टी-ट्वेन्टी वर्ल्डकपचा मंच. भारत-पाकिस्तान (IND vs PAK) मॅच. अखेरची ओव्हर. किंग कोहली (Virat Kohli) मैदानात. दिवाळीची पूर्वसंध्या.
क्रिकेट मैफलीसाठी यापेक्षा प्रेक्षणीय भैरवी असूच शकत नाही. त्या मैफलीची सांगताही भारतीय चाहत्यांना अपेक्षित झाली आणि विजयाचा सूर अवघ्या भारतात निनादला.
खरं तर, अखेरच्या ओव्हरमधील प्रत्येक चेंडू ब्लडप्रेशर वाढवणारा होता. खेळाडूंचं आणि चाहत्यांचंही. त्या क्षणी बर्फही ज्याच्याकडून थंडपणा उसना घेईल अशा धीरोदात्त वृत्तीचं दर्शन घडवणारा कोहली, गेल्या काही महिन्यात म्हणजे आयपीएल विजेतेपद पटकवल्यापासून प्रत्येक सामन्यागणिक मॅच्युअर होत जाणारा हार्दिक पंड्या आणि अखेरचा एकच चेंडू खेळायला मिळून त्यातही कोहलीच्याच टेम्परामेंटचा रिप्ले दाखवणारा अश्विन. हे सारं अविश्वसनीय होतं. हे लिहितानाही अंगावर काटा येतोय. आम्ही न्यूजरुममध्ये मॅच अपडेटची बातमी करता करता तो थरार पाहत होतो. अश्विनने तो चेंडू मिडऑफवरुन टोलवला आणि पुढची काही मिनिटं फटाक्यांच्या आवाजालाही फिका पाडेल असा विजयोत्सवाचा ध्वनी न्यूजरुमसह अवघ्या भारतात दुमदुमत होता. या आवाजाला कोणत्याही डेसिबलची मर्यादा नव्हती. कारण, या आनंदालाच कोणती सीमा नव्हती.
एक रोमांचक सामना पाहण्याचा हा अनुभव घेऊन आपण आता सामन्याचं विश्लेषण जरी करत असलो तरीही ही निखाऱ्यावरची वाट होती. तीही काही प्रमाणात आपणच निर्माण केलेली. म्हणजे आधी सात बाद 120 वरुन पाकिस्तानला (Pakistan) आपण 159 पर्यंत पोहोचू देणं आणि नंतर स्वत: चार बाद 31 अशा स्थितीत पोहोचणं.
या अवघड वाटेवरुन आपण सामना फिरवला, म्हणून कोहलीच्या खेळीचं मोल अधिक आहे. पाकिस्तानची गोलंदाजी खेळपट्टीचा मसाला घेऊन तिखटपणा दाखवत असताना कोहलीने सुरुवातीला पोट भरण्यासाठी एकेरी-दुहेरी धावांची मदत घेतली. पण, खराब चेंडूचा समाचार घेणंही सोडलं नाही. पहिल्या 29 चेंडूंत 28 धावा, नंतरच्या 14 चेंडूंत 22 धावा आणि मगच्या 10 चेंडूंमध्ये 32 धावा. याला म्हणतात गिअर बदलणं. मैदान टी-ट्वेन्टीचं असलं तरीही इथे थेट 20 ओव्हर्सचा विचार करुन चालत नाही. तुम्हाला तीन-चार ओव्हर्सचे छोटे सेगमेंट करुन खेळावं लागतं. इथे 15-20 रन्सच्या एखाद-दोन ओव्हर्सही सामना तुमच्या पोटातून बाहेर काढून प्रतिस्पर्ध्याच्या खिशात घालू शकतात. म्हणजे बघा ना. 17 ओव्हरनंतर आपल्याला 18 चेंडूंमध्ये 48 धावा हव्या होत्या. इथे आधी आफ्रिदीवर कोहलीने हल्ला चढवला. मग 19 व्या ओव्हरमध्ये अखेरच्या दोन चेंडूंवर स्वप्नवत षटकार ठोकले. त्यातला फाईन लेगच्या बाजूला मारलेला षटकार हा आजच्या दिवसातलं मोरपीस होतं. तो शॉट आठवून कधीही मनाला गुदगुल्याच होतील. म्हणजे अझर, लक्ष्मणसारखे मनगटी फटक्यांचे जादूगार आपण पाहिलेत. त्यांनाही अभिमान वाटेल, अशी मनगटी नजाकत त्या फटक्यात होती. कोहलीला तितकीच समर्थ साथ पंड्याची मिळाली. म्हणजे कोहलीचं टायमिंग, त्याचा टच पंड्याला समोरुन जाणवत होता. त्यामुळे तो उगाचच आक्रमक खेळून त्याला मॅच व्हायला गेला नाही. उलट त्याने कोहलीला चांगलं कॉम्प्लिमेंट केलं आणि गरज भासली तेव्हा आक्रमणाची तलवारही उपसली. कोहली मात्र दुसरीकडे कमालीचा फ्लोमध्ये खेळत होता. आक्रमकतेतली ताकद, फटके मारतानाचा देखणेपणा, टायमिंग, फूटवर्क याचा संगम त्याच्या फलंदाजीत दिसत होता. त्याची ही इनिंग इतकी स्पेशल होती, की पत्नी अनुष्काची पोस्ट आली. कामगिरी भन्नाट, लव्ह यू विराट. खरं तर अवघा देशच हे म्हणतोय. या पोस्टमधलं एक वाक्य महत्त्वाचं होतं, ही इनिंग एका खडतर काळानंतर झाली होती. म्हणजे कोहलीकडून आपण नेहमी शतकांची, मोठ्या खेळीची अपेक्षा ठेवत असतो. मध्यंतरीच्या काळात त्याच्या बॅटला शतकांचा, मोठ्या इनिंगचा उपवास घडलेला. तो उपवास त्याने अलिकडेच सोडला आणि आपल्यासाठी तसंच टीम इंडियासाठी ही समाधानाची बाब आहे की, त्याची ही धावांची भूक आता पुन्हा एकदा वाढलीय.
इथे कोहलीचं कौतुक करत असताना अर्शदीपच्या गोलंदाजीचं आणि पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीचंही ते करावं लागेल. म्हणजे अर्शदीपने बाबरसारखा मोहरा शून्यावर टिपणं, समोरच्या टीमचं मनोधैर्य किती खचवू शकतं. हे आपण पाहिलं. पाकचा डोलारा सात बाद 120 असा कोसळला. अर्शदीप चेंडू चांगले स्विंग केले. मुख्य म्हणजे त्याने लेफ्टी-राईटी कॉम्बिनेशन समोर असून लाईन-लेँथ बिघडू दिली नाही. अर्शदीप आणि पंड्याने पिचमधील बाऊन्सचा उत्तम वापर केला.
त्याच वेळी डेथ ओव्हर्समध्ये आपण जास्त रन्स दिल्या याकडेही अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे 16.4 ओव्हर्समध्ये सात बाद 120 वरुन शेवटच्या 20 चेंडूंमध्ये आपण त्यांना 39 धावा कुटू दिल्या. टूर्नामेंट निर्णायक टप्प्याकडे जाताना या कामगिरीत आपल्याला सुधारणा करावी लागेल. तसंच आघाडीच्या फळीने केलेली निराशाही थोडी धाकधूक वाढवणारी आहे. म्हणजे रोहित शर्मा, राहुल आणि सूर्यकुमार यादव तिघेही एकाच वेळी फ्लॉप ठरणं. यावरही विचार व्हायला हवा. अर्थात सूर्या सध्या चांगल्या टचमध्ये आहे. पण रोहित आणि राहुलकडून खास करुन अधिक चांगल्या सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे.
क्रिकेटचा खेळ आपल्याकडे देशवासियांना एकवटतो. आपला सगळा थकवा, वेदना, दु:ख, निराशा विसरायला लावतो. हे आजच्या सामन्यावरुन दिसून आलं. जनसामान्य रस्त्यावर उतरुन जल्लोष करत होते. तर, माजी कर्णधार सुनील गावसकरांसारखे दिग्गज मैदानात चक्क आनंदाच्या भरात नाचत होते. क्रिकेट त्यातही भारत-पाक सामन्याचा हीच तर खासियत आहे. दिवाळीच्या फटाक्यांआधीच कोहली नावाच्या बॉम्बने पाकिस्तानच्या मनसुब्यांच्या चिंधड्या उडवल्या. अवघ्या देशाला दिवाळीच्या पूर्वसंध्येला याहून यादगार भेट ती कोणती असावी. पण, या भेटीने पोट भरलेलं नाही, 2007 च्या धोनीच्या कामगिरीची पुनरावृत्ती व्हावी, एक कप और हो जाये.