"द ग्रेट वॉल ऑफ इंडिया!" भारतीय महिला हॉकी संघाची गोलरक्षक सविता पुनियासाठी हे विशेषण अगदी अचूक लागू पडावं. कारण टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताच्या महिला हॉकी संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयात गुरजीत कौरइतकाच वाटा सविता पुनियाचाही होता. याचं कारण एक दोन नव्हे तर तब्बल नऊ वेळा सवितानं ऑस्ट्रेलियाचं आक्रमण यशस्वीरित्या परतवून लावलं.

 

भारतीय महिलांनी ऑलिम्पिक हॉकीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारली. पण हा विजय भारतासाठी खास होता. कारण हा इतिहास रचताना भारतानं तीन ऑलिम्पिक सुवर्ण जिंकलेल्या बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारली आणि या सामन्याची सामनावीर ठरली ती गोलरक्षक सविता पुनिया.

 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघ उपांत्य फेरी गाठेल असं काल परवापर्यंत तरी कुणालाही वाटलं नव्हतं. कारण ऑलिम्पिकच्या गटसाखळीतच भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक होती.



सलामीच्या लढतीत नेदरलँड्सनं भारताला 5-1 अशी धूळ चारली. त्यानंतर जर्मनीकडून भारताला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. ग्रेट ब्रिटनकडून 4-1 असा पराभव स्वीकारून भारतानं पराभवाची हॅटट्रिक केली. पण गटसाखळीतल्या चौथ्या सामन्यात भारतानं कमबॅक करत आयर्लंडला 1-0 असं नमवलं. मग दक्षिण आफ्रिकेवरच्या 4-3 अशा विजयानं भारतीय महिलांना टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीचं दार उघडून दिलं.


पण उपांत्यपूर्व फेरीत भारतासमोर आव्हान निर्माण झालं ते ऑस्ट्रेलियाचं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये गटसाखळीतला एकही सामना ऑस्ट्रेलियानं गमावला नव्हता. शिवाय याआधीची ऑस्ट्रेलियाची कामगिरी भारताच्या तुलनेत कितीतरी पटीनं अधिक सरस होती. पण रानी रामपाल आणि कंपनीनं आत्मविश्वासानं सुरुवात केली. पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी साधली, दुसरं सत्र सुरू झालं आणि भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ आणि भारताची एकमेव ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरनं संधी साधली आणि गोल डागला.


गुरजीतचा हाच गोल भारताच्या या ऐतिहासिक विजयात निर्णायक ठरला. दुसऱ्या सत्रात भारतानं घेतलेली ही आघाडी टिकवून ठेवण्याचं काम केलं ते भारताच्या बचावपटूंनी. त्यांचा अप्रतिम बचाव आणि गोलरक्षक सविता पुनियाची भिंत ऑस्ट्रेलियन आक्रमणाला अखेरपर्यंत भेदता आली नाही.

 

हरयाणाच्या 31 वर्षीय सविता पुनियाचं हे दुसरं ऑलिम्पिक आहे. याआधी रिओ ऑलिम्पिकमध्येही सविता पुनियाचा भारतीय संघात समावेश होता. सवितानं आजवर 202 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलंय. 2017 साली आशिया चषक सुवर्णपदक, त्याचबरोबर 2014 आणि 2018 च्या एशियाडमध्ये पदक भारताला पदक मिळवून देण्यात सविताचं मोठं योगदान राहिलंय.

 

1980 साली भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळला होता. त्यानंतर 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ बाराव्या स्थानावर राहिला. पण टोकियोत मात्र भारतीय महिलांनी कमाल केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघानं पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत खेळतानाही सविता पुनिया नावाची ही भिंत पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांसमोर अभेद्य ठरावी हीच अपेक्षा.