26 फेब्रुवारी 2019... भारतीय वायुदलाच्या भीमपराक्रमानं अख्ख्या देशात जल्लोष सुरु होता...उत्साह रस्त्यारस्त्यावर ओसंडून वाहत होता...पेढे, मिठाई, फटाके दिवसभर काहीना काही सुरुच...त्यादिवशी संध्याकाळ व्हायला आली आणि माझी गाठ आणखी एका अशाच उत्साहाच्या धबधब्याशी पडली...


ती गोरीपान, उंच...चाफेकळी नाकाची, विलक्षण बोलक्या अश्या घाऱ्या डोळ्यांची...लांबसडक केसांचा सुरेख अंबाडा ल्यालेली...त्यात हातभर लांबीचं मंगळसूत्र...आणि नवऱ्यानं लग्नानंतर पहिल्यांदा गिफ्ट केलेली मोतीया रंगाची साडी तिला खुलून दिसत होती. मला भेटलेला हा उत्साहाचा धबधबा म्हणजे शहिद मेजर प्रसाद महाडिक यांची पत्नी गौरी महाडिक...पण, आता ती नुसतीच एका शहिदाची पत्नी नाहीय, ती आहे शहिद नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय सैन्यात दाखल व्हायला सज्ज झालेली, लवकरच नावापुढे 'लेफ्टनंट' हे पद लावणारी गौरी महाडिक...

मंगळवारी (26 फेब्रुवारी) गौरीला भेटले आणि झरझर डोळ्यांपुढे एक फ्लँशबँक तरळून गेला...
9 सप्टेंबर 2017...चैन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या मैदानावर एका निर्धाराची लक्ष्यपूर्ती होत होती...चहुबाजूंनी कौतुकाची फुलं उधळली जात होती...माना अभिमानानं ताठ होत होत्या...शहिद कर्नल संतोष महाडिकांची पत्नी स्वाती महाडिकांच्या खांद्यावर लेफ्टनंटपदाचे दोन अभिमानाचे स्टार विराजमान झाले होते...

30 डिसेंबर 2017...तीन महिन्यांनी पुन्हा एकदा तोच निर्धार आणखी एका चेह-यावर झळकला..."नवरा शहिद झाला म्हणून मला टिकली, मंगळसूत्र काढायला लावता?? पण, शहिद नवऱ्याने कमावलेली वर्दी मी सुद्धा कमावून दाखवेन आणि तेच माझ्या सौभाग्याचं लेणं असेल" हाच तो निर्धार...

योगायोग असा की असा निर्धार करणाऱ्या या दोन्ही रणरागिणी महाडिक आडनावाच्या...पहिली स्वाती महाडिक जी आता यशस्वीपणे लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यदलात कर्तव्य निभावतेय...आणि दुसरी गौरी महाडिक जी पहिलीनं रेखलेल्या अभिमानाच्या पाऊलखुणांवरुनच आपली वाट शोधत आहे.

मंगळवारी अख्खा देश भारतीय वायुदलाच्या विजयाचा जल्लोष करत होता...आणि त्याच वेळी मुंबईत राहणाऱ्या गौरी महाडिक भारतीय सैन्यदलात प्रवेश करण्यासाठी सज्ज होत होत्या. 30 डिसेंबर 2017 ला भारत-चीन बॉर्डरवर तैनात असताना एका आगीच्या दूर्घटनेत मेजर प्रसाद महाडिक शहिद झाले. काही दिवसांपूर्वी अशाच एका शहिदाच्या वीरपत्नी असलेल्या स्वाती महाडिकांना लेफ्टनंटपदाची कँप घालतांना गौरीनं पाहिलं होतं. "नवरा गेल्यानंतर पहिले दहा दिवस भांबावले. अकराव्या दिवशी ठरवलं आणि थेट अभ्यासालाच लागले" गौरी महाडिक दुसऱ्या प्रयत्नात स्टाफ सिलेक्शन बोर्डाची परिक्षा पास झाली आणि आता तीसुद्धा चैन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अँकेडमीमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल होईल"

स्वाती महाडिक आणि गौरी महाडिक दोघींच्या मुलाखती घेण्याचं भाग्य मला लाभावं हासुद्धा एक योगायोगच म्हणावा लागेल. एक अत्यंत शांत, गंभीर आणि तितकीच धिरोदात्त...तर दुसरी प्रचंड हसरी, बोलक्या डोळ्यांची, आणि गालावरच्या खळ्यांतून उमलणारी...या दोघींचं ध्येय समान, संघर्ष समान, त्यासाठी तुडवावी लागणारी वाटही समानच...

गौरी महाडिकांना काल भेटले तेव्हा अगदी जन्मोजन्मीची घट्टमुट्ट मैत्रीण भेटल्यासारखं वाटलं...मुलाखतीत मी प्रश्न विचारायच्या आधीच तिचं उत्तर हजर...किती बोलू नी किती नको असं तिला झालेलं...मग नकळतपणे माझ्या अंगावरची पत्रकार म्हणून असलेली झूल उतरवली गेली...मीसुद्धा तिची मुलाखत न घेता फक्त गप्पाच मारल्या...

मला म्हणाली, "प्रसाद कायम सोबतच असतो आणि त्याला मी हिरमुसलेली, हरलेली, बिचारी अशी आजिबातच आवडणार नाही. म्हणून मी जशी आहे तशीच कायम राहणार. कायम हसत राहणार. नवरा गेला, प्रसादचे विधी आटोपले. काही बायकांनी माझं मंगळसूत्र काढ, कपाळावरची टिकलीच काढ, बांगड्यांनाच हात लाव असे उद्योग सुरु केले"
गौरी तशी खुल्या विचारांची...लग्न झालंय म्हणून कंपल्सरी मंळसूत्र हवंच म्हणणारी नक्कीच नाही...पण, "माझ्या नवऱ्याला मी उगाच अशी गबाळी, विटक्या रंगाचे कपडे घालून तोंड पाडलेली, भकास कपाळाची, मोकळ्या गळ्याची बिचारी वगैरे झालेलं आजिबात खपणार नाही. त्याला त्याची गौरी कायम त्याला आवडेल अशीच असली पाहिजे म्हणून मी हट्टानं आणि जाणीवपूर्वक मंगळसूत्र घालते, कायम मस्त आणि खुष दिसते"
मला या वाक्यावर तिला घट्ट मिठी मारावाशी वाटली...जातांना मी तशी मिठी मारलीही...

कँमेरा सुरु होण्यापूर्वी तिची लगबग मी पहात होते...एरव्ही अनेकजण काय विचारणार आहेस...असं विचार, तसं नको, उगाच अडचणीत आणणारे प्रश्न नको अशा सारख्या सूचना देऊन मुलाखत सुरु करण्यापूर्वीच वैताग आणतात. पण, गौरी बिनधास्त होती. तिची लगबग होती ती कँमेऱ्यात दिसण्याची. जिथे आम्ही मुलाखत शुट केली त्या पार्किंगमधल्या दुचाकीच्या आरशात तिनं स्वत:ला दोन-चारदा पाहून घेतलं..."अरे यार माझी टिकली पडली, थांब जरा" म्हणत तिने पर्समधून इवलीशी रेखीव टिकली काढून कपाळावर लावली...तिच्या मनाचं समाधान झालं आणि मगच मुलाखत सुरु झाली...

तिने जातांना मला दोनदा विचारलं..."आजच लागेल ना गं टिव्हीवर...प्रसादनं मला स्वत:हून लग्नानंतर पहिल्यांदा गिफ्ट केलेली साडी नेसलीय...मला या साडीतला माझा इंटरव्ह्यु पाहायचाच आहे तो ही आजच...नक्की लाव हां"...

VIDEO



मी खरं तर या धबधब्यासमोर नि:शब्द होते. कौतुक, आनंद, त्यापलिकडे असणारी तिची जिद्द आणि ती नेमकी कशी असेल याचा विचार करत होते. मी तिला म्हटलं, "एक परिक्षा पास झालीस...पण, अजुन ट्रेनिंग बाकी आहे. ते खडतरच असणार"...त्यावर तिचं उत्तर म्हणजे "हो तर रोज 5-10 किमी धावतेय, मला ट्रेनिंगला गेल्यावर नेमक्या कोणत्या आणि किती पनिशमेंट होऊ शकतात त्यांचीही तयारी करत आहे. प्रसादला ट्रेनिंगमध्ये आठवी रँक होती. मला त्याच्या जवळपास तरी पोहोचलं पाहिजे" मला ही मुलगीच भन्नाट वाटली कारण ती ट्रेनिंग आणि त्यात होऊ शकणाऱ्या पनिशमेंट या दोन्हीची तयारी करत होती. कारण, परिणामांची पर्वा न करता ती फक्त भिडण्याची तयारी तिने ठेवली आहे.

मी तिला म्हटलं, "पहिल्यांदा असा निर्धार करणारी होती स्वाती महाडिक आणि आता तू आहेस गौरी महाडिक...महाडिकांच्या सुनांचं पाणी जरा वेगळंच आहे म्हणायचं" त्यावर खळखळून हसली आणि म्हणाली " असणारच, महाडिक ऑलवेज रॉक्स"

आजपर्यंत घराघरातल्या कन्या रॉक्स होत होत्या. आईबापाचा अभिमान असणाऱ्या पोरींच्या सक्सेस स्टोरीज होत होत्या. आता घराघरातून सुनांच्या सक्सेस स्टोरीज पुढे येत आहेत. एखाद्या मातब्बर घराण्याची सुन पाटल्या-बांगड्या मिरवेल, दिमाख मिरवेल. पण, महाडिकांच्या या सुना खांद्यावर अभिमानाचे दोन स्टार्स मिरवत आहेत. त्यासाठी झगडत आहेत...कोणी आलाच अंगावर तर शिंगावर घेण्याची धमक ठेवून आहेत...

आदर्श सुनांच्या टिपीकल व्याख्यांना झोडणाऱ्या अनेकांना महाडिकांच्या सुना ही एक सणसणीत चपराक आहे. आदर्श सुनेनं घरासाठी राबावं, हवं-नको ते बघावं, नम्रपणानं सर्वांची तिन्ही-त्रिकाळ सेवा करावी हे सांगणारे अनेक आहेत. पण आदर्श सुनेनं स्वत्व न सोडता घराचा नावलौकीक जागता ठेवावा हे सांगणाऱ्या सुना महाडिकांना लाभल्यायेत.

महाडिकांच्या सुनांची ही गोष्ट अशीच पुढे जात राहो. त्यांनी रेखलेल्या अभिमानाच्या पाऊलखुणांवर अनेक लेकी-सुनांना आपली वाट सापडो...

व्हिडीओ पाहा