इरफान गेल्याची बातमी आली तेव्हा मन सैरभैर झालं.
एकिकडे लाईव्हला उभं राहायचं होतं..
दुसरीकडे बातमी कन्फर्मेशन चालू होतं.
कानात इपी.. हातात माईक होता.
डोकं विचार करत होतं,,
त्याचे कोणते सिनेमे सांगायला हवेत मी, पुरस्कार कोणकोणते मिळाले.. तो कधी एडमिट झाला.. लंडनमध्ये काय झालं.. इत्यादी इत्यादी.
..
..
ही झाली कॅलक्युलेशन्स.
माझ्या मनात काय सुरू होतं?
मन बधीर झालं होतं.
दोन दिवसांपूर्वीच इरफानसाठी जीव कासाविस झाला होता.
त्याची आई जयपूरमध्ये गेली. पण लॉकडाऊनमुळे इरफान तिकडे जाऊ शकला नाही. जयपूरमध्ये त्याच्या लहान भावानेच सगळे सोपस्कार केले. त्याला फोनवरूनच आईचं दर्शन घ्यावं लागलं. भावना मोकळ्या कराव्या लागल्या त्या मोजक्या लोकांसमवेतच.
ही घटना ताजी असतानाच इरफानची बातमी कानी आली.
आई गेल्याची बातमी आल्यानंतर दोन दिवसांत इरफान गेला.
त्याला कर्करोगाचं निदान झाल्यावर जसा तो मोजक्या लोकांना सांगून लंडनला गेला, तसाच तो आज गेला. लंडनमध्ये तो कधी गेला.. कुठे होता.. कसा होता.. किती लोकांना माहीती आहे? माहीत असणारे फार कमी.
म्हणजे, तिकडे जाताना त्याने कोणताही गाजावाज केला नाही.
ट्रीटमेंट चालू असतानाचे फोटो टाकले नाहीत.
तो तिकडे काही महिने राहिला. झुंजला आणि तितक्याच शांतपणे तो आला. आजार झाल्याचं दु:ख नाही. झुंजल्याचा आनंद नाही. तो ज्या थंडपणे लंडनला गेला. तितक्याच शांतपणे भारतात परतला.
आणि डॉक्टरांनी घालून दिलेल्या मर्यादेत त्यानं काम सुरू केलं.
पण.. आज तो गेलाही असाच की.
म्हणजे, तो गेला हे कळलं सगळ्यांना. पण इच्छा असूनही वेळ असूनही त्याच्यापर्यंत पोचू शकणारे होते अगदी मोजके. त्या माणसांनिशी तो शेवटच्या प्रवासाला लागला.
दर्शन नाही.
प्रतिक्रिया नाहीत.
गर्दी नाही की हार-फुलं नाहीत.
..
इरफान..
इरफान काय घेऊन आला होता?
चॅनलवर अभिनय देव, मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, जयवंत वाडकर बोलत होते. इरफानबद्दल सांगत होते. अर्थात प्रत्येकाच्या नजरेतून हा गुणी कलाकार अधिकाधिक कळत होता हे खरंच आहे.
तरीही शब्द अपुरे होते. भावना प्रबळ होत्या. कारण, इरफानने आपल्या अभिनयातून शब्दांपलिकडचं काही दाखवलं होतं प्रत्येकाला. काहीतरी असं जे मनाचं मनाला भिडतं. प्रत्येकाच्या कुवतीनुसार.. प्रत्येकाच्या अनुभवविश्वानुसार ज्याला त्याल ते पटलंही होतं.
इरफान शब्दापलिकडे सुरू होणारा अभिनेता होता.
इंडस्ट्रीत येऊनही शांततेत रमणारा..
आपल्या कामाचा तीर बरोब्बर टारगेट हिट कसा करेल, याची काळजी घेणारा.. झटणारा.
कशी गंमत आहे पहा हं, तो गेल्याची बातमी आल्यानंतर अमिताभ बच्चनही तितक्याच वेदनेने ट्विट करतात. दीपिकाही आक्रंदते आणि त्याच दु:खावेगाने आपले अने मराठी लेखक, दिग्दर्शक, कलाकारही सोशल मीडियावर लिहिताना दिसतात.
असं का झालं असेल?
अभिनेता जयवंत वाडकर यांनी इरफानसोबत तीन सिनेमांत काम केलं. सिनेमात काम कऱणं आत नवं नाही. पण मग चॅनलवर प्रतिक्रिया देताना जयवंत वाडकर कधी नव्हे इतके भावनाविवश का झाले असतील? इरफानसाऱख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकाराचे वाडकरांसोबत असे काय बंध असतील?
..
आपल्या इंडस्ट्रीमध्ये एखादा कलाकार आला की आपल्या अस्तित्वाची जाणीव त्याला इतरांना सतत करून द्यायची असते. सतत चर्चेत राहण्यासाठी अनेक कलाकार जंगजंग पछाडत असतात. फार कशाला, लॉकडाऊनमध्ये दोन महिने गप्प घरात बसणंही अनेक हिंदी कलाकारांना नको वाटतं. कारण इंडस्ट्रीतली असुरक्षितता त्यांना घेरून टाकत असते. इथे तुम्ही एकदा विस्मरणत गेलात की तुमचं करिअर आटोपतं. अशा इतक्या ताणावपूर्ण स्थितीत हरतऱ्हेचं काम केल्यानंतर इरफान २०१८ मध्ये काही महिने अचानक गायब होतो. पण तो विस्मरणात जात नाही. उलट तो आल्यानंतर पुन्हा एकदा काम हाती घेतो. काम करतो आणि आपण सिद्ध असल्याचं दाखवून देतो.
खरंतर कोणाही कलाकाराला तालीम गरजेची असते म्हणतात. आजारातून उठल्यानंतर अशी कोणती तालीम इरफानने घेतली असेल?
आजारपणामुळे कामापासून निर्माण झालेला दूरावा आणि त्याचवेळी औषधोपचारांमुळे शरीरात झालेले अनाकलनीय बदल.. या सगळ्याला तो कसा सामोरा गेला असेल?
शिवाय इतकं होऊनही तो कसा पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभा राहिला असेल?
तो नुस्ता उभा नाही राहिला तर त्याने अंग्रेजी मीडियम हा सिनेमा पेललाच की पुन्हा.
..
सिनेमा आला खरा. पण इथेच नियतीने सिग्नल लावला.
नव्या इनिंगचा त्याचा हा सिनेमा आला, आणि त्यानंतर पुढे तीनच दिवसांत लॉकडाऊन जाहीर झाला. का झालं असेल असं?
हिंदी मीडियमच्या यशानंतर तमाम लोकांचं लक्ष अंग्रेजी मिडियमकडे होतं. लोकांच्या मनातही होतं सिनेमाला जायचं. पण मनात असूनही सिनेमा थिएटरवर लागूनही तमाम इरफानप्रेमींना हा सिनेमा पाहता आला नाही. या हतबल परिस्थितीने तो खंतावला असेल का?
आजही आमच्या ऑफिसच्या मागच्या गल्लीत असलेल्या पीव्हीआरसमोरून जातो तेव्हा, अंग्रेजी मीडियमचं पोस्टर.. आणि त्यावर लाल युनिफॉर्ममध्ये असलेला इरफान दिसतो.
कलाकार हा अस्सल परफॉर्मर असेल, तर त्याला आपल्या परफॉर्मन्समधून सकारात्मक ऊर्जा मिळते म्हणतात. तो खरंही आहे.
इतक्या आजारातून उठून निश्चयाने उभ्या राहिलेल्या इरफानच्या या सिनेमाला जर लोकाश्रय मिळाला असता, तर ती ऊर्जा त्याला पुढे घेऊन गेली असती का?
इतक्या गॅपनंतर पुन्हा नव्याने सिनेमा आल्यानंतर त्याचवेळात लॉकडाऊन होणं हे कसलं द्योतक होतं?
नियतीला काय सांगायचं होतं?
इरफानचं जाणं अमान्य आहेच. पण नियतीनं त्याला ज्या स्थितीत आपल्यापासून दूर नेलं ते जास्त वेदनादायी आहे. कि त्यालाही तेच हवं होतं?
..
गेल्या तीन दिवसांच्या क्रोनोलॉजीने तर मी हवालदिल झालो आहे.
काही दिवसांपासून त्याची आई आजारी होती. पण तिला तो भेटू शकला नाही.
तीन दिवसांपूर्वी त्याची आई गेली.
तो जयपूरला जाऊ शकला नाही.
आई गेल्याचं दु:ख त्याला आपल्या लहान भावासोबत वाटायचं असेलच की. त्यालाही आपल्या भावाच्या गळ्यात पडून मन मोकळं करावं वाटलं असेलच की. पण इरफानला ती मुभा मिळाली नाही.
दोन दिवस का असेनात पण, मातृशोकाचे भोग त्याला भोगावे लागलेच.
आणि आज जाताना शेवटी तो म्हणाला, अम्मा हॅज कम टू टेक मी.
तो गेला.
..
आज त्याच्या लहान भावाला त्याच्याकडे यायचं असेल. पण त्यालाही ती मुभा नाही.
त्याच्यासोबत काम केलेल्या तमाम कलाकारांना त्याला शेवटचं भेटायचं असेल.. त्यांनाही ते जमणारं नाही.
इरफानवर प्रेम केलेल्या हजारो लोकांना त्याच्या शेवटच्या प्रवासात सामील व्हायचं असेल.. तीही सवलत त्यांना नाही.
तो गेला... अत्यंत मोजक्या लोकांसमवेतच.
इरफान.
इरफान असाच होता.
सगळ्यांना माहीत असलेला.
सर्वांचं भरभरून प्रेम मिळवलेला.
पण, मोजक्यच लोकांमध्ये रमणारा.
इरफान.
एग्झिट चुकली!.