स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कायम अग्रणी राहिलेला असे जहालमतवादी क्रांतीकारक. 'ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा, प्राण तळमळला' सावरकरांच्या या काव्यपंक्तीतून त्यांचं देशाप्रति असलेलं प्रेम प्रतित होतं. दूरदृष्टी, विज्ञानवादी क्रांतीकारक ही सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू. 23 डिसेंबर 1910 रोजी सावरकरांना 25 वर्षांची पहिली आणि 30 जानेवरी 1911 रोजी त्यांना 25 वर्षाची दुसरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. पण, जनरेट्याच्या मागणीपुढं त्यांची अंदमानच्या काळकोठडीच्या कारागृहातून 6 जानेवारी 1924 रोजी सुटका झाली. यावेळी सावरकारांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आलं. असं असलं तरी त्यावेळी त्यांना दोन अटी मात्र इंग्रज सरकारनं घातल्या होत्या. पहिली म्हणजे, राजकारणात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घ्यायचा नाही. तर, दुसरी अट ही सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय रत्नागिरी जिल्हा सोडून जायचे नाही. त्यानंतर 6 जानेवारी 1924 ते 17 जून 1937 अशी तेरा वर्षे सावरकारांनी रत्नागिरीमध्ये काढली. या कालावधीत त्यांनी भाषण, लेखन, आंदोलने, हिंदु संघटन, अस्पृश्यता निर्मुलन, व्यायामप्रसार, स्वदेशीचा आग्रह असे विविध कार्यक्रम राबवले. नाशिक ही सावरकांची जन्मभूमि असली तरी रत्नागिरी ही सावरकरांची एका अर्थानं कर्मभूमि होती. ही बाब देखील महत्त्वाची. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या तेरा वर्षाच्या काळात रत्नागिरी शहर, आसपासची गावं आणि जिल्ह्यात केलेल्या कामांचा, कार्याचा आढावा इतिहास तज्ञ्ज आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या मदतीनं केलेला प्रयत्न!


'सावरकरांना आपल्या सोयीनुसार बांधलं गेलंय'
सावरकरांचं रत्नागिरीतील तेरा वर्षातील कार्य नेमकं काय होतं? याबाबत 'एबीपी माझा'नं रत्नागिरीतील इतिहासाचे निवृत्त प्राचार्य डॉ. आर. एच. कांबळे यांच्याशी बातचित करत त्यांचं कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बोलताना डॉ. कांबळे यांनी 'सावरकरांना प्रत्येकानं आपल्या सोयीनं घेतलं आहे. त्यांच्या कार्याबद्दल, विचारांबद्दल मतमतांतरं असू शकतात. पण, त्यांनी केलेलं काम हे निश्चितच महत्त्वाचं होतं. तो काही राजकारणाचा विषय होवू शकत नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं कार्य देखील महत्त्वाचं आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेला. बसता-उठता स्वातंत्र्य हाच विचार ज्याच्या डोक्यात घोळत होता असा हा आद्य क्रांतीकारी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. मुळात त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. विचार विज्ञानवादी होते. ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही. प्रत्येकाच्या आजुबाजुची परिस्थिती त्याला एका ठराविक अशा दिशेनं विचार करण्यासाठी भाग पाडते. धर्माबद्दल त्यांना अभिमान होता हे नाकारण्याचं कारण नाही. पण, त्याचवेळेला त्यांचे 'गाय, एक उपयुक्त पशु, माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे' हे विचार देखील ध्यानात घेतले पाहिजेत. अशी प्रतिक्रिया दिली.


यावेळी डॉ. काबंळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या रत्नागिरीतील कार्यावर देखील भरभरून माहिती दिली. त्यांनी त्यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकारांचे रत्नागिरीतील कार्य' या त्यांच्याच पुस्तकाचा देखील दाखला दिला. सन 1924-25 साली प्लेगची साथ आली आणि सावरकर नाशिकला गेले. पण, ही परवानगी केवळ तीन महिन्यांपुरतीच होती. रत्नागिरीमध्ये देखील यावेळी प्लेग असला तरी सरकारी आदेशामुळे त्यांना रत्नागिरीमध्ये परतावं लागलं. त्यानंतर सावरकर रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या शिरगांवमध्ये कै. विष्णुपंत दामले यांच्या घरी वास्तव्याला होते. सरकारची अवकृपा होईल या भीतीनं त्यांना कुणी घर देईना. पण, ते दामले यांनी दिलं. ही खोली अत्यंत लहान अर्थात बार फुट लांब आणि सात फुट रूंद होती. तसं पाहिले तर ते दामल्यांचे भाताचे कोठार होते. त्याला फक्त एक दरवाजा आणि लहान खिडकी होती. याच खोलीत सावरकरांनी 'हिंदुपदपातशाही' हा आपला इंग्रजी ग्रंथ लिहिला. याच ठिकाणाहून त्यांनी 'तुम्ही-आम्ही सकल हिंदू बंधु बंधु' अशी साद देत अस्पृश्यता निर्मुलनाच्या कार्याची सुरूवात केली. त्यांनी 'पहिल्या संमिश्र हळदीकुंकू' कार्यक्रमाचे देखील आयोजन केले.


साक्षरता प्रचार सारखा क्रार्यक्रम देखील हाती घेतला. अस्पृश्यता निर्मुलन, व्यायामप्रसार आणि स्वदेशीचा आग्रह ही त्यांची त्रिसुत्री होती. तो काळ असा होता की त्या काळात अस्पृश्यांसोबत कुणी एकत्र जेवत नसे. पण, सावरकारांनी हा रिवाज मोडीत काढत सर्वांसाठी एकत्र पंगत सुरू केली, ऐवढंच नाही तर, गजानन दामले यांच्या व्यवस्थापनाखाली त्यांनी 'अखिल हिंदू उपहारगृह' सुरू केले. अस्पृश्यांना त्यावेळी मंदिरात प्रवेश नव्हता. मूर्तीला किंवा देवाला स्पर्श करून त्यांना दर्शन घेता येत नसे. याकरता त्यांनी भागोजीशेठ किर यांच्या मदतीनं सर्वधर्मियांसाठी अशा पतित पावन मंदिराची स्थापना केली. 10 मार्च 1929 रोजी श्रीमंत शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या हस्ते या मंदिराचा कोनशिला समारंभ पार पडला. इतकंच नाही तर अखिल हिंदू गणेशोत्सवाची सुरूवात देखील याच पतित पावन मंदिरातून झाली. 21 सप्टेंबर 1931 रोजी दुपारी मनोरमाबाई देवरूखकर यांच्या अध्यक्षतेखाली तीस-पस्तीस सुविद्य स्त्रिया, वीस-पंचवीस अस्पृश्य स्त्रिया यांचे पहिले स्नेहभोजन याच पतित पावन मंदिरात पार पडले. तसेच अस्पृश्यांना जानवी देण्याचा कार्यक्रम घेत त्यावर आपले परखड विचार देखील सावरकरांनी व्यक्त केलेत. आपल्या रत्नागिरीतील वास्तव्यात तात्याराव अर्थात सावरकरांनी उ:शाप, सन्यस्त खडग ही नाटके लिहिली. मोपल्यांच्या बंडावर आधारित अशी मोपल्यांचे बंड, अर्थात मला काय त्याचे ही कादंबरी लिहिली. 'हिंदूपदपातशाही' हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. लिपीशुद्धी आणि भाषाशुद्धी यांची आवश्यकता प्रतिपादन करणाऱ्या पुस्तिका लिहिल्या. शिवाय, महाराष्ट्राच्या वाड्:मयांत अमर ठरलेलं 'माझी जन्मठेप' हे पुस्तक देखील सावरकरांनी यांच रत्नागिरीतील वास्तव्यात लिहिलं. अशी माहिती त्यांनी दिली. शिवाय, डॉ. कांबळे यांच्या पुस्तकात देखील याबाबतचे उल्लेख दाखल्यांसह आढळून येतात.


सावरकरांचं रत्नागिरीतील वास्तव्य आणि त्यांचं कार्याबाबत आम्ही रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार, सावरकरांबाबत ज्यांचा दांडगा अभ्यास आहे, अशा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्याशी देखील बातचित केली. मसुरकर गेली 40 वर्षे पत्रकारिेतेत असून राज्य शासनाकडून पत्रकारितेतील कामाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. सावरकरांच्या जीवनाबाबत, रत्नागिरीतील वास्तव्य आणि कार्य याबाबत बोलताना त्यांनी सावरकरांच्या कार्याची, त्यांच्या व्यक्तिमत्वाची वेगळी बाजु मांडली. यावेळी 'एबीपी माझा'शी बोलताना मसुरकर यांनी 'सावरकर हे दूरदृष्टी, विज्ञानवादी आणि सामरिक नितीचा अभ्यास केलेले व्यक्तिमत्व होते ही बाब लक्षात घेतली पाहिजे. सावरकरांकडे, त्यांच्या कार्याकडे पाहताना आपण 1947च्या आधीचे सावरकर नेमके कसे होते? हे पाहिले पाहिजे. सावरकर इंग्लंडला गेले. त्यावेळी त्यांनी जोसेफ मॅझिनीचा अभ्यास केला. इंग्लंडमध्ये त्यावेळी मुक्त विचारांचं व्यासपीठ उदयाला आलेलं होतं. त्यामुळे त्यांच्याकरता त्यावेळी त्या ठिकाणचं वातावरण हे पोषक होते. त्यांच्या काही विचारांशी, काही मतांशी सहमती होऊ शकत नाही. ती मतं टोकाची देखील असतील. पण, याचा अर्थ असा अजिबात होत नाही की आपण त्यांचा, त्यांच्या विचारांबाबत टोकाची भूमिका घेतली पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान विसरता देखील येणार नाही आणि ते नाकारता देखील येणार नाही ही बाब आपण सर्वांनी ध्यानात घेतली पाहिजे.


सावरकर हिंदुत्वाच्या मुद्यांकडे का वळले?
आता सावरकर हिंदुत्वाच्या मुद्यांकडे का वळले? त्यामागे देखील कारण आहे. अंदमानच्या तुरूंगात असताना त्यांना आलेले अनुभव. त्यावेळची नेमकी परिस्थिती कशी होती? हे सर्वांनाच ठावूक आहे. त्या परिस्थितीचा परिणाम हा प्रत्येकाच्या मनावर मतावर होत असतो. तो सावरकांच्या देखील झाला असावा. त्यांचं देशकार्यात आणि समाजकार्यातील योगदान हे नक्कीच मोठं आहे. ज्यावेळी त्यांनी राजकारणात सक्रीय होता येणार नाही या अटींवर इंग्रजांनी रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध केलं तेव्हा त्यांनी केलेलं कार्य मोठं आहे. अस्पृश्यता निवारणासारखं कार्य त्यांनी केलं, ज्याची दखल देश पातळीवर घेतली गेली. त्याकाळी असलेली जातीपातीची सारी परिस्थिती पाहता आपल्याला ते कार्य किती महत्त्वाचं होतं, याची किमान जाणीव नक्की येऊ शकते. अस्पृश्यता निर्मुलनासाठी त्यांनी केलेल्या कार्यामागे समाजानं आपल्यामधील घटकांना अशी वागणूक देता कामा नये असा त्यामागे उद्देश किंवा अशी ती निखळ भावना होता. रत्नागिरीमध्ये असताना त्यांना या कामी कर्मठ लोकांची साथ मिळाली ही बाब देखील ध्यानात घ्यायला हवी. कारण, त्याकाळी जातीपातीची परिस्थिती काय होती हे सर्वांना ठावूक आहे. याच त्यांच्या कर्मभूमित अर्थात रत्नागिरीमध्ये कर्मठ लोकांनी अस्पृश्य मुलांच्या शाळेसाठी त्यांना जागा दिली होती. याचा अर्थ आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यसाठी ते यशस्वी होत होते. नाहीतर ते शक्य होतं का? हिंदू लोकांना उद्योजक बनवण्याच्या दृष्टीनं देखील त्यांनी त्यावेळी प्रयत्न केले.



स्वदेशीला ते महत्व देत होते. अनेक वस्तु साबण, साखर ते याच ठिकाणी तयार करण्यावर भर देत. याबाबत आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. साखर विकल्यानंतर जेव्हा वर्षाकाठी केवळ दोन रूपयांचा फायदा झाला असं त्यांना सांगितलं गेलं तेव्हा, त्यांनी 'अरे किमान ते दोन रूपये तरी आपल्या देशात राहिले नाहीतर ते इंग्रजच घेऊन गेले' असते असं उत्तर दिलं. यावरून त्यांचा दृष्टीकोन आपल्या लक्षात येतो. सावरकरांच्या दूरदृष्टीची देखील आपल्याला उदाहरणं घेता येतील. अंदमान-निकोबार बेटं ही सामारिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत. ती आपल्याकडे राहिली नाहीत तर जपान त्यावर राज्य करेल असं मत त्यांनी माडलं होतं. सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या व्यक्तिनं देखील त्यांच्याशी चर्चा केली होती. एकंदरीत त्यावेळची सारी परिस्थिती पाहिली, अभ्यास केला तर एक गोष्ट नक्की होते कि सुभाषबाबुंनी देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. दुसऱ्या महायुद्धात भारतीयांनी सामिल व्हावं. जेणेकरून या प्रशिक्षणाचा फायदा आपल्याला सहज होईल यामागे देखील देशाच्या स्वातंत्र्याबाबत एक विचार होता. हे आपण समजून घेतलं पाहिजे. सावरकरांना समजून घेताना त्यावेळी त्यांच्याबाबत घडलेले प्रसंग, त्यावेळची सारी परिस्थिती याचा विचार देखील झाला पाहिजे. त्याच्या काही विचारांवर चर्चा होऊ शकते. पण, त्यांनी रत्नागिरी येथे तेरा वर्षात केलेलं कार्य आणि त्यांच्या कार्याचा असणारा आवाका, त्या कार्याच्या सकारात्मक बाजू या दुर्लक्षित करून चालणार नाही हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. अशी प्रतिक्रिया दिली. रत्नागिरीमध्ये वावरताना तुम्हाला या साऱ्या गोष्टी आजही पाहता येतात. त्यांच्या कार्याच्या साऱ्या खुणा आजही रत्नागिरी शहर आणि आसपासच्या भागात आपल्याला दिसून येतात.