वेळ : रात्री 11.30,


स्थळ: गावाशेजारच्या 12 फूट रुंद ओढ्याच्या आतमध्ये (साप, विंचू, काटे काहीही असण्याची शक्यता)

काम: पोकलेन ऑपरेटरला ओढा खोली, रुंदी कशी करायची, हे क्लिप्स मधून समजावताना.

गाव रातंजन, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर.

या चष्मावाल्याचं सोलापूरला BE इलेक्ट्रिकल झालंय. 2013 पासून पाच वर्ष तो MPSC साठी झटतोय. गेल्या वर्षी शेवटी प्री क्लीअर झाला, मग मेन्स, मग फिजीकल क्लिअर झाला, मग इंटरव्ह्यूही झाला, पण नेमकं रिझल्ट यायच्या आत कोर्टाचा PSI भरतीवरच स्टे आला.

त्याने पुढच्या वर्षी परत परीक्षा दिली, परत प्री आणि मेन्स क्लीअर झाला. आता फिजीकल आहे, पण परत स्टे आलाय. याच्या गावात जिम नाही, फिजीकलची स्टेप महत्त्वाची असून त्याच्या तयारीसाठी त्याने बार्शी या तालुक्याच्या ठिकाणी जिमसाठी रुम केलीय अन तिथे राहतोय. आता त्याने सगळे फिजीकल क्लिअर झालेले PSI करतात - तसं पूर्ण वेळ बार्शीत राहून, ज्या परीक्षेसाठी इंजिनिअर असूनही 5 वर्ष मातीत घातलीत, त्या परीक्षेच्या फिजीकलची तयारी करणे अपेक्षित आहे- कारण कोर्ट निकाल केव्हाही लागू शकतो.

पण घडतंय काहीतरी वेगळंच.

8 एप्रिल पासून सुरू झालेल्या वॉटर कप स्पर्धेतून बाद होता-होता याचं गाव थोडक्यात वाचलं, कारण- गावाचा निरुत्साह. अन 8 तारखेपासून गावातून अतिशय संथ गतीने आणि उगीचच करायचं म्हणून काम सुरू झालं. निव्वळ तुटपुंजं. अशात 5, 6 गावकऱ्यांनी आठव्या दिवशी मिळून CCT खांदली. त्यात हाही सहज म्हणून गेलेला. ट्रेनिंग घेतलेला एक जणही त्यात होता. पण काहीच काम न समजलेला. काम झाल्यावर तालुक्याच्या ग्रुपवर त्यांनी सहज फोटो टाकले. तर त्यांना 'पाणी फाऊण्डेशन टीम' चा फोन गेला की हे काम कंटूरवर नाही अन पूर्ण चुकलंय. कारण त्यांनी हायड्रोमर्कर न वापरताच CCT घेतले होते. ह्याला वाईट वाटलं. 5, 6 जणांनी 2 तास झटून केलेलं सगळे कष्ट वाया. याला लक्षात आलं की हे काम तितकंसं सोपं नाही. गाववाले असंच काम करत राहतील तर रिझल्ट शून्य आहे. त्याने आणि गावातल्या अजून एकाने मिळून मग जाऊन हायड्रोमार्करचं सामान आणून ते स्वतः बनवलं. नवव्या दिवशी काम सुरू केलं. पण अजून 5, 6 जणच येत होते, त्यात CCT ची आखणी कोणालाच करता येईना. याने मग पाणी फाऊण्डेशनची आखणी वाली व्हिडिओ क्लिप अॅपवर पाहिली. अन स्वतःच आखणी करायला लागला. हा आता पाणी फाऊण्डेशनच्या कामात नकळत पूर्ण ओढला गेला. एक-एक दिवस त्याचा जीव तुटायला लागला, दोन पर्याय समोर होते.

1. PSI च्या फिजीकलची तयारी, बार्शीला जाऊन तयारी करणं.
2. ह्या गावात राहून पाणी फाऊण्डेशनच्या कामात जमेल तितकी मदत.

घरच्यांचा बार्शीला जाण्यासाठी फोर्स वाढत होता. चॉईस अवघड होता, जवळ-जवळ करिअरवर पाणी पडण्याची शक्यता. त्यात गावाने उशिरा काम सुरू केल्याने अन त्यातही 10-20 जणच येत असल्याने, पाणी फौंडेशनमधे नंबर येणं तर आता शक्यच नाही हेही त्याला संपूर्ण माहीत होतं. तरीही आपण गेलो तर, मग तर इथं काहीच काम होणार नाही, पाणीच मुरणार नाही... असं वाटून म्हणून मग त्याने शेवटी गावातच थांबायचा अतिशय धाडसी अन दुर्मिळ निर्णय घेतला. काम अवघड. त्यात लोक नाहीत.

आता काम सुरू होऊन 3 दिवस झाले होते अन स्पर्धा सुरू होऊन 10 दिवस. अजूनही गावातले लोक कामाला कमीच. फक्त 20-25 जण. गावची लोकसंख्या 3000 हजावर. म्हणजे 1 टक्का सुद्धा लोक नीट येत नव्हते.

अशात सध्या ह्याचं काम असं सुरू झालं...

सकाळी 5.30 ला उठून, थोडं काहीतर खाऊन हा श्रमदानाला लोकांना बोलवायला गावात जातो. मग 6.15 च्या आसपास हे 20 जण गावापासनं 2 किमीवर असलेल्या डोंगरावर जातात. तिथं हा फिरून 'साईट सलेक्शन' करतो, मग करायचा उपचार निवडतो. श्रमदानापैकी कोणाला अॅपमधे माहिती भरता येत नाही म्हणून ह्याने ते पाणी फाऊण्डेशन प्रतिनिधीकडून शिकून घेतलं. मग हा त्या साईट बद्दलची सर्व माहिती अॅपमध्ये फोटो काढून, गट नंबर, शेतकऱ्याचे नाव, करावयाचा उपचार वगैरे सगळं भरतो. मग हायड्रोमार्कर, फक्की, पाणसळ घेऊन CCT ची आखणी करायला घेतो, आखणी पूर्ण झाली की सगळे मिळून CCT खांदायला घेतात, त्यात ह्याच्याही हातात कधी कुदळ, कधी खोऱ्या, कधी पाटी तर कधी पिचिंग ची दगडं. ""मुद्दाम वेगवेगळी कामं""". हे पूर्ण झालं की अॅपमध्ये पुन्हा माहिती भरणं. सकाळी 8, 9 पर्यंत श्रमदान करुन पुन्हा रनिंगला. 4,5 किमी रनिंग करुन घरी, जेवण आंघोळ. कामाची एवढी सवय नसल्याने अंग आता दुखायला लागलेलं असतं. पण पुन्हा एक, अर्ध राहिलेलं महत्वाचं काम याला हाती घ्यावं लागतं. गावातल्या एक दोघांच्या मदतीने ह्याने मशीनसाठी जे डिझेल लागेल त्याच्या वर्गणीच्या लोकांची स्वतः लिस्ट तयार केलीय. मग हा दुपारी 11, 12 च्या कडक उन्हात ती लिस्ट घेऊन बाहेर गावात पडतो, घरोघरी जाऊन, पैसे गोळा करत राहतो, कोणी 50, कोणी 100, कोणी 20 रुपये, कोणी 1000 - देईल ते सगळे घेतो. काहींना फॉलो-अप फोन करतो. गाववाल्यानी बँकेत ह्याच्याच नावाने खातं उघडलय. मग ते सगळे गोळा केलेलं पैसे, चेक वगैरे सगळं नेऊन बँकेत जमा करतो. ह्यात 2, 3 तास जातात. परत घरी घेऊन थोडा आराम करतो की तिसऱ्या पारा 4, 5 च्या आसपास नर्सरीत, तिथे 5000 ची रोपवाटिका करायला सुरुय. मग तिथे जाऊन, काही पुरुष अन महिला सोबत असताना- पिशव्यांत माती भरणे, त्यात बिया टाकणं, त्यांना पाणी देणं अशी कामे सुरु. त्यात 2,3 तास जातात. मग तिथल्या लोकांना मार्गदर्शन करुन हा परत संध्याकाळी ज्या गावकऱ्यांना श्रमदानाला जायचंय त्यांना घेऊन परत फील्डवर, एक, दोन तास काम. की परत हा गावातल्या सभागृहात येतो. काम सुरु झाल्यावर याने त्याच्या गावातल्या कामाला येणाऱ्या लोकांतून, प्रत्येक कामासाठी एक टीम तयार केलीय. (पण बरीचशी कामे अजूनही ह्यालाच करावे लागतात.) मग त्यांची रोज एक आढावा बैठक संध्याकाळी 8-9 वाजता असते. तिथं तो प्रत्येक कामाची माहिती घेऊन, एका वहीत रोज सगळ्या नोंदी करून, आज झालेलं काम अन उद्या करायची कामं यावर चर्चा होते. प्रत्येक टीम प्रमुखाला तो, समाधानकारक किंवा असे काहीसे शेरे देतो. कामाची माहिती देतो. त्यात 1 तास जातो. आता रात्रीच्या 10, 10. 30 वाजलेल्या असतात. घरी काहीतरी तुटपुंज खाऊन हा परत झोपायच्या आधी - जिथं पोकलंड मशीनने काम सुरु आहे, त्या गावाशेजारच्या ओढ्यात 2 किमी वर जातो. ते काम नीट चालु आहे की नाही ते पाहायला. तिथं काही ठिकाणी काही काम चुकलेलं असेल तर हा गडी रात्रीच पाणी फाऊण्डेशनची क्लिप लावून त्या मशीन ऑपरेटरला ओढ्यातच बसून, त्याला क्लिप प्ले, पॉज करत सगळी माहिती नीट देतो. त्याला नीट समजलंय का हे पाहून शेवटी, रात्री 11.30, 12 ला घरी येतो. ----------- अन आपलं फाटकं-तुटकं अंग मग कॉटवर अक्षरशः फेकून देतो. इथवर आता कशाचीच शुद्ध राहिलेली नसते. पाय हे पाय नसतात, हात हे हात नसतात, मेंदू हा मेंदू नसतो, फक्त श्वास अन ह्रदयाची ठाक-ठाक चालू म्हणून चालू. नुसतं मेलेलं जिवंत शरीर. बाकी सगळं निव्वळ सुन्न.......... कसलीच हालचाल नाही.

थोडक्यात ज्या कामासाठी अनेक गावांत हजार हजार लोकं आहेत तिथं हा तेच काम एकटा खांद्यावर घेऊन फिरतोय. मी आतापर्यंत स्पर्धा सुरू असलेल्या 34 गावात फिरलोय. त्या अनुभवावरुन छातीवर हात ठेवून प्रचंड आत्मविश्वासाने सांगतोय की हा जे करतोय ते humanly impossible आहे. त्याने पाणी फाऊण्डेशनचं कोणतंही ट्रेनिंग घेतलेलं नाही, फक्त क्लिप्स बघून हा तो सगळी कामे स्वतः करतोय.

आता मात्र गावातले 150-200 लोक याच्यासोबत याचं काम पाहून, लाजून शेवटी जोडले गेले आहेत.

त्याला विचारलं की "अरं तू हे सगळं करतोय, तुझ्या गावचा ना नंबर येणार आहे, ना करोडो लिटर पाणी वाचणाराय, ना कोण तुला बाहेरचं भेटायला येणाराय, अन याउपर म्हणजे - मग तुझ्या करिअरचं काय?? उद्या कधीही कोर्टाचा निकाल लागला तर तू कशी फिजीकल परीक्षा पास होणाराय??, या 5 वर्षांचं, घरच्यांचं काय??"

त्याचं मग शांत अन डोळ्यात बघत दिलं गेलेलं उत्तर अंगावर शहारे आणून ह्रदय तडकून टाकतं...

तो म्हणतो,

"1. PSI च्या फिजीकल परीक्षेत पुल-अप्स काढाव्या लागतात, त्याची मी श्रमदानात रोज सकाळी खोऱ्याने माती ओढून प्रॅक्टिस करतोय. 2. परीक्षेत लोखंडी गोळा फेक करावी लागते, त्याची प्रॅक्टिस मी कुदळीने रोज CCT खांदुन करतोय. त्याने मनगटात अन हातात ताकद येतेय. 3. दगड अन मुरमाची पाटी उचलली की खांदा म्हणेल इतका ताणला जातो, 4. शिवाय ह्या सगळ्या शारीरिक कामात दम भरून फुफुसाची ताकद वाढतेय, सो पळायला स्टॅमिना वाढतोय. निकाल कधीही येवो, मी पास हुईल यात मला शंका नाही, त्यापेक्षा मोठा प्रश्न हा आहे की , मी उद्या PSI होऊन गावा बाहेर गेलो तर परत गावासाठी इतकं झटून काम करायची संधी मिळणार नाही. दुसरी गोष्ट इंटर्व्हिवमध्ये अनेकजण खोटी उत्तरे देताना समाजसेवेची आवड म्हणून सांगतात, मी actual काम केल्याने मला खोटं बोलावं लागणार नाही, ना माझी इच्छाय खोटेपणाची. तिसरी गोष्ट, माझी गावातली इमेज चांगलीय, मग गरीब लोक मला 10 तरी रुपये अन श्रीमंत मला 5, 5 हजार देतानाबी खुश असतात. त्याचा फायदा शेवटी गावच्या पाणी साठ्यालाच होणाराय..!,,,

माझ्या एवढ्या अॅडजस्टमेंटवर गावात पाणी मुरून शेतकरी मरायची थांबणार असतील तर माझा एक जीव, माझी एकट्याची करिअरची स्वप्न त्या मानाने खूपच लहान आहेत!!!....."

--

काल रात्री त्याचे हे शब्द आठवत अक्षरश: डोळ्यात पाणी साचवत झोपी गेलो............ सगळं प्रत्यक्ष अनुभवलेलं, त्याचं खपाटीचं पोट, आत गेलेले डोळे.

माझ्या दृष्टीने रातंजनचा "अजित देशमुख" पाणी फाऊण्डेशनच्या आजपर्यंतच्या इतिहासातला, Gretest Water Hero आहे......

""झोपायच्या वेळचे स्वतःला जिवंत ठेवायचे श्वास सोडले तर या 24 तासातनं झोप सोडून उरलेले सगळे श्वास, ह्याने पाणी फाऊण्डेशनच्या कामाला दिलेत.""