23 फेब्रुवारी 2010... आसामची राजधानी गुवाहाटीमधला 'शांती साधना आश्रम'... या दिवशी या आश्रमातला 'तो' मंडप गर्दीनं अगदी फुलून गेलेला... मंचावर आसामचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अनेक 'बिग सिलेब्रिटी' उपस्थित होत्या. अगदी मोजक्याच लोकांची भाषणं या कार्यक्रमात होणार होती. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असलेल्या हेमभाईंनी यावेळी 'प्रोटोकॉल'मध्ये थोडा बदल करीत एक नाव भाषणाच्या यादीत वाढवलं. हे नाव मंचावर बसलेल्यांपैकी कुणाचं नव्हतं. तर ते नाव होतं समोर बसलेल्या एका साध्या महिलेचं. सभेच्या आयोजकांनी मधातला क्रम तोडत एक नाव भाषणासाठी पुकारलं... अन् पुढच्या भाषणासाठीचं नाव होतं महाराष्ट्रातून आलेल्या 'सिंधुताई सपकाळ' यांचं.



 

नावाचा पुकारा झाल्यानंतर सिंधुताई' अगदी झपझप पाऊलं टाकत माईककडे निघाल्यात. त्या माईककडे जात असतांना २५-३० हजारांची गर्दी असलेल्या मंडपात एकाएकी चुळबूळ वाढली. काहींच्या कपाळावर आठ्याही पडल्यात. लुगडं घातलेली, मोठं कुंकू लावलेल्या या बाईकडे पाहून अनेकांची भावना एकच होती, "ही बाई या एव्हढ्या मोठ्या व्यासपीठावरून या गर्दीसमोर खरंच काय बोलणार?". अनेकांच्या मनात प्रश्नही होते, तर अनेकांच्या चेह-यावर प्रश्नचिन्हही. आयोजकांनी सिंधुताईंना बोलायला अवधी दिला होता तो फक्त अगदी पाच मिनिटांचाच... सिंधुताई माईकसमोर उभ्या राहिल्यात. एखाद्या जोरदार पावसाआधी जशी एखादी वीज चमकावी अन नंतर जोरदार पाऊस बरसावा... इथंही अगदी तसंच झालं...

 

सिंधुताईंनी माईकचा ताबा घेतला अन सुरू झाला या मंडपातील गर्दीला विचारांनी चिंब भिजवून टाकणारा सिंधूताईंच्या विचारांचा रिप-रिप पाऊस... सिंधुताई हिंदीतून धो-धो बरसू लागल्यात. अवघ्या पाच मिनिटांतच हाच पाऊस व्यासपीठावरील मान्यवर अन समोर बसलेल्या गर्दीच्या डोळ्यांतूनही बरसू लागला, अश्रूंच्या माध्यमातून. पाच मिनिटांच्या भाषणाचा वेळ गर्दीच्या आग्रहानं कधी पंचेचाळीस मिनिटांपर्यंत गेला हे कधी कुणाला कळलंही नाही. त्यांनी भाषणात त्यांचा मांडलेला संघर्ष, 'अनाथांची माय' होतांना पदोपदी झालेले अपमान अन त्यातून उभं केलेलं आभाळभर काम... माईंच्या बोलण्यातून उभ्या झालेल्या जीवनपटाच्या आठवणींनी हा मंडप हुंदक्यांनी अक्षरश: शहारला होता. 



 

 

भाषणाआधी व्यासपीठावरील माईककडे जातांना त्या गर्दीसाठी 'त्या' फक्त 'सिंधुताई सपकाळ' होत्या. मात्र, भाषणानंतर 'माईक' सोडून परत आपल्या जागेकडे येणारी सिंधूताई या गर्दीसाठी 'माई' झाली होती. ही लुगड्यावाली बाई या गर्दीसमोर काय बोलणार?, असं वाटणा-या अनेकांनी स्वत'ची माफी मागतल्याचं त्यांचे चेहरेच सांगत होते. प्रत्येकाला 'माई'च्या भाषणानं आंतर्बाह्य हादरवून सोडलं होतं, अंतर्मुख केलं होतं. भाषणानंतर या गर्दीची 'माई' हिरो झाली होती. या कार्यक्रमानंतर माईच्या भोवतीची गर्दी हटता हटत नव्हती. 

 

हा प्रसंग आहे आसामची राजधानी गुवाहाटी येथील 'अखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलना'तला... २१ ते २३ फेब्रूवारी २०१० असं तीन दिवस हे संमेलन चाललं होतं. या संमेलनात देशभरातील गांधीप्रेमी आणि गांधीवाद्यांचा मेळाच 'शांती साधना आश्रमा'त यानिमित्ताने जमला होता. आसाममधील गुवाहाटीच्या 'शांती साधना आश्रमा'चे मुख्य प्रवर्तक आणि जेष्ठ गांधीवादी नेते हेमभाई या संमेलनाचे मुख्य आयोजक होते. २३ फेब्रूवारीच्या समारोपाला आसामचे तेंव्हाचे राज्यपाल जानकी बल्लभ पटनाईक आणि मुख्यमंत्री तरूण गोगोई यांची प्रमुख उपस्थिती होती. 'माईं'च्या आभाळभर कामाची तोपर्यंत महाराष्ट्राला चांगलीच ओळख झालेली. मात्र, 'अनाथांची माय'ही ओळख 'सेव्हन सिस्टर्स स्टेट'मधील मोठी बहीण समजल्या जाणा-या आसाम राज्याला ही नव्याने कळली होती. महाराष्ट्राच्या मातीतील संस्कृती आणि संतपरंपरेची शिकवण असणा-या संवेदना, परोपकार आणि समर्पनाचा जीवंतपणा या ठिकाणी संपुर्ण देशातून आलेल्या लोकांना कळला होता.

 

'माई' म्हणजे उत्साहाचा अखंड 'धबधबा'च : 

 

या संमेलनाला प्रस्तूत लेखकही उपस्थित होते. या संमेलनाच्या निमित्ताने 'माई'चा मिळालेला सहवास माणूस म्हणून अतिशय समृद्ध करणारा होता. 'माई' नावाची उत्तुंगता जमिनीशी किती घट्टपणे जुळली आहे, हे याच सहवासातून समजलं आणि उमजलंही. या संमेलनाच्या समारोपानंतर 'माईं'ना पुर्वोत्तर भारतातील संस्कृती, परंपरा, लोकमानस, येथील ऐतिहासिक वास्तू आणि वारशाबद्दल प्रचंड कुतूहल होतं. माईंसह त्यांच्यासोबत त्यांची मूलं दिपकदादा, मनिषदादा आले होते. तर आमच्यासोबत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील हरसुलच्या सामाजिक कार्यकर्त्या लताताई उपलेंचवार, पुसदच्या अंजली बेलोरकर , मिलिंद हट्टेकर, चापके दांपत्य आणि इतर काही लोकं होती. या चार दिवसांच्या 'माईं'च्या सहवासात त्यांच्यातील अनेक गोष्टी स्वत: अनुभवता आल्यात. त्या जेव्हढ्या संवेदनशील होत्या तेव्हढ्याच चिकित्सक, देशप्रेमी, खेळकर आणि कधी-कधी लहान मुलांसारख्या खोडकरही. याच प्रवासात आम्ही सर्वजण दोन दिवस आसाम आणि मेघालयातील अनेक ठिकाणं, वास्तू पाहिल्यात. 

 

आधल्या दिवशी आम्ही गुवाहाटीमधील 'आसाम राज्य संग्रहालया'ला भेट देत आसामच्या संस्कृतीला समजून घेण्याचा प्रयत्न केला. दुस-या दिवशीच्या प्रवासात तर एका नव्या 'माई'ची आम्हाला ओळख झाली. ही 'माई' खेळकर, उत्साही अन काहीशी खोडकरही. दुस-या दिवशी आम्ही होतो मेघालयच्या दौ-यावर. या दिवशी आम्ही सर्वात आधी गेलो ते चेरापुंजीला. पुस्तकात वाचलेलं चेरापू़ंजी पुस्तकातच वाचलेल्या सिंधुताईंसोबत पहायला मिळणं हा एक वेगळाच अनुभव होता. पुढे आम्हाला भारत-बांगलादेश सिमा पहाता आली. त्यावेळी 'माई' प्रचंड भावूक झाल्या होत्या. "माझी लेकरं किती कठीण परिस्थितीत देशाचं रक्षण करतात", या भावनेनं त्यांचे डोळे पाणावले होते. यावेळी 'भारत माता की जय'च्या घोषणेनं माईनं परिसर दणाणून सोडला होता.

 

तिथून पुढे आम्ही मावसाई गुहा या ठिकाणाला भेट दिली.. मावसमाई गुहा चेरापुंजीजवळ आहे. भुलभुलैयाप्रमाणे या गुहेतून चमकणारे दिवे आणि दगडांचे दृष्य दिसते. खरं तर तिथे असणाऱ्या सुक्ष्म जिवांमुळे या दगडांना ही चमक येत असते. मावसाई गुहेची लांबी 150 किलोमीटर आहे. मावसाईच्या गुहा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. तिथून सर्वात शेवटी आम्ही शिलाँगला पोहोचलो. तेथील बाजारात काही वस्तू खरेदी केल्यात. येथील हाताने विणलेल्या शाली आम्ही विकत घेतल्यात. यावेळी एक शाल मी माईंसाठी घेतली. माईंनी ती आनंदाने स्विकारत आम्हा 'माय-लेकरां'च्या नात्यांची विण आणखी घट्ट केली.

 

'माई' हा एक खळाळणारा प्रवाह होता. या प्रवाहानं आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक वेदनेला संवेदनेत बदलवत समृद्ध केलं. सोबतच आपल्या विचारांतून आणि आभाळभर कामातून 'माई'नं समाज, राज्य, देश आणि मानवतेलाही समृद्ध केलं आहे. आज 'माई'च्या जाण्यानं आठवणींचा हा पट आपसुकच डोळ्यासमोर तरळून गेला. माई!, तू रूढार्थानं आज जरी या जगातून गेली असली तरी, पुढची शेकडो वर्षे तुझ्या कार्यातून तू कायम जीवंत असणार आहेस. 'माई!', भावपूर्ण श्रद्धांजली.....