यथा ह्यल्पेन यत्नेन च्छिद्यते तरुणस्तरुः।
स एवाऽतिप्रवृध्दस्तु च्छिद्यतेऽतिप्रयत्नतः॥
एवमेव विकारोऽपि तरुणः साध्यते सुखम्।
विवृध्दः साध्यते कृछ्रादसाध्यो वाऽपि जायते॥
संदर्भ: चरक संहिता निदान 5/13/16
श्लोकाचा अर्थ


ज्या प्रमाणे वृक्षांची रोपटी लहान असतानाच नष्ट करता येतात तसेच रोग ही प्राथमिक अवस्थेत नष्ट करावेत अन्यथा नंतर आपण हतबल होतो.ह्या श्लोकानुसार कोरोनाचे रोपटे आता रोपटे राहीलेले नसून एक भयंकर प्रचंड असा वटवृक्ष झाला आहे आणि आता मानवता विनाशाच्या उंबरठ्यावर आहे!!



पण निसर्ग एवढा पण क्रूर नाही. सध्या जरी हा विध्वंस सुरू असला तरी हा नवनिर्मितीपूर्वीचा विध्वंस आहे.
निसर्गाचं त्याचं म्हणून एक अस विशेष प्रतिकार तंत्र आहे आणि त्याच नाव आहे कळप प्रतिकार सिध्दांत म्हणजेच herd immunity theory


होय. सर्वप्रथम याचा उल्लेख A. W. hedrich यांनी बाल्टीमोर अमेरिकामध्ये 1930 च्या दरम्यान पसरलेल्या measles म्हणजेच गोवरच्या साथी वेळीस केला होता. त्यांनी आपल्या प्रयोगातून हे सिद्ध करून दाखवले की जरी गोवरची साथ 1930 मध्ये सुरू झाली आणि त्यावर सामुदायिक लसीकरण मात्र 1960 नंतर सुरू झाले तरी ह्या कालावधीत एक ठराविक लोकसंख्या प्रमाण बाधित झाल्यानंतर नवीन बाधित रुग्ण सापडणे कमी होत गेले आणि नंतर लसीकरण साध्य झाल्याने रोगाचे उच्चाटन करणे जलद साध्य करता आले. याचाच 1970 मध्ये पाठपुरावा करण्यात आला वा त्यातून herd immunity threshold म्हणजेच कळप प्रतिकार शक्ती साध्य करण्यासाठी लागणाऱ्या एकूण बाधित लोक संख्येचे प्रमाण शोधून काढण्यासाठी लागणारे सूत्र होय.


या सुत्रानुसार कोरोनाच्या अगोदरच कहर केलेल्या H1N1 या विषाणूचा threshold हा 40% आहे.
पण नक्की काय असते ही शक्ती ते पहिले समजून घेऊयात.



कळप प्रतिकार म्हणजे ,"जेव्हा कोणताही नवीन घातक विषाणू किंवा जिवाणू जो की मोठी साथ पसरवू शकतो हा लोकसंख्येच्या एका विशिष्ट प्रमाणाला बाधित करतो त्यानंतर ह्या बाधा होऊन बऱ्या झालेल्या अशा मोठ्या लोकसंख्येमुळे घातक घटक नव्याने बाधा करण्यासाठी स्वतःसाठी होस्ट म्हणजे वाहक तयार करू शकत नाही व हळूहळू त्या रोगाचे उच्चाटन होते.


पण ही प्रतिकार शक्ती दोन मार्गाने साध्य होते एक म्हणजे प्रभावी लसीकरण किंवा नैसर्गिक निवडीच्या आधारावर.
नैसर्गिक निवड म्हणजे बाधा बऱ्याच जणांना होणार पण जे सामर्थ्यवान आणि चांगल्या प्रकृतीचे धनी आहेत तेच टिकून राहणार.
साहजिकच आहे की कोणताही देश प्रभावी लसीकरण हाच पर्याय निवडून त्यावर काम सुरू करेल (ह्याला मात्र एक देश अपवाद आहे काही दिवसापूर्वी covidoscope म्हणुन एक लेख साखळी सुरू आहे लोकसत्ता वृत्तपत्रात त्यात गिरीश कुबेर यांनी स्टॉकहोम मॉडेल स्पष्ट करून सांगितले होते. त्यात अशाच काही प्रकारचे प्रयत्न करण्यात आले होते)



असो जर आपला देश नागरिकांना रोगाची बाधा होऊ देऊन कळप प्रतिकार शक्ती करू इच्छित नसेल तर लस तयार करणे हाच एक अंतिम उपाय उरतो पण लस तयार करण्यात सुद्धा काही विशिष्ट टप्पे असतात.
जसे की,
1).Pre Clinical trials : यात लसीचे प्रमाण तसेच त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम, कोणत्या माध्यमातून देता येईल या सर्वांची चाचणी प्रयोगशाळा प्राणी जसे की उंदीर, कुत्रा, माकड याच क्रमाने करून मानवी चाचणी साठी विविध पर्याय पडताळून पाहिले जातात.
2).Phase I clinical trial: 10 व्यक्तींचे 2 ते 3 गट किमान अभ्यास कालावधी काही महिने ते 1 वर्ष
3). Phase II clinical trial: यात व्यक्तीचे गट संख्या 100 पर्यंत नेली जाते. किमान कालावधी - 2 वर्षे
४. Phase III clinical trial: हा जागतिक टप्पा असतो. गट संख्या 1- 3000 पर्यंत याच टप्प्यावर औषध कंपन्या new drug application म्हणजे N.D.A सादर करू शकतात आणि हे ऍप्लिकेशन मान्य झाल्यास औषध प्रायोगिक स्तरावर डॉक्टर्स ना मर्यादित प्रमाणात वितरित करून समुदायात त्यांची काय प्रतिक्रिया मिळतात याचा अभ्यास केला जातो.
5. Phase IV clinical trial: हा अंतिम टप्पा असून यात केवळ संशोधनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो आणि ह्याच टप्प्यात एफडीए कडून नवीन लस अधिकृत केली जाते.


पण हे सर्व झालं लस तयार करण्याबाबत. पण जर लस उपलब्ध होण्यात वेळ जाणार असेल आणि तो पर्यंत लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर बाधित होत असेल तर त्यावेळी कामी येतो तो कळप प्रतिकार सिद्धांत!


ह्या सिद्धांत मध्ये 3 प्रतिमाने म्हणजेच मॉडेल्स वापरली जातात


1) स्पर्धात्मक गमन म्हणजेच Race through it


2) प्रलंबित गमन म्हणजेच delaying the pass


3) समन्वयातून संपुष्टी म्हणजेच Co ordinate and crush


ह्यातले दुसरे प्रतिमान सर्व जगाने प्राथमिक उपाय म्हणून वापरले.


प्रलंबित गमन Delaying the pass यामध्ये विषाणूचा प्रसार होण्यासाठी समुदायाचे एकमेकांसोबत होणाऱ्या विविध आंतरक्रिया प्रतिबंधित करून त्यावर बंदी घातलेल्या दिसून येतात.
म्हणजेच लॉकडाऊनचे विविध टप्पे ज्यात आपण समाजाच्या मोठ्या भागाला घरातच बंदिस्त करून विषाणूचा प्रसार होणे थांबवण्याचा प्रयत्न करतो.


तिसरे प्रतिमान म्हणजे समन्वयातून संपुष्टी म्हणजेच Co ordinate and crush म्हणजे काय ते पाहू.


या मध्ये सारे जग म्हणजे एकच घटक मानून सर्वांनी आंतरराष्ट्रीय प्रवास, संशोधन, उपचार पद्धती, लॉकडाऊन आणि सुविधा या बाबतीत एक संयुक्त आघाडी वरती काम करतात आणि जिथून या विषाणूचा प्रवास सुरू झाला किंवा जिथे ह्या विषाणूचे केंद्रीकरण झालेले आहे तिथे प्रभावी योजना लागू करणे असे स्वरूपाची प्रक्रिया असते. परंतु, सध्याच्या बहुकेंद्रित आणि संशयी राजकारणाच्या युगात हे प्रतिमान स्वप्नवत आहे.


आता पहिले प्रतिमान म्हणजे स्पर्धात्मक गमन race through it म्हणजे काय असते ते पाहू.
हे सर्वात जलद गतीचे प्रतीमान असून सुद्धा ते वापरण्यात आले नाही. कारण त्यात सरकारची भूमिका शून्य असते.
ह्या प्रकारात सरकार जास्तीत जास्त निरोगी लोक जे ह्या जीवघेण्या रोगाची बाधा झाली तरी स्वतःच्या प्रतिकार शक्तीच्या आधारावर बरे होऊ शकतील अशा लोकांना म्हणजेच लोकसंख्येच्या तरुण गटाला कोणत्याही बंधना व्यतिरिक्त समुदायात वावर करू देते.
म्हणजे ह्यात अंतिम उद्देश जास्तीत जास्त निरोगी आणि बरे होऊ शकणाऱ्या लोकांना हा रोग होऊ देणे हाच असतो.
ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर साथ पसरते आणि लक्षावधी बळी जाऊ शकतात ह्यात सरकारची भूमिका फक्त वृध्द आणि बालके आणि इतर आजाराने ग्रस्त लोक यांच्या पुरतीच मर्यादित असते.


आणि ह्याच 3 मॉडेल्स मध्ये थोडी सुधारणा करून आपण भारताने एक सुनियोजित कार्यक्रम आखला आहे असे म्हणता येईल.


आपण पहिल्यांदा delayed मॉडेल वापरले ते ही 4 विविध टप्प्यात. त्यानंतर आता आपण 5 वा टप्पा हा unlock -1 म्हणून घोषित केला आहे.
ह्या unlock 1 टप्प्याचा जर बारकाईने विचार केला तर आपण असे म्हणू शकतो की हा स्पर्धात्मक गमन ह्या मॉडेलचा सुधारित आविष्कार आहे. कारण ह्यात पण आपण हळूहळू करून समाजाचे विविध गट एक एक करून बंदिस्त वातावरणीय जागेतून आपण विषाणू बाधा करू शकणाऱ्या वातावरणात आणणार आहोत. पण ह्यात सरकारची भूमिका प्रभावी आहे. अगोदरच आपण delayed मॉडेल वापरल्याने प्रसाराची साखळी तोडण्यात आपण बऱ्यापैकी यश मिळवलेले दिसते. आता त्यानंतर आपण हे स्पर्धात्मक गमनाचे नियंत्रित मॉडेल अनुसरण केल्यावर येणाऱ्या काही काळात आपल्याला कळप प्रतिकार शक्ती चे दृश्य परिणाम दिसू लागतील तेव्हा बाहेर येणाऱ्या सर्वांनी सामाजिक अंतर आणि इतर प्रतिबंधक नियम पाळले तरच हे नियंत्रित स्पर्धात्मक गमन आपले हेतू साध्य करून शेवटी मग तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच जागतिक आघाडीकडे मार्गक्रमण करेल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. ह्यातून एवढेच वाटते की,


"आम्ही नेहमीच अशक्यावर मात करण्याच्या सामर्थ्याने स्वत: ची व्याख्या केली आहे. आम्ही हे क्षण मोजतो. हे क्षण जेव्हा आपण उच्च लक्ष्य ठेवण्याचे, अडथळे दूर करण्याचे, तार्‍यांपर्यंत पोहोचण्याचे, अज्ञात गोष्टी शोधण्याचे धाडस करतो. हे क्षण आम्ही अभिमानास्पद कामगिरी म्हणून लक्षात ठेवतो. पण आम्ही ते सर्व गमावलंय. किंवा आपण विसरलो आहोत की आपण अजूनही नवीन गोष्टी शोधणार आहोत. आम्ही केवळ सुरुवात केली आहे. आमची महान कामे आपल्यामागे असू शकत नाहीत, कारण आपले नशिब आपल्यावर आहे. " हॉलिवूड चित्रपट इंटरस्टेलर मधील कुपरचा संदेश.