सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात फाईव्ह जीची कास धरणारे आपण क्षणार्धात कुठूनही कुठलीही माहिती मिळवत असतो. त्याची देवाणघेवाण करत असतो. माहितीचा हा फेरारीलाही थक्क करणारा वेग आपण अनुभवतोच. असं असलं तरीही एखाद्या कलाकाराला किंवा वक्त्याला, विचारवंताला प्रत्यक्ष जाऊन ऐकण्याचा, पाहण्याचा अनुभव काही औरच असतो. म्हणजे प्रत्यक्ष उपस्थित राहून विचारांचा हा जागर करणं, हे आज 2023 मध्येही अनेक संस्था, मंडळांनी एखाद्या व्रतासारखं सुरु ठेवलंय. मुंबईतल्या (Mumbai News) गिरगावच्या (Girgaon) कुडाळदेशकर निवासातील टोपीवाला ज्ञान मंडळ हे त्यापैकीच एक. ज्यांची टोपीवाला व्याख्यानमाला (Topiwala Vyakhyanmala) यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरं करतेय. सुरेश प्रभूंपासून आदेश बांदेकरांपर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यंदाच्या सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमालेतले वक्ते असणार आहेत. यानिमित्ताने या व्याख्यानमालेची प्रमुख धुरा वाहणारे सतीश सामंत यांच्याशी गप्पा केल्या आणि त्यांनी व्याख्यानमालेचा प्रवास मांडला.
ते म्हणाले, 1974 मध्ये आपल्या कुडाळदेशकर निवासामध्ये एक हॉस्टेल होतं. विद्यार्थ्यांसाठी त्याची स्थापना झाली होती. कोकणातून तिथे ज्ञाती बांधव शिक्षणासाठी येत असत. त्या काळात सहा महिन्यांकरता 15 रुपये आकारले जात. याच ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन टोपीवाला ज्ञानमंडळ स्थापन केलं.
तत्कालीन नगरसेवक जयप्रकाश सामंत हे ज्ञाती बांधव होते. विद्यार्थ्यांची व्याख्यानमालेची मूळ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय.
पहिल्या वर्षी पाच दिवसाची व्याख्यानमाला झाली. ज्यात पहिलं व्याख्यान स. का. पाटील यांचं होतं. त्यावेळी मी 25 वर्षांचा होतो, कार्यकारी मंडळात माझा समावेश झाला होता. माझं व्याख्यानमालेशी नातं जोडलं गेलं ते आजतागायत. या व्याख्यानमालेत त्या काळात वामनराव महाडिक, अहिल्याताई रांगणेकर, सुधीर जोशी अशी दिग्गज मंडळी येऊन गेलीत.
प्राचार्य कमलाकर तिरोडकर हे आमच्या टोपीवाला ज्ञानमंडळाचे अध्यक्ष होते. जेवढे वक्ते येत असतं, त्यांचं भाषण झाल्यावर तिरोडकर सर त्या व्याख्यानाचा सारांश सांगत. तो सारांश ऐकणं हाही काहीतरी देऊन जाणारा अनुभव होता.
दुसऱ्या वर्षीनंतर ही व्याख्यानमाला सात दिवसांची झाली. आधी डिसेंबरमध्ये मग जानेवारीत ही व्याख्यानमाला आयोजित होऊ लागली.
तिरोडकरांनंतर व्याख्यानमालेची जबाबदारी घेतली ती एकनाथ ठाकूर यांनी. त्यांनीही ती समर्थपणे पार पाडली ज्या व्याख्यानमालेची धुरा आता त्यांचे पुत्र गौतम ठाकूर वाहतायत. या व्याख्यानमालेच्या 50 वर्षांच्या प्रवासात अनेक यादगार क्षण आहेत. एका वर्षी कामगार नेते दत्ता सामंत आणि बुजुर्ग क्रिकेटर तसंच मिल मालक असलेले माधव आपटे यांच्यात वाद-प्रतिवाद झालेलं व्याख्यान मला अजूनही लक्षात आहे. कामगारांच्या प्रश्नावर ही दोन्ही मंडळी तितक्याच तडफेने मुद्दे मांडत होती. त्या काळी आतासारखे निर्बंध नसल्याने ते व्याख्यान मध्यरात्री 12 पर्यंत सुरू राहिलं. तेव्हा छायागीत सारखा कार्यक्रम दूरदर्शनवर लोकप्रिय होता. तो सुरु असतानाही व्याख्यानमालेला गर्दी माझ्या आजही लक्षात आहे.
आम्ही 2008 मध्ये एकनाथ ठाकूरांच्या पुढाकाराने राज्यभरातील व्याख्यानमाला आयोजित करणाऱ्या संस्थांचं एक अधिवेशन घेतलं. ज्याला राज्यभरातून मंडळं, संस्थांनी आवर्जून उपस्थिती लावली.
एक प्रसंग मला आजही आठवतो, जेव्हा ज्येष्ठ संगीतकार पंडित यशवंत देव हे प्रकृतीच्या कारणाने ऐनवेळी व्याख्यानाला येऊ शकले नाही. अगदी एक दिवस आधीच हे कळलं. वेळ अत्यंत परीक्षेची होती. त्यावेळी एकनाथ ठाकूर यांनी दिलीप प्रभावळकरांना एका दिवसात व्याख्यानासाठी निमंत्रित केलं. प्रभावळकरही त्यांच्या एका सांगण्यावरुन आले होते. त्यांच्यातलं घट्ट नातंच यानिमित्ताने समोर आलं.
कोरोना काळात म्हणजे 2021 मध्ये व्याख्यानमालेचा एका वर्षाचा खंड वगळता ही व्याख्यानमाला अविरत सुरु आहे. या व्याख्यानमालेच्या प्रवाहात प्रफुल्ल खानोलकरांनी मला अत्यंत बहुमोल साथ दिलीय. आज त्यांचं नसणं मला प्रकर्षाने जाणवतंय.
(संग्रहित छायाचित्र)
सामंत गिरगावातील या व्याख्यानमालेचा प्रवास मांडत असताना माझंही मी या व्याख्यानमालेशी जडलेलं नातं आठवू लागलो. म्हणजे आधी प्रेक्षकांमध्ये बसून मी अनेक क्षेत्रातल्या दिग्गजांची व्याख्यानं ऐकलीत. जानेवारी महिना उजाडला की, माझं लक्ष कुडाळदेशकर वाडीच्या बाहेरच्या लाईटच्या पोलकडे लागलेलं असे. त्या पोलवर व्याख्यानमालेची कार्यक्रम पत्रिका असलेला बोर्ड कधी लागणार याची प्रतीक्षा असे.
जिथे काही वेळा उभं राहून, अनेकदा बसून अनेकांना ऐकलंय, पाहिलंय, त्याच मंचावर तब्बल तीन मुलाखती वा गप्पांचे कार्यक्रम करण्याचा योग मला आला. हा विशेष आनंदाचा आणि समाधानाचा क्षण म्हणावा लागेल. इथे मी 2012 ला आमचा मनोरंजन विश्वातील गाढा अनुभव असणारा मित्र अमित भंडारीसोबत सिने क्षेत्रासंदर्भात गप्पा केल्या होत्या. तर, 2020 मध्ये कुडाळदेशकर निवासात ज्यांचं आजोळ होतं, त्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची मुलाखत घेता आली. तर, 2022 मध्ये ज्येष्ठ सिने लेखक अरुण पुराणिकांनी यांच्याशी गप्पा केल्या, तेव्हा मुंबईतील प्रमुख सिनेमा थिएटर्सचे इंटरेस्टिंग किस्से त्यांनी सांगितले.
टोपीवाला व्याख्यानमालेप्रमाणेच मुंबईतील आणखी काही मंडळांनी, संस्थांनी ही व्याख्यानमाला संस्कृती रुजवलीय, फुलवलीय. दादरचं अमर हिंद मंडळ त्यापैकीच एक. इथली व्याख्यानमाला ही मुंबईतील जुनी व्याख्यानमाला म्हणून ओळखली जाते. 1948 पासून सुरु झालेल्या या व्याख्यानमालेने नुकतीच पंचाहात्तरी साजरी केली. विश्वस्त अरुण देशपांडेंनी या व्याख्यानमालेची वाटचाल सांगितली. ते म्हणाले, आमच्या वसंत व्याख्यानमालेचा मी एक भाग आहे, याचा मला विलक्षण आनंद आणि समाधान आहे. या व्याख्यानमालेची मुहूर्तमेढ प्रकाशभाई मोहाडीकरांनी रोवली. त्यांचा जनसंपर्क अत्यंत दांडगा आणि बहुआयामी होता. त्यांनी सुरु केलेला विचारांचा हा प्रवाह आम्ही आताच्या नव्या दमाच्या शिलेदारांसह वाहता ठेवलाय.
एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आम्ही ही व्याख्यानमाला आयोजित करत असतो. म्हणजे सुट्ट्यांची सुरुवात आणि वसंत ऋतूची चाहूल म्हणून आमची वसंत व्याख्यानमाला.त्या काळात व्याख्यानमालेला तिकीटही असायचं. एक आणा बैठकीसाठी तर दोन आण्याचं तिकीट घेतल्यास खुर्चीवर बसायची व्यवस्था असायची. साधारण पाच ते सात हजारांचा प्रेक्षक वर्ग उपस्थित असे. व्याख्यानमालेची सुरुवात आम्ही जय जय महाराष्ट्र माझा या गीताने करत असतो. तर, व्याख्यान संपताना राष्ट्रगीत घेत असतो. या व्याख्यानमालेला तीन वर्षे जागा मिळाली नव्हती, तेव्हा आम्ही अँटोनियो डी-सिल्व्हा हायस्कूलमध्ये ती आयोजित केली. इथे साहित्यिक, कलाकार, सामाजिक, पत्रकार आदी विविध क्षेत्रातील दिग्गज येऊन गेलेत. आचार्य अत्रे तर 1948 ते 1966 या काळात तब्बल 14 वेळा व्याख्यान द्यायला येऊन गेलेत. तर, मोरारजी देसाई, वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, मनोहर जोशी हे चार मुख्यमंत्री त्या पदावर असताना इथे व्याख्यानमालेला येऊन आपले विचार मांडून गेलेत. गोविंद तळवलकर, माधव गडकरी, विद्याधर गोखले, कुमार केतकर यांसारखी दिग्गज मंडळीही व्याख्यानमालेत येऊन गेलीत.
काळानुरुप व्याख्यानमालेमध्ये आम्ही युवा पिढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय. विश्वास नांगरे-पाटील, संदीप खरे, कॅप्टन दोंदे यांसारख्या मंडळींच्या व्याख्यानांना युवा पिढीने तुफान प्रतिसाद दिला. कोरोना काळात 2020 आणि 2021 या वर्षी आम्ही ऑनलाईन व्याख्यानमाला घेतली. ज्याला परदेशातील म्हणजे अमेरिका, कॅनडातील सदस्यांचा उत्तम सहभाग लाभलाय.
सध्या वयस्कर व्यक्तींच्या व्याख्यानाच्या उपस्थितीबद्दल थोडा वेगळ्या पद्धतीनेही विचार करावा लागतो. कारण, 65 ते 70 वयानंतर त्यांना वाहनाची, टॅक्सीची गरज असते. काही वेळा त्यांना ती मिळत नाही किंवा अन्य वाहनाची व्यवस्था होत नाही. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्यावर काही बंधनं येतात. त्यामुळे त्यांची घटलेली संख्या हा एक विचारात घेण्यासारखा मुद्दा आहे. असं असलं तरीही काही वयोवृद्ध मंडळीही तितक्याच उत्साहाने येतात, हेही तितकंच खरंय.
या व्याख्यानमालेतील एक अनुभव मी कधीच विसरु शकत नाही. त्यावेळचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार धो.वि.देशपांडे हे त्या काळात वक्त्याची ओळख करुन देत असत. एकदा असं झालं की, काही कारणास्तव त्या दिवशीचा तो वक्ता येऊ शकला नाही, तर देशपांडे सरांनी त्या वक्त्याचा विषय घेऊन व्याख्यान दिलं आणि मुख्य म्हणजे उपस्थितांना त्यामध्ये गुंगवून ठेवलं. या विलक्षण प्रतिभेला आम्ही सारेच सलाम करतो.
मुंबईतील आणखी एका व्याख्यानमालेची नोंद ही घ्यावीच लागेल, ती व्याख्यानमाला म्हणजे लालबागची विवेकानंद व्याख्यानमाला. संघाचे स्वयंसेवक दादा गावकर यांच्या पुढाकारातून ती सुरु झाली. एप्रिल 1954 मध्ये विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची स्थापना झाली आणि 1958 मध्ये व्याख्यानमाला सुरु झाली. महानगरपालिकेच्या शाळेत जिथे अभ्यासिका वर्ग भरायचे तिथे व्याख्यानमाला सुरु झाली.
या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प सचिन तेंडुलकरचे वडील कवी रमेश तेंडुलकर यांनी गुंफलं होतं. पहिल्यापासून ही व्याख्यानमाला तिकीट लावूनच होत असते. पहिल्या व्याख्यानाचं तिकीट एक आणा होतं. नंतर तीन, चार आणे करत करत ते वाढलं. आता पाच व्याख्यानांसाठी आम्ही तीस रुपये शुल्क देऊन पास देत असतो. याकरता आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन व्याख्यानमालेबद्दल, तिथे येणाऱ्या वक्त्यांबद्दल माहिती देत असतात.
यातून मंडळाचा कार्यकर्ता आपसूकच इव्हेंट मॅनेजमेंटचे धडे गिरवत असतो. भारतमाता सिनेमा, बीईएसटी क्वार्टर्स, लक्ष्मी कॉटेज, परेल या भागात आम्ही पोहोचत असतो. आम्ही साधारण 30 ते 35 हजार घरांपर्यंत पोहोचतो. तिथे आमच्या संस्थेबद्दलही आम्ही माहिती देत असतो. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची मध्यवर्ती कार्यकारिणी ही 60 जणांची असते. प्रत्येक विभागात 10 गटप्रमुख असतात. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही व्याख्यानमाला होत असते. इथल्या गाजलेल्या व्याख्यानांबद्दल सांगायचं तर अनेक दिग्गजांनी हा मंच गाजवलाय. त्यात द्वारकानाथ संझगिरी, दिलीप प्रभावळकर, सिंधुताई सपकाळ यांच्या व्याख्यानांना तुफान गर्दी झालेली मी पाहिलीय.
आम्ही सध्याच्या काळानुसार, सोशल मीडियावर फेसबुक, ट्विटर, इंस्टावरही याची जाहिरात करत असतो. आमच्या प्रत्येक व्याख्यानाला साधारण 800 ते 1000 इतकी प्रेक्षक संख्या असते. कोजागिरी पौर्णिमेपासून पासेसची विक्री होत असते. ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर या व्याख्यानमालेत येऊन गेले आणि नंतर त्यांनी आमच्या व्याख्यानमालेबद्दल लेख लिहिला. आमच्यासाठी हे एक मोठं सरप्राईज होतं.
आमची संस्था लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असते. छंद वर्ग, विविध वाद्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून आम्ही मुलांसाठी उपक्रम आयोजित करत असतो. जून, जुलैमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन होत असतं. आमच्या संस्थेतर्फे कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, क्रिकेट स्पर्धाही होत असतात. याशिवाय आमचा कलाविभागही आहे, ज्यात नाटक, एकांकिका सादर केल्या जातात. निर्मिती सावंत, पंढरीनाथ कांबळे, महेंद्र कदम, कमलेश सावंत, अतुल तोडणकर या कलाकारांची जडणघडण इथूनच झाली, असंही व्याख्यानमाला प्रमुख कमलेश जगदाळे आणि माहिती संकलनप्रमुख किशोर टापरेंनी हा आठवणींचा पट उलगडताना आवर्जून सांगितलं.
व्याख्यानमालेचं हे बीज रोवणाऱ्या आणि त्याचा वृक्ष जोपासण्यासाठी मेहनत करणाऱ्या अशा अनेक संस्था, मंडळांना या त्यांच्या योगदानाबद्दल वंदन करुया.