खरंच कळत नाही कसं जगायचं. कोरोना संकट काय कमी होतं जी किटकांची शेतीमालावर टोळधाड आली. आता कुठं सगळं मार्गी लागायच्या मार्गावर तर चक्रीवादळ. आरोग्य यंत्रणेने आणि प्रशासनाने काय-काय आणि कुठे बघायचं. आभाळ जर फाटलं असेल तर ठिगळं तरी कुठं कुठं लावायची. आव्हानाचा सामना करणारं महाराष्ट्र राज्य आहे, मग काय एका पाठून एक आव्हानचं स्वीकारायची. सेटल कधी व्हायचं. सगळी संकटं अशी एकत्र आली, असं कधी झालं नव्हतं. मात्र, या अतिशय बिकट परिस्थितीतही रडायचं नाही आता लढायचं अशा अविर्भावात राज्याचा प्रत्येक नागरिक हा दक्ष आहे. या सगळ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना राज्य शासन एकाच परिस्थितीत करू शकतो. जेव्हा सगळे नागरिक एकत्र येऊन या सगळ्या संकटाचा एकदिलाने मुकाबला करतील. सगळ्या नागरिकांनी एकत्र यायचं म्हणजे शाररिक दृष्ट्या नव्हे तर एका विचाराने एकत्र येणे अपेक्षित आहे.
संपूर्ण देशात कोरोनाचं थैमान असताना सर्वात जास्त कोरोनाबाधितांचा आकडा महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबई मध्येच आहे. त्यानंतर एक आठवड्यपूर्वी टोळधाडीचं संकट महाराष्ट्रावर आले. शेतीसाठी टोळधाड अतिशय घातक आहे. ज्या शेतीवर ही टोळधाड येते त्या शेत मालाचा फाडशा पाडून मोठ्या प्रमाणात फळ-बागायती शेतीची नासधूस होते. शेतकऱ्यांच्या उरात टोळधाडीमुळे धडकी भरते. टोळधाडीचं संकट महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांवर आलं आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर ही कीड पीकाची पुरती वाट लावून टाकतात. हिरवागार शेत हे टोळ किडीच्या आवडतं खाद्य. या सगळ्या प्रकारामुळे बळीराजा आधीच डोक्यला हात लावून बसला आहे. राज्याचा कृषी विभाग या संकटातून कसं बाहेर पडता येईल यासाठी विविध उपाय योजना करीत आहे.
गेल्या तीन दिवसापासून या निसर्ग चक्रीवादळाची माहिती मिळाल्यानंतर, केंद्र सरकारच्या हवामान आणि नौदल विभागासहीत, राज्याचं आपत्ती व्यवस्थापन विभाग काम करीत आहे. नैसर्गिक संकट आहे त्याला थांबविणे शक्य नाही. मात्र, त्यामुळे जनजीवनावर कोणते परिणाम होऊ नये याकरिता राज्याचं प्रशासन काम करीत आहे. नागरिकांमध्ये या वादळाच्या जनजागृती बरोबर, समुद्र किनाऱ्यावरील लोकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरु आहे. शक्यतो तेवढी काळजी घेण्याचं काम सुरु आहे.
वैद्यकीय तज्ञाच्या मते, पावसाळ्यात या कोरोनाच्या साथीत अन्य आजाराचे रुग्ण वाढून आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होऊ शकतो. कोरोनाचा धोका आजही कायम आहे. मंगळवारी, राज्य शासनाच्या आरोग्य केलेल्या आकडेवारीनुसार, 1225 रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यात आजपर्यंत एकूण 31,333 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 2287 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. एकाच दिवशी 107 जणांचा या कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळाच्या भीतीमुळे बी के सी येथील एम एम आर डी ए मैदानावरील फील्ड हॉस्पिटल मधील रुग्णालयातील रुग्नांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. प्रशासन प्रश्न निर्माण झाल्याबरोबर त्यांच्यावरील उत्तर शोधत आहे, शेवटी प्रशासनातील काम करणारे आपल्यासारखे सर्वसामान्य लोकचं आहेत. ते काही 'सुपरमॅन' नाहीत. गेली तीन महिन्यापासून सर्व प्रशासन यंत्रणेवर कोरोना, चक्रीवादळ आणि टोळधाडीने अतिरिक्त ताण वाढविला आहे. त्यांचा ताण कमी कसा करता येईल याचा आता नागरिकांनीच विचार करायला हवा.
या अशा संकटसमयीन काळात आता नागरिकांनी प्रशासनाला मदत करण्याची गरज आहे. प्रशासन या काळात सर्व निर्माण झालेल्या आपत्तीबद्दल सुरक्षिततेचे काही नियम नागरिकांसाठी आखून देतील. त्या सर्व नियमांच पालन करणे म्हणजे प्रशासनाला एक प्रकारे मदत करणे असेच होईल. ह्या परिस्थितीत कोणी कुठलेही 'स्पिरिट' दाखवता कामा नये आणि विनाकारण कोणतेही साहस दाखवण्याची ही वेळ नव्हे. शासनाला आणि प्रशासनाला सहकार्य हीच खरी या काळातील 'समाजसेवा' आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या समाजकार्यास हातभार लावण्याची हीच ती योग्य वेळ.
ही विविध संकट उभी येऊन ठाकल्यामुळे कसं जगायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, वेगळं असं काय करणार की अशी नैसर्गिक आणि साथीच्या आजाराची संकट येणारच नाही. उत्तर सोपं आहे संकट येत राहतील कसा सामना करायचा याकरिता उपाय शोधून ठेवणे, आपत्ती व्यस्थापनात नव-नवीन गोष्टी आणून सज्ज राहणे. आजचा कठीण काळ पण लवकरच निघून जाईल अशी आशा ठेवून प्रत्येकानेच घरी राहून स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे.