गेल्यावर्षी श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेतल्या अंतिम सामन्यात अखेरच्या चेंडूवर दिनेश कार्तिकनं षटकार ठोकत टीम इंडियाला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. अखेरच्या चेंडूवरच्या त्या विजयी षटकारानं दिनेश कार्तिक भारतीय क्रिकेटरसिकांचा हीरो ठरला होता...


जवळपास वर्षभरानं हाच दिनेश कार्तिक आता व्हिलन ठरलाय... याचं कारण न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टीत कार्तिकनं नाकारलेली एकेरी धाव...


भारताला विजयासाठी शेवटच्या चार चेंडूत 14 धावांची गरज असताना दिनेश कार्तिकनं लाँग ऑनच्या दिशेनं चेंडू टोलावला. पण या चेंडूवर एकेरी धाव निघत असताना आणि नॉन स्ट्रायकर एंडचा कृणाल पंड्याही फटकेबाजी करत असताना कार्तिकनं स्ट्राईक स्वत:कडेच ठेवला.


टिम साऊथीच्या पुढच्या चेंडूवर कार्तिकला केवळ एकच धाव घेता आली. आणि इथेच क्रिकेटरसिकांमध्ये कार्तिकच्या नावानं शंख फुंकण्यास सुरुवात झाली. अखेरच्या चेंडूवर कार्तिकनं षटकार ठोकला खरा पण भारतानं हा सामना अवघ्या चार धावांनी गमावला. सामना संपल्यानंतर कार्तिकवर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली. ‘कार्तिक तू काही धोनी नाहीस’ इथपासून ‘त्याला संघातून कायमचं वगळा’ अशा कमेंट्स धडकू लागल्या. पण कार्तिकला या पराभवासाठी जबाबदार धरणं खरंच योग्य ठरेल?


कार्तिकनं 2017 पासून ट्वेन्टी ट्वेन्टीत मोलाची कामगिरी बजावली आहे. गेल्या दोन वर्षात त्यानं 16 डावांत तब्बल 56.44 च्या सरासरीनं 290 धावा फटकावल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे 16 पैकी 11 डावांत तो नाबाद राहिला आहे आणि त्याचा स्ट्राईक आहे 163.31. कार्तिकची ही कामगिरी आणि त्याचा ट्वेन्टी ट्वेन्टीतला सध्याचा फॉर्म लक्षात घेता त्याक्षणी त्यानं घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा म्हणणं योग्य ठरणार.


न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सामन्यात भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरणारी बरीच कारण देता येतील... सामन्यात मोक्याच्या क्षणी खलील अहमद आणि रोहित शर्माकडून सुटलेले झेल... टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण... खलील अहमद, हार्दिक आणि कृणाल पंड्यां या तिघांनी मिळूनं 12 षटकांत केवळ एका विकेटच्या मोबदल्यात दिलेल्या तब्बल 145 धावा... भारताच्या पराभवाची खरंतर ही मुख्य कारण...


Public memory is very short असं आपल्याकडे म्हटलं जातं. ज्या कार्तिकने अंतिम चेंडूवर षटकार ठोकून भारताला निदाहास ट्रॉफी जिंकून दिली आज तोच कार्तिक संघाला जिंकून देऊ शकला नाही म्हणून ट्रोल झाला. खरंतर क्रिकेटमध्ये जर-तरच्या भाषेला काहीच अर्थ नसतो. हार आणि जीत हा खेळाचाच एक भाग. पण भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात जिंकल्यानंतर आपण खेळाडूंना कौतुकानं डोक्यावर घेतो आणि हरल्यानंतर टीका हे ठरलेल. हे चित्र कधी बदलणार हाच खरा प्रश्न आहे.