2017 चा वन डे विश्वचषक आणि त्यानंतर 2018च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय संघ विश्वविजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण विजेतेपदाचा तो घास भारताकडून दोन्ही वेळा एकाच संघानं हिरावून घेतली. आणि आता तोच संघ पुन्हा एकदा अडथळा बनून भारतासमोर उभा ठाकलाय.... ती आहे हेदर नाईटची इंग्लिश फौज...
भारत आणि इंग्लंड सिडनीत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येत आहेत. या लढतीत भारतीय संघाला त्या दोन्ही पराभवांचा वचपा काढण्याची संधी खरं तर चालून आली आहे. पराभवाची ती सल आणि पहिल्या विजेतेपदाची संधी ज्या संघानं दोन वेळा हिरावून घेतली त्या संघाला उपांत्य फेरीत टक्कर देणं ही खरं तर भारतासाठी उजवी बाजू मानायला हवी. कारण एक तर करो या मरोची स्थिती आणि जुन्या जखमांची सल ह्या दोन गोष्टी आत्मविश्वास उंचावणाऱ्या ठरतात.
2011 चा विश्वचषक आपल्याला आठवतंच असेल. 2003 साली ज्या ऑस्ट्रेलियानं आपल्या ताकदवर फौजेसह सौरव गांगुलीच्या टीम इंडियाला विश्वचषकाच्या फायनलमध्ये सहज हरवलं, तीच बलाढ्य ऑस्ट्रेलियन फौज 2011 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताकडून पराभूत झाली. समोरचा संघ तेव्हाही त्याच ताकदीचा होता. पण धोनीच्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वरचढ ठरला. क्रिकेट हा खेळ जेवढा शारीरिक क्षमतेनं खेळला जातो त्यापेक्षा कैक पटीनं जास्त तो डोक्य़ानं खेळला जातो. आणि हरमनप्रीतच्या संघासाठी तीच मोठी अग्निपरीक्षा ठरावी.
पण साखळी फेरीत वर्चस्व गाजवलेला भारतीय संघ खरंच तितका ताकदवर आहे का? तर नाही. या विश्वचषकात गोलंदाजी ही भारतीय संघाची उजवी बाजू ठरतेय. प्रभावी माऱ्याच्या जोरावर आपण बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही नमवलं. पण फलंदाजीत भारतीय महिलांनी निराशा केली. एकट्या शेफाली वर्मानं धावांचा रतीब घातला. पण दुसरीकडे स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरचं भारताच्या साखळी फेरीतल्या विजयातलं योगदान अगदीच नगण्य आहे. स्मृतीनं या स्पर्धेत तीन सामन्यांत 38 तर हरमनला चार सामन्यांत केवळ 26 धावाच करता आल्या आहेत. भारताच्या या अनुभवी आणि जबाबदार खेळाडूंची विश्वचषकासारख्या व्यासपीठावरची ही कामगिरी निश्चितच समाधानकारक नाही. त्यामुळे बाद फेरीच्या निर्णायक लढतीत त्या दोघींना आपला खेळ उंचावण्याची गरज आहे. इंग्लंडच्या ताफ्यातही कर्णधार हेदर नाईटसह अमी जोन्स, ट्रॅमी ब्यूमाँट, अना श्रबसोल, डॅनीएला वेटसारख्या मातब्बर खेळाडू आहेत. त्यामुळे माजी विजेत्यांसमोर भारतीय संघाचा कस लागेल.
महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासात भारताचं आव्हान याआधी तीन वेळा उपांत्य फेरीत संपुष्टात आलं आहे. 2009आणि 2010 सालच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर गेल्या विश्वचषकात इंग्लंडनच भारताला अंतिम फेरी गाठण्यापासून रोखलं होतं. आता त्याच इंग्लंडचा अडथळा दूर करुन भारतीय महिला पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.