BLOG : छोटे रस्ते आणि अरुंद अंधाऱ्या गल्ल्यांमधून वाट काढत आम्ही एका कारखान्यात पोहोचलो. कारखान्यात गेल्यावर दिसलं की, काही कारागिर एकदम एकाग्र चित्ताने कसला तरी पोशाख बनवत होते. काम करुन राकट झालेल्या हातांनी कपड्यांवर अलगदपणे नक्षीकाम सुरु होतं. मी विचारलं की तुम्ही नेमकं कसलं काम करत आहात? तर उत्तर आलं की हम ठाकुरजीकी पोशाख सील रहे है....
मी विचारलं – ठाकुरजी मतलब?
'ठाकुरजी मतलब भगवान श्रीकृष्ण, मथुरा वृंदावन मे उनकी लिला इसी नाम से जानी जाती है' कारागिराने उत्तर दिलं.
कारखाना होता श्रीकृष्णाचे पोशाख बनवण्याचा. कारखान्याच्या मालकाचं नाव होतं बंटी मुल्ला. आणि सगळे कामगार धर्माने मुस्लिम होते.
गेल्या कित्येक वर्षांपासून श्रीकृष्णाचे पोशाख बनवण्याचं काम बंटी मुल्ला इमान इतबारे करतोय. आणि त्याच्या हाताखालचे सगळे कारागिर सुद्धा मुसलमानच आहे. अर्थात आजच्या या सगळ्या राजकारणात हिंदु देवाचे कपडे मुस्लिम बनवतायत हे थोडं आश्चर्याचं वाटू शकतं पण मथुरेत ही काही नवी बाब नाहीये. प्रामाणिकपणे ठाकुरजीचे कपडे बनवणाऱा कारखान्याचा मालक बंटी मुल्लाला मी कॅमेरासमोर बोलायला सांगितल्यावर मात्र तो एकदम घाबरला. मधाळ आणि हळूवारपणे बोलणाऱ्या बंटी मुल्लाने हात जोडत मला कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. मी कारण विचारलं तर म्हणाला ‘’की मी इतक्या वर्षांपासून इथे हे काम करतोय पण मध्ये धर्म कधीच आला नाही. पण काही दिवसांपुर्वी माझा फोटो मॉर्फ करत वेगळ्याच आशयाने हिंदु मुस्लिमांमधला तणाव वाढवण्यासाठी तो वापरला गेला. त्यामुळे मला आणि घरच्यांना खुप त्रास झाला. त्यामुळे आता कॅमेरामोर बोललो तर पुन्हा आणखी काय नवं संकट येईल याची भिती वाटते’ आणि आईनी पण आता कुठल्याच कॅमेरासमोर बोलायचं नाही असं दटावलंय , हे सगळं तोंडावरचं मास्क वर करत त्याने सांगितलं.
समाजातला विखार आणि विद्वेष कसा वाढत चाललाय त्याचच हे द्योतक आहे. अर्थात याबद्दल त्याने मात्र एकदम मौन बाळगलं. पण मुस्लिम व्यक्ती हिंदुं देवाचे कपडे बनवतोय याचा अभिमान वाटायला हवा. पण विवेक मेला की विकृती जन्म घेते आणि त्यातून असं काहीतरी कृत्य जन्म घेतं. काही दिवसांपुर्वी मथुरेत एका मुस्लिम ठेलेवाल्याने ठेल्याचं हिंदु धर्मीय नाव ठेवल्याने त्याला मारहाण केली होती. शेवटी त्याने काहीतरी इंग्लिश नाव ठेवलं. इतकच नाही तर मथुरेत्या ज्या गल्लीत आधी नॉनवेज मिळायचं तिथेही आता व्हेज पदार्थच बनवण्याची सक्ती करण्यात येतेय. इतकच नाही तर हिंदु नाव ठेल्याला ठेवल्यामुळे एका मुस्लिम तरुणाला मारहाण करत नाव सुद्धा बदलायला लावल्याची घटना घडली. प्रेमाचा संदेश देणारं मथुरा-वृंदावन कसं बदलतेय ते या घटनांवरुन दिसतं. राजकारणामुळे इथली संस्कृती बदलतेय असा नाराजीचा सूर सुद्धा काही कारागिरांनी बोलून दाखवला. पण हिंदु मुस्लिम दोघंही इथे प्रेमभावाने राहतात असं सगळ्यांनी आवर्जून सांगितलं. असो. तर ज्या कारखान्यात आम्ही गेलो तिथे काही वेळाने तोंडात मावा भरलेला एक कारागिर उशीराने आला आणि कॅमेराकडे दुर्लक्ष करुन कामाला लागला. मग त्याच्या समोरच्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की हा गोसेवक आहे, मग मी त्याला याबाबत विचारल्यावर तोंडातला माव्याचा टोबरा थुकत त्याने त्याचं नाव सांगितलं.
नाव होतं सय्यद.....
सय्यद भाई तीन पिढ्यांपासून गोसेवा करतात. त्यांच्याकडे असलेल्या गायी या दुध देत नसतानाही केवळ सेवाभावी वृत्तीने ते या गायींची सेवा करतायत, त्यांची काळजी घेतायत असं त्यांच्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं. विशेष म्हणजे हे त्यांच्यात इतकं भिनलंय की आपण काहीतरी वेगळं सांगतोय, करतोय असा भाव सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर किंवा बोलण्यात नव्हता....
एक मुस्लिम आणि तेही गोसेवक....
धर्म मुसलमान, मुर्तीपुजा गैरइस्लामिक पण हिंदुं देवाची मुर्ती आपण तयार केलेल्या पोषाखांमध्ये अधिकाधिक सुंदर दिसावी हीच भावना इथल्या प्रत्येक मुस्लिम कारागिराच्या मनात होती. गंगा जमुनी तेहजीब हा शब्द आपण खुप वेळा ऐकला, पण ही तेहजीब काय आहे ते या कारागिरांच्या जगण्यातून आपल्याला दिसतं. कृष्णाच्या पोषाखात दिसणारे रंग इथल्या संस्कृतित सुद्धा दिसतात. त्यामुळे मथुरेतली ही धार्मिकता एकतेच्या बहुरंगी धाग्यात आणखी उठून दिसते. मग त्याला उसवण्याचे कितीही प्रयत्न होवोत ..... शेवटी..
कोई पुजे पत्थर को, कोई सजदे मे अपना सर झुकाता है
ये एक ही है, जो कुछ इसे पुजा और कुछ इसे अपना इमान कहते है
एक ही रिवाज , एक ही रसम, बस कुछ अंदाज बदल जाते है
वरना एक ही है जिसे कुछ उपवास और कुछ रमजान कहते है....
हेच आपल्या संस्कृतीचं सार आणि सौंदर्य आहे.
- सौरभ कोरटकर