Covid 19 Treatment cost : कोरोनाच्या आजारातून सहीसलामत बाहेर पडल्याचा आनंद काही रुग्णांसाठी जास्त काळ टिकत नसल्याचे चित्र दिसून आले आहे. या आजाराचे उपचार घेऊन घरी गेल्यावर फार कमी रुग्णांना पोस्ट कोविड ( कोरोनाच्या उपचारानंतर निर्माण होणाऱ्या व्याधी ) नंतर व्याधी होत असल्याचे चित्र दिसत आहेत. त्यामध्ये विशेष करून असे काही आजार आहेत की घरी गेल्यावर अनेक दिवस लोकांना उपचार घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या उपचारांपेक्षा ह्या नंतरच्या उपचारांचा खर्च नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून या उपचारांच्या शुल्कावर  सुद्धा सरकारने काही तरी नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या उपचारांच्या शुल्कावर सरकारने नियंत्रण ठेवल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे.  


या आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात बहुतांश नागरिकाचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात चुकून कोरोनाच्या आजाराचा संसर्ग झाला तर  कुटुंबातील काही सदस्याचे मानसिक आरोग्यही अडचणीत येत आहे. नागरिक जो पर्यंत इन्शुरन्स किंवा पैसे आहेत तो पर्यंत पैसे देत असतात. मात्र त्यानंतर त्यांची अवस्था केविलवाणी होती. विशेष करून ग्रामीण भागात याचा विशेष फटका जाणवला आहे. 


काही रुग्णांना कोरोनाच्या उपचारानंतरही थोड़ा अधिक त्रास होऊन त्यांना दुसऱ्या व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काही रुग्णांना घरीच रोज सिलेंडरने ऑक्सिजन घ्यावा लागणे,  फुफ्फुसांवर काही वेळा व्रण आल्याने असे उपचार घ्यावे लागत असतात. हे आजार बहुतांश नागरिकांना होत नसले तरी ज्या  नागरिकांना होतो त्यांची मात्र अक्षरशः भंबेरी उडते. 


त्यातच आता दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजराचे रुग्ण राज्यभर सापडू लागले आहेत. या आजाराची गंभीरता एवढी आहे की काही रुग्णांचे डोळे आणि जबडा काढावा लागत आहे. त्या आजाराच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येत आहे. अनेक रुग्णांना कर्ज काढून उपचार करावे लंगर आहे. या आजराच्या उपचारात काही इंजेक्शन्स रुग्णांना दयावी लागत आहे. त्यामध्ये एका इंजेक्शनची  किंमत  60-70 हजार आहे, दीड महिना काही वेळा ही औषधे दयावी लागत आहे. 2 ते 6 तासापर्यंतच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. या सगळ्याचा खर्च 5 लाखांपासून ते 20 लाखांपर्यंत जातो.      


याप्रकरणी अधिक माहिती देताना कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. मिलिंद नवलाखे सांगतात, "या पूर्वीही या आजरावर आम्ही उपचार करत होतो. मात्र या कोरोनाच्या  या काळात या आजराने अधिक प्रमाणात डोके काढले आहे.  रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते त्यांना हा आजर जडत असल्याचे दिसत आहे. विशेष करून हवेतील धुळीतून या आजराचा प्रसार होत असतो. तसेच कोरोनच्या आजारात रुग्णांची प्रतीकारशक्ती कमी होते, त्यात त्यांना स्टिरॉइड्स आणि अन्य औषधे उपचाराचा भाग म्हणून दिले जातात. त्यामुळे त्यांची तब्येत नाजूक असतेच.  नाकाच्या आत काळी बुरशी जमा होते आणि त्याचा परिणाम चेहऱ्याच्या इतर भागांवर होतो. यामध्ये काही वेळा कुणाचा एक डोळा तर कुणाचा जबडा काढावा लागतो. आम्ही खूप वेळा हे अवयव वाचविण्याचा प्रयत्न करतो. पण काही वेळा पर्याय नसतो. त्यामुळे या अशा शस्त्रीक्रिया करणे आणि महागडी इंजेक्शन या आजाराच्या उपचारात कराव्या लागल्याने ह्या आजाराचा खर्च खूप महाग जातो. या खर्चावर नियंत्रणासाठी जी चांगली गुणवत्तेची ज्याचा वापर केल्याने चांगले परिणाम दिसले आहेत अशी औषधे स्वस्त दरात कशी खरेदी करता येतील यासाठी मोठ्या स्तरावर प्रयत्न व्हावे लागतील. सध्या या औषधांचा बाजारात मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे." 


काही रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची खरेदी करावी लागत असून त्याची किंमत 40-80 हजाराच्या घरात आहे. तर काही रुग्ण हे उपकरण भाडेतत्वावर घेत आहेत त्यासाठी महिन्यांना काही 2-3 हजार खर्च येत आहे. त्यात औषधे आहेत त्याचा खर्च येत आहेच. या रुग्णामध्ये विशेष करून कोरोनाच्या आजाराबरोबर सहव्याधी मधूमेह, रक्तदाब, संधिवात असणारे अनेक रुग्ण आहेत. याशिवाय स्ट्रोक, हृदयविकार, फुफ्फुसाच्या व्याधी, असेही आजार होत आहेत, या आजरात मोठ्या प्रमाणात खर्च हा होत असतो.  


"पोस्ट कोविड काही प्रमाणात फुफ्फुसाचा संसर्ग (लंग्स फायब्रोसिस ) होऊ शकतो त्याकरिता घरीच रुग्णाला ऑक्सिजन घेऊन उपचार घ्यावे लागतात. त्यात 80-9 हजाराचा खर्च येतो. हे प्रमाण कमी आहे. योग्य वेळी योग्य उपचार घेणे हा उत्तम मार्ग आहे, लक्षणे येताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजराची तीव्रता वाढायच्या आधीच उपचार घ्या." असे मत पुणे येथील के इ एम रुग्णालयाचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी यांनी व्यक्त केले.