आज देशभरात 'नॅशनल डॉक्टर्ड डे' साजरा केला जातोय. आपल्या जीवनात डॉक्टरांचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही. कोरोना काळात जीवाची बाजी लावत रात्रंदिवस रुग्णांसाठी झटणारे डॉक्टर अवघ्या जगाने पाहिलेत. कोरोना काळातील डॉक्टरांचं हे काम पुढची अनेक शतकं आठवणीत राहिल. म्हणूनच आजचा दिवस डॉक्टरांनी केलेल्या रुग्णसेवेसाठी समर्पित आहे. आजच्या नॅशनल डॉक्टर्स डेच्या दिवशी तीन इंटरनॅशनल डॉक्टरांनी दाखवलेले शौर्य येथे आवर्जुन आठवतं. आपल्या 'रुग्णांना' आजारी पाडून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या या डॉक्टरांना आजही स्मरण केलं जातं. त्यांनी त्यांच्या वैद्यकीय पेशाचा वापर करुन लोकांचे जीव वाचवण्याचं कर्तव्य ज्या प्रकारे बजावलं त्याबद्दल आजही त्यांचं कौतुक होतंय. तर कोण आहेत हे डॉक्टर्स जाणून घेण्यासाठी आपल्याला सात दशकं मागे जावं लागले. 


जर्मनीचा हुकूमशाह हिटलर  किती क्रुर होता हे अवघ्या जगाला माहित आहे. त्याने ज्यू लोकांचा केलेला नरसंहार महाभंयकर होता. 1941 ते 1945 यादरम्यान हिटलरच्या नाझी सैन्याने जवळपास 60 लाख ज्यूंना जीवे मारलं. युरोपमधील एकून ज्यूंच्या संख्येच्या ही संख्या दोन तृतीयांश होती. म्हणजे युरोपमध्ये ज्यूंची संख्या 90 लाख होती ती या नरसंहारानंतर अवघी 30 लाख राहिली. नाझी सैन्याकडून झालेल्या या नरसंहाराचं वर्णन 'होलोकॉस्ट' म्हणूनही केलं जातं. यासाठी हिटलरने हजारो छळछावण्या (Concentration camps) तयार केल्या होत्या. तेथे ज्यू लोकांना डांबलं जायचं. येथे ज्यू नागरिकांवर विविध प्रकार अत्याचार केला जात असे आणि त्यांना क्रूरपणे मारलं जात होतं. त्यामुळे ज्यू लोकांमध्ये नाझी सैन्याबाबत मोठी भीती होती.   


या कठीण काळातही काहींनी नाझी सैन्याच्या हिमतीने, चातुर्यांने सामना केला आणि हजारो ज्यूंना वाचवलं. मुसोलिनीच्या फॅसिस्ट राजवटीच्या काळात इटलीमध्ये ज्यू लोकांवर अत्याचार सुरु होते. या होलोकॉस्टमध्ये इटलीतीलही जवळपास 9 ते 10 हजार ज्यू मारले गेले होते. मुसोलिनी हा हिटलरचा निकटवर्तीय मानला जात होता. त्यामुळे नाझी सैन्याने इटलीमध्ये ज्यूंचा छळ सुरु केला होता. 1943 मध्ये नाझी सैन्य आक्रमक होऊन इटलीत ज्यूंना शोधत होतं. दरम्यान 16 ऑक्टोबर 1943 मध्ये नाझी सैन्याने रोममधील ज्यू लोकांच्या वस्तीवर हल्ले करण्यास सुरुवात केली. रोममधील टायबर नदीच्या मध्यभागी एक छोटसं बेट होतं, तिथे 450 वर्ष जुनं फेटबेनेफ्रेटेली नावाचं हॉस्पिटल होतं. तिथे काही ज्यूंनी (25 ते 50) आश्रय घेतला. मात्र नाझी सैन्य येथेही छापा टाकणार हे निश्चित होतंच.


महाभयंकर आजाराचं प्लानिंग


या हॉस्पिटलचे इन्चार्ज डॉ. गिओनी गोरोमिओ हे होते. डॉ. गोरोमियो यांच्याबद्दल सांगायंच तर याआधी फॅसिस्ट पार्टीकडून इतर महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये प्रमुखपदाची ऑफर त्यांना होती. मात्र केवळ वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी ती नाकारली होती. त्यामुळे फेटबेनेफ्रेटेली हॉस्पिटल आधापासून ज्यूंसाठी आश्रयस्थान मानलं जात होतं.  मग आता हॉस्पिटलमध्ये आश्रयाला आलेल्या या ज्यू लोकांना कसं वाचवायचं हा यक्ष प्रश्न हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि स्टाफ समोर होता. यामध्ये डॉ. गोरोमिओ यांच्यासोबत डॉ. विटोरिओ सॅकरडोटी आणि डॉ. आंद्रियानो ओसीसिनी यांनी एक योजना आखली. या योजनेअंतर्गत जे कुणी ज्यू नागरिक हॉस्पिटलमध्ये येतील त्यांना महाभयंकर आजार झाल्याचं सांगून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घ्यायचं. मात्र तो आजार पुस्तकात आढळणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. त्यांनी या आजाराला 'सिंड्रोम के' (Syndrome K) किंवा 'के सिंड्रोम' असं नाव दिलं. या आजाराच्या नावामागचं लॉजिकही इंटरेस्टिंग आहे. हा आजार पूर्णपण काल्पनिक होता, याचा कुठेही उल्लेख नाही. 


Syndrome K नाव कुठून आलं? 


'सिंड्रोम के' का? तर हे नाव दोन क्रूर नावांवरुन देण्यात आलं होतं. रोममधील नाझी सैन्याचा प्रमुख अल्बर्ट केस्सरलिंग (Albert Kesserling) आणि रोम शहरांचा पोलीस प्रमुख हर्बर्ट कॅपलर (Herbert Kappler) या दोघांच्या नावातील (Kesserling आणि Kappler) 'K' यावरुन या आजाराला Syndrome K असं नाव देण्यात आलं. आता या हर्बर्ट कॅपलरची क्रुर ओळख सांगायची तर त्याने मार्च 1944 मध्ये जवळपास 335 इटालियन नागरिकांना जीवे मारलं होतं. 


त्यामुळे प्लाननुसार सगळं सुरळीत व्हावं यासाठी आश्रयाला आलेल्या रुग्णांना त्यांना असलेला आजार महाभयंकर वाटावा म्हणून जोरजोराने खोकण्याचा सल्ला देण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे नाझी सैन्याने या रुग्णालयावर छापा मारलाच. त्यावेळी त्यांना डॉक्टरांनी सिंड्रोम के आजाराबाबत सावध केले. रुग्णालयात या आजारानेग्रस्त रुग्ण असून या अतिसंसर्गजन्य रोगाची लागण झाल्यास न्यूरोलॉजिकल डिजीस होण्याचा इशारा नाझी सैन्याला देण्यात आला. याचे रुपांतर अंर्धांगवायूचा झटका किवा इतर भयंकर आजारात होऊन मृत्यू ओढावण्याची भीती दाखवली गेली. त्यामुळे जोरजोरात खोकणारे रुग्ण पाहून यांना कर्करोग किंवा टीबी असल्याचा अंदाज नाझी सैन्याने वर्तवला आणि तिथून पळ काढला. 


नाझी सैन्याच्या तावडीतून सुटका व्हावी यासाठी येथील ज्यू नागरिकांना शहरात इतरत्र सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. त्यानंतर मे 1944 मध्ये नाझी सैन्याने पुन्हा एकदा या रुग्णालयावर छापा मारला. त्यावेळी येथे पाच पोलिश ज्यूंना पकडण्यात आलं. मात्र दुसरं महायुद्ध संपल्यानंतर या पाच जणांनाही सोडण्यात आलं. 


काही वर्षानंतर फेटबेनेफ्रेटेली हॉस्पिटलमध्ये घडलेली ही घटना समोर आली. क्रुर अशा नाझी सैन्यासमोर अशी जीवघेणी योजना आखून ज्यू लोकांचे प्राण वाचवणे यासाठी मोठं धाडस लागतं. तिथे घडलेल्या एका चुकीमुळे आपला मृत्यू निश्चित ही जाणीव असून देखील डॉ. गोरोमिओ, डॉ. विटोरिओ सॅकरडोटी आणि डॉ. आंद्रियानो ओसीसिनी यांनी दाखवलेलं शौर्य आजही तेथील नागरिकांच्या आठवणीत आहे. 2016 मध्ये फेटबेनेफ्रेटेली 'House Of Life' म्हणून घोषित करण्यात आले. अशारितीने या तीनही डॉक्टरांनी ज्यू नागरिकांचे प्राण त्यांना आजारी पाडून वाचवले.