बोटीनं एक वळण घेतलं आणि समोर दोन इमारतींच्या मध्ये उभी असलेली माणसं दिसायला लागली. एकमेकांना खेटून, तरीही एका रांगेत उभी असलेली . बोट जसजशी जवळ जायला लागली तसे त्या माणसांचे चेहरे दिसायला लागले, निस्तेज आणि निर्विकार. ब्रह्मनाळ गावाच्या बुडायचं बाकी राहिलेल्या अगदी थोड्या उंचवट्यावर ही माणसं जीव मुठीत धरुन उभी होती . रांगेत पुढं असलेले पुरुष कंबरेएवढ्या पाण्यात उभे होते तर गावातल्या बायका शेजारच्या इमारतीच्या पायरीवर दाटीवाटीनं उभ्या होत्या. सकाळपासून एनडीआरएफचे जवान गावातील लोकांना बाहेर काढण्यासाठी जीवाचं रान करत होते. पण तरीही अजूनही शंभर - सव्वाशे माणसं गावात अडकली होती. बोट अरुंद गल्लीत शिरली. आम्ही बोटीतून पाण्यात उतरलो आणि पाण्यातून चालत जमिनीकडे निघालो.



पाण्यातून बाहेर येताच लोक भोवताली गोळा झाले. आतापर्यंत त्यांच्या गावात एनडीआरएफच्या जवानांशिवाय कोणीच आलेलं नव्हतं. एनडीआरएफचे इथं आलेले जवानही पंजाबमधल्या भटिंडा सेंटरचे होते, त्यामुळे मराठीशी त्यांचा संबंध नव्हता. सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन मूकपणे सुरु होतं. मराठी बोलणारं कोणीतरी समोर दिसताच गावातल्या लोकांचा प्रशासनावरचा राग उफाळून येत होता. त्यांना थोडंसं शांत करून मुलाखतीसाठी तयार केलं. पहिल्याच व्यक्तीला प्रश्न विचारला की एवढं पाणी वाढेपर्यंत तुम्ही प्रशासनाला कळवलं नाही का? संतापाने थरथरणाऱ्या त्या माणसाला धड बोलायलाही जमेना "बोट उलटली गुरुवारी सकाळी सव्वा नऊ वाजता, पण मी बुधवारपासून तहसीलदारांना फोन लावत होतो. बोट पाठवा म्हणून सांगत होतो, पण तहसीलदार म्हटले की तुमचं तुम्ही बघून घ्या. माझ्याकडं त्या फोनचं कॉल रेकॉर्डिंग आहे. नालायक प्रशासन आहे साहेब..." एका दमात शंकर वडेर नावाच्या त्या माणसानं सगळा राग बाहेर टाकला. तुमच्या घरातील लोक कुठायत असं त्यांना मी विचारल्यावर मात्र आतापर्यंत संतापानं थरथरणारा तो माणूस रडायला लागला, " माझ्या घरातली चार माणसं गेली.. माझी भन गेली.. तीची पोरगी गेली..."



त्याच्या खांदयावर हात ठेऊन पुढं सरकलो आणि रांगेतल्या लोकांच्या मुलाखती घेऊ लागलो. एक दोन लोकांच्या मुलाखती रेकॉर्ड झाल्या. एवढा गोंधळ सुरु असताना रांगेत शांतपणे उभ्या असलेल्या माणसाकडं माझ लक्ष गेलं. माईक घेऊन त्याच्याकडं सरकलो आणि त्याच्या तोंडासमोर माईक धरला. काही क्षण तो काहीच बोलला नाही आणि मग अचानक मनगट तोंडावर आपटत त्यानं बोंब ठोकली. शिमग्याला ठोकतात तशी. मला काय बोलावं कळेना. बाजूच्या लोकांनी शंकर नावाच्या त्या माणसाला आधार दिला त्याच्या तोंडावरुन हात फिरवला. एकजण म्हणाला याची बायको काल पाण्यात गेली, दुसरा एक तरुण कॅमेरासमोर आला आणि सांगायला लागला की त्याची आई त्या बोटीत होती पण तीचं काय झालं त्याला अजून कळालेलं नाही. महिलांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी शेजारच्या पायरीवर उभ्या असलेल्या बायकांसमोर माईक धरला तर त्यांनी हंबरडा फोडला. एकीची वहिनी बोटीसहित बुडाली होती तर दुसरीची मुलगी. एरवी भावनिक प्रसंगांमध्ये कॅमेऱ्यासमोर काम करण्यास आपण सरावलो आहे असा माझा तोपर्यंत स्वतःबद्दलचा समज होता, पण ब्रह्मनाळ गावातील बोटीची वाट पाहत उभ्या असलेल्या त्या केविलवाण्या लोकांसमोर तो समज चुकीचा ठरला. मी कॅमेऱ्याच्या समोरुन चेहरा दुसरीकडं वळवला.



माणसांची अवस्था ऐकल्यावर आमच्या जनावरांची परिस्थितीपण बघा म्हणून ब्रह्मनाळमधील लोकांनी आग्रह धरला. त्यांच्यासोबत पुढं निघालो तर डाव्या बाजूच्या गल्लीत गावातील जनावरं त्यांनी दाटीवाटीनं बांधून ठेवलेली दिसली. त्यांच्या मधून वाट काढत पुढं निघालो आणि गावाच्या ग्रामपंचायतीच्या समोर पोहोचलो तर ग्रामपंचायतीच्या इमारतीवर देखील जनावरं बांधलेली दिसली. गावकऱ्यांबरोबर जिन्याने इमारतीवर गेलो तर तिथं म्हशींबरोबर एक पांढऱ्या रंगाचा उमदा घोडाही बांधलेला दिसला. गावातील भैरोबा देवस्थानाची शेती ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या मागेच होती. तिथल्या अर्धा एकर उसाचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी ब्रह्मनाळमधील लोक करत होते. तीन हजार लोकसंख्येच्या या गावात तब्ब्ल सात हजार दुभती जनावरं होती. कृष्णा आणि येरळा नदीच्या संगमावर असलेल्या या गावाला चारा-पाण्याची कधीच काळजी नव्हती. त्यामुळं शेती आणि दुभती जनावरं हेच इथल्या लोकांचं जगण्याचा मुख्य साधन होतं. गावातून दररोज जवळपास चार हजार लिटर दूध चितळे डेअरीला जात होतं, पण गेल्या आठ दिवसांपासून रस्ता बंद असल्यानं इथल्या लोकांना ते अक्षरश: पुराच्या पाण्यात ओतून द्यावं लागत होतं. आठ दिवसांपासून लोक धारा काढून ते दूध पाण्यात ओतत होते.



सांगली आणि कोल्हापूर शहराला पुराचा विळखा पडला होता पण या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील गावं अक्षरश: पाण्याखाली बुडाली होती. गावांमध्ये तीस-पस्तीस फूट पाणी होतं. पण या ग्रामीण भागाकडं प्रशासनाचं फारसं लक्ष नव्हतं. त्यासाठी ब्रह्मनाळ गावात बोट बुडून दुर्घटना घडावी लागली. अनेकवेळा मागणी करुनही तहसीलदार मदत पाठवत नव्हते आणि कृष्णेचं पाणी तर वाढत चाललं होतं. तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाचा फक्त दहा टक्के भाग बुडायचा राहिला होता. त्यामुळं गुरुवारी आठ ऑगस्टला ब्रह्मनाळमधील लोकांनी अखेरचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या बोटीचा उपयोग करायचं ठरवलं.



2005 साली कृष्णेला पूर आल्यानंतर नदीकाठच्या गावांना संकटाच्या वेळी बाहेर पडता यावं म्हणून जिल्हापरिषदेनं बोटी पुरवल्या होत्या. सांगली जिल्ह्यातील 20 गावांना अशा बोटी पुरवण्यात आल्या पण त्या चालवायच्या कशा याचं प्रशिक्षण गावातील कुणालाच देण्यात आलं नाही. आठ ऑगस्टला सकाळी नऊच्या सुमारास ग्रामपंचायतीची बोट लोकांनी पाण्यात आणली. बोटीच्या इंजिनमध्ये पेट्रोल नव्हतं, मग गावातल्या तरुणांनी त्यांच्या दुचाकीमधून पेट्रोल काढून आणलं आणि ते बोटीच्या इंजिनमध्ये भरलं. बोट चालवायची जबाबदारी गावच्या ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या जयसिंग मोहिते नावाच्या तरुणावर होती. नऊ ते दहा जणांची क्षमता असलेल्या त्या बोटीत पंचवीस ते तीस जण चढले, कारण कृष्णेचं क्षणा-क्षणाला वाढत चाललेलं पाणी गावकऱ्यांना हा धोका पत्करण्यास भाग पडत होतं. दोन महिन्यांची बाळंतीण असलेल्या अश्विनी घटनट्टी तिच्या दोन महिन्यांच्या राजवीरला आणि चार वर्षांच्या आरोहीला घेऊन बोटीत चढल्या. सोबत त्यांचा भाऊ आणि आई होती. राजवीरला त्यांनी छातीशी कवटाळलं होतं तर आरोही त्यांच्या आईजवळ होती. बोट निघाली आणि सगळ्यांनी श्वास रोखून धरले. गावातील गल्ल्यांमधून बाहेर पडून बोट शेजारच्या खटाव गावाच्या शिवाराकडं निघाली. या बाजूला कृष्णेची उपनदी असलेल्या येरळेचं पात्र होतं.



एरवी कोरडी ठणठणीत असणारी येरळाही यावेळी दुथडी भरुन कृष्णेला साथ देत होती. पंधरा मिनिटांचं अंतर बोटीनं कापलं असेल आणि समोर खटाव गावाचा किनारा दिसायला लागला. आणखी दोन ते तीन मिनिटांमध्ये सगळे किनाऱ्यावर पोहचणार होते, पण नियतीला हे मंजूर नव्हतं. नक्की काय झालं कोणालाच माहित नाही पण कदाचित बोट पाण्याखाली असलेल्या झाडाला धडकली आणि कलंडली. बोटीतील माणसं बुडायला लागली. त्या गडबडीतदेखील अश्विनी घटनट्टीच्या समोर बसलेल्या गावातील कस्तुरी वडेर नावाच्या महिलेनं अश्विनीच्या हातातून दोन महिन्यांच्या राजवीरला स्वतःकडे घेतलं. अश्विनी घटनट्टींनीं मग चार वर्षांच्या आरोहीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू सगळेच पाण्यात पडले आणि येरळेच्या गढूळ पाण्यासोबत वाहायला लागले. पाण्याच्या प्रवाहामुळं आरोही हातातून निसटली. अश्विनी घटनट्टींना आणि त्यांच्या आईला भावाने ओढत किनाऱ्यावर आणलं. पण अवघ्या काही मिनिटांत त्यांची पोटची दोन मुलं पुरात वाहून गेल्याचं त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी बघावं लागलं. थोड्याच वेळात येरळेच्या पात्रात कस्तुरी वडेर आणि त्यांच्या हातात असलेल्या राजवीरचा मृतदेह मिळाला. त्या दोघांच्या मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पाहणारा प्रत्येकजण हळहळला. 2019 च्या महापुराचं गांभीर्य आणि प्रशासनाचा नाकर्तेपणा त्या फोटोने जगापर्यंत पोहोचवला, पण त्यासाठी एका आईला तिची दोन मुलं गमवावी लागली. या अपघाताची माहिती मिळाल्यावर अश्विनी घटनट्टींचे पती आप्पासो घटनट्टी आणि त्यांच्या सासरची माणसं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या त्यांच्या गावावरुन खटावला आली. दिवसभर शोधूनदेखील आरोहीचा पत्ता लागला नाही.



ब्रह्मनाळ गावातील कव्हरेज उरकून परत येण्यासाठी मी आणि कॅमेरामन विजय राऊत पुन्हा एनडीआरएफच्या बोटीत बसलो. येरळेच्या पात्रात काल बुडालेली बोट अर्धवट दिसत होती. बोटीचं तोंड पाण्यात कशालातरी थटल्याचं दिसत होतं. बोटीचा फक्त तीस टक्के भाग पाण्याच्यावरती दिसत होता. त्या बोटीला वळसा घालून खटावच्या हद्दीत आम्ही बोटीतून उतरलो. काठावर एका मोठ्या लोखंडी काईलीमध्ये फडक्यात काहीतरी गुंडाळून ठेवलेलं दिसलं. आम्हाला बघताच लोक जवळ आले आणि त्यातील एकानं सांगितलं की आत्ताच आणखी एक प्रेत सापडलंय. चार वर्षांच्या मुलीचं आहे. आता मात्र राजवीर आणि आरोहीच्या आई वडिलांना शोधणं गरजेचं होतं. लोकांकडे चौकशी केली असता ते तिथून जवळच असलेल्या पाटीलवाडीमध्ये एका नातेवाईकांकडे असल्याचं कळलं. त्यांना शोधेपर्यंत अंधार पडायला लागला होता. ते ज्या घरात थांबले होते त्या घरासमोर आम्ही पोहचलो. त्यांच्या एका नातेवाईकाला त्यांना बाहेर घेऊन याल का म्हणून विचारलं, तो आतमध्ये गेला. आता कोणतं दृष्य बघायला लागणार या विचारात असतानाच अश्विनी आणि त्यांचा नवरा घरातून बाहेर आले आणि पायरीवर उभे राहिले. मला ते दोघे निर्जीव पुतळ्यांसारखे वाटले.



धाय मोकलून रडणं तर दूरच साधा हुंदकाही ते देत नव्हते. माझी अवस्था त्यामुळं आणखीनच अवघडल्यासारखी झाली. आपण यांना काय विचारणार आणि हे काय सांगणार असं वाटलं. पण परत वाटलं कॅमेरा सुरु झाल्यावर दोघांच्या भावनांचा बांध फुटेल आणि दोघे बोलू लागतील. कॅमेरा रोल झाला आणि इंटरव्ह्यू सुरु केला. मी विचारलं तुम्ही किती लोक होतात आणि त्यावेळी नक्की काय झालं आठवतंय का? अश्विनी घटनट्टींनी उत्तर दिलं की "आम्ही पंचवीस ते तीस लोक होतो आणि बोट कशाला तरी थटली आणि आम्ही बुडायला लागलो. समोर बसलेल्या कस्तुरी काकींनी राजवीरला माझ्या हातातून घेतलं." बस्स एवढं सांगून त्या थांबल्या. मग पुन्हा मी विचारलं की आरोही तुमच्याकडं होती का, त्यांनी पुन्हा उत्तर दिलं "हो पण ती पण निसटली". या एका वाक्यातील उत्तरांनी मी आणखी हैराण झालो. या आई बापाचं आभाळाएवढं दुःख आपण कसं मांडायला पाहिजे हे काही सुचेना. इंटरव्ह्यू संपला. पण मला वाटलं पुन्हा एकदा करायला पाहिजे, म्हणून परत एकदा त्यांना विनंती केली ते तयार झाले. पुन्हा एकदा जवळपास तसाच इंटरव्ह्यू झाला. मी त्या घरासमोरुन निघालो आणि रस्त्यावर आलो पण माझं मन काही भरेना. यांचं दुःख कस मांडलं म्हणजे यांना मदत मिळेल या विचारात मी होतो कारण दोघेही पती पत्नी मजुरी करुन जगणारे. आप्पासो घटनट्टी दुसऱ्यांच्या शेतात मजूर म्हणून काम करणारे तर अश्विनी त्यांना साथ देणारी. त्यामुळं मी त्यांचा तिसऱ्यांदा इंटरव्ह्यू करायचं ठरवलं. मी त्यांच्या नातेवाईकांना पुन्हा विंनती केली आणि पुन्हा त्यांना बाहेर बोलवायला सांगितलं. ते दोघे पती पत्नी पुन्हा बाहेर येऊन पायरीवर उभे राहिले आणि तसेच पुतळ्यांसारखे उभे राहिले. पुन्हा तसाच निर्जीव इंटरव्ह्यू झाला. रडणं तर सोडाच दोन मुलं गमावलेल्या त्या आईच्या आवाजात साधा चढ उतारही नव्हता. शेजारी उभा असलेला त्यांचा नवराही तसाच. जीव नसलेल्या यंत्रासारखे ते वाटले. तिसऱ्यांदा इंटरव्ह्यू करुनही आपल्याला जे प्रेक्षकांसमोर मांडायचंय ते नक्की कॅमेऱ्यात उतरलंय का याबद्दल मी साशंक होतो. पण त्या आईबापाचं दुःख टिपायला जगातील कोणताही कॅमेरा अपुरा पडेल हे मला जाणवलं आणि मी तिथून निघालो.



परत येरळेच्या काठावर आलो तर परत लोक भोवताली जमा झाले आणि म्हणाले त्या बोटीतून वाचलेल्या बायका इथं आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घ्या. मी विचारलं किती बायका आहेत तर ते म्हणाले तीन बायका. मी आश्चर्यचकित झालो, ज्या बोटीत प्रवास करणारे अठरा प्रवासी बुडून मेले त्यामध्ये या बायका कशा वाचल्या असतील, मी त्यांच्यासमोर पोहोचलो तेव्हा आणखी आश्चर्य वाटलं कारण तिन्ही बायका साठीच्या पुढच्या होत्या. एक तर जख्ख म्हातारी होती, पाठीत वाकलेली. मी विचारलं तुम्ही कशा वाचलात तर राधाबाई चुंगे नावाची बाई म्हणाली की बोट बुडायला लागल्यावर मी बोटीला लटकवलेल्या रबरी ट्यूबला पकडलं. त्याबरोबर वाहत मी पाण्याच्या मधोमध असलेल्या झाडापर्यंत जाऊन पोहोचले आणि त्याला पकडून ठेवलं. बाकी दोघीजणीही असंच एकमेकांना पकडत त्या झाडापर्यंत जाऊन पोहचल्या. पाण्यातून डोकं वरती ठेवण्यासाठी त्यातील म्हातारी असलेली बाई बाकीच्यांना धीर देत राहिली आणि थोड्या वेळात शेजारच्या खटाव गावातील लोकांनी त्या तिघींना पाण्यातून बाहेर काढलं. दोन लहान बहीण भाऊ पुरात बळी गेले पण या स्त्रिया केवळ नशिबाची दोरी बळकट असल्यानं वाचल्या. कृष्णेच्या काठी हा असा नशिबाचा खेळ सुरु होता.




पूरग्रस्तांना शेजारच्या गावांमधील हायस्कुल्समध्ये हलवण्यात आलं होतं. मदतीचा ओघ एव्हाना सुरु झाला होता. शेजारच्या गावांमधले लोक जमेल ते घेऊन येत होते. कुणी जेवण तयार करुन आणलं होतं तर कुणी टेंपो भरुन कपडे आणले होते. ते घेण्यासाठी लोकांची झुंबड उडत होती. कारण बहुतेकांना अंगावरील कपड्यानिशी घर सोडावं लागलं होतं. खंडोबाची वाडी नावाच्या गावात भारती विद्यापीठाकडून चालवल्या जाणाऱ्या कॅंपमध्ये साड्या वाटण्यात येत होत्या. साडी मिळालेल्या एका महिलेला विचारलं तर ती म्हणाली आठ दिवस झाले अंगावर एकच साडी होती. कृष्णेच्या काठची एरवी समृद्धी अनुभवणारी ही माणसं पुरामुळं या परिस्थितीला येऊन पोहचली होती. शेजारचं भिलवडी नावाचं गावही पाण्याखाली होतं. गावात अडकलेल्या लोकांना एनडीआरएफच्या बोटीतून अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत पुरवली जात होती. 'आपलं पुणे' नावाच्या संस्थेकडून आतमध्ये एक मेडिकल कॅंपही सुरु करण्यात आला होता. एनडीआरएफच्या जवानांसोबत भिलवडीत जाण्यासाठी निघालो.



गावाचे सरपंच आणि उपजिल्हाधिकारी देखील बोटीत चढले. गावात पोहोचेपर्यंत त्यांचे इंटरव्ह्यू केले. बोट पाटील गल्लीमध्ये घुसली, पाण्यातून उतरुन तिथून काही अंतरावर असलेल्या मेडिकल कॅंपमध्ये गेलो आणि रिपोर्टिंग सुरु केलं. तोपर्यंत बाहेर गोंधळ ऐकू यायला लागला. एनडीआरएफच्या कमांडरने तिथून लवकर निघायला पाहिजे असं सांगितलं. काय झालं हे पाहायला बाहेर आलो तर सरपंच आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना जमावानं घेरलं होतं. त्यातली तरुण पोरं शिव्यांची लाखोली वाहत होती. आठ दिवस आम्ही पुरात अडकलेलो असताना तुम्ही कुठे होतात असा त्यांचा सवाल होता. त्या जमावापासून आम्हाला एकजण बाजूला घेऊन गेला आणि पटकन आम्हाला बोटीत बसवण्यात आलं. पाठोपाठ सरपंच आणि उपजिल्हाधिकारी देखील घाईनं बोटीत बसले आणि बोट वेगानं निघाली, एवढा वेळ असलेला तणाव कमी झाला. हे गावाच्या राजकारणातून घडतंय असं सरपंच म्हणाले. पण यातून पूरग्रस्त भागातील लोक किती चिडलेले आहेत हे प्रत्यक्ष पाहायला मिळालं. पुढचे दोन दिवस याच भागात सगळीकडे अशीच परिस्थती होती. प्रशासनातला अधिकारी पूरग्रस्त भागात लोकांच्या रोषामुळे पोहोचणं अवघड झालं होतं.



ब्रह्मनाळच्या शेजारी असलेल्या सुखवाडी गावात जाण्यासाठी निघालो तेव्हा सातारा जिल्ह्यातून मदत घेऊन आलेले तरुण भेटले. खाण्याच्या पदार्थांची पाकिटं आणि पिण्याच्या बाटल्यांचे बॉक्स घेऊन ते तीन किलोमीटर चिखल तुडवत बोटीपर्यंत आले. पुढचा प्रवास बोटीतून करावा लागणार होता. गावचे रमेश यादव नावाचे सरपंच स्वतः बोट चालवत होते. गेल्या तीन दिवसांमध्ये त्यांनी गावातल्या तरुण मुलांना सोबत घेऊन गावातील पंधराशे लोकांना या बोटीतून बाहेर काढलं होतं. बोट चालवायचं कोणतंही प्रशिक्षण त्यांनी घेतलं नव्हतं पण गावावर आलेली वेळ त्यांना सगळं काही शिकवत होती. सुखवाडी गावात देखील ब्रह्मनाळसारखीच परिस्थती होती. पण आता दोन दिवसांनंतर रोगराईचा धोका डोकं वर काढायला लागला होता. गावात पोहोचल्यावर गावकऱ्यांनी सांगितलं की गावातील बेचाळीस गाई-म्हशी पाण्यात बुडून मरुन पडल्या. पाणी ओसरल्यानंतर लोक गावात परतत होते आणि काही हाताला लागतंय का हे चाचपत होते. पण गाळाशिवाय हाताला फारसं काही लागत नव्हतं.



हा पुर नक्की कशामुळं आला याबाबत एव्हाना वेगवेगळ्या चर्चा मीडिया आणि सोशल मीडियामध्ये पसरत होत्या, पसरवल्या जात होत्या. त्यापैकी बहुतेक चर्चांना राजकारणाचा वास होता. 2005 साली आलेल्या पुरानंतर एका समितीने पुराची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला होता. औरंगाबादच्या वाल्मी संस्थेचे माजी संचालक डॉक्टर सतीश भिंगारे, महाराष्ट्र शासनाच्या नाशिकमधील महाराष्ट्र इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेचे माजी महासंचालक डी. एम. मोरे, पर्यावरण शास्त्रज्ञ मुकुंद घारे, विजय परांजपे आणि आनंद कपुर यांचा त्यामध्ये समावेश होता. या समितीने दोन वर्षं सगळीकडे फिरुन पुराच्या कारणांचा शोध घेतला आणि 2007 साली त्याबद्दलचा अहवाल त्यावेळच्या राज्य सरकारला दिला. या अहवालात नक्की काय आहे हे समजण्यासाठी पुण्यात गेल्यावर डी. एम. मोरेंना भेटायचं ठरवलं. मोरेंच्या मते या अहवालात महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये कृष्णेच्या पाण्याच्या नियोजनाबद्दल समन्वय असावं यावर भर देण्यात आला होता.



महाराष्ट्राच्या जलसंपदा खात्याकडून इथं पडणारा पाऊस आणि त्यावेळी कोयना धरणात असलेला पाणीसाठा यानुसार पाणी किती सोडायचं आणि किती साठवायचं याचं नियोजन करण्यात येतं तर कर्नाटक सरकारकडून त्यांच्या भागात पडणारा पाऊस आणि त्यावेळी आलमट्टी धरणात असलेला पाणीसाठा यानुसार नियोजन केलं जातं. महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्र आणि आता तेलंगणा या चार राज्यातून वाहणाऱ्या कृष्णेच्या पाण्यासाठी या राज्यांमध्ये वर्षानुवर्षे वाद चालू आहे. काही निकाल लागले तर काही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. उन्हाळ्यात महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ होता तेव्हा कर्नाटकमध्येही दुष्काळ होता. त्यावेळी कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला कोयनेतून पाणी सोडण्याची विंनती केली होती. पण पश्चिम महाराष्ट्रातील जनतेलाच पाणी पुरत नसल्याने महाराष्ट्राने कर्नाटकला पाणी सोडलं नाही. पण ऑगस्ट महिन्यात याच्या नेमकी उलटी वेळ आली.



मुसळधार पावसामुळे तुडूंब भरलेल्या कोयना धरणातून पाणी घ्या म्हणून महाराष्ट्राला कर्नाटकच्या मागं लागावं लागलं. पण त्याचवेळी आलमट्टी देखील पूर्णपणे भरल्यानं कर्नाटकला महाराष्ट्राचं पाणी स्वीकारणं कठीण बनलं. ही परिस्थती पुन्हा येऊ नये म्हणून 2007 साली दिलेल्या त्या अहवालात या दोन राज्यांनी धरणांमध्ये पाणी साठवताना आणि सोडताना एकमेकांसोबत समन्वय ठेवायची गरज असल्याचं म्हटलंय. त्यासाठी दोन्ही राज्यांनी मिळून एक कक्ष स्थापन करण्याची शिफारस त्यामध्ये करण्यात आलीय. पण त्या अहवालाला नेहमीप्रमाणे बासनात गुंडाळून ठेवण्यात आलं. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी पुढं काही केल्याचं दिसलं नाही. आत्ता सत्तेत असलेले तर या पुराच्या गांभीर्यापासून शेकडो मैल दूर तिकडे विदर्भात यात्रा काढत होते.



गुरुवारी सव्वा नऊ वाजता ब्रह्मनाळ गावात बोट उलटल्यानंतरही सांगलीचे पालकमंत्री असलेले सुभाष देशमुख त्यानंतर अकरा ते दीड वाजेपर्यंत पुण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुका कशा जिंकायच्या याबद्दल मार्गदर्शन करत होते. मीडियाने त्याबद्दल बातम्या चालवणं सुरु केल्यावर देशमुख गडबडीने सांगलीकडं गेले. कृष्णा आणि पंचगंगेचं पाणी गावांमध्ये पसरत असताना मुख्यमंत्री फडणवीसांची विदर्भात यात्रा सुरु होती आणि ती रद्द करण्याचा त्यांचा कोणताही विचार नव्हता. खूपच आरडाओरड व्हायला लागल्यावर ते एका दिवसासाठी म्हणून मुंबईला बैठकीला आले. त्यानंतर कोल्हापूर आणि सांगलीची हवाई पाहणी करण्यास जायचं असल्यानं त्यांची यात्रा आणखी एक दिवस स्थगित केल्याचं जाहीर करण्यात आलं. गुरुवारी मुख्यमंत्री एका दिवसासाठी कोल्हापुरात आले होते आणि सांगलीची हवाई पाहणी करत होते. त्याचदिवशी ब्रह्मनाळ गावात बोट बुडाली. त्यामुळं फडणवीसांना तिथून पुढची जनादेश यात्रा थांबवणं भाग पडलं. प्रशासनानं यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवली नाही की यांना त्याचं गांभीर्य समजलं नाही हे मात्र कधीच उघड होणार नाही.



इतर नद्यांपेक्षा कृष्णा संथपणे वाहत असते. कृष्णेच्या या वैशिष्ट्याला आधार मानून 1967 साली "संथ वाहते कृष्णामाई" या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी ग. दि . माडगूळकरांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत गीत लिहलं, "संथ वाहते कृष्णामाई, काठावरल्या सुख-दुःखांची जाणीव तिजला नाही. नदी नव्हे ती निसर्ग- नीती, आत्मगतीने सदा वाहती. लाभहानीची लवही कल्पना नाही तिज ठायी" असं ग. दि. माडगूळकर म्हणून गेले. नदीचं काम असतं ते वाहणं...प्रवाही असणं. सुख-दुःखांची जाणीव ठेवायची असते ती माणसांनी, लाभ हानीची कल्पना करायची असते ती देखील माणसांनी. पण ती जाणीव यावेळी ठेवली गेली नाही, नदीला दोष देऊन काय उपयोग!