South Africa vs India 4th T20I : विंडीज भूमीवरील टी-ट्वेन्टी विजेतेपदाचा रोमांच अजूनही अंगावर शहारे आणत असतानाच आपण दक्षिण आफ्रिकेत जाऊन विजय पताका फडकवलीय. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Viarat kohali) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या तीन प्रमुख खेळाडूंनी टी-ट्वेन्टीला सायोनारा केल्यावर ताज्या दमाच्या खेळाडूंनी आफ्रिकन सफारीमध्ये स्वारी केली. हे खेळाडू जरी युवा असले तरी नवखे नव्हते. त्यात आपल्याकडे आयपीएलच्या रुपातली टी-ट्वेन्टीच्या फास्ट फूडची डिश दरवर्षी चाखायला मिळत असल्याने हा फॉरमॅट आता खेळाडूंना नवीन नाहीये. संजू सॅमसन-अभिषेक शर्मा या दोघांनी वादळी सुरुवात करुन दिली. हे दोघंही गोलंदाजांच्या अक्षरश: ठिकऱ्या उडवत होते. अभिषेक-सॅमसन जोडीने 5.5 ओव्हर्समध्ये 73 ची आतषबाजी केली. यात अभिषेकने 18 चेंडूंत 36 धावा केल्या. स्ट्राईक रेट 200 चा. ज्यात दोन चौकार, चार षटकार. तो आऊट झाल्यावर आफ्रिकेने काहीसा नि:श्वास सोडला असेल. पण, त्यांना हे माहिती नव्हतं. की, पुढे येणारा फटाका आणखी कानठळ्या बसवणारा आहे. आणि जीव घुसमटवणार आहे. तिलक वर्मा त्याचं नाव. 


दोनच दिवसांपूर्वी सेंच्युरियनच्या मैदानात सेंच्युरी ठोकून त्याने यजमानांचा घामटा काढलेला. यावेळी जणू गेल्या वेळचीच इनिंग पुढे सुरु आहे असं वाटावं, इतकी भन्नाट बॅटिंग त्याने केली. या स्टेडियमच्या ज्या कानाकोपऱ्यात कदाचित आफ्रिकन खेळाडू फिरलेही नसतील तिथे तिथे त्याने चेंडूला सफर घडवून आणली. त्याची आकडेवारी पाहा, 47 चेंडूंत नाबाद 120, नऊ चौकार, दहा टोलेजंग षटकार. स्ट्राईक रेट 255.31 चा. त्याच्यासमोर सॅमसनची शतकी आतषबाजीही डोळ्याचं पारणं फेडणारी होती. त्याची आकडेवारीदेखील तोंडात बोटं घालायला लावणारी होती. 56 चेंडूंत नाबाद 109, सहा चौकार, नऊ षटकार, स्ट्राईक रेट - 194.64. जेव्हा एका बाजूने आक्रमण होतं, तेव्हा कर्णधाराला श्वास घ्यायला तरी फुरसत मिळते. मात्र इथे दोन्ही बाजूंनी बॅटने नव्हे तर जणू हातोड्याने घाव घातले जात होते. कॅप्टन मारक्रम म्हणाला, खेळाच्या तिन्ही अंगांमध्ये भारताने आमच्यावर वर्चस्व गाजवलं. त्यात भर घातली ती 17 वाईड बॉलनी. क्रिकेटचा फॉरमॅट कोणताही असो, अशा अवांतर धावा समोरच्या टीमला धावांचं टॉनिक देतात आणि तुमची ताकद घटवतात. क्रिकेटचा खेळ किती मजेशीर आहे पाहा... ज्या खेळपट्टीवर चेंडू पहिल्या सत्रात प्रत्येक स्टँडमध्ये भटकंती करुन येत होता. तिथे अर्शदीप गोलंदाजीला आला आणि चेंडू स्विंग होऊ लागला. बाऊन्स होऊ लागला. अगदी पंड्यानेही निष्णात वेगवान गोलंदाजासारखा स्पेल टाकला. 


283 चा डोंगर सर करताना 10 ला 4 अशा सुरुवातीच्या पायऱ्यांवर तुम्ही चाचपडता तेव्हा जमिनीवर आपटून तुमचा कपाळमोक्ष नक्की असतो. तसंच झालं, 148 वरच यजमानांची इनिंग आटोपली. अतिशय एकतर्फी अशा या लढतीसह भारताने मालिका 3-1 ने खिशात टाकली. दुसऱ्या सामन्याच अपवाद वगळता सबकुछ भारत अशीच स्थिती होती. मालिकेतील भारताच्या दृष्टीने फलित विचार केल्यास सूर्यकुमारची एकही स्फोटक इनिंग न होऊनही आपण चारपैकी तीन सामन्यात 200 चा टप्पा सफाईदारपणे गाठला. सॅमसन, तिलक वर्माने शतकं लीलया ठोकली. तर गोलंदाजीत अर्शदीप प्रत्येक सामन्यागणिक सुधारत असताना वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई या दोन्ही फिरकीपटूंनी मधल्या ओव्हर्समध्ये आफ्रिकन बॅटिंगला सुरुंग लावले. क्लासेन - 25,2, 41,0 अशा एकूण 68 धावांसह फ्लॉप ठरला. तर, मिलर - 18,0,18,36 या एकूण 72 स्कोरसह निष्प्रभ ठरला. कॅप्टन मारक्रमने 8,3,29, 8 अशी एकूण अवघ्या 48 धावांची नोंद केली. एकीकडे भारत धावांचा पाऊस पाडत असताना दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच हवामानात, त्यांच्याच भूमीवर धावांच्या तुरळक सरीच पाडता आल्या.


यंग ब्रिगेडनी हे मिशन फत्ते केलंय, आता सीनीयर्ससमोर आणखी खडतर मिशन आहे ते ऑस्ट्रेलियाचं. न्यूझीलंडविरुद्धच्या 0-3 ची भळभळती जखम घेऊन आपण ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळणार आहोत. जखमेवर मीठ चोळण्यात कांगारु माहीर आहेत. त्यात पराभवाचे व्रण घेऊन पर्थच्या खेळपट्टीवर कमिन्स आणि कंपनीशी दोन हात करायचेत. अर्थात असं असलं तरीही काही वेळा घरातली लहान मुलं जशी एखाद्या नकारात्मक क्षणी मोठ्यांमध्ये उत्साहाची वात लावतात तसं आफ्रिकेतील 3-1 चा मालिका विजय अनुभवी खेळाडूंना सकारात्मकपणे आणि लढाऊ बाण्याने खेळण्याचा नवा ऑक्सिजन देतील अशी आशा करुया.