रिया चक्रवर्तीची मुलाखत पाहिली.
एकदा नव्हे, तीनदा. पुन्हा पुन्हा.
तिचे कोणतेही मुद्दे मी ऐकायचे राहू नयेत म्हणून. तिला अनेक प्रश्न विचारले गेले. त्याची तिने थेट उत्तरंही दिली. दुसरी बाजूही लोकांसमोर यायला हवी हे खरंच आहे. ही मुलाखत बघत असताना, मनात सतत एक प्रश्न येत होता, हा मुलगा किंग साईझ जगला. त्याला जे वाटलं ते त्यानं केलं. रियाही असं म्हणते आहेच. मग त्याने पाऊल का उचललं असेल?


त्यानंतर मात्र एका मुद्द्यापाशी मी येऊन थबकतो. हा मुद्दा असतो सुशांतवर झालेल्या आरोपांचा. त्याची दिल बेचारा या चित्रपटातली नायिका संजना संघीने सप्टेंबर 2018 मध्ये सुशांतवर मी टू अंतर्गत अनेक आरोप केले होते. रियाने आपल्या मुलाखतीत त्याचा उल्लेख केला आहे. हे आरोप केल्यानंतर जवळपास दीड महिन्याने तिने म्हणजे संजनाने आपलं दुसरं स्टेटमेंट देत पडदा टाकला. पण याला दीड महिना का लागला? रिया या मुलाखतीत म्हणते त्याप्रमाणे संजनाने केलेल्या आरोपांमुळे सुशांतला कमालीचा धक्का बसला होता. कुणालाही बसेल.


2018 मध्ये सुशांत लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्याचे सिनेमे हिट झाले होते. अशा एका टोकावर असताना एक मुलगी जी इंडस्ट्रीत खूप नवी आहे, ती आरोप करते.. तेव्हा त्या मुलाला काय वाटलं असेल? हे आरोप झाल्यानंतर तो मुलगा संजना आणि आपल्यामध्ये झालेले चॅट सार्वजनिक करतो. म्हणजे, त्यालाच ते करावे लागतात यापेक्षा दुसरं दुर्दैव काय? त्यानंतर जवळपास दीड महिन्यांनी संजनाने काही वेबपोर्टल्स समोर यात तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला खरा. पण तोवर जवळपास दीड महिना उलटून गेला होता. रियाच्या मुलाखतीतही ते आह. या दरम्यान प्रत्येक मुलाखतीत सुशांतला या मीटूबद्दल विचारलं जात होतं. प्रत्येक मुलाखतीत त्याला ही स्पष्टीकरणं द्यावी लागली होती.


या सगळ्या गोष्टीचा सुशांतच्या मानसिकतेवर काहीच परिणाम झाला नसेल? यशाच्या शिखरावर नुकतेच आपण विराजमान होतो आहे असं वाटत असताना कुणीतरी आरोप करून आपल्याला खाली खेचतं आहे, ही भावना मानसिक खच्चीकरण करणारी नव्हे काय? मग या स्थितीचा ज्याने त्याने फायदा करून घेतला असणार हे उघड आहे. असे आरोप लागल्यानंतर पुरस्कार सोहळ्यांसाठी निमंत्रणं न पाठवणं.. किंवा त्याच्या कलाकृतीला पुरस्कार न देणं.. अशा गोष्टी घडतातच. कारण, मीटू आरोपांमध्ये अडकलेल्या माणसाला आपल्या मंचावर येऊ द्यायचं का यावर खल होणं स्वाभाविक आहे. या आरोपांमध्ये पुढे रोहिणी अय्यरचंही नाव आलं आहे. याच रोहिणी अय्यरने सुशांत गेल्यावर त्याच्याबरोबरचे आपले फोटो इन्स्टावर टाकून तो कसा आपला भारी मित्र होता हे ठसण्याचा प्रयत्न केला. याच संजना संघीने दिल बेचारा ज्यावेळी रिलीज झाला त्यावेळी सुशांतच्या नावाने गळा काढला होता.
आता मुद्दा तो नाहीच.


मुद्दा असा, की सुशांतच्या ज्या डिप्रेशनबद्दल आता चर्चा होते आहे, त्याची सुरूवात नक्की कुठून झाली हे शोधायला नको? कोण कारणीभून होतं त्याचं मानसिक खच्चीकरण करायला? त्याची सुरूवात संजना संघीपासून होते. कारण हा मुलगा 2013 पासून सिनेसृष्टीत काम करतो आहे. त्याआधी तो टीव्ही इंडस्ट्रीत स्थिरावला होता. आजवर त्याच्यावर कधीच असे आरोप लगावले गेले नव्हते. सुशांतवर लगावल्या गेलेल्या या आरोपांमुळे तो मुलगा कमालीचा दुखावला गेला होताच. रिया मुलाखतीत म्हणते त्यानुसार संजनाने असं काही नसल्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी दीड महिना का घेतला?


या घटनेनंतर सुशांतच्या मनात जो केमिकल इम्बॅलन्स झाला असेल, त्याची जबाबदारी कोणाची? आज ही सगळी मंडळी नामानिराळी आहेत. खरंतर त्या आरोपांनंतर सुशांत पूर्ण खचला होता असं रिया सांगते. हे सगळे प्रकार आपल्यासोबत जाणूनबुजून कोणी करतं आहे असं त्याला वाटत होतं असं त्याला वाटत होतं. असं वाटणं हे किती भयंकर आहे. सुशांतच्या मानसिकतेचा जर आपण शोध घेत असू तर गोष्ट इथून सुरू व्हायला हवी.


रियाच्या मुलाखतीत रियाने आपल्यावर झालेल्या सगळ्या आरोपांचं आपल्या परिने खंडन करेलच. सत्यही यथावकाश समोर येईल. पण म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, तर काळ सोकावतो अशी म्हण आहे. इथे म्हातारी मेली आहे आणि काळही सोकावतो आहे.


मीटू मुव्हमेटं सुरू झाल्याचा आनंद सगळीकडे होता. त्यानिमित्ताने पुरूषी मानसिकतेतून होणारी पिळवणूक लोकांसमोर यायला मदतही झाली. पण याच मोहिमेची ही दुसरी काळी बाजू आहे. अनेक मुलींनी अनेकांवर असे आरोप केले. यातून काही पुरुष तरले. काही टिकले आणि सुशांतसारखे काही सरले.


प्रश्न दुष्ट मानसिकतेचा आहे. सुशांतला भर पुरस्कार सोहळ्यात टपली मारणारे जेवढे याला जबाबदार आहेत, तितकेच हे बिनबुडाचे आरोपही.


सुशांतच्या मृत्यूशी संजना संघीचा थेट संबंध आहे असं अजिबात नाही. पण कुठेतरी पहिला तडा तिथे गेला होता का, असं वाटत राहतं. संजनाने आरोप करून दीड महिन्यांनी त्याचं खंडन करणं चूक होतं. रोहिणी अय्यरने सुशांतला काहीबाही मेसेज करणं चूक होतं. असे प्रकार करून सुशांतच्या आयुष्यात नको ते वादळ विनाकारण निर्माण करणं चूक होतं.
या चुकीला माफी नसावी इतकंच.


सौमित्र पोटे यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग


BLOG | निशीच्या बातमीवेळी नेमकं घडलं काय?


BLOG | आत्महत्या कधी थांबायच्या? 

BLOG | इतकी कसली घाई आहे?

BLOG | ए. आर. रेहमानला अनावृत्त पत्र...

BLOG | आत्महत्येनंतर एका आठवड्याने...

BLOG | टू डू ऑर नॉट टू डू!

BLOG | लॉकडाऊन.. शुटिंग आणि कोल्हापूर!

BLOG | एग्झिट चुकलीच इरफान!

BLOG | चिंटूसाब.. काळापुढचा कपूर!