Sugarcane Farmers : ज्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेलाय आणि आता ज्याचा ऊस कारखान्याला जायचा आहे, त्या दोघांनीही सावध व्हावे. कारण, साखर कारखानदार उसाच्या बिलातून वीजबील वसूल करण्याच्या तयारीत आहेत. आजच कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने एका शेतकऱ्याच्या उसाच्या बिलातून विजबील वसूल केले आहे. अभिजीत पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे अभिजित पाटील यांना साखर कारखान्याकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यांना न सांगता ऊस बिलातून कपात केली आहे. खुद्द अभिजित पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. साखर कारखान्यांना आशा प्रकारे शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कोणत्याही प्रकारे कपात करण्याची परवानगी नाही. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कारखान्याला एक पैसाही कट करता येत नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मांडली आहे. तरीसुद्धा कारखान्याने उसाच्या बिलातून कपात केली आहे. जर कारखान्यांनी अशीच उसाच्या बिलातून कपात केली तर साखर कारखाना आणि चेअरमनवर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा यावेळी शेट्टी यांनी दिला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारावर जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्य शासनाने वीज मंडळाची थकबाकी वसूल करण्याचे कारखान्यांना सांगितले आहे. त्यानुसार वसुली सुरू आहे. कारखान्याने 3 ते 5 हजार रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे 3 ते 5 हजार रुपये कारखान्याकडे ठेवण्यात येणार आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याने सांगितले माझी थकबाकी नसताना विजबिल कपात केले आहे, तर त्या शेतकऱ्याची रक्कम परत दिली जाणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे आवाडे यांनी शेतकऱ्याची परवानगी असल्याशिवाय ऊस बिलातून वीज थकबाकीची रक्कम कपात करणार नसल्याचे सांगितले आहे. अहो, आवाडे तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, किती खोटे बोलता. अभिजित पाटील या शेतकऱ्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता उसाच्या बिलातून कपात केली आहे आणि आवाडे सांगत आहेत शेतकऱ्यांची परवानगी असेल तरच कपात करतोय. किती खोटं बोलताय ते उघड होत आहे.
दुसरा मुद्दा आवाडे म्हणाले जवाहर कारखाना नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतो.शेतकऱ्यांच्या हिताचा तुम्ही एवढा विचार करता तर त्याच्या मुळावर उठणारा निर्णय तुम्ही का घेतला? यात तुमचा काय फायदा आहे का? तुम्हाला शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकायचय का? याची उत्तरे आधी माननीय आवाडे यांनी द्यावीत.
एकीकडे, खतांच्या वाढणाऱ्या किंमती,अतिवृष्टीचा शेकऱ्यांना बसलेला फटका, सरकारची धोरण यामुळे शेतकरी संकटात आहे. आता त्याच्या ऊस बिलातून पुन्हा कपात करून त्याला संकटाच्या गर्तेत कारखानदार लोटत आहेत. विषय फक्त आवाडे यांच्या कारखान्याचा नाही तर राज्यातील इतरही कारखान्यावर लक्ष द्यावे लागेल. नाहीतर हे कारखानदार शेतकऱ्यांचे खिसे कधी कापतील ते सांगत येत नाही.
एकतर दीड दिड वर्षे ऊस कारखान्याला जात नाहीत. शेवटी शेवटी ऊस कारखाना नेतात, अशात उसासा वजनात मोठी घट होते, यातच पुन्हा असा फटका कारखानदार शेतकऱ्यांना देत असतील तर महाराष्ट्रातील शेतकरी गप्प बसणार नाही.