संस्कृत हा विषय पूर्वी चांगले गुण मिळवून देणारा विषय होता. पण राज्य परीक्षा मंडळाने 2018 पासून  'कृतिपत्रिका' नावाचा पॅटर्न संस्कृतलासुद्धा लागू करून या विषयाची वाट लावली आहे. आज नववी आणि दहावीला जे व्याकरण आहे ते मुलांसाठी अत्यंत क्लिष्ट आहे. हे व्याकरण पक्के करण्यासाठी इतर सर्व विषयांचा अभ्यास सोडून वर्षभर केवळ संस्कृतचाच अभ्यास मुलांना करावा लागेल. तेव्हा कुठे त्यांना बरे गुण मिळतील. स्कोअरिंग वगैरे लांबचीच गोष्ट!


मी गेली दहा वर्षे संस्कृत हा विषय शाळेत शिकवत आहे. आज संस्कृत अभ्यासक्रमातील अति-व्याकरणामुळे या भाषेविषयी विद्यार्थ्यांचा द्वेष वाढीला लागला आहे. व्याकरणाचे बारकावे पुढे अकरावी, बारावी, पदवी स्तरावर शिकवले पाहिजे. तेव्हा बुद्धीची वाढ बर्‍यापैकी झालेली असते. 


बालबुद्धीवर व्याकरणाचा भडीमार
दहावीपर्यंतच्या मुलांवर परस्मैपद व आत्मनेपदाचे तीन काळ आणि दोन अर्थांचे 144 प्रत्यय, धातूंची कर्मणिरूपे, धातूसाधित अव्यये, विविध धातूसाधित विशेषणे, नामे, सर्वनामे, क्रियापदे यांचे टेबल परीक्षेत विचारणे, सूचनानुसार कृती या प्रश्नामध्ये वाच्य परिवर्तन म्हणजे 'चेंज द व्हाॅइस', प्रयोजक, अव्यये काढणे, काळ बदलणे, समास वगैरे इतके बारकावे असणारे प्रश्न विचारले जातात की ज्या व्यक्तीने तीनेक वर्षे केवळ संस्कृतचाच अभ्यास केला आहे त्यालाच ते नीट सोडवता येतील.


एवढा एकच विषय आहे का मुलांना?
संस्कृत हा एवढा एकच विषय नसतो विद्यार्थ्यांना! बोर्डानेच काढलेली इतर विषयांची पुस्तके पाहिली तर लक्षात येईल की इतर विषयांचा प्रचंड अभ्यास मुलांना आहे. तो सोडून मुले केवळ संस्कृत व्याकरणात डोके लावत बसतील असे बोर्डाला वाटते का? 


बोर्डाच्या अभ्यास मंडळाने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की संस्कृत हा अनिवार्य विषय नाही. ऐच्छिक विषय आहे. त्याचा अभ्यासक्रम कमी ठेवावा आणि परीक्षा पद्धत त्यानुसार सोपी ठेवावी.


परिचय व गोडी लावणे एवढेच लक्ष्य असावेः
हा विषय पूर्वीप्रमाणे गद्यपाठ, सोपी प्रश्नोत्तरे, सुभाषितमालांचे पाठांतर, त्यावरील मराठी, इंग्रजीतून उत्तरे आणि आजच्या मुलांना पचेल एवढे व्याकरण अशी पूर्वीसारखी परीक्षा पद्धत ठेवली तर मुलांना या विषयाची गोडी लागेल आणि रोजच्या व्यवहारात या भाषेतले हजारो शब्द आपण कसे वापरतो हेही लक्षात येईल. 


संस्कृत ही आजची बोलण्याची भाषा नसली तरी ती आपली 'पराभाषा' आहे. संस्कृतमधील हजारो शब्द आपण रोज वापरतो. त्यामुळे या भाषेची ओळख व गोडी लावणे एवढेच उद्दिष्ट शाळेच्या स्तरावर बोर्डाने ठेवायला पाहिजे होते.


तेलही गेले तूपही गेलेः
संस्कृत घेतलेल्या मुलांना पूर्वी फारसे संस्कृत येत नसले तरी पाठांतर व भाषांतराच्या प्रश्नांमुळे चांगले गुण मिळत असत. आजच्या परीक्षा पद्धतीमुळे मुलांना संस्कृत तर येतच नाही; पण गुणही फारसे मिळत नाहीत. म्हणजे 'तेलही गेले आणि तूपही गेले' अशी अवस्था झाली आहे.


आजच्या पिढीची फरफटः
आजची पिढी ही देवनागरी लिपी वाचणारी नाही. मराठी, हिंदी वाचतानाही त्यांची फरफट होते. आठवी, नववी, दहावी अशी तीन वर्षे संस्कृतचे व्याकरण शिकूनसुद्धा परीक्षेत गोंधळ उडतो आणि मार्क जातात. चांगले मार्क मिळणारच नसतील तर पुढचे विद्यार्थी कशाला संस्कृत विषय घेतील? संस्कृत हा विषय महाराष्ट्रातील शाळांमधून बंद पडला तर त्याला केवळ राज्य परीक्षा मंडळ जबाबदार असेल.


(संस्कृत आणि उर्दू शिकल्याने मराठी भाषा पक्की होते. मराठीचा व्यावसायिक उपयोग करून पैसे कमावता येतात हे मी आधीच दोन लेखांमध्ये मांडले आहे. संस्कृत ही केवळ ब्राह्मणांची किंवा धार्मिक भाषा नाही आणि उर्दू केवळ मुसलमानांची नाही हे सुद्धा आधीच लिहिलेले आहे. त्यामुळे तो वाद येथे घालू नये. आधी या दोन्ही भाषा शिकाव्या आणि मग बोलावे..)


टीप- लेखातील मतं ही लेखकाची स्वत:ची असून या मतांशी एबीपी माझा सहमत असेलच असं नाही...