लिंगायत जात नव्हे धर्म आहे...लिंगायत धर्माला मान्यता देण्यात यावी यासह विविध मागणीसाठी मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे..अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर हा राज्यव्यापी महामोर्चा निघणार आहे. यासाठी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगाना आंध्र प्रदेश या भागातूनही मोठ्या संख्येने समाज बांधव मोर्चाला हजेरी लावणार आहेत.


लिंगायत महामोर्चाची पार्श्वभूमी....


आम्ही लिंगायत ... आमचा धर्म लिंगायत....  असा नारा देत लाखो लिंगायत बांधवांनी 2017 आणि 2018 साली कर्नाटक आणि महाराष्ट्रात भव्य मोर्चे काढले होते... या मोर्चांनी अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. लिंगायत समाज बांधवानी या महामोर्च्यांच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद केला होता  ' भारत देशा - जय बसवेशा ', ' एक  लिंगायत - कोटी लिंगायत ' , लिंगायत धर्म - स्वतंत्र धर्म ' , ' जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय ' , लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळालीच पाहिजे., ' आम्ही लिंगायत -  आमचा धर्म  लिंगायत ' अशा घोषणा देत निघालेल्या या महामोर्चाचे नेतृत्व बंगळुरूच्या प्रथम महिला जगदगुरु डॉ. माते महादेवी, भालकीचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरु, दिल्लीचे चन्नबसवानंद महास्वामी, कुडलसंगम कर्नाटकचे बसवजयमृत्युंजय महास्वामी, अहमदपूरचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज..उस्तुरीचे कोरणेश्वर अप्पाजी यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. महात्मा बसवेश्वरांनी मांडलेल्या तत्वज्ञानातून जन्मलेल्या लिंगायत धर्माचे अनुकरण करणाऱ्या लाखो समाज समाजबांधवांनी या मोर्चाच्या माध्यमातून एक नवा लढा उभारला होता. त्यानतंर आता हा मोर्चा मुंबई येथे होत आहे.


महात्मा बसवेश्वरांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या लिंगायत धर्माचा मोठा इतिहास आहे. कल्याण क्रांतीच्यावेळी असंख्य शरणांच्या हत्या करण्यात आल्या. त्यानंतर हा समाज शेजारील राज्यात विखुरला गेला. त्यानंतरही स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत लिंगायत धर्माची जनगणनेत स्वतंत्र धर्म म्हणून नोंद करण्यात आल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. विखुरलेल्या या समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न या महामोर्चातून करण्यात येणार आहे.


लिंगायत म्हणजे काय ? आणि लिंगायत म्हणजे कोण? 


लिंग आयत (धारण) करणारा तो लिंगायत. 12 व्या शतकापर्यंत सर्वत्र स्थावर लिंगाची पूजा केली जात होती. मात्र महात्मा बसवेश्वर आणि शरणांनी हा लिंग हातावर धारण करून त्याची पूजा करण्यास प्रारंभ केला. हातावर धारण केल्या जाणाऱ्या लिंगाला 'इष्ट लिंग' असे म्हटले जाते. माणसाच्या आतल्या दैवी गुणांचे प्रतीक म्हणजे हा इष्ट लिंग. वेद अमान्य करणारा, वर्ण आणि वर्ग व्यवस्था अमान्य करणारा, कर्मकांड, पुरोहित शाहीला विरोध करण्यासाठी महात्मा बसवेश्वर आणि शरणांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून  "लिंगायत धर्मा"ची स्थापन केली. आणि अठरा पगड जातींना त्यात सामील करून समतेची बीजे रुजवली. त्यामुळे लिंग धारण करणारा प्रत्येक जण मग तो कोणत्याही जातीचा असला तरी तो लिंगायत समाजला जातो. 


लिंगायत धर्मातील वेगळेपण


हा धर्म हिंदू संस्कृती/ सनातन वैदिक संस्कृती पासून भिन्न आहे. अवैदिक असलेला हा धर्म आहे ..लिंगायत , मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात दफनविधी केला जातो तो पर्यावरणवादी विचारातून.. या धर्मात पंचसुतक पाळण्यात येत नाहीत. जे हिंदू धर्मात पाळण्यात येतात.
जनन सुतक .  
मरण सुतक , 
उच्छिष्ट सुतक , 
जाती सुतक , 
रजस्व  सुतक .. 
कर्मकांडापासून दूर असलेला हा धर्म आहे. जैन आणि बौद्ध धर्मावर मध्ययुगात आलेल्या ग्लानी नंतर बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांचा उदय झाला. आलेल्या अनुभवातून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चेतून धर्माची संकल्पना मांडली. वेद  नाकारले आणि प्रत्येक व्यक्तीच्या हातात देव ( इस्टलिंग ) देऊन सर्व समान असल्याचा जागर केला. याच कारणांनी 350 वेगवेगळ्या जातीतील लोक यात आले. यामुळे आमचा वेगळा धर्म आहे तो सरकारने मान्य करावा अशी मागणी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून सातत्याने जोर धरत आहे.  


पूर्वीच का मिळाली नाही मान्यता?  


लिंगायत समाज बांधव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू , पंजाब , ओरिशा, तेलंगणा आदी अनेक प्रांतात विखुरला गेलेला आहे. लिंगायतांपेक्षा अल्पसंख्यांक असणाऱ्या शीख, बौद्ध , जैन, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मियांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता आहे. मग यापेक्षा बहुसंख्येने असणाऱ्या लिंगायत धर्मालाही स्वतंत्र  संवैधानिक मान्यता मिळावी. भारतात असलेला हा सर्वात जुना धर्म आहे. असे असतानाही या धर्माला मान्यता का नाही ? असा सवाल या महामोर्च्याचे निमित्ताने उपस्थित केला जाणार आहे.


प्रमुख मागण्या 


मुंबई येथील आझाद मैदान येथे नऊशे वर्षांनी एकवटणाऱ्या लिंगायत समाजबांधवांनी या महामोर्च्याच्या निमित्ताने अनेक मागण्या ठेवल्या आहेत.   


लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्यात यावी 


लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्यांक वर्गामध्ये समाविष्ट करावे. 
 
राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. 


2021 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वतंत्र नोंद घ्यावी. 


 लिंगायत धर्माच्या मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्याला मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी स्वतंत्र मंडळ वा प्रकल्पाची निर्मिती करावी. 


सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे 


मुंबई येथील विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा. 


महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. 


गांव तेथे रुद्रभुमी ( स्मशानभुमी) आणि गांव तेथे अनुभव मंटप ( सभामंडप ) करण्यात यावे. 


लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह निर्माण करण्यात यावे.  
 
Disclaimer : ब्लॅागमध्ये व्यक्त झालेली मते लेखकाची व्यक्तिगत आहेत, एबीपी माझा किंवा एबीपी नेटवर्क या मतांशी सहमत असेलच असं नाही. हा लेख लिंगायत समाजाच्या मुंबईतील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आला आहे.