कोरोना काळातून वाट काढत पुढे जाणाऱ्या सर्वच क्षेत्रांप्रमाणे भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठीही उद्यापासून मिशन बिगिन अगेनची सुरुवात होतेय. तीही एका अशा मोहिमेने जिकडची गेल्या दौऱ्यातली सुखावह कामगिरी आजही गुदगुल्या करुन जाते. मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात जेव्हा आम्हाला आठवतं कोहलीच्या टीम इंडियाने ऑसी टीमला कसोटी मालिकेत त्यांच्याच भूमीत धूळ चारली होती. त्यातही जेव्हा आम्हाला कळतं की, अशी कामगिरी करणारे आम्ही एकमेव एशियन आहोत. तेव्हा हा आनंद द्विगुणित होतो,


हे सारं खरं असलं तरी, तो इतिहास आहे आणि सध्याची मालिका हे वर्तमान आहे. त्यात समोर कांगारुंसारखा खडूस संघ आहे, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंवर गेल्या वेळी कारवाईपायी संघाबाहेर राहण्याची वेळ आली होती, ते दोघेही यावेळी उपलब्ध आहेत. जोशात आहेत, हे आयपीएलने दाखवून दिलंय. खास करुन वॉर्नर. त्यामुळे गेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांच्या बॅटी शिवशिवत असणार हे नक्की.


मागच्या पराभवाची सल या अख्ख्या टीमच्या मनात बोचत असणार. त्यामुळे यावेळचं आव्हान आणखी कडवं असेल. त्यात भारतीय संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे पहिल्या कसोटीनंतर पत्नीच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतणाऱ्या विराट कोहलीची उर्वरित तीन सामन्यांमधील अनुपस्थिती. कलर्ड क्लोदिंग क्रिकेटसाठी कोहली संघात असला तरी रेड बॉल क्रिकेटने जे घमासान होईल, त्या पूर्ण युद्धासाठी कोहली उपलब्ध नसेल. हा फॅक्टर क्रुशल ठरणार का, हे येणारा काळच ठरवेल.


त्यातच सध्याच्या क्वारंटाईन नियमांप्रमाणे रोहित शर्माही पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दोन प्रमुख अस्त्रांशिवाय फलंदाजीला उतरताना रहाणे अँड कंपनीची खरी कसोटी लागणार आहे.


समोर मिचेल स्टार्क अँड कंपनी असणार आहे. ज्यांचा पेस, बाऊन्स आणि मूव्हमेंट भारतीय फलंदाजांच्या फळीची परीक्षा घेईल हे निश्चित. खास करुन लेफ्ट आर्म पेस बोलर मिचेल स्टार्कचा अँगल, त्याच्या उंचीमुळे त्याला मिळणारा बाऊन्स आणि मूव्हमेंट ही त्रिसूत्री त्याला आणखी धोकादायक बनवून जाते. त्यातच मालिका गमावल्याचं दु:ख मनात ठेवून मैदानात उतरणारी ऑसी टीम ही डबल डेंजरस असणार आहे. त्यात खेळपट्टीची भूमिकाही महत्त्वाची असेल. कसोटी मालिका एडलेड, मेलबर्न, सिडनी आणि ब्रिस्बेनच्या मैदानात रंगेल. यात धोकादायक ठरु शकणाऱ्या पर्थचा समावेश नसला तरी अन्य चारही खेळपट्ट्या या भारतीय टीमचा कस पाहणाऱ्याच असतील, यात शंका नाही. खास करुन गेली मालिका गमावल्यानंतर ऑसी टीम भारतीय संघाला वेगवान माऱ्याने सळो की पळो करुन सोडण्यासाठी उत्सुक असेल.


अर्थात यावेळीही गेल्या वेळप्रमाणेच आपल्याकडे बुमराह अँड कंपनीचं तोडीस तोड आक्रमण आहे. तेही फॉर्मात आहेत. आयपीएलमधील बुमराह, शमी यांची कामगिरी उत्साह वाढवणारीच राहिलीय. त्यामुळे कांगारुंना ट्रॅप लावताना विचार करावा लागेल. कारण, त्या सापळ्यात ते अडकण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.


बुमराह, शमी दोघांकडेही सातत्याने वेगवान म्हणजे 140 किमी प्लस वेगाने मारा करण्याची क्षमता आहे. यॉर्कर, स्लोअर वन, स्विंगमुळे दोघांचाही भाता समृद्ध आहे. त्यामुळे जर ऑसी आक्रमण तिखट मिरच्यांचा जाळ काढेल तर भारतीय गोलंदाजीही काही गुलाबजामची पंगत वाढणार नाही. आपल्या गोलंदाजीतही हिसका दाखवणारा अन् ठसका लागणारा तिखटपणा आहे.


गोलंदाजी तोडीस तोड मॅचिंग असल्याने जो संघ फलंदाजी उत्तम करेल, धावांची रास घालेल, त्याचंच पारडं जड राहणार आहे.


अर्थात हे सारं आपण कसोटी मालिकेच्या अँगलनेच जास्त बोलतोय. कारण, वनडे, टी-ट्वेन्टीचा खेळ हा अधिक बेभरवशी आणि त्या त्या दिवसावर अवलंबून असतो. तिथेही टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या अरे ला कारे करण्याची हिंमत बाळगून आहे.


अगदी कोरोना काळामुळे अनेक महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सराव नसला तरीही, पुन्हा एकदा भिस्त फलंदाजीवरच असणार आहे. इथेही रोहित शर्मा नसला तरी कोहलीला धवन, राहुल, श्रेयस अय्यर, पंड्या अशी फटकेबाज फलंदाजीची फळी दिमतीला आहे. अर्थात रोहित शर्माचा नॉक आऊट पंच काही वेगळा असतो, तरीही ही फलंदाजी मालिका जिंकून देण्याच्या क्षमतेची नक्कीच आहे, असं आताच्या घडीला तरी म्हणायला वाव आहे.
ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा त्यांच्याच भूमीत अस्मान दाखवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. मंजिल मुश्किल जरुर है...नामुमकिन नही....ऑल द बेस्ट टीम इंडिया.