"तू हिंदू बनेगा, न मुसलमान बनेगा.. इन्सान की औलाद है इन्सान बनेगा..." साहिर लुधियानवींनी या दोन ओळीत धर्म, जात, पंथात माणसाची झालेली विभागणी मोडीत काढली होती. सलीम शेख यांच्याकडे पाहिल्यावर त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

जम्मूमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशवादी अंधाधुंद गोळीबार करत असताना, प्रसंगावधान दाखवून 49 भाविकांचे प्राण वाचवून त्यांच्यासाठी देवदूत बनून आलेले बस ड्रायव्हर सलीम शेख.

अमरनाथमधील निष्पाप भाविकांवर अंधाधुंद गोळीबार करणारे अतिरेकी बोलायला मुसलमान होते, पण इस्लाम आणि मुसलमानचा खरा अर्थ काय असतो, हे अनंतनागपासून हजारो किलोमीटर दूर महाराष्ट्रातून आलेल्या आणखी एका मुसलमानामुळे समजलं.

सलीम शेख.. मूळचे जळगाव जिल्ह्यातील पिंपरखेड गावचे. पण सलीम यांचे वडील गफूर पटेल कामानिमित्त कुटुंबासह 15 वर्षांपूर्वी गुजरातच्या वलसाडला स्थायिक झाले. ओम ट्रॅव्हल्सवर गेल्या अनेक वर्षांपासून सलीम ड्रायव्हर म्हणून काम करतात. जवळपास 8 वर्ष सलीम यात्रेकरुंना अमरनाथला घेऊन जातात. वलसाड, डहाणू आणि परिसरातील भाविकांना घेऊन सलीम अमरनाथला रवाना झाले. 10 जुलै 2017 रोजी बाबा अमरनाथचं दर्शन करुन यात्रेकरुंनी भरलेली बस जम्मूच्या दिशेने जात होती. रात्रीचे 8 वाजले होते, सलीम यांनी अनंतनाग पास केलं आणि बटेंगूजवळ अचानक अतिरेक्यांनी ट्रॅव्हल्सवर अंदाधुंद गोळीबार केला.

जेव्हा अतिरेक्यांनी बसवर गोळीबार करायला सुरुवात केली त्यावेळी सलीम शेख यांना जाणवलं की जर त्यांनी बस थांबवली तर अतिरेक्यांनी मृत्यूचा तांडव केला असता. याच भीतीमुळे बस चालक सलीम शेख यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी सुसाट सोडली. धावती बस पाहून अतिरेक्यांनी चाकांवर निशाणा साधून गोळीबार केला. टायर पंक्चर होऊनही सलीम यांनी एक्सलेटरवरील पाय हटवला नाही. डोकं खाली झुकवून बस चालवली आणि पुढे दीड किलोमीटरपर्यंत सैन्याच्या कॅम्पपर्यंत बस पोहोचवली.



या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला तर दोन डझनहून अधिक भाविक जखमी झाले. अशा आणीबाणीच्या परिस्थितीतही सलीम शेख यांनी एका सैनिकासारखी कामगिरी केली. आपल्या प्राणांची पर्वा न करता 49 जणांचा जीव वाचवला. हल्ल्याच्या वेळी त्यांनी तेच काम केलं, जे कोणत्याही माणसाचं कर्तव्य असतं.

सलीम शेख यांच्या या असामान्य धैर्यामुळे, हिंमतीमुळे तब्बल 49 भाविकांचा जीव वाचला होता. त्यांच्या रुपाने जणू देवच यात्रेकरुंच्या मदतीला धावून आला होता. स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचा जीव वाचवला याचा सलीम शेख यांच्या कुटुंबीयांसह देशाला सार्थ अभिमान आहे.

अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर हल्ला झाल्यानंतर सो कॉल्ड हिंदुत्ववादी चेकाळत आहेत. धर्मांध आणि भडकाऊ ट्वीट आणि फेसबुक पोस्टचा पाऊस सुरु आहे. पण त्याचवेळी सलीम शेख सोशल मीडियावर हीरो बनले आहेत. त्यांच्या धाडसाला सलाम करत आहेत. सच्चा भारतीयाचा आम्हाला अभिमान आहे, असं नेटीझन्स बोलत आहेत. टीकाकारांसाठी अल्लाह, देव, गॉडने सलीमच्या रुपाने कडक संदेश दिला आहे.

विशेष म्हणजे सलीम यांच्या भावाने तब्बल 15 वर्ष हिंदू भाविकांसोबत ड्रायव्हर म्हणून अमरनाथ यात्रा केली आहे. तर सलीमही गेली 8 वर्ष हिंदू भाविकांची सेवा करत आहेत. अनंतनागमधील सलीम शेख यांचं कृत्य हे दहशतवादाला एका धर्माशी जोडणाऱ्या लोकांना सणसणीत चपराक आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सलीश शेख यांच्या नावाची वीरता पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याची घोषणा केली आहे. 49 भाविकांचे प्राण वाचवणारे जिगरबाज सलीम शेख यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, एबीपी माझानेही त्यांना यथोचित गौरव केला. 'माझा सन्मान' देऊन एबीपी माझाने सलीम शेख यांच्या धाडसाला सलाम केला. तसंच यावेळी सलीम शेख यांच्यासोबत ओम ट्रॅव्हल्सच्या मालकाचा मुलगा ओमचाही सत्कार केला, तोच बससोबत क्लीनर होता.