सामाजिक माध्यमांवर सहज नजर टाकली तर लक्षात येते, जरी थेट ओळखीचे नसले तरी कुणाचे नी कुणाचे कुणी तरी कोरोना या आजाराने निधन झाल्याचे वाचनास येतेच नाहीतर विविध माध्यमातून ही वाईट बातमी कानावर इच्छा नसली तरी आदळत असते. फेसबुकवर कुणाचा 'पोट्रेट' फोटो दिसला तरी धस्स व्हायला होतं. सध्याच्या कोरोनामय काळात अशा बातम्या मिळण्याच्या घटना काही दिवसात वाढल्या आहेत. यापूर्वी कोरोनाचा लढा यशस्वी लढून घरी परतणाऱ्याच्या कहाण्या, नाही तर कोरोनाला हरवून घरी आल्यानंतर होणाऱ्या भावपूर्ण स्वागताच्या व्हिडीओची जागा आता या कोरोनामुळे होणाऱ्या निधनाच्या बातमीने घेतली आहे. जर यापैकी काहीच नसलं तर नातेवाईकांचा रुग्णालयात होणाऱ्या अन्यायाच्या घटनांचे व्हिडीओ किंवा त्यासंदर्भातील तक्रारी, डॉक्टरांशी होणाऱ्या वादांचे व्हिडीओ आणि शेवटी कोरोनाच्या उपचारात महत्वाची ठरणाऱ्या औषधांची टंचाई, ऑक्सिजन बेडच्या तक्रारी हमखास या समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरील जागाही सध्या कोरोनाशी संबंधित 'वेदनादायक' बातमीने व्यापून घेतली आहे. दरम्यान, समाजमाध्यमांवरही दुःख निधनाच्या बातम्या शेअर करण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात अधिक असून, त्यानंतर होणारी 'रीप रीप' आता सगळ्यांच्याच अंगवळणी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे.


राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, दिवसभरात 474 व्यक्तींचा या आजारामुळे मृत्यू झाला असून 23  हजार 365 नवीन रुग्णांची भर एक दिवसात झाली आहे. तर 17 हजार 559 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनामुळे प्रामुख्याने मागच्या काही काळात घडलेल्या महत्वाच्या दोन बाबी लोकांच्या स्मरणात राहतील म्हणजे त्यापैकी एक लॉकडाउन आणि दुसरे म्हणजे वर्क फ्रॉम होम. फावल्या वेळात मूव्ही, रेसिपीज, शोज बघून झाले कि काहीवेळा पुरते का होईना अनेक जण सामाजिक माध्यमांवर जाऊन अपडेट घेत असून जमल्यास अनेक जण त्या ठिकाणी व्यक्तही होत आहेत. सध्या अनेक नागरिक माहितीचा स्रोत म्हणून सामाजिक माध्यमांचा वापर करीत आहेत. त्यांना अनेक वेळा अचूक माहिती मिळतेच असे नाही, परंतु हातात असणाऱ्या मोबाईलवर एका क्लिकवर माहिती मिळविण्याची सवय लागली आहे. त्यात इंटरनेट लाईव्ह स्ट्रीम वृत्तवहिन्याही असतात, एकंदर काय तर मोबाईलचा आधार घेऊन 'दुनिया' मुठीत घेण्याचा प्रयत्न सध्या सगळ्यांचाच सुरु आहे. विशेष म्हणजे या काळात या कोरोनामुळे घडणाऱ्या अनेक घटनांमुळे भयावह वातावरण निर्माण झाले आहे.


सध्या नागरिकांना या आजाराच्या विरोधात लस कधी येणार याची जास्त चिंता भेडसावत आहे. प्रत्येकाला जगायचं आहे, त्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु आहे. त्यांना बंदिस्त राहायचा कंटाळा आलाय, उद्योगधंदे व्यवसाय करायचे आहेत नोकरीसाठी बाहेरही पडायचं मात्र कोणत्याही दडपणात न राहता. परंतु नागरिकांना वास्तव विसरून चालणार नाही. हा संसर्गजन्य आजार आहे. एक बाधित माणसाकडून दुसऱ्या माणसाला होतो त्यामुळे त्याचा नायनाट इतक्या लवकर शक्य नाही, हवं तसं होण्यास काही काळ जावा लागणार आहे. तो काळ किती असेल हे सांगणे आता जरी शक्य नसले तरी 'लस' हा एक पर्याय असल्याचा सगळेच वैद्यकीय तज्ञ सांगत आहे. ती येण्यास नवीन वर्ष उजाडेल असं सांगितलं जातंय.


मृत्यू झाल्यानंतर स्मशानात अंत्यविधीसाठी ताटकळत राहणे आता नवीन राहिलेले नाही. नातेवाईकांचा आणि मित्र परिवाराचा आधारही आता समाजमाध्यमापुरता मर्यादित होत चालला आहे. कोरोनाने नाती-गोती हिरावून घेतली आहे. सांत्वनाची जागा 'मेसेज बॉक्स' ने घेतली आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरात ह्या वाईट घटना घडत आहे, त्या व्यक्तीही हे वास्तव तात्काळ मान्य करीत आहेत. शेवटचे दर्शन दुरापास्त करणाऱ्या या आजाराची दहशत दिवसागणिक वाढतच आहे. मनाने खंभीर असणारे वेळ प्रसंगी दुसऱ्यांना धीर देणारेच खचून जात आहे. या आजाराने माजविलेल्या हाहाकाराचा शेवट करण्यासाठी देशातील आणि राज्यातील सर्व यंत्रणा एकवटली आहे. प्रत्यकाचे 'टार्गेट' कोरोना असले तरी त्या कोरोनाची व्याप्ती वाढत असून दिवसागणिक या आजाराने माणसं 'गिळंकृत' होण्याची संख्या वाढत आहे. या विरोधात राज्य सरकारने मोठी लढाई उभारली असून प्रत्येकाच्या घरी जाऊन 'रुग्ण शोधणे' सारख्या मोहिमेला आता सुरुवात केली आहे. कारण आता रुग्णांना माहिती देण्यापेक्षा सौम्य लक्षणे असतानाच या रुग्णांना शोधून त्यावर तात्काळ उपचार करणे ह्या मोहिमेचा एक भाग आहे. या शासनाच्या लढाईत नागरिकांनी दिलखुलास भाग घेतला तर या मोहिमेचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.


दररोज राज्यात कोणत्या ना कोणत्या भागात कदाचित कुणी तरी आपल्यातलीच व्यक्ती या कोरोनामुळे निधन पावत आहे. काही व्यक्ती या गंभीर असून व्हेंटीलेटवर आहेत, तर काही कृत्रिम प्राणवायूचा आधार घेत जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. प्राणवायूचा तुटवडा असल्याच्या बातम्या सगळीकडे येत असताना शासन मात्र अशा प्रकारची कोणतीही टंचाई भासू देणार नाही सांगत दरवेळी प्रमाणे सज्ज असल्याचे सांगत आहे. या सगळ्या वातावरणात नागरिकांचे मानसिक संतुलन कसे अबाधित राहील याकरिता आरोग्य विभागाने राज्य भर विशेष कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. आजच्या घडीला ठणठणीत माणूस कोरोनाच्या अनाठायी विचाराने ग्रासला आहे. यातून त्याचं समुपदेशन करून वेळीच बाहेर काढणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोरोनाच्या बातम्या बघू नका, त्या विषयावर चर्चा करू नका असे कितीही मोफत सल्ले दिले तरी त्याचा आताच्या घडीला फारसा फायदा होईल, अशी शक्यता कमी वाटते, कारण पाणी बरंच पुलाखालून वाहून गेलंय. चोहोबाजूनी कोरोनाच्या बातम्यांची आदळाआपट सुरु आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मित्रांशी अस्वस्थ असेल तर बोलणे, वेळप्रसंगी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही फायदेशीर ठरू शकते. प्राणायमाने मानसिक संतुलन चांगले राहत असल्याचे दाखले आजपर्यंत अनेकवेळा देण्यात आले आहे, त्यामुळे तो पर्याय चांगला ठरू शकतो.


सध्याच्या रोगट वातावरणात सगळेच कंटाळले आहेत. मात्र याचा अर्थ कसंही वागून चालणार नाही, रुग्णसंख्येत असुरक्षित वावरामुळे भर पडेल असे वागणे आता थांबवावेच लागणार आहे. एक व्यक्तीच्या चुकीमुळे अनेकांचे आयुष्य अडचणीत येऊ शकते हे एव्हाना आतापर्यंत कळाले असेलच. तरी पण बाहेर पडल्यानंतर ज्या पद्धतीने वर्तन असणे अपेक्षित आहे ते का होत नाही? हा प्रत्येक नागरिकाने स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे. तसा विचार केला तर सुजाण नागरिक आतापर्यंतच्या खूप मोठ्या लढाईचे साथीदार राहिले आहेत. यापुढेही अविरतपणे अशाच पद्धतीने संघर्ष करत पुढे जायचे आहे. कुणी कसं जगायचं हे शेवटी प्रत्येकाच्या हातात आहे. एखादी गोष्ट केल्याने आपल्या आरोग्यवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो हे माहिती असताना सुद्धा ती गोष्ट करणे, म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. त्यामुळे सजग आणि सुरक्षित राहणे हेच एकमेव शस्त्र सगळ्यांच्याच हातात आहे. कारण येणार काळ हा भयंकर आहे, जे सध्याच्या वातावरणावरून अंदाज बांधणे सहज शक्य आहे. नागरिकांनी या कोरोनाच्या काळात 'टेक केअर पासून ते रीप' पर्यंतचा खूप मोठा प्रवास पहिला आहे आणि या काळात प्रत्येकालाच याची प्रकर्षाने जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.