लग्नाआधी ठराविक टप्पे असतात. उपवर मुलगा, मुलगी असलेल्या घरातली कर्ती मंडळी नातलगात, सोयऱ्या धायऱ्यात, मित्र मंडळीत निरोप देऊ लागतात. योग्य स्थळ मिळावे म्हणून चौकस नजरेने लक्ष ठेवून राहतात. मध्यस्थाकडून स्थळाचा निरोप आला की मग आधी जुजबी माहिती दिली घेतली जाते. यातून एकमेकाचा अंदाज काढला जातो. आखाड्यात कुस्ती सुरु होण्याआधी पैलवान एकमेकांचे पट काढून ताकद जोखण्याचा प्रयत्न करतात तसा हा प्रकार असतो. हा टप्पा पार पडला की मग जाणती जुणती मंडळी घर बघायच्या निमित्ताने जाऊन चाखाचोळा घेऊन येतात. घर बरे वाटले, माणसे चांगली वाटली की मग गाडी पुढे सरकते. मुलगा मुलगी बघण्याचा दिवस मुक्रर केला जातो. दहा बारा बायका माणसे जाऊन हे कार्य करतात. इथे इतर गोष्टींचा अंदाज लावला जातो. स्थळ पसंत पडले की पुढच्या गोष्टींचा वेध लागतो. बैठक घेतली जाते. हा टप्पा फार महत्वाचा असतो कारण निम्मी लग्ने याच टप्प्यात फिसकटतात. देण्याघेण्याची मानपानाची विवाहकार्याची सगळी बोलणी यात पक्की होतात. थोडी घासाघीस होते. मध्यस्थ असणारे भाऊसाहेब, रावसाहेब, अण्णासाहेब दोन्ही बाजूंच्या लोकांचा कल घेत, अंदाज काढतात आणि एका मध्यमार्गावर बैठकीत एकमत होते. तारीख ठरते. कार्यालय पक्के होते. पत्रिका छापून वाटून होतात. दोन्ही घरात सगळीकडे लगीनघाई सुरु होते. साखरपुडा होतो. गडंगनेरांची रांग लागते. पाव्हणे रावळे घरात ठाण मांडून बसतात. दारापुढे मांडव उभा राहतो आणि बघता बघता लग्नाचा दिवस उजाडतो.
थाटामाटात लग्न लागते. थोडे रुसवे फुगवे होतात. कुलवऱ्यांची कलकलवाढत जाते, कुलवरे वरातीत धूम उडवून देतात. म्हातारे कोतारे एका कोपऱ्यात बसून आडकित्त्यात सुपारी कातरत एकमेकांच्या आस्थेवाईक चौकशांचे बारीक दळण दळत बसतात. वरमायांचा तोरा न्याराच असतो, विहिणींच्या तऱ्हा आगळ्याच असतात, पोट्टे सगळ्याना भंडावून सोडतात, वाजंत्री कहर करतात, अक्षता वाटून होतात आणि भटजीबुवा एकदाचा स्वस्ति श्री गणनायकंचा परिचित चालीतला स्वर आळवतात अन इतक्या दिवसापासून जीवाची तगमग सुरु असलेल्या नवरा नवरीचा जीव भांड्यात पडतो. अंतरपट बाजूला होताच लाजत लाजत हसत हसत ते दोघे एकमेकांना हार घालतात. लग्न लागते. सप्तपदीच्या फेऱ्या होतात. आहेर घेऊन होतात. रुखवताचा भाव वाढतो. जेवणावळी उरकतात. दिवस कलायला होतो. पाव्हणे रावळे, मित्र मंडळी, शेजारपाजारचे लोक आपआपल्या घरी जायला निघतात. दिवस मावळेपर्यंत सगळे जिकडे तिकडे होतात. मोजके पाव्हणे घरी उरतात. नव्या नवरीसोबत एक अनुभवी बाई पाठराखीण म्हणून तिच्या सोबत सासरी येते. ही पाठराखीण त्या नव्या नवरीला एकटं वाटू नये म्हणून सदा न कदा तिच्या भोवती फेर धरुन राहते. तिला धीर देत देत घरातल्या सगळ्या माणसांना जोखण्याचे काम ती करत असते. पोरीची नणंद कशी आहे, जावा काम करतात की नाही, सासू किती कडक आहे, सासरा चांगला आहे की नाही, दीर काम धंदे करतात की नाही, घराची आर्थिक स्थिती कशी आहे, नवरा मुलगा कसा वागतो-तो काही कामधाम करतो की नाही अशा एक न अनेक प्रश्नांवर ती आपले मत बनवत असते. त्यावरुन निष्कर्ष काढून आपल्या साळूचं सासर लई भारी किंवा लई मोक्कार असला कुठला तरी शेरा ती देणार असते. तसेच सासरी कसे वागायचे, कुणापुढे झुकायचे अन कुणाला वाकवायचे याचे प्रात्यक्षिक उपदेश ती करत राहते.
लग्न उरकल्यावर पुढचे विधी सुरु होतात. देवदर्शनाची वारी पुरी होते. कुलदैवताला नमस्कार होतो. कुलदेवतेला चोळीबांगडी होते. नवे जोडपे देवांच्या पायी मस्तक टेकवते. पुढच्या आयुष्यासाठी मागणं मागितलं जातं. नवरा नवरी मात्र कासावीस झालेली असतात. थोडी भीड चेपलेली असते आणि स्पर्शखेळासोबतच नेत्रपल्लवीही सुरु झालेली असते. आता जागरण गोंधळ झाले की मग मिलनाची ती घडी काही घटिकांच्या अंतरावर आहे याची त्यांना जाणीव होते. दोघेही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. जागरणाचा दिवस कलतो. दारातल्या मांडवात पुन्हा एकदा माणसांची बहार येते. वाघ्या मुरळी येतात. बेल भंडार उधळला जातो. भंडाऱ्याचा भडका उडतो, खोबऱ्याचे कुटके उडतात. संबळ वाजू लागतो. ढोलकी कडाडत असतात. दुमडी ताल धरते आणि हातातली घुंगरं थिरकावत मुरळी ठेक्यात गाऊ लागते. " माझ्या मल्हारी रायाचा लगीनसोहळा गाजतो, नवरी झाली बाणाई, दारी चौघडा वाजतो...." यजमानाकडची पोरं सोरं मुरळीला नाचण्याचा आग्रह करु लागतात. नवखी मुरळी लाजू लागते. तिचं लाजणं रंगत जातं अन गोंधळ फिका होऊ लागतो मग वाघ्या पुढं सरसावतो. पाय थकलेले असले तरी जोश भरतो आणि ठेका धरु लागतो.
हळदीत न्हाऊन निघालेला काहीसा वय वाढत चाललेला प्रौढत्वाकडे झुकू लागलेला वाघ्या ताल धरु लागताच मुरळीला नकळत हुरुप येतं आणि जागरण गोंधळ खऱ्या अर्थाने सुरु होतं. ग्रामीण महाराष्ट्रातील नव्या नवरा नवरीचे पहिले जागरण गोंधळ म्हणजे एक सुरस कथाच असते. रात्रभर नवरा नवरी पळी पळी तेलाची धार लावून बसतात, लोकं येत असतात, जात असतात. इकडे मांडवात जेवणावळी चालू असतात. भकाकणाऱ्या लाईटच्या फोकसभोवती चिलटांचा धुडगूस सुरु असतो. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजातले लाऊडस्पीकरचे कर्णे नंतर गात्र शिथिल झाल्यागत भोंग्यातून आवाज गेल्यागत गळून पडतात. हौशे नवशे जागरणात सामील होतात. पानाची कळी खुडत चुना लेपला जातो, अडकित्त्यात अलगद सुपारी कातरत कातरत तिच्या चिरफाळया उडत राहतात. पानविडे रंगत जातात, त्याच्या पिचकारे कारंजे हवेतून त्याचा गंध पसरवत राहतात.
नुकत्याच माहेरी आलेल्या लेकुरवाळया पोरीबाळींची चिमणीपाखरं दिवसभर हुंदडून रात्री उशीरपर्यंत जागं राहून अलगद आईच्या मांडीवर गाढ झोपी गेलेली असतात. आजूबाजूच्या म्हाताऱ्या कोताऱ्या बाया डोक्यावरचा पदर सावरत हनुवटीला हात लावून बसत नवरीचा अंदाज घेत तिचा प्रपंच कसा असणार याचा अंदाज बांधत असतात. एखादी भोचक बाई त्यात संधी सांधून शेरेबाजी करत असते. नवरीच्या कलवऱ्यांचा उत्साह काही केल्या मावळलेला नसतो, पण बसून बसून तिच्या पाठीची कमान मोडलेली असते. तेल घालून कंटाळलेल्या त्या जोडप्याला वाघ्या मुरळीच्या चहापानाच्या निमित्ताने ब्रेक मिळतो तेव्हा त्यांच्यात अत्यंत आकर्षक अन् वेधक नेत्रपल्लवी होते, तिच्या हिरव्याकंच बांगड्या किनकिनतात. मांडी घालून बसलेल्या पायांना रग लागलेली असते. नकळत तिच्या पायाची करंगळी मातीत रुतते कारण त्याने हळूवार हात फिरवत फिरवत तिच्या मांडीवर अज्जात ओझे टाकलेले असते.
चहापानाच्या विश्रांतीनंतर जागरण गोंधळ सुरु होताना इतरांची नजर चुकवत ती चोरुन त्याच्याकडे पाहत असते. खरे तर तिला वाटत असते की आपल्याकडे कुणाचेच लक्ष नसावे पण तिचे आडाखे चुकीचे असतात. सगळ्यांच्या चोरट्या नजरा तिच्यावर तर रोखलेल्या असतात. हळूच ती त्याला चिमटा काढते. त्याचे ते अवघडलेपण उपस्थित पुरुषांच्या नजरेतून सुटत नाही. आपल्या संसाराच्या लोणच्यात कैरीगत मुरलेल्या बायकोच्या कोपराला ढूसण्या देत जुने झालेले नवरे विचारतात, "तू बी अशीच होतीस ना!" त्याच्या बायकोचे गाल लाजून आरक्त होतात, खळी त्याच्याही गालावर पडते! तरकटी जुनाट खोंडांना मात्र या सर्वात कशात स्वारस्य नसते ते वाघ्याला दमाने घे रे बाबा, नेमाने होऊ दे अशी गळ घालत राहतात. तरणी पोरं मधीच उठून नाचून आपली हौस भागवून घेतात, पोरं थकत नाहीत पण दमून गेलेला वाघ्या आभाळातल्या चान्न्या बघून वेळवख्ताचा अंदाज बांधतो.
दरम्यान मध्यरात्र उलटून साखरझोपेचा गारवा सुरु झालेला असतो. निम्म्या लोकांचे डोळे पेंगू लागले की नवरा नवरी एकदा डोळे भरुन एकमेकांना पाहतात. नेमका हा क्षण टिपून झाला की वाघ्या मुरळी जाग्रणाच्या अखेरच्या टप्प्यात येतात. भला मोठा साखळदंड एका फटक्यात तोडला जातो. त्यातल्याच कडीची पूजा होते. फोकस बंद होतात, गॅसबत्तीचे मेंटल फिके होतात. लाईटचे निम्मे गोळे बंद होतात. थकलेले वाघ्या मुरळी बसकण मारतात. पुन्हा एकदा चहा होतो. बिदागी देऊन होते. इतक्यात कोणी तरी आगाऊ शहाणा येऊन अमक्या तमक्याच्या लग्नात आलेली मुरळी ही नव्हं का? का तर कंबार लई हललीच न्हाई असं विरजण घालून जातो. तर कुणी तरी लग्नाची तारीख पक्की केलेला वधूपिता पुढे येत पार्टी कुण्या गावची, बिदागी किती याची जुजबी चौकशी करतो अन् पटल्यास सुपारी देतो.
जागरण संपतं. घरातले दिवे मालवले जातात. आवाजाने जागी असलेली माणसं स्पीकर बंद झाल्याने पोटात पाय खुपसून आल्हाद झोपी जातात. रस्त्याच्या फुफुट्यात अंगाची मुटकुळी करुन पडलेली कुत्री घरासमोरच्या मांडवात येऊन इतस्ततः पडलेल्या वस्तूंना बराच वेळ हुंगत राहतात. त्यांची थोडी खसफस होते. अखेर तोही आवाज बंद होतो, गाव झोपेच्या अधीन झालेले असते. इकडे वेगवेगळ्या खोल्यात निजलेले नवरा नवरी इतक्या वेळ बंद केलेले डोळे हलकेच उघडतात आणि आपल्याकडे कुणाचे लक्ष तर नाही ना याची खात्री करुन घेतात. तो उशी वरती सरकवत थेट दाराच्या उंबऱ्यापाशी सरकत जातो अन् प्रचंड खटपट करुन शेजारच्या खोलीत झोपलेल्या 'तिचा' चेहरा नजरं पडतो का याचा अंदाज घेऊ लागतो. 'त्याच्या' आवाजाचा ती कानोसाच घेत असते. त्याच्याशी नजरानजर होताच हळदरंगात रुळलेल्या तिच्या गालावर जीवघेणी खळी पडते अन् आसमंतात निखळ प्रेमाचे धुमारे फुटतात. निळ्या काळ्या आभाळातल्या चांदण्या लाजून चूर होऊन जातात...
- समीर गायकवाड, ब्लॉगर
संबंधित ब्लॉग
आमच्या काळी असं नव्हतं (?)......
अस्सल लोकनायक - बापू बिरु वाटेगावकर
रेड लाईट डायरीज : स्तनदायिनी...
रेड लाईट डायरीज : तळतळाट...
रेड लाईट डायरीज : रेड लाईट एरियातलं न्यू इअर सेलिब्रेशन...
रेड लाईट डायरीज : पोलिस, प्रशासन आणि कुंटणखाने (उत्तरार्ध)
रेड लाईट डायरीज : पोलिस, प्रशासन आणि कुंटणखाने
पवित्र ...
रेड लाईट डायरीज : आज्जी आणि चाईल्ड सेक्स वर्कर्स....
रेड लाईट डायरीज : रंगरुपाचे रेड-लाईट लॉजिक...
रेड लाईट डायरीज : रेड लाईट एरियातली नोटाबंदी
रेड लाईट डायरीज : वेश्येतले मातृत्व ……
इंदिराजी …. काही आठवणी …
रेड लाईट डायरीज : गिरिजाबाई …..
रेड लाईट डायरीज : सेक्सवर्कर्सचे रॅकेट – 2
‘रॅकेट’ रेडलाईट एरियाचे…
नवरात्रीची साडी…
रेड लाईट डायरीज – शांतव्वा….
रेड लाईट डायरीज – ‘धाड’!
गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध)
गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध)
उतराई ऋणाची…
स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव…
गीता दत्त – शापित स्वरागिनी