महाराष्ट्रात 'मराठा' समाजाचे मोर्चे सध्या गाजत आहेत, तर बाजूच्या गोवा राज्यात मराठी व कोकणी भाषिकांनी त्यांच्या हक्कासाठी बंडाळ्या सुरु केल्या. गेले काही महिने मी राजकीय कामासाठी गोव्यात जाऊन-येऊन आहे. कोकणातील एका जिल्ह्याएवढे गोवा राज्य. पण मातृभाषेच्या प्रश्नावर सुभाष वेलिंगकर या शिक्षकाने राज्यात खळबळ माजवून दिली. महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांत एखाद्या प्रश्नावर 'जातीय' तणाव वाढतो व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. असे काही गोव्याच्या बाबतीत घडणार नाही. गोव्याच्या मातीचा तो गुण नाही व मानसिकता नाही.

सुभाष वेलिंगकर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा प्रमुख पदावरुन दूर केले. वेलिंगकर यांचे मातृभाषेचे आंदोलन हे गोव्यातील भाजप सरकारची तिरडी बांधणारे ठरत आहे व वेलिंगकर यांनी सरळ सरळ राजकीय भूमिका घेऊन गोव्यात भाजपच्या पराभवाची गर्जना करताच वेलिंगकर यांना हटवण्यात आले. वेलिंगकर हे 40 वर्षांपासून गोव्यात संघ रुजवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे संघाचे शेकडो स्वयंसेवक वेलिंगकर यांच्या हाकेसरशी पणजीत जमा झाले व भाजपचा पराभव करण्याचा निर्धार त्यांनी केला.

स्वभाषेसाठी लढणे हा गुन्हा आहे काय? मातृभाषेशी बेइमानी करणाऱ्यांच्या विरोधात उभे राहणे हे राजकारण असेल तर संघाचा प्रत्येक पदाधिकारी त्यांच्या विचारांचे राज्य येण्यासाठी राजकारण करीत आहे.

राममंदिराचा लढा हा धार्मिक कमी व राजकीय जास्त होता. सध्याचे पंतप्रधान मोदी असतील किंवा नितीन गडकरींसारखे नेते, हे संघाचे स्वयंसेवकच आहेत व राजकीय भूमिका घेऊनच ते संघ विचारांचा झेंडा फडकवीत आहेत. दिल्लीतील सत्तापरिवर्तनानंतर अनेक राजभवनांत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले ते सर्व संघाचेच स्वयंसेवक आहेत. संघाचा स्वयंसेवक असणे हा गुन्हा नाही. पण गोव्यात सुभाष वेलिंगकर यांना एक न्याय व इतर स्वयंसेवकांना दुसरा न्याय, अशी गडबड झालीय.

हिंदुस्थानातील सर्वच नागरिकांसाठी एकच समान नागरी कायदा असावा हा मागणी संघाची आहे. पण देशावर स्वयंसेवकांचे राज्य बहुमताने येऊनही समान नागरी कायदा नाही व राममंदिरही नाही.

उलट वेलिंगकरांच्या बाबतीत समान नागरी कायद्याच्याच चिंधड्या उडालेल्या दिसतात. संघाचे कडवट शिस्तबद्ध स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या सुभाष वेलिंगकर यांना राजकारण केले म्हणून पदमुक्त केले. पण इतर स्वयंसेवकांना राजकीय पदे देऊन भाजपात विराजमान केले गेले. हे चित्र गोव्यात दिसले. म्हणूनच गोव्यासारख्या लहान राज्यातील बंडाळी राष्ट्रीय बातमी ठरली. संघात असे कधी घडले नव्हते, पण गोव्यात ते घडले. शिस्तीची चौकट मोडून दोन हजारांवर स्वयंसेवक वेलिंगकरांच्या पाठिंब्यासाठी पणजीत जमा झाले. वेलिंगकर म्हणाले, 'पहा, संघ चुकला नाही. सरसंघचालक चुकू शकतात!' पोर्तुगीजांपासून मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर गोवा प्रथमच मोठ्या बातमीचा विषय झाला. मातृभाषेचा उद्धार त्यातून होईल काय?