सध्याच्या या डिजिटल युगात तरुणाई सोबत वयस्कर मंडळी सोशल मीडियावर आपली मत व्यक्त करत असतात याबद्दल आता काही नवलाई राहिली नसून तो एक दैनंदिन कामकाजाचा भाग झाला आहे. मात्र या कोरोनाच्या काळात सोशल मीडियाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांचे अकाउंट्स सुद्धा सोशल मीडियावर असल्यामुळे बऱ्यापैकी माहितीची देवाण घेवाणीकरिता या माध्यमांचा दांडगा वापर होत आहे. सोशल मीडिया ही कुणाची मक्तेदारी नसून येथे सर्व घटकातील तरुण, नागरिक आपली मते निर्भीडपणे मांडत असतात. मात्र काही दिवसापासून याच सोशल मीडियावरून डोळ्यात आसवं आणणाऱ्या किंवा रडणाऱ्या ' इमोजीस'चा महापूर आला आहे. या कोरोनाच्या हाहाकारामुळे दुःखात असणारे अनेक जण आपली व्यथा, हतबलता, स्वकीयांसाठी लागणाऱ्या मदतीचा हात येथे मागत आहे. मात्र परिस्थिती इतकी भयानक आणि दुर्दैवी झाली आहे की लोकांच्या मदतीचे हात अपुरे पडू लागले आहेत. अपुऱ्या आरोग्य व्यस्थेमुळे अनेक रुग्णांचे वाईट हाल सुरु आहे. भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट काही दिवसापासून अचानक वाढल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडिया उघडल्यानंतर जर कुणाचा साधारण फोटो असला तरी धस्स व्हायला होत असल्याच्या भावना समाज माध्यमातील तज्ञांकडून व्यक्त होत आहे. नाशिक मध्ये महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे एकाच दिवशी 22 जणांचा प्राण गेल्याची घटना घडल्याने, या कोरोनामय काळात माणसं तडफडून मरत आहेत, या विरोधात पण नातेवाईकांचा आक्रोश सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे.              


सोशल मीडियावर समाजात जशी परिस्थिती असते त्याप्रमाणे तेथे असणारे नेटिझन्स आपले मत व्यक्त करत असतात. सध्याच्या काळात सोशल यावर मीडियावर मदतीचे संदेश मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहे. जेव्हा त्यांना कुठूनच ठोस अशी मदत मिळत नाही.  तेव्हा रुग्णाचा मित्र परिवार संदेश टाकून मदतीची याचना करत असतो. यामुळे कधी कधी त्यांचे गाऱ्हाणे थेट संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत किंवा मंत्र्यांकडे सुद्धा पोहचते आणि त्यांना मदत झाल्याच्या अनेक घटना आहेत. सध्याच्या काळात सोशल मीडियावर रेमेडेसिवीर आणि टॉसिलीझूम्याब हवे आहे, प्लास्मा हवा आहे, ऑक्सिजन किंवा आय सी यू बेड्स हवे आहे, रक्त हवे आहे याच गोष्टींच्या पोस्ट जास्त आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात काही झाले कि नागरिक पहिले सोशल मीडियाचा आधार घेताना दिसत आहेत. मात्र या काळात अप्रिय घटनांचा सिलसिला गेले अनेक दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेक लोक सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त करताना दिसत आहे. समाजात सध्या  याची माहिती घ्यायची असलेया त्यांनी सोशल मीडियावर एक नजर टाकली तर आपल्या समाजात सध्याच्या घडीला सध्या काय सुरु याची माहिती काही क्षणात मिळत असते. त्यामुळे सोशल मीडियावर एखादी चांगली वाईट बातमी टाकली कि ती वाऱ्याच्या वेगाने पसरत असते. त्याचे ज्या प्रमाणे चांगले परिणाम होतात त्याप्रमाणे वाईट परिणाम झाल्याचे सुद्धा लोकांनी पहिले आहे.


याप्रकरणी डिजिटल बातम्या आणि एसईओ आणि डिजिटल पत्रकारिता या दोन पुस्तकाचे लेखक शिवाय सामाजिक माध्यम तज्ञ म्हणून ओळख असणारे विश्वनाथ गरुड यांनी सांगितले की, "गेल्या चार पाच वर्षात लोकांमध्ये सोशल मीडियामुळे एकलकोंडेपणा आलाय. पूर्वी मदतीचा हात लागला तर कुटुंब, नातेवाईक, जळवळचे मित्र , व्यवसायातले मित्र यांच्याशी थेट बोलणं व्हायचं मात्र आता ते फारसं होताना दिसत नाही. त्यामुळे आता मदतीकरिता किंवा दुःख व्यक्त करायचे असेल तर कुणाकडे करायचे, तर ते हल्ली सोशल मीडियातून व्यक्त होत असतात. अनेक मदतीच्या याचना या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या जातात. त्यांना काही अंशी चांगला प्रतिसाद मिळतो पण प्रत्येकालाच तो मिळेल का याबाबत अजूनही साशंक आहे. कारण तुम्ही एखाद्या गोष्टीची मागणी केली तर त्यावर तुम्हाला मदत मिळेलच असे नाही, मात्र प्रयत्न निश्चितपणे केले जातात. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेक लोकांना सगळ्यांनाच लिहायला जमत नाही, त्यामुळे सोशल मीडियावर दोन विरुद्ध विचाराच्या पोस्ट जोरदार चालतात. त्यापैकी एक म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली आणि दुसरी हार्दिक शुभेच्छा अनेक लोक कोणाच्या तरी यशस्वीतेवर किवा दुःखावर आपले मत व्यक्त करत असतात.  अनेक मदतीच्या पोस्ट सध्याचा काळात पडतअसतात, मात्र त्या अशा नियंत्रित किंवा एखाद्या समुदायाने केलेल्या नसतात. त्यामुळे त्याला किती यश लाभेल हे माहित नाही. मात्र काही ग्रुप्स आहेत ते एकत्रितपणे एखादी मोहीम चालवतात त्यात त्यांना यश मिळते. चांगल्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर ठरवून व्हायला पाहिजे. "     
    
तर समाजमाध्यम तज्ञ अनय जोगळेकर सांगतात की, " पाच वर्षांपूर्वी फेसबुकचे सी इ ओ मार्क झुकेरबर्ग यांनी जेवहा फेसबुकचे 100 कोटी यूजर्स झाले होते तेव्हा त्यांनीही सांगितले होते कि आता ही 100 कोटी लोकं या माध्यमाचा कसा वापर करतात त्यावर पुढचे काही ठरणार आहे. पूर्वी सोशल मीडियाचा वापर हा एखादा पक्ष किंवा संघटना जनमत वळविण्यासाठी किंवा एक विशिष्ट वैचारिक मत तयार करण्यासाठी करत होता. मात्र काही दिवसापासून सोशल मीडियावर नागरिक उत्स्फूर्तपणे व्यक्त होताना दिसत आहे. तसेच ते या कोरोनाकाळात त्यांना जे वाटते ते लिहिताना दिसत आहे. अनेकवेळा जर हा मजकूर बघितला तर तो मदतीच्या स्वरूपातील अशा आशयाचा आहे असे दिसून येतो. ज्या पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या जातात त्याप्रमाणे प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे सोशल मीडियाचा  वापर या काळात निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  


दिवसागणिक राज्याची परिस्थिती गंभीर होत चालली असून मृताच्या आकड्याचा नवीन उचांक गाठला जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागातर्फे दैनंदिन देण्यात येणाऱ्या माहितीनुसार २० एप्रिल रोजी  ६२ हजार ०९७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ५१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५४ हजार २४२ रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ८३ हजार ८५६ ऍक्टिव्ह रुग्ण असून ते राज्यातील विविध भागात उपचार घेत आहे. लसीकरणाचे काम जोरदार सुरु आहे मात्र अनेक केंद्रांवर लसी नसल्यामुळे  अनेक केंद्र बंद पडली आहेत. ते नवीन लसी येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 


समाज माध्यमांवर कायम भाष्य करणारे तरुण लेखक अविनाश उषा वसंत यांच्या मते, "समाज माध्यमे ही आरोग्य विषयक व इतरही मदतींसाठी चांगल्या प्रकारे वापरली जातायत. असंख्य हॅशटॅग त्यातून चालणाऱ्या चळवळी हे अनेक प्राण वाचवत आहेत.' सेव्ह आराध्या' , ' तीरा फाईट एसएमए'   ह्या  मुव्हमेंट या सगळ्या गोष्टींची सुरवात होती म्हणायला हरकत नाही. अनेक तरूण आरोग्य आणिबाणी, पूरस्थिती यात देखिल याचा सदुपयोग करून घेत आहे. समाज माध्यमातून खूप चांगले नेटवर्क बनल्यामुळे रक्तपुरवठा तसेच प्लाज्मा ही रूग्णांना जलदगतीने उपलब्ध होत आहे. तसेच समाज माध्यमांवरून फोन अ फ्रेंड सारखे उपक्रमातून मानसिक आधार ही एकमेकांना देत आहेत.  समाज माध्यमांचा सुयोग्य वापर केला तर आणिबाणी स्थितीतील मदत कार्यालाही वेग येताना दिसलेला आहे. समाज माध्यमं ही कुणा एका मालकीची नसून यावर सामान्यजन आपले मत व्यक्त करता असतात. समाजमाध्यमांवर समाजहिताच्या मोठ्या  उभारल्याचे आपण यापूर्वीच पहिल्या आहेत. समाज माध्यमांमध्ये केवळ राजकीयच कुरघोडी होतात, हे वास्तव नसून अनेक समाजहिताचे काम या माध्यमातून घडत आहे. कोरोनाच्या काळात तर समाज माध्यमांनी मोठी भूमिका निभावली असल्याचे दिसून येत आहे. "     


17 सप्टेंबरला,  ' टेक केअर पासून रीप पर्यंत .... ! ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, सामाजिक माध्यमांवर सहज नजर टाकली तर लक्षात येते, जरी थेट ओळखीचे नसले तरी कुणाचे नी कुणाचे कुणी तरी कोरोना या आजाराने निधन झाल्याचे वाचनास येतेच नाहीतर विविध माध्यमातून ही वाईट बातमी कानावर इच्छा नसली तरी आदळत असते. फेसबुकवर कुणाचा 'पोट्रेट' फोटो दिसला तरी धस्स व्हायला होतं. सध्याच्या कोरोनामय काळात अशा बातम्या  मिळण्याच्या घटना काही दिवसात वाढल्या आहेत. यापूर्वी कोरोनाचा लढा यशस्वी लढून घरी परतणाऱ्याच्या कहाण्या, नाही तर कोरोनाला हरवून घरी आल्यानंतर होणाऱ्या भावपूर्ण स्वागताच्या व्हिडिओची जागा आता या कोरोनामुळे होणाऱ्या निधनाच्या बातमीने घेतली आहे. जर यापैकी काहीच नसलं तर नातेवाईकांचा रुग्णलयात होणाऱ्या अन्यायाच्या घटनांचे व्हिडिओ किंवा त्यासंदर्भातील तक्रारी, डॉक्टरांशी होणाऱ्या वादांचे व्हिडीओ आणि शेवटी कोरोनाच्या उपचारात महत्वाची ठरणाऱ्या औषधांची टंचाई, ऑक्सिजन बेडच्या तक्रारी हमखास या समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरील जागाही सध्या कोरोनाशी संबंधित 'वेदनादायक' बातमीने व्यापून घेतली आहे. दरम्यान, समाजमाध्यमांवरही दुःखद निधनाच्या बातम्या शेअर करण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात अधिक असून, त्यानंतर होणारी रीप रीप आता सगळ्यांच्याच अंगवळणी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
  
ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर एखादा द्वेष किंवा एखादे विशिष्ट मत पसरविण्यासाठी व्हायचा असे असले तरी खूप चांगल्या गोष्टीसाठी सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो, हे कोरोनाच्या काळात अधोरेखित झाले आहे. अनेकांच्या या काळात नोकऱ्या गेल्या त्यावेळी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात मिळालेला  सगळ्यांनीच पाहिला आहे. त्याचप्रमाणे अनेक सकारात्मक कामाची चळवळ या माध्यमातून उभी राहिली आहे. अनेक नागरिकांच्या डोळ्यावरचे अश्रू पुसण्यासाठी सोशल मीडियाने मोठी मदत केली आहे. सोशल मीडियावर प्रत्येकालाच मदत मिळेल असे नाही मात्र ती  मदत मिळवण्यासाठी प्रयत्न निश्चित केले जातात. सध्याच्या काळात कायम मदतीसाठी पुढे असणारा सोशल मीडिया स्वतःच दुःखात असल्याचे सोशल मीडियावरील संदेश वाचून कळते. अनेकांना मदत करण्याची इच्छा असून सुविधाअभावी मदत होत नाही. मात्र सोशल मीडियावरील सामाजिक चळवळींना भविष्यात मोठे स्वरूप प्राप्त ठरल्यास आश्चर्य वाटणार नाही.