प्रसाद कांबळी अखेर निवडून आले.


मोहन जोशी विरोधात आपलं पॅनल अशी खडाखडी नाट्यपरिषदेच्या प्रांगणात सुरू होती. ही लढत अटीतटीची होईल असं वाटत असतानाच, प्रसाद कांबळी यांनी मात्र मोहन जोशी पॅनला धोबीपछाड दिला.

निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण निकाल वाचल्यावर आपलं पॅनलच्या सर्वच लोकांनी जोरदार आनंद साजरा केला. ते स्वाभाविकही होतं. कारण मोहन जोशी यांच्यासारख्या कसलेल्या विरोधकावर विजय मिळवणं तसं सोपं काम नव्हतं.

....

निकाल जाहीर झाल्यावर प्रसाद कांबळी साहजिकच प्रसार माध्यमांशी बोलते झाले. त्यांच्यासोबत भरत जाधव, शरद पोंक्षे, मधुरा वेलणकर, मंगेश कदम, राजन भिसे, संतोष काणेकर आदी सगळी मंडळी होतीच. त्यावेळी बोलताना आता सर्वात पहिलं काम हे नाट्यसंमेनल भरवण्याचं असल्याचं कांबळी यांनी सांगितलं. संमेलन नेमकं कुठे होणार, कसं होणार हे त्यांना तिथेच विचारण्यात पॉइंट नव्हता. पण आता त्याची वेगळी पत्रकार परिषद घेतली जाईल असंही यावेळी कांबळी यांनी सांगितलंय.



नाट्यसंमेलन हा नाट्यपरिषदेचा वर्षानुवर्षाचा पायंडा आहे. आता संमेलन नव्वदीत आहे. लवकरच या संमेलनाची शंभरी पूर्ण होईल. अशावेळी नव्या कार्यकारिणीच्या यादीत संमेलन प्राधान्याने असणं यात नाविन्य नाही. पण आता हे संमेलन कशा पद्धतीने होतं, ते पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

...

गेल्या पाच वर्षात भरवण्यात आलेल्या नाट्यसंमेलनांवर नजर टाकली तर लक्षात येतं की या मेळाव्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही. एखादं शहर वजा गाव निवडून तीनेक दिवस मजा मारायची यात भावनेतून मंडळी एकत्र येताना दिसतात. नाटकात कधीच न दिसलेले अनेक चेहरे या संमेलनाला आवर्जून हजर असतात. एरवी नाटकांना, नाट्यसृष्टीशी संबंधित कोणत्याही उपक्रमात सहभागी नसलेल्या स्वत;ला अभिनेत्री समजणाऱ्या अनेक महिला चेहऱ्याला भडक मेकअप लावून संमेलनभर मिरवताना दिसतात. त्यांची राहायची खायची सोयही श्रीमंती हॉटेलांमध्येच होताना दिसते. ही अशी कित्येक मंडळी वर्षातून एकदाच संमेलनात भेटतात. ते तिथे येऊन काय करतात याचा अंदाज मला आला असला तरी उलगडा मात्र झालेला नाही. असो.

नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनादिवशी आणि समारोपादिवशी रंगमंचावर सतत दिसणारी राजकीय चेहऱ्यांची गर्दी.. आयोजकांसह मध्यवर्ती शाखेच्या चेहऱ्यावर असलेले लाचार भाव.. आणि सतत वाढीव अनुदानासाठी पसरलेली झोळी हे इतकंच चित्र संमेलनात दिसतं. या निमित्ताने या व्यासपीठावर मागितलेल्या मागण्यांची दखल राजकीय नेते घेतात हाच तो काय फायदा.



प्रसाद कांबळी यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाकडे परिषदेची धुरा आता आली आहे. याद्वारे वेगळा विचार प्रामुख्याने दिसणं ही काळाची गरज आहे. तसं झालं तरच ही धुरा आपण योग्य माणसाच्या हाती सोपवल्याचं समाधान तमाम नाट्यसृष्टीला मिळेल. याची सुरूवात संमेलनापासून व्हावी. दरवर्षी संमेलन झालं की संमेलनाचं फलित काय इथपासून चर्चा सुरू होते. जर त्यातून फार काही निष्पन्न होणार नसेल, तर ते सरकारी अनुदान इतर गरजवंतांना का दिलं जात नाही असाही वाद होत असतो. पण खरंतर संमेलन होणं ही आजच्या नाट्यसृष्टीची गरज आहे. नाट्यपरिषदेच्या अधिपत्याखाली येणारा निर्माता संघ, कलाकार संघ, रंगमंच कामगार संघ, लेखक संघ, व्यवस्थापक संघ आदी अनेकांना जागं करण्याची मोठी जबाबदारी परिषदेवर आहे. याची सुरूवात या संमेलनापासून व्हावी.

...

संमेलन कुठं आणि किती दिवसाचं होतं यापेक्षा त्यातून निष्पन्न काय होतं हे जास्त महत्वाचं आहे. त्यादृष्टीने आता प्रसाद कांबळी यांना काही गोष्टींचं नियोजन करावं लागेल. त्यांच्या पॅनलमध्ये अनेक कलाकार असल्यामुळे या संमेलनाला आपोआप चंदेरी किनार येईल यात शंका नाही. पण आता मात्र आपला वेगळा विचार या संमेलनातून दाखवायला हवा. संमेलनाला हवा असणारा राजाश्रय आहेच.  पण त्यात लाचारी नसावी. सरकारने संमेलनाला देऊ केलेली ठराविक रक्कम परिषदेला द्यावीच लागेल. मुद्दा तो नसून, त्या संमेलनाचा आपण आपल्या विकासासाठी कसा उपयोग करून घेतो ते जास्त महत्वाचं आहे.

प्रसाद कांबळी यांना स्वत:चे विचार आहेत. आपली एक ठाम भूमिका घेऊन ते वाटचाल करतात. त्यामुळेच त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्यांची सुरू झालेली पहिली टर्म.. मिळालेला अत्यंत कमी वेळ पाहता याच अवधीत एक नवा प्रयोग करण्याची मुभा दडलेली आहे हे लक्षात घ्यायला हवं.

...

आता संमेलन कुठे होणार.. कधी होणार ते नवे अध्यक्ष सांगतीलच यथावकाश.

तोवर थोडी कळ काढावी लागेल.