 मार्च 2011 रोजी सरकारविरोधात शांततेत आंदोलन सुरु असतानाच सुरक्षा दलांनी गोळीबार करुन चौघांना गतप्राण केले. 


या घटनेनंतर जनतेमधून उद्रेक होण्यास वेळ लागला नाही. एका शहरापुरते सिमित असलेल्या या आंदोलनाने देश व्यापून टाकला. लष्करामधूनच बंडखोर झालेल्यांनी "फ्री सीरियन आर्मी"ची स्थापना केली. बंडखोर गटांचा मुख्य उद्देश असाद यांची राजवट उधळून लावणे हाच होता. सरकारकडून आपल्याच देशांतील नागरिकांचा विरोध चिरडून टाकण्यासाठी रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचा आरोप झाला. या प्रकारानंतर अनेक बाह्य राष्ट्रांनी विचित्र पद्धतीने नागरिकांना समर्थन देण्याच्या नावाखाली सीरियामध्ये हस्तक्षेप करण्यास सुरवात केली.


कोण कोणाविरोधात लढतोय?


जगाच्या इतिहासात कधीच आघाड्या झाल्या नसतील अशा अघोरी पद्धतीच्या आघाड्या सीरियामध्ये बाह्यराष्ट्रांनी हस्तक्षेप करुन केल्या. राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्या समर्थनासाठी रशिया, इराण, लेबनाॅन, हेजबोल्ला, इराक, अफगाणिस्तान आणि येमेन एकटवले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सीरियामध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे असाद यांना बळ मिळाले. अमेरिकेने पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मदतीने बंडखोरांना साथ देण्यासाठी "सीरिया डेमोक्रॅटिक फ्रंट" ची स्थापना केली. यामध्ये सौदी अरेबिया, कतार, इस्रायल यांचाही समावेश आहे. 


बंडखोरांना अत्याधुनिक हत्यारे पोहोचवण्यासाठी अमेरिकेने कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. ड्रोन हल्ल्याने तर सीरियामधील सामान्य नागरिकही गतप्राण झाले. या संघर्षात अल कायदा आणि इसिसने बंडखोर गटात सामील होत सीरियामध्ये हैदोस घातला. इसिसने तर स्वतःचे खलिफत राज्य निर्माण करण्यापर्यंत मजल मारली. हे कमी म्हणून की काय कुर्दिश या अल्पसंख्याक समुदायाला चिथवण्याचे काम अमेरिकेडून करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यापासून हैराण असेल्या तुर्कीनेही सीरियामधील कुर्दिशांचा काटा काढण्याचे काम सुरु केले. इराणच्या सहभागामुळे इस्रायलची वेगळीच धोरणे सीरियामध्ये राबवत आहे. इतकी भीषण परिस्थिती सीरियामध्ये ओढवली आहे.