आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात आणि मी जिथं नोकरी करतो त्या बेळगांव आणि सीमाभागात कालच्या युतीवर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यात बहुतांश लोकांना 'युती आवडली नाही' असाच सूर होता. सोशल मीडियावर तर सेना इतकी ट्रोल झाली की, कधीकाळी सेनेची बाजू लढवणारे कट्टर सैनिकदेखील गोंधळून गेले आणि स्वकीयांवरच टीका करून आपले दुःख हलकं करू लागले. परवापर्यंत सेनेच्या बाजूने असणारे युती झाल्यावर अक्षरशः तोंडघशी पडले. हे सगळे कशामुळे घडले? सेनेला स्वतःचे कट्टर केडर वगळता बाकी मतं मिळणं नेहमीच जड जात असताना आता कट्टर मतांमध्ये देखील पडलेली फूट सेनेला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महागात पडणार आहे.
बहुतांश मराठी माणसाला शिवसेनेबद्दल प्रेम, सहानुभूती आहे. त्याची त्याची अनेक कारणं असली तरी स्थापनेपासूनच 'शब्दाचे पक्के' अशी इमेज असलेल्या आणि ती इमेज शेवटापर्यंत टिकवून ठेवलेल्या बाळासाहेबांचं नेतृत्व हे त्यापैकी एक मुख्य कारण. पुढे उद्धव ठाकरेंकडे नेतृत्व आल्यांनतर अगदी 2014 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांची इमेज देखील 'विचार करून शब्द देतात आणि दिलेला शब्द पाळतात'' अशीच होती(सामान्य शिवसैनिकांमध्ये ). काल भाजपसोबत पुन्हा एकदा युती केल्यावर याच सामान्य शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पक्षप्रमुखांवरील विश्वास डळमळताना दिसत आहे. याचं मुख्य कारण आहे, सेननं 25 वर्ष संसार करून घटस्फोट घेत पुन्हा महिन्या भरातच धुसफुसत का होईना पण सुरु केलेलं 'लिव्ह इन रिलेशन' आणि त्यातही ''पुन्हा तुमच्याशी लग्न करणार नाही'' अशी गर्जना करून पुन्हा भाजपशी अधिकृत लग्न करून संसार. अश्या कोलांट्या उड्यांमुळे जनमानसात निर्माण होणारी पक्षाची प्रतिमा. 2014 ला युती तुटल्यावर आणि चार प्रमुख पक्ष समोर असताना एकहाती प्रचार करून प्रतिकूल परिस्थितीमधे 63 आमदार निवडून आणल्यावर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचं वजन कमालीचं वाढलं होतं. सेनेला त्यावेळी विश्वासघातकी भाजपशी लढणारी सेना म्हणून प्रचंड सहानुभूती मिळली आणि सेनेची हक्काची मतं सोडून सामान्य मराठी माणसांचीही मतं मोठ्याप्रमाणात मिळाली होती. त्यावेळीही बहुतांशी शिवसैनिक आणि सामान्य मराठी माणूस यांची अशी अपेक्षा होती कि, 'सेनेने विरोधी पक्षात बसावं'. सेनेला ती संधी राष्ट्रवादीच्या खेळीने अनायासे मिळाली देखील, पण महिनाभर विरोधीपक्षात बसून सेना सरकारमध्ये सामील झाली आणि तिथूनच सेनेबद्दलच्या विश्वासाला तडा जायला सुरवात केली.
''युतीमध्ये 25 वर्ष सडली'' अशी खंत वारंवार बोलून दाखवणारे उद्धव ठाकरे आज त्याच भाजपशी युती करून सेनेचं राजकीय भवितव्य पुन्हा सडवून टाकत आहेत का? हा प्रश्न सामान्य मराठी माणसाला नक्कीच पडतो. नेतृत्वाने संघटनेत विश्वास निर्माण करायची गरज असते, इथे नेमकं उलट आहे. इथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतःचीच विश्वासहर्ता गमावून बसले आहेत. युतीची घोषणा झाल्यावर सोशल मीडियावरील आणि रस्त्यावरीलही शिवसैनिकांशी बोलल्यावर दिसून आलं की, पक्ष आणि पक्षप्रमुखांवरील त्यांचा विश्वास उडाला आहे. हे कशामुळे झालं? तर सततची 'राजीनामे खिश्यात घेऊन फिरतो', 'सत्तेला लाथ मारतो', 'आम्ही सत्तेसाठी लाचार नाही' अशी कृतीच्या अगदी विरुद्ध टोकाची बडबड.
बरं, अशी बडबड दुसऱ्या फळीतील लोकांना करायला लावून पक्षप्रमुखांनी स्वतः विकासाची भाषा करत सरकारला सहकार्य देत राहून युतीसाठीचा एक दरवाजा मोकळा ठेवला असता तर आज दुसऱ्या फळीतल्या वाचाळवीरांची आणि बोरूबहाद्दरांची खिल्ली उडाली असती पक्षप्रमुखांच्या प्रतिमेला आज जितका तडा गेला तितका गेला नसता. तसेही सत्ता आणि विरोधीपक्षाची जागा अशा दोन्ही डगरींवर पाय ठेऊन सेनेचा प्रवास सुरूच होता की.'ऐन लढाईच्या वेळी स्वबळाची तलवार म्यान करून सैनिकांचे मनोबल खच्ची करणारा निर्णय उद्धव ठाकरेंनी का घेतला? याची पटतील अशी कारणं त्यांना आता सभांतून आणि प्रतिक्रियांतून द्यावी लागणार आहेत.
''जो पक्ष आणि नेतृत्व स्वतःच्या शब्दाशी ठाम राहत नाही.. शब्द फिरवत त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा आणि असे धरसोडवृत्तीचे नेते राज्याचा विकास कसे करणार? या सामान्य मराठी मतदाराला पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागणार आहे. सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून काँग्रेस सोडून नवीन पक्ष स्थापून पुन्हा त्याच काँग्रेससोबत युती केल्यावर बाळासाहेबांनी स्वतः शरद पवारांवर अतिशय शेलक्या शब्दात टीका केली होती, तीच टीका आज सेनेला लागू होत नाही का?
हक्काची मतं आहेत पण त्याच्यावर स्वबळावरच काय युतीत देखील पूर्ण बहुमत मिळवता येत नाही, अशी आजची परिस्थिती असताना आपला मतदारांचा बेस वाढवणे गरजेचे असताना असा आत्मघातकी निर्णय उद्धव ठाकरेंनी का घेतला असेल याबाबत आता विरोधी पक्षाकडूनच नव्हे तर त्याच्या मित्रपक्षांच्या 'कुजबुज मोहिमे'तून अनेक कंड्या पिकवल्या जाणार आहेत आणि अगोदर विश्वास गमावरून बसलेला पक्ष त्याला समर्पक उत्तरं कोणत्या तोंडाने देणार आहे?
''संपूर्ण देश कोतुक करत असताना नोटबंदीवर पहिल्यांदा टीका करणारे'', 'GST मधील काही त्रुटींवर टीका करून अगदी जेटलींना मातोश्रीवारी घडवणारे'' ''दुष्काळावरून सरकारला घेरणारे", " भाजपच्या नाकावर टिच्चून अयोध्यावारी करून भाजपाला सतावणारे'', ''राफेलवरून चौकीदार चोर म्हणत मोदींना जेरीस आणणारे'', अशी भाजपविरोधी प्रतिमा गेली चार-साडेचार वर्ष करून राज्यात आणि देशाच्या राजकारणात महत्वाचं स्थान मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या या 'यु-टर्न'मुळे त्यांची त्यांची विश्वासहर्ता कमी झाली आहे आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांची पत काहीअंशी का होईना कमी झाली आहे. राज ठाकरेंच्या मनसेला सतत, 'सेटिंग करणारा पक्ष' अशी टीका करणाऱ्या सेनेला आज स्वतः या केलेल्या सेटिंगचा जाब द्यावा लागणार नाही का?
2014 च्या विधानसभेच्या निवडणुकांवेळी शेवटपर्यंत अंधारात ठेऊन आपली पूर्ण तयारी करून ऐनवेळी सेनेला दगा देणारी भाजप उद्या लोकसभेनंतर पुन्हा तोच डाव कशावरून खेळणार नाही? आणि त्यांनी तो डाव खेळला तर स्वतःच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील स्वबळाची ठरावाला हरताळ फासून कार्यकर्त्यांची मानसिक फसवणूक करणारी सेना कोणत्या तोंडाने भाजपला याचा जाब विचारेल?
देशभरात प्रादेशिक पक्षांचं महत्व वाढत असताना पन्नाशी गाठणाऱ्या सेनेला मात्र भाजपच्या दावणीला बांधून मराठी माणसाच्या नजरेतून पक्षाला आणि स्वतःला उत्तरवण्याचं काम राजकारणात संयमी आणि सभ्य म्हणून गणल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरेंनी केलं आणि त्यामुळे एक सक्षम प्रादेशिक पक्ष आज भाजपच्या वळचणीला जाणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे खरंच संयमी आहेत कि अवसानघातकी आहेत? हा प्रश्न त्यांनी स्वतः निर्माण केला आहे. सतत चार - साडेचार वर्ष भाजपशी, भाजपच्या ट्रोल आर्मीशी आणि भक्तांशी त्वेषाने लढा देणाऱ्या आणि रस्त्यावर थेट भाजपशी भिडणाऱ्या सामान्य शिवसैनिकाला आज या दरबारी मांडवली नंतर त्यांच्या छातीत खंजीर खुपसला गेला असं वाटत असेल तर ते अपयश कुणाचं?
छातीत खंजीर खुपसला गेला असं म्हणतो कारण मराठी माणसाने सेनेवर मनापासून - हृदयापासून प्रेम केलं. सेनेची राजकीय खेळी कि अपरिहार्यता हे येणार काळ सांगेलच ..पण मराठी माणसाला लढणारे नेते आवडतात , तह करणारे नव्हे हे सेनेला कधीच उमगलं नाही आणि म्हणूनच सेना कधी स्वबळावर सत्तेत आली नाही आणि आता येण्याची सुतराम शक्यता नाही.
प्रबोधनकारांच्याच शब्दात सांगायचं तर 'राजकारण म्हणजे गजकर्ण', पण म्हणून राजकारणातील काहीतरी तडजोडींसाठी मनापासून प्रेम आणि डोळे झाकून विश्वास टाकणाऱ्या शिवसैनिकांच्या छातीत सेनेने घुसवलेल्या या खंजिराने केलेली जखम कधीही भरून न येणारी आहेच पण त्यामुळे आलेली कळ प्रचंड वेदनादायी आहे. उद्यापासून कदाचित पडलेल्या सवयीनुसार 'आदेश' प्रमाण मानून सैनिक कामाला लागतीलही.. पण त्यांना स्वतःवर विश्वस नसेल आणि नेतृत्वावर देखील. फक्त उघड बोलून दाखवून त्यांना बाळासाहेबांना दुखवायचं नसेल..पण सेनेला मत मात्र न देण्याचा ऑप्शन त्याला आता ओपन आहे. मी आणि माझ्यासारखे अनेक मराठी मतदार युतीतल्या शिवसेनेला आता मतदान नक्कीच करणार नाहीत.
असो !