या लेखाच्या शीर्षकावरून हा लेख गमतीदार आहे असे वाटले असेल तर तसं अजिबात नसून परिस्थिती गंभीर झाली असून आता हा कोरोनाबाधित रुग्णांचा वाढलेला 'स्कोर' कमी कसा करायचा यासाठी राज्याच्या आरोग्य यंत्रणेने चांगलीच कंबर कसली आहे. कोरोनाने विशेषतः महाराष्ट्रात आता रौद्र रूप धारण केलं असून हा विषाणू आता आपले खरे रंग दाखवू लागलाय. तुम्हाला आता 'स्कोर' काय झाला आहे ऐकायची इच्छा होणार नाही इतका रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय हे वास्तव मान्य करून नागरिकांनी सतर्क राहण्याचा हाच तो काळ. खूप झाला आता भाजीपाला. कोरोनाचा सुरुवातीचा काळ संपला असून त्याने आता मुंबईत 'तांडव' करण्यास सुरुवात केल्याची चिन्ह दिसू लागलेत.


काही जणांनी कोरोनाला खूप हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवसापासुन शासकीय यंत्रणा बोंबलून सांगत होती काळजी घ्या, घराच्या बाहेर पडू नका. लॉकडाऊन झाल्यानंतर काही महाभाग मुशाफिरी करतचं होते. सध्या कोरोना विषाणूने त्यांचे हातपाय पसरवून मुंबईत चांगलाच जम बसविण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याच्या दसपटीने मुंबई आणि शासनाच्या आरोग्य यंत्रणेने आता त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नवीन 'डाव' टाकण्यास सुरुवात केली आहे. आशिया खंडात सर्वात मोठी समजली जाणारी झोपडपट्टी धारावी आणि वरळी कोळीवाडा येथे या विषाणूचा शिरकाव झाला असून ही बाब गंभीर आहे.


नागरिकांनी आपण कुठल्या स्टेज मध्ये आहोत ही माहिती घेऊन स्वतःला खोटं समाधान देणायचे प्रकार आता बंद केलेलं पाहिजे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा संपूर्ण देशात अव्वल आहे, त्यांच्याबरोबर मृतांचा आकडा शंभरी पार करून गेलाय. परिस्थिती चिंताजनक नाही हे सांगून वास्तव तर बदलता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक जण या कोरोनाशी 'दोन हात' करण्यासाठी रात्रं-दिवस झटतोय. मुंबईत रॅपिड टेस्ट करण्याबद्दल निर्णय घेण्यात आला असून लवकरच याला सुरुवात होईल. रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं आहे का याची तात्काळ माहिती मिळते. तसं इन्फेक्शन झालं असल्यास त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.


गेल्यावर्षी, सप्टेंबर महिन्यात संपत्तीसंबंध सल्ला देणारी कंपनी एनरॉकने माहिती दिली होती की, ताडदेव हा देशातील सर्वात महागडा रहिवासी परिसर आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव ताडदेवमध्ये झाला असून या परिसराचा काही भाग आणि येथील एक रुग्णालय सील करण्यात आले आहे. याच भागात भाजीपाला बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी आता कुठे कोरोनाचं गांभीर्य ओळखलंय. देशात मुंबई हा कोरोनाचा 'हॉटस्पॉट' झाला असून खासगी डॉक्टरांनी सुद्धा शासनाला मदत करण्यास सुरुवात केली.


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली असून धारावी सारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी लॉकडाऊनचे पालन सक्तीने व अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्याबाबत गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. गर्दीच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. गर्दीचे संनियंत्रण महत्वाचे असून आता त्यासाठी नियंत्रण कक्षाच्या मदतीने सीसीटिव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते, मात्र आता रस्त्यांवरील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. धारावीसारख्या ठिकाणी जे सार्वजनिक स्वचछतागृहे आणि शौचालये आहेत त्याचा वापर दिवसभरात मोठ्या प्रमाणावर होतो अशा ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने आणि पॉवर जेटचा वापर करून हे शौचालये वारंवार स्वछ्च करण्यास सांगण्यात आले आहे. ड्रोनचा वापर करून निर्जुतकीरणासाठी फवारणी करण्याचे काम निश्चित करण्यात आले आहे.

लॉक डाऊनची चिंता जनतेने करणं सोडून दिले पाहिजे, स्वतःची मानसिकता बदलण्याची आता गरज आहे. लॉक डाऊन असतानाच्या काळात जो आकडा वाढत आहे तो आटोक्यात आणणं गरजेचं आहे . शासन योग्य ते जनहितार्थाचे निर्णय घेत आहे. जर कोरोनाला वेळीच अटकाव घातला नाही तर परिस्थिती भीषण होऊ शकते, हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. आपण एका संकटात सापडलो असून त्यातून सुटका कशी काय करून घ्यायची यासाठी आपले 'योद्धे' लढाई लढत आहे. आपण नागरिक म्हणून त्यांच्या कामाला 'घरातच बसून' बळ देण्याचं काम केलं पाहिजे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही ब्लॉग


BLOG | फिनिक्सच्या पक्षासारखी मुंबई झेप घेणार


BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना

BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क

BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा

BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...

सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?

BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!



BLOG | कोरोना होणं म्हणजे गुन्हा नाही!