कलाकारांबद्दल कोण बोलणार?

जेवढं नाव मोठं.. चेहरा ओळखीचा तेवढा संकोच जास्त. मदत मागणार कशी? कुणाकडे मागायची? आपली ओळख.. चेहरा उघड झाला तर? सोशल मीडियावर आपली खरी परिस्थिती कळली तर?

या संकोचातूनच खालावत चाललेली स्थिती पाहता 'कोरोनाच्या कात्रीत कलाकार' हा कार्यक्रम 'एबीपी माझा'वर झाला. सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद आला. फोनाफोनी सुरू झाली. प्रत्येकजण आपआपली हकिकत सांगू लागले.

..

रात्री 9 वाजता एक फोन आला.

नाव महत्वाचं नाही. एका अत्यंत लोकप्रिय नाटकात काम करणाऱ्या कलाकाराचा फोन होता. अर्थात मुख्य कलाकार नव्हे.

हॅलो, दादा कार्यक्रम बघितला. फार महत्वाचा होता.

हो रे. थॅंक्स.- मी.

मी हवा होतो रे दादा. मीही बोललो असतो. - तो

काय बोलला असतास.. काय झालं? - मी

काय नाय रे. दोन महिने घरी आहे. आई अमुक ठिकाणी काम करते. दादा तमुक ठिकाणी काम करतो. सगळेच धंदे बंद झालेत. कुठूनच मदत नाही. कलाकार संघाकडून आणि इतर एकिकडून आली मदत पण झाले दोन महिने निघाले. आता पुढं काय करू?

अरे नको काळजी करू. आपण करू व्यवस्था. तुम्ही किती लोक आहात? - मी

अरे मदत करशील तू. पण किती दिवस. पुढे सहा महिने काही दिसत नाहीय. कधी सुरू होईल काही कळत नाही. कसं करायचं.. ??

..

जुजबी उत्तर देऊन मी फोन ठेवला.

अस्वस्थ झालो. माझ्या शोचं पोस्टर मी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्याखालच्या कमेंटस काय होत्या?

कलाकारांना कशाला लागते मदत.. इकडं शेतकरी मरायला लागलाय.. कलाकारांचं पडलंय यांना!

अरे ही काय कमेंट आहे?

शेतकऱ्याचा जीव प्यारा आहेच. पण म्हणून कलाकार कसे कमी महत्वाचे ठरतात?

मुंबईत नाव कमवायला आलेला मनप्रित गरेवाल घरी आत्महत्या करतो तेव्हा ही घटनाही तितकीच वेदनादायी असते, जेवढी कुणी  इतर क्षेत्रातल्या व्यक्तीने आत्महत्या केलेली असते. पण, आपण कलाकारांना गृहित धरतो. त्यांना हलक्यात घेतो. पण एक लक्षात ध्यायला हवं, पडद्यावर श्रीमंतीचा आव आणणारा कलाकार त्याच्या व्यक्तिगत जीवनात तसा कधीच नसतो. जी छानछोकी हिंदी सिने-मालिका विश्वात असते तशी ती मराठीत नसते. कधीच नव्हती. हे काही लक्षात न घेता आपण टिप्पणी करू लागतो. अर्थात त्यात टिप्पणी करणाऱ्यांचाही दोष नाही म्हणा. कारण आपण नेहमीच कलाकारांना फुटकळ लेखत आलो आहोत. त्यांना हसण्यावारी नेण्यात धन्यता मानत आलो आहोत.

अगदीच उदाहरण द्यायचं, तर चला हवा येऊ द्या मधून घराघरांत पोचलेला कुशल बद्रिके पोटधरून हसवतो. तो उत्तम अभिनेता आहेच. पण जेव्हा कलाकारांमार्फत पूरग्रस्तांना मदत केली गेली.. लॉकडाऊन काळात कलाकारांनी बॅकस्टेज आर्टिस्टना मदत केली तेव्हा गोण्याच्या गोण्या घेऊन कुशल जागोजागी पोचवण्यात व्यग्र होता. वेळ काढून त्याने ते काम केलं. अर्थात कुणी त्याला चांगलं म्हणावं म्हणून त्याने ते केलं नाहीच. कुणीच कलाकार असं कुणासाठी काम करत नसतो. पण मराठी कलाकार हा जमिनीवर कायमच असतो त्याचं हे उदाहरण. कुशलच नव्हे, तर जीतेंद्र जोशी, सुबोध भावे, संदीप पाठक, स्पृहा जोशी, विजू माने, प्रवीण तरडे ही सगळी मंडळी आपलं व्यवधान सोडून या मदतीला आली. केवळ मुंबई नव्हे, पुणे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड आदी ठिकाणचे रंगधर्मी एकवटले. कोल्हापूरच्या रंगकर्मींनी रक्तदान शिबीरही घेतलं. अशा त्यांच्या कामाची, समाजभानाची दखल आपण घेणार की नाही? म्हणजे, त्यांनी मदत केली तर ती आपण घेणार. पण उद्या त्याच विभागाला मदतीची गरज असेल तर? तर ती आपण करणार नाही?

...

काय विरोधाभास आहे पहा. कलाकारांचा समाजावर मोठा पगडा असतो म्हणून कोणत्याही मोठ्या योजनेत.. जाहिरातीत.. निवडणुकीत आपल्याला ते लागतात. पण तो घटक आपल्या वेदना सांगू लागला की मात्र आपल्याला ते खोटं वाटतं.

लॉकडाऊन वाढला आणि पडद्यामागच्या आर्टिस्टना मदत सुरू झाली. यात कोण होतं? यात स्पॉटबॉईज, लाईटमन, मेकअपदादा, वेशभूषाकार, इस्त्रीवालेदादा, टेम्पोचालक, नेपथ्य लावणारे असे सगळे सगळे येतात यात. अनेक कलाकारांनी आपणहून मदतकार्यात उडी घेतली. या सर्व रंगकर्मींना शिधा देण्यात आला. तो आवश्यकच होता.

पण या सगळ्या मदतीमध्ये 'कलाकार' कुठेच नव्हता. कलाकार म्हणजे फक्त मुख्य कलाकार नव्हे. इतरही कलाकार. आता यात कोण येतात?

अगदी उदाहरण घ्यायचं म्हणून सांगतो. एक नाटक घ्या. कोणतं घेऊया... सध्या गाजलेलं नाटक.. हं.. अलबत्या गलबत्या. यात कलाकार कोण आहे? वैभव मांगले. करेक्ट. आणखी कोण आहे? सोडून द्या. किती आहेत? या नाटकात साधारण किमान सहा ते आठ कलाकार आहेत. कलाकार म्हणजे जे मंचावर दिसतात. असं जवळपास प्रत्येक नाटकाचं होतं. शिवाय, असे कित्येक कलाकार आहेत जे नाटकात सातत्याने काम तर करतात. पण सध्या त्यांचं नाटक सुरू नाहीय. अशांनी काय करायचं? असा एकही कलाकार मदत मिळण्याच्या 'या' रांगेत नव्हता. याचं कारण संकोच. लोकांना काय वाटेल.. ही भावना.

या लोकांकडे आपण बघणार की नाही?

का ते आपल्या समाजाचा घटक नाहीयेत? की मनोरंजनसृष्टीत काम करतात म्हणून त्यांना पोट आणि भूक नाहीय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची बैठक घेतली ही बाब कौतुकास्पद आहे. यावर पुढचा आराखडा.. चित्रिकरण सुरू होणार की नाही.. कुठे सुरू करायचं..या सगळ्या गोष्टी यथावकाश समोर येईलच. ज्या आवश्यक आहेत. पण आत्ता ज्या बहुतांश कलाकारांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तो कोण सोडवणार?

यात दोन महिने गेले.

त्यानंतर महामंडळाने कलाकारांची थकित बिलं देण्याबाबत नोटिस काढली. नोटिस नव्हे, आग्रहवजा आर्जव.

मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यायला आणि ही नोटिस यायला एकच गाठ पडली.  आता हा मद्दा योग्य आहे.

मराठी महामंडळात इतके लोक काम करतायत, एकालाही हा मुद्दा दोन महिने आधी कळला नाही.. समजला नाही? कमाल आहे.

फक्त कलाकारांची ही गत. कलादिग्दर्शक, संगीतकार, असिस्टंट डायरेक्टर्स आदींची रखडलेली पेमेंटस यांचं काय? ती आली तरी पुढचे तीन महिने निघतील. पण त्यासाठी खंबीर निर्णय घ्यावे लागतील.

एखाद्या एपिसोडचं पेमेंट चॅनलमार्फत जर निघालं असेल तर ते कलाकारापर्यंत आणि त्याच्याशी संबंधित सर्व घटकांपर्यंत आता पोचणं आवश्यक आहे. लॉकडाऊन आपल्याला खूप काही शिकवून जाणारा आहे. कारण आता लोकांची अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.

..

बरं ते जाऊ दे.

आपल्या राज्याचं सांस्कृतिक धोरण काय आहे?

म्हणजे आहे का?

असायला नको?

जर आपल्याकडे सांस्कृतिक कार्य संचालनालय आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आहे. जर महाराष्ट्रात हिंदी, मराठी आणि इतर मनोरंजनसृष्टी आहे. तर या सगळ्या कलाक्षेत्राचं धोरण नको?

आता कुणी म्हणेल.. तसं ते क्रिडा धोरणही नाहीय. तो मुद्दा इथे नाही. बाकीच्या विभागांचं असावं.. नसावं.. हा पुन्हा वेगळाच मुद्दा आहे. पण देशातल्या ज्या राज्यात मनोरंजनसृष्टी उभी आहे, तिचा आपण विचार करणार का नाही? प्रसिद्ध निर्माते नितीन वैद्य यांच्या गणितानुसार आपल्याकडे 70 हिंदी आणि 40 मराठी मालिका बनतात. त्यांचे वर्षाला 30 हजार एपिसोडस बनतात. इतर भाषा आहेतच. शिवाय सिनेमे. हे सगळं आपल्या मुंबईत असताना कलाकाराबद्दल, तंत्रज्ञांबद्दल निश्चित धोरण नको?

...

मुद्दा लक्षात येतोय का?

लॉकडाऊन चालू आहे. तो किती चालेल माहीत नाही. त्यात चित्रिकरणं पुन्हा कधी सुरू होतील हेही कळत नाहीय. अशात अनेक छोट्या छोट्या कलाकारांचे जगण्याचे वांधे झाले आहेत. ते आपण सोडवू शकणार आहोत का? की त्यांची गरज वाटत नाही आपल्याला?

त्वरित हालचाल करायला हवी. कदाचित नाट्यनिर्मात्यांनी आपआपल्या चमूची खबरदारी घ्यायची आता वेळ आली आहे. प्रशांत दामले यांनी उत्तम उदाहरण घालून दिलंच की. त्यांनी लॉकडाऊन काळात त्वरित आपल्या बॅकस्टेज आर्टिस्टला प्रत्येकी 10 हजार रुपये दिले. त्याच्या बातम्याही आल्या. असं प्रत्येकाने करायची गरज आहे. लॉकडाऊनमध्ये सगळे घटक त्रासले आहेत. यात कोणीही सुटलेलं नाही. चॅनल्स, निर्माते, कलाकार सगळ्यांचे पैसे अडकलेत. पण आता ज्यांचा सर्व्हायवलचा प्रश्न आहे त्यांना उभं करायला हवंय. अन्यथा अवघड होऊन बसेल. परिस्थिती असताना मदत झाली नाही तर मदत हवी असणारा ते आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. तीच मदत झाली तर पुढे जीव ओवाळून टाकणार आहे.

काळ कठीण आहे. पण मार्ग काढायला हवा.

..

कालचा कार्यक्रम झाल्यावर एका अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोन आला.

ती म्हणली, अत्यंत योग्य विषय घेतलास. आवश्यक होता.. वगैरे.. वगैरे..

तिलाही कलाकार संघाने शिध्याचं किट पाठवून मदत केली. अर्थात मी ते किट गरजू वॉचमनला दिलं असंही ती म्हणाली. ज्याने मला हायसं वाटलं.

पण पुढे ती म्हणाली..

मी राहतेय रे. हप्ते आहेत. मुलांची शिक्षणं.. शिवाय घरचं खाणं..

इंडस्ट्री सुरू व्हायला हवी. मीही पुढचे तीन महिने नेईन रेटून. पण पुढे काय... ?

..

मी खूपच शांत झालो आतून.. शांत अस्वस्थ..

मला एकदम मनमित गरेवाल दिसतो.. एकदम नाटकवाल्या मुलाचा फोन आठवतो आणि शेवटी तीन महिन्यांनंतर पुढे काय.. हा प्रश्न डसतो.

..

कोरोनाने कुठं आणून ठेवलं यार आपल्याला.

आपणच यातून आपल्याला बाहेर काढायला हवं ना?

निदान आता.. देणेकऱ्यांनी ज्याची त्याची जमतील तेवढी देणी देऊन टाकावी. थोडी ऊर्जा मिळेल त्याने जगण्याची.

..

आज थांबू इथे.