महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचं नाव समोर आलं की नकळत मिलिंद नार्वेकर यांचंही नाव ओघाने येतंच. उद्धव ठाकरेंच्या राजकीय रंगमंचाच्या प्रवेशाबरोबर मिलिंद नार्वेकर यांचा प्रवास सुरु आहे तो आजतागायत. प्रसंग कुठलाही असो मिलिंद नार्वेकर हे सावलीसारखे मागे वावरणारच. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू व्यक्ती म्हणून तीन दशकांपासून काम पाहत आहेत. मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातला गटप्रमुख ते शिवसेना सचिव हा प्रवास त्याच्या चिकाटी, मेहनत आणि निष्ठेचा परिपाक आहे.


ज्यावेळी शिवसेनेचे नेतृत्त्व बाळासाहेबांनंतर राज ठाकरे यांच्याकडे येईल, अशी अटकळ पत्रकार, ते सर्वसामान्य शिवसैनिक बांधत होते तेव्हापासून ते आज मुख्यमंत्री झालेल्या उद्धवजींचे ते स्वीय सहाय्यक आहेत. उद्धव ठाकरे ज्यावेळी शिवसेनेत फारसे सक्रिय नव्हते, तेव्हाचा हा काळ, त्यावेळी शिवसेनेत राज ठाकरे, नारायण राणे, स्मिता ठाकरे, मनोहर जोशी, सुभाष देसाई यांचा शब्द शिवसेनाप्रमुखांच्या खालोखाल महत्त्वाचा मानला जात होता.


उद्धव ठाकरे आपला छंद, कुटुंब यांना जास्त वेळ देत होते. तो हा काळ होता. त्यावेळी मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून मातोश्रीवर 1992 च्या सुमारास रुजू झाले. पण तरीही ते फारसे प्रकाशझोतात नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या अपॉईंटमेंट, दौरे, संघटनात्मक भेटीगाठी ते समर्थपणे सांभाळत होते. पहिल्यांदा प्रकाशझोतात आले ते 2004 सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत!

2004 मध्ये भाजपा-शिवसेनेची सत्ता येणार अशी माध्यमातून चर्चा होती. सहाजिकच सेनेतील अंतर्गत राजकारणही जोरात होते. त्यावेळी शिवसेनेत भास्कर जाधव विरुद्ध नारायण राणे असा अंतर्गत वाद असल्याची चर्चा माध्यमांमध्ये जोरात होती. कदाचित या वादाची परिणिती, भास्कर जाधव यांना गुहागर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात झाली. भास्कर जाधवांना असे सांगण्यात आले की सर्वेक्षण अहवालावरुन असे दिसते की ते गुहागर विधानसभा मतदारसंघात पराभूत होतील. त्यामुळे त्यांची उमेदवारी नाकारण्यात येत आहे. मातोश्रीवर भास्कर जाधव उमेदवारी मिळावी म्हणून गेले असता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ताटकळत राहावे लागले. 1990 पासून शिवसेनेत सक्रिय असलेल्या भास्कर जाधव यांना ही बाब प्रचंड खटकली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर समांतर सत्ताकेंद्र चालवत असल्याचा घणाघाती आरोप करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.


शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर शिवसेना सोडणारे भास्कर जाधव हे पहिले महत्त्वाचे नेते होते. त्यानंतर नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि तिथून खऱ्या अर्थाने मिलिंद नार्वेकर हे महाराष्ट्राला सामान्यांना परिचित झाले. गंमत अशी की नारायण राणे यांनी मिलिंद नार्वेकर यांची बाजू घेत भास्कर जाधव यांचे आरोप खोडून काढले होते.


2004 साली युतीची सत्ता तर आलीच नाही. पण निकालानंतर सत्ता चुकीच्या तिकीट वाटप आणि फसलेल्या रणनीतीमुळे गेली अशी ठाम भावना नारायण राणे यांची झाली. आता आपल्याला शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेत स्थान राहिले नाही हे नारायण राणेंना उमगले. यामुळे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच वितुष्ट आले. अन् 2005 साली नारायण राणे हे अकरा आमदारांना घेऊन शिवसेने बाहेर पडले. त्यांनीही पत्रकार परिषद घेऊन मिलींद नार्वेकर यांच्यावर आरोप करत सेना सोडली.


काही काळाने मातोश्रीच्या विठ्ठलाभोवती बडवे जमा झाले आहेत. त्यांच्यामुळे शिवसेनेत काम करणे अशक्य झाले असल्याचा आरोप करत राज ठाकरेंनीही 2006 साली शिवसेना सोडली. बडवे नक्की कोण हे त्यांनी कधीच स्पष्ट केले नाही, मात्र लोकांनी एक नाव नक्की ठरवले होते ते होते मिलिंद नार्वेकरांचे!


वास्तविक मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव होते. शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितल्याशिवाय शिवसेनेत पानही हलत नाही, हे ज्यांनी शिवसेना संघटन म्हणून जवळून पाहिली आहे त्यांना ठाऊक आहेच. या बाबी उद्धव ठाकरे यांना माहित होत्या. फक्त मिलिंद नार्वेकरांनी पक्षप्रमुखांचा गोडवा शाबूत ठेवण्यासाठी लोकांशी शत्रुत्व घेतले हे उघड आहे.


पक्षप्रमुखांना सहज भेटू न देणारा खलनायक अशी मिलिंद नार्वेकर यांची प्रतिमा बनत गेली. तरी तोच पक्षप्रमुखांची कवचकुंडले आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले. नार्वेकरांनी टीकेची कधीच पर्वा केली नाही, ते माध्यमातून कायम चर्चेत राहिले. माध्यमकर्मींशी त्यांचे वैयक्तिक संबंध उत्तम होते पण त्यांनी माध्यमांना मुलाखती देणे, ब्रेकिंग न्यूज देणे हे कधीही केले नाही. SMS वर माहिती देताना Yes or No एवढंच उत्तर देताना पक्षप्रमुखांच्या प्रतिमेला तडा जाणार नाही याची दक्षता घेणं हा मिलिंदचा हातखंड. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्षात करिष्मा वाढत असतानाच मिलिंद नार्वेकरही पक्षात महत्त्वाचे होत गेले.


मिलिंद नार्वेकरांच्या गणरायाच्या आगमनाची चर्चा नेहमीच होते. भाजप-सेनेचे सरकार आल्यावर 2015 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिलिंद नार्वेकरांच्या गणपतीला भेट दिली. त्याचं कवित्व हे युतीची सत्ता असताना पाच वर्षे चालली. बॉलिवूडमधील मोठं मोठ्ठे फिल्म स्टार, कार्पोरेट जगतातील मोठ्या हस्ती मिलिंद नार्वेकरांच्या पाली हिलीच्या घरी गणेशोत्सवात हजेरी लावतात. तरी मिलिंद लो-प्रोफाईल राहतात.


2018 साली तर शिवसेनेने त्यांना अधिकृतरित्या पक्षाचे सचिव म्हणtन जबाबदारी दिली. ती जबाबदारी देताना युवा सेनेचे पदाधिकारी आणि आदित्य ठाकरेंचे समर्थक सूरज चव्हाण यांना ही सचिव करण्यात आले. तेव्हा प्रथमच मिलिंदच्या सामराज्याला तडा गेला. सेनेच्या युवराजने मिलिंदचे पंख कापले ही भावना मिलिंद समर्थकात झाली.


2018 सालच्या विधान परिषद निवडणुकीत अनिल परबांसोबत मिलिंद नार्वेकर यांचे नाव आघाडीवर होते. पण पुन्हा एकदा मिलिंद यांना आमदारकीने हुलकावणी दिली अन् तिकीट मनिषा कायंदे ना जाहीर झाले. त्यानंतर मिलिंद नार्वेकर काही दिवस अज्ञातवासात होते.


शिवसेना पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी असून त्यांना अजूनही आमदार किंवा खासदार या वैधानिक पदावर पोहोचता आले नाही.

सत्तेच्या वर्तुळात आतल्या गोटातील व्यक्तींना वैधानिक पद, मंत्रीपद मिळाल्याचा इतिहास आहे. देशाच्या राजकारणात इंदिरा गांधी यांचे सहायक राहिलेले आर के धवन असतील किंवा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असलेले अहमद पटेल यांना राज्यसभेचे खासदार झाल्याचा इतिहास आहे. त्यांना एकदा नव्हे अनेक वेळा खासदार की देऊन गांधी परिवाराने उपकृत केले आहे. इतकी वर्षे उद्धव ठाकरे यांची कवचकुंडले बनून नेपथ्यात आपली भूमिका चोखपणे बजावणारे मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेवर संधी कधी मिळणार हा प्रश्नच आहे.


महाराष्ट्रात याआधी, शरद पवार यांचे खाजगी सचिव दिलीप वळसे पाटील, गोपीनाथ मुंडे यांचे सचिव अमित साटम, हे विधानसभा लढवून आमदार झाले. महादेवराव शिवणकर यांचे खाजगी सचिव सुबोध मोहिते शिवसेनेकडून खासदार आणि मंत्री ही झाले. प्रफुल्ल पटेल यांचे सचिव राजेश जैन हे विधानपरिषदेत पोहोचले. पण मिलिंद नार्वेकर यांना न्याय कधी मिळणार? गटप्रमुख ते शिवसेना सचिव हा प्रवास आमदारकीपर्यंत पोहोचणार का? हाच महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे.


भाजपाशी काडीमोड झाल्यानंतरच्या कालखंडात ज्यावेळी खासदार संजय राऊत राज्यपालांवर टीका करत होते. तेव्हा मिलिंद नार्वेकर राजभवनावर जाऊन या संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी झटत असल्याचे महाराष्ट्र्राने पाहिले आहे. मिलिंद नार्वेकरांच्या शिष्टाईने अनेक गोष्टी उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोप्या होत गेल्या.


वास्तविक पाहता मिलिंद नार्वेकर यांचा संघटनेतील अनुभव व दबदबा पाहता त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी या आधीच मिळायला हवी होती. पण पडद्याआड राहून शांतपणे आपले काम करणाऱ्या नार्वेकरांवर नेहमीच अन्याय झाला असे म्हणता येईल.


2019 हे वर्ष शिवसेनेच्या संघटनात्मक सत्तांतराचे वर्षे. युवासेना प्रमुखांचा पगडा प्रत्येक निर्णयावर दिसून आला. आतापर्यंत विधानसभा निवडणूक तिकीट वाटपात मिलिंद नार्वेकरांचा दबदबा असायचा तो कमी झाला आणि आदित्य सेनेचा उदय झाला. आदित्यच्या वर्तुळात वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण, अमोल किर्तीकर, प्रियंका चतुर्वेदी, अमेय घोले, सचिन अहिर, उदय सामंत या नेत्यांचा समावेश आहे. आता कुठलीही अवघड जबाबदारी सेनेतील जुन्या जाणत्या नेत्याला न देता आदित्य सेनेतील शिलेदारावर सोपवली जाते. सत्तास्थापनेच्या संघर्षात काही महत्त्वपूर्ण मिशन आदित्य सेनेतील नेत्यांवर सोपवले होते. तसेच राहुल नार्वेकरांच्या विधानपरिषद उमेदवारीच्या वेळी मिलिंदने कटकारस्थान केल्याचा आदित्य सेनेचा ग्रह आहे. त्यामुळे राहुलसारखा चांगला नेता शिवसेनेला गमवावा लागला. आता आदित्य सेनेतील अमेय घोलेंना नगरसेवकपद आणि आरोग्य समितीचं सभापती पदही मिळाले. काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभा मिळाली. आदित्य सेनेतील शिलेदारांना सत्तेच्या राजकारणात चांगली पद मिळत असताना मिलिंद नार्वेकर या स्पर्धेत मागे पडणार नाहीत ना..!


विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत अनेक नेत्यांनी प्रवेश केला त्यात भास्कर जाधवही होते, ज्यांनी मिलिंद नार्वेकरांवर आरोप करत सेना सोडली होती. तर नारायण राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी सेनेत यावे असे प्रयत्न खुद्द मिलिंद नार्वेकर हे करत होते. नेपथ्यात राहून काम करणाऱ्या मिलिंद नार्वेकरांना रंगमंचावर आमदारकीची भूमिका मिळणार का?


आपल्या नेत्यासाठी जे जे भल्याचे आहे ते सर्व करण्यासाठी मिलिंद नार्वेकर झटत असतात हा एक संदेश यातून जातो. त्यांच्यावर आरोप करुन पक्ष सोडणारे परत पक्षात येतात. याचा अर्थ पक्ष सोडताना जी आरोपांची फैरी मिलिंद नार्वेकर यांच्यावर वेगवेगळ्या नेत्यांनी झाडल्या होत्या. त्या चुकीच्या गृहितकावर आधारित होत्या हे स्पष्ट झालं आहे. 2004 ते 2014 पर्यंत सर्वात कठीण काळात वाईटपणा स्वतःकडे घेऊन, सगळ्यांच्या शिव्याशापाचे धनी झालेल्या मिलिंद नार्वेकरांना यावेळी तरी आमदारकी मिळणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल हे नक्की..!!