अपना टाईम आयेगा! या गली बॉय सिनेमामधील रॅपनं तरुणाईला चांगलंच वेड लावलं होतं. पण या रॅपसोबतच 'अपना टाईम अपून लायेगा' असेही अनेक कोट्स व्हायरल होत होते...अगदी अशाचप्रकारे मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वत:ची वेळ बदलवत जागतिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडणारा क्रिकेटर म्हणजे सूर्यकुमार यादव... तर स्काय, सूर्या अशा विविध नावाने प्रसिद्ध मुंबईकर सूर्यकुमार यादवला  भारताकडून खेळण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली, हे आपण सारेच जाणतो...पण सूर्याचा आतापर्यंतचा प्रवास, स्ट्रगल, अपब्रिगिंग कसं होतं जाणून घेऊ...


मायानगरीतला चमचमता हिरा


मुंबई मायानगरीनं भारतीय क्रिकेटला अनेक अनमोल हिरे दिले. यात अजित वाडेकरांपासून ते सचिन तेंडुलकर आणि आता युवा पृथ्वी शॉ अशी अनेक नावं आहेत. यातीलच एक नाव म्हणजे सूर्यकुमार यादव...जसं तेजदार नाव तसाच प्रखर आणि तेजस्वी खेळ असणाऱ्या सूर्यकुमारचं आगामी टी20 विश्वचषकासाठीच्या संघात नाव आलं आणि त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला...कारण सूर्या खेळत असलेली चार नंबरची जागा म्हणजे सर्वाधिक धोकादायक आणि मागणी असणारी...अगदी युवराज, रायडू, रैना अशा दिग्गजांची मारामारी असणारी ही जागा यंदाच्या विश्वचषकात मात्र सूर्याला मिळणार हे नक्की झालं आहे. संजू, श्रेयस अशा दमदार खेळाडूंच्या रेसमध्ये प्रथम येत सूर्यानं ही जागा मिळवली आहे.


फॅन्सचा लाडका सूर्यादादा


पण 32 वर्षीय सूर्याला इथवर पोहोचायला उशीर झाला असं अनेकांचं मत आहे, आता ते काही प्रमाणात खरंही आहे. कारण संघात त्याच्या अनुभवाचे खेळाडू हे 25 ते 28 अशा वयातील आहेत. पण सूर्याने अगदी तिशी पार केल्यावर त्याला भारतीय संघाचं तिकीट मिळालं. पण असं असलं तरी लेट आलेला सूर्या अगदी थेट आला आहे हे देखील तितकचं खरं... कारण सध्या संघात असणाऱ्या खेळाडूंमध्ये चाहत्यांचं मोठ्या प्रमाणात प्रेम सूर्याला मिळतं... याचं कारण त्याचा दमदार आणि फुल ऑन एन्टरटेनिंग खेळ... तर सूर्या आता जरी चमकत असला तरी या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने संयम दाखवत मोठी प्रतिक्षा केली आहे आणि तितकीच मेहनतही घेतली आहे...


वाराणसीहून थेट मुंबई...


तर 14 सप्टेंबर, 1990 रोजी उत्तरप्रदेशच्या गाझीपूरमध्ये जन्माला आलेल्या सूर्याने वाराणसीच्या गल्ल्यांमध्ये क्रिकेटची एबीसीडी शिकायला सुरुवात केली. वडिल बीएआरसीमध्ये इंजिनीयर असल्याने नोकरीसाठी मुंबईला आले. सूर्याची क्रिकेटमधील आवड पाहता त्यांनी त्याला बीएआरसी कॉलनीतील क्रिकेट कॅम्पमध्ये दाखल केलं. आधी बॅडमिंटन आणि क्रिकेट दोन्हीमध्ये इंटरेस्ट असलेल्या सूर्याने क्रिकेटमध्येच अधिक रस दाखवला ज्यामुळे त्याला आणखी चांगलं प्रशिक्षण देण्यासाठी वडिलांनी वेंगसरकर क्रिकेट अकादमीत घातलं. त्यानंतक दिग्गज क्रिकेटर दिलीप वेंगसरकरांच्या प्रशिक्षणाखाली सूर्या तयार होऊ लागला..मग पिल्लई कॉलेजसाठी क्रिकेट खेळणाऱ्या सूर्याने अखेर 2010-11 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करत मुंबईकडून रणजी ट्रॉफीचा सामना खेळला.


रणजीत चमकदार खेळी


दिल्लीविरुद्ध 73 धावांची दमदार खेळी केल्यानंतर सूर्याची संघातील जागा फिक्स झाली आणि मग काय सूर्याने डोमेस्टीक क्रिकेटमध्ये आपला धडाकेबाज खेळ दाखवायला सुरुवात केली. पण डोमेस्टीक क्रिकेटपर्यंतच सूर्याची स्वप्न पूर्ण होणारी नव्हती, भारतासाठी खेळायचं हे प्रत्येक क्रिकेटरचं असणारं स्वप्न सूर्याचंही होतं... ज्यासाठी त्याचे प्रयत्न सुरुच होते. पण मागील काही वर्षात टीम इंडियाचं तिकीट हे आयपीएलमधील खेळीने मिळत असल्याचं आपण पाहतोय आणि सूर्यालाही कदाचित भारतात एन्ट्रीसाठी आयपीएल गाजवणं गरजेचं होतं. 2012 मध्ये मुंबई इंडियन्सने सूर्याला संघात सामिल केलं. पण केवळ एकच सामना खेळवला ज्यानंतर 2014 मध्ये सूर्याला केकेआरने सोबत घेतलं. सूर्याने 2015 आयपीएलमध्ये दमदार खेळही दाखवला, ज्यानंतर मात्र 2018 मध्ये सूर्याला तब्बल 3.2 कोटी इतकी रक्कम देत मुंबई इंडियन्सने परत संघात सामिल केलं. विशेष म्हणजे त्यावर्षीचा तो सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला होता.. सूर्यानेही मुंबईचा विश्वास कायम ठेवत अप्रतिम खेळ दाखवत मधल्या फळीतील एक मुख्य आणि दमदार असा फलंदाज बनून दाखवलं.  


IPL गाजवून थाटात आंतरराष्ट्रीय पदार्पण


आयपीएल कामगिरीचा विचार करता सूर्यानं आजवर 123 सामन्यांतील 108 डावात 2644 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये 16 अर्धशतकांसह कितीतरी मॅचविनिंग खेळी सामिल आहेत. पण 2018 पासून चमकणाऱ्या सूर्याचा भारतीय संघात उदय होण्यासाठी 2021 हे वर्ष उजाडावं लागलं...पण भारतीय संघातही लेट आलेला सूर्या थेट आल्याचं त्याने खेळलेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातून दिसून येतं.. समोर इंग्लंडचा संघ आणि गोलंदाजीला सध्याच्या घडीचा आघाडीचा गोलंदाज जोफ्रा आर्चर...सूर्याला पहिलाच बॉल जोफ्राने फेकला आणि लेट पदार्पण झालेल्या सूर्याने स्वीप शॉट खेळत थेट षटकार ठोकला...सामन्यात अर्धशतकं ठोकत सूर्यानं भारताला मालिका जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला... ज्यानंतर सूर्या टी20 संघाचा अविभाज्य भाग झाला. काही दिवसांपूर्वीच सूर्यानं इंग्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यात 48 चेंडूत 101 धावा ठोकत आपलं पहिलं वहिलं शतक ठोकलं.. काही धावा कमी पडल्यानं भारत सामना हारला पण सूर्यानं मात्र सर्वांची मनं जिंकली... आणि याचाच प्रत्यय सूर्याच्या टी20 रँकिंगमधून येतो... कारण केवळ 25 आंतरराष्ट्रीय सामने खेळून जगातील टॉप 5 फलंदाजांमध्ये सूर्या विराजमान झाला आहे... त्यामुळे आता टीम इंडियामध्ये लेट आलेला सूर्यकुमार यंदाच्या टी20 विश्वचषकात भारताला थेट ट्रॉफी जिंकवून देईल अशीच त्याच्या सर्व चाहत्यांसह सर्वच भारतीयांची इच्छा आहे...