वारीला गेलं पाहिजे. पण का? कशासाठी?


माहित नाही.

उत्तर मिळवण्यासाठी तरी वारी केली पाहिजे का?

माहित नाही.



2017 हे  आयुष्यातलं एक असं वर्ष आहे, ज्यावर्षी दोन नव्या गोष्टी घडल्या.

पहिली- एप्रिलमध्ये लग्न झालं. आणि दुसरी.. अर्थातच वारीला गेलो.

आयुष्यात संपूर्ण वारी करायची इच्छा खूप आधीपासूनच होती.

याआधी कधी वारी केली होती का? तर नाही. खरंतर वारीला गेलो होतो.. पण थेट आषाढीच्या दिवशी पंढरपुरातच गेलो होतो.

साल नीटसं आठवत नाहीये. पत्रकार-संपादक सचिन परब यांच्या रिंगण या मासिकाच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन होतं बहुधा. अकुलजमध्ये राहिलो होतो.. भल्या पहाटे उठलो होतो. उजाडलंही नव्हतं. गाडी घेतली. परबांना कुठूनतरी आणल्याचं तेवढं आठवतंय. वारीची आणि पंढरपूरची याआधीची तोंडओळख तेवढ्यापुरतीच. मर्यादित असलेली.



पंढरपुरातला सावरकरांचा पुतळा. त्याच्यामागचं ऐश्वर्य़ा हॉटेल. या दोघांच्या मधोमध उभी असलेली एबीपी माझाची ओबी. ही ओबी वॅन मी तेव्हाही पाहिली होती. लांबूनच. तिच्या आत काय आहे, हे कुतूहलानं बघितलं होतं. हे एवढंच पुसटसं आठवतंय..

चालत-बिलत, वारकऱ्यांसोबत किंवा पाऊल खेळत, रिंगण-बिंगण वगैरे कधी प्रत्यक्ष पाहिलं किंवा अनुभवलं नव्हतं.

ते यंदा अनुभवलं. आहा… भारावून टाकणारा प्रवास...



आता वारीबद्दल सगळं चांगलं वगैरे लिहायला हवं का? तर मुळीच नाही.

याआधी अनेकांनी वारीबद्दल चांगलं वाईट असं दोन्हीही लिहीलेलं आहेच.

संतपरंपरा, संतसाहित्य, वारकरी संप्रदाय वगैरेवर लिहीण्याइतका अभ्यास आपला आहे का?

माझा तर मुळीच नाही. त्यामुळे तो विषय नकोच.



काय लिहीवं? मेघराज सर दोनदा आले. ब्लॉग लिहून दे म्हणाले.. नाही म्हणायची संधी नव्हतीच.

याजसाठी केला हा अट्टाहास…

लग्नाला दोन महिनेही पूर्ण झालेले नव्हते. अशात वारी कवर करायला जाशील का, अशी विचारणा झाली.

आता याला संधी म्हणायची की आव्हान, याचं अॅनलिसिस होण्याअगोदरच मी गुरुसोबत देहूच्या दिशेने रवाना झालो.

नाईट शिफ्ट नीटशी संपलीही नव्हती. झोपही अर्थवटच राहिलेली. त्यात रिपोर्टींगचा अनुभव शून्य. काय करणार होतो आम्ही जाऊन? पांडुरंगालाच ठाऊक.

उद्या वारीला जायचंय. बायकोला सांगितलं.

कधी येणार परत. तिचा प्रश्न.

२० एक दिवसांनी येईन… माझं उडवाउडवीचं उत्तर.. तोपर्यंत वारीसोबतच राहणार आहे…

संवाद संपला. वारी सुरु झाली.

रुकमीणी रुकमीनी

शादी के बाद क्या क्या हुआ.. असं कुणी माझ्या बायकोला विचारलं

तर ती.. मेरा विठ्ठल तो वारी चल दिया.. असं डोळे वटारुन सांगेल, तेव्हा माझ्याही पायाखालची वीट सरकेलच. असो..

बायकोला आणि घरातल्यांना काळजी. जेवणार कुठे, राहणार कुठे, जाऊन करणार काय.. काही माहित नाही. काहीच ठरवेलं नाही.



चालत राहायचं. धु म्हटलं की धुवायचं… असं तर होत नाहीये ना..? मनोमन असंच वाटून गेलं. पण ते काही वेळापुरतंच. नंतर ना पूर्ण पत्रकार होतो.. ना वारकरी आणि नाही माणूस.

वारीला जायचंच आहे, हे कळल्यानंतर दोघा-तिघांना फोन फिरवले. वारीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सगळेजण वारीबद्दल भरभरुन सांगत होते. ज्यांना फोन केले त्यांच्याशी माझं बोलणं झालंच नाही. त्यांच्यामार्फत माझ्याशी फक्त वारीचा प्रभाव बोलत होता.

नंतर असं वाटलं कुणालाच फोन करायला नको होता. कदाचित काहीच माहिती घेतली नसती, तर सगळं नवं नवं दिसलं असतं.



वारी दिसायला एकदम भारी दिसते. फोटोतली वारी किती देखणी आहे, हे सांगायला संत साहित्याचा अभ्यास असलेल्या जाणकाराची गरज थोडीच लागते. माझा विठ्ठल माझी वारीच्या निमित्तानं खूप माणसं सतत समोर आली. या संपूर्ण वारीमध्ये रिपोर्टर अशी ओळख लपवून अस्सल काही सापडतंय का, याचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कितपत जमला? पांडुरंगालाच ठाऊक.



अनेक चुका वारीत आम्ही केल्या. वारी कव्हर करणं आणि नुसती वारी करणं, यात फरक आहे. अनेकदा पालखी आमच्या पुढे निघून गेली. अनेकदा आम्ही पालखीतल्या परंपरागत सुरु असलेल्या रुढी कव्हर करु शकलो नाही. अनेकदा राजकीय व्यक्तिमत्वांना आम्ही वारीत गाठू शकलो नाही. कामाचा भाग म्हणून या बाबी चुकल्या, याचं राहूनराहून दुःख वाटलं. पण वैयक्तिक विचाराल तर अजिबात नाही. वारीला पॉलिटीकली आणि प्रमोशनली कव्हर करणं आपण थांबवलं पाहिजे. पण वारीचा पीआर आता जोरात आहे. तो थांबवण्यासाठी आता पांडुरंगालाच कमरेवरचे हात झटकावे लागलीत. असो.

एक पत्रकार म्हणून माझं एक प्रांजळ मत आहे. महाराष्ट्राला वारीचं खूप कौतुक आहे. आणि कौतुकापेक्षाही कुतूहल जरा अतीच आहे. मीडिया वारीला खूप महत्व देत आलाय.. सदैव देत राहिलही. पण मराठी माध्यमं वारीचं वार्तांकन करण्याऐवजी वारीचं प्रमोशनच करतायेत की काय? हा प्रश्न मला अस्वस्थ करत राहतो. बरं नाही केलं वार्तांकन आणि फक्त वारीचं प्रमोशनच केलं, तरी त्यात काय चुकलं? याचंही उत्तर मला सापडलेलं नाही. विचारमंथन पांडुरंगासोबत सुरुच आहे.



प्रश्न अनेक आहेत. वारीमध्ये तुकोबांची पालखी आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी या दोन्ही पालखींचा मार्ग जसा वेगळा आहे. तसा या दोन्ही पालखींमधला माहौलदेखील वेगळाच आहे. पण या दोन्ही पालख्यांना सेलिब्रिटी पालखीचा दर्जा मिळालाय, हे कुणीच नाकारु शकत नाही. निवृत्ती-सोपानकाका, मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव इत्यादी अनेक संतांच्या पालख्यांची हवी तितकी दखल अजूनपर्यंत घेतली का गेली नाही, याचं कारणंही उमजत नाही.



दरम्यान वारीच्या सोहळ्यात पालखी प्रमुख, चोपदार, सोहळा प्रमुख यांच्यावर खूप दडपण असतं. पण त्यांच्याहीपेक्षा सगळ्यात जास्त दडपण असतं, ते पोलिसांवरच.

वारीत सगळ्यात जास्त हाल कुणाचे होत असतील, तर ते पोलिसांचे. नाव न सांगण्याच्या अटीवरुन अनेक पोलिस कर्मचारी वारीबद्दल ऑफ द रेकॉर्ड बोलतात. वारीच्या काळात वाहतुकीचे तीन-तेरा वाजलेले असतात. १२ तास उभं राहून शिफ्ट करणं म्हणजे खायचं काम असतं का? त्यात जेवणाचा पत्ता नाही. पाणी टँकरचं. ते कसं असेल माहित नाही. शिफ्ट संपली की तास दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकायचं. त्यानंतर घर गाठायचं. झोपायचं कधी? उठायचं कधी? पुन्हा पालखी जिथे असेल तिथं हजर व्हायचं कधी? बापरे. किती हाल आणि कष्ट. हा पोलीस माऊलीच खरा पांडुरंग नाही, तर कोणंय? तुम्हीच सांगा.



गेली पाच-सहा वर्ष अनेक पोलिस कर्मचारी अशाप्रकारे वारीत ड्युटी करतायेत. त्यांना घर नसेल का? बायका-पोरं नसतील का? सोलापूर, सातारा, पुणे अशा तीनही जिल्ह्यांमधल्या पोलिसांना वारीची स्पेशल ड्युटी लावली जाते. त्यांचं वार्तांकन कुणी करु शकणार आहे का? त्यांची बातमी कुणी देऊ शकणार आहे का? माहित नाही.

दहीहंडीवर मी माहितीपट केला. मुंबईतल्या गणेशोत्सवावरही केला. आणि आता वारीचं कव्हरेज करायला गेलो. तिनही ठिकाणी अर्थकारण आहे आणि राजकारणदेखील आहेच. या तीनही उत्सवांकडे तटस्थपणे पाहिल्यावर अनेक प्रश्न पडतात. दहीहंडी आणि गणपतीप्रमाणेच वारीसुद्धा एक इव्हेंट बनलाय का? ठोस माहित नाही. पण बहुतेक हो.

वारीत सगळं मिळतं. जगण्यासाठी जे-जे लागतं ते-ते सगळं. जगण्याच्या सगळ्या 'गरजा' वारीत भागवता येतात.



का येतात इतकी लोकं वारीत? त्यातले किती जणं खरे वारकरी आहेत? ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे राजाभाऊ चोपदार एकदा वारीदरम्यान म्हणाले की, वारकऱ्यांची संख्यात्मक वाढ प्रचंड मोठी आहे. पण वारकऱ्यांची गुणात्मक वाढ कितपत झाली आहे? हा अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे. मी हे ऐकून दचकलोच होतो.

वारीचं गुणगान आपण गातो. गायलाच हवं. शंकाच नाही. पण वारीत दिसणारी माणसं जरा निरखून बघा.

चेहऱ्यावर सुरकुत्या, पायाला भेगा, माथ्यावर गंध, झिजलेल्या चपला, अंगावर सफेद कपडे.. असं साधारण चित्रंय.



वर्षानुवर्ष इतकं सगळं बदललं. पण वारीतली माणसं बदलली नाहीत. वारकऱ्यांचा काहीच विकास झालेला नाहीये का अजूनही?

नेमकं या चित्रातनं आपण काय बोध घ्यायचा?

सगळेजण वारी करतात. पण आपआपल्या सोयीनं. सोयीनं जे वारीत भाग घेतात, त्यांना पांडुरंग भेटेल का? पांडुरंगालाच ठाऊक.

वारीची गरज आहे का? अर्थातच आहे.

वारी खूप शिकवते का? तर अजिबात नाही. वारीत आल्यानंतर माणूस स्वतःच स्वतःचं शिकत जातो. घडत जातो. उलगडत जातो.

वारीत आलेल्या सगळ्यांना माऊली'च' म्हणा, असा काही नियम नसतो. मग तरी सगळे माऊली कसे होऊन जातात? याला वारीची जादू म्हणतात.

वारीत आपण सगळ्यांमध्ये मिसळतो. अभंग, आनंद, उर्जा, आचार-विचार, तत्वज्ञान या सगळ्याचं आदानप्रदान करतो.



'ज्ञानोबा माऊली तुकाराम'चा गजर करत पंढरपुरात दाखल होतो. चंद्रभागेत स्नान करतो.

विठूमाऊलींचं दर्शन घेतो. आणि सुरु होते परतीची वारी.

इथून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरु होतात का?.. हे जाणून घेण्यासाठी माध्यमांनी परतीची वारीसुद्धा अवश्य कव्हर केली पाहिजे. असो.

वारी शेकडो वर्ष सुरु आहे.. सुरु राहिल..



पण या सगळ्यात आपण आपला विठ्ठल शोधू शकलो नाही, तर वारी करण्याला अर्थ तरी काय उरला?

मेरी सुनो तो… आयुष्यात एकदा तरी वारी करावी…आणि आयुष्यात एकदाच वारी करावी!