काही माणसांची मृत्यूपश्चात ख्याती होते तर काहींचे लोकोत्तर पूजनही होते काही मोजकीच माणसे अशी असतात की, जी जिवंतपणी दंतकथा होऊन जातात. महाराष्ट्राच्या काळ्या मातीत अन कृष्णेच्या निळ्या पाण्याच्या काठी एक असाच अफाट माणूस होऊन गेला की, ज्याची ख्याती सातासमुद्रापार गेली, ज्याच्यावर सिनेमे निघाले, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, रकानेच्या रकाने भरुन लेखन केले गेले! काही काळ त्याची ख्याती विवादास्पद भासवली गेली मात्र लोकांनी मात्र त्याच्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले, तरुणांनी त्यांच्यात आपला आदर्श पाहिला तर वृद्धांना तो पुत्रवत वाटला, केसांची चांदी झालेल्या बायाबापडयांना तो आपला आधार वाटला तर सड्यासाठ्या बायकापोरींना तो आपला भाऊबंद वाटला! मिसरूड फुटलेल्या कोवळ्या पोरांना तो धगधगता ज्वालामुखी वाटला! बापू बिरू वाटेगावकर हे त्या मुलुखावेगळ्या आसामीचं नाव!


बापू उर्फ कृष्णेचा वाघ! खरा खुरा वाघ! आजच्या वाघाहून अनेक पटींनी हिंस्त्र आणि आक्रमक तरीही माणुसकीचे सगळे मंत्र जपणारा एक अवलिया माणूस. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी ‘सत्तू भोसले’ हा कथानायक आपल्या ‘वारणेच्या वाघ’ मध्ये जसा रंगवला त्याहून अधिक दिलदार आणि त्याहून अधिक टोकदार असा हा माणूस. खराखुरा जिता जागता ज्वालामुखी कृष्णाकाठचा मराठमोळा वाघ, सह्याद्रीचा भूमीपुत्र, मराठी बाण्याचे अस्सल रौद्र रूप.

‘कृष्णाकाठचा फरारी',‘बोरगावाचा ढाण्या वाघ’ अशा अनेक विशेषणांने बापूंची ओळख आजही साऱ्या महाराष्ट्राला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बाहे बोरगाव हे बापूंचे गाव. याच गावात काही दशकापूर्वी बापू बिरूंचा रक्तरंजित इतिहास लिहिला गेला. एका अद्भुत चैतन्याचा इतिहास. एक काळ होता जेंव्हा कायद्याचे राज्य सर्वत्र पोहोचले नव्हते. अश्राप निराधार गरीब जनतेवर गावातील गावगुंड, खासगी सावकार अन्याय करत मुजोर व्हायचे, गोर गरीबांच्या लेकीसुना म्हणजे त्यांच्यासाठी विषयसुखाच्या जिनसा होऊन गेल्या होत्या. आपली वासना भागवण्यासाठी कुणाची ही पोरबाळ बिनदिक्कत नासवली जायची. कुणाच्याही पदराला हात घातला जायचा, कुणाच्याही झोपडीवर पेटते बोळे पडायचे, कुणाच्याही गच्चीला हात जायचा, कुणाच्याही गल्ल्यावर धाड पडायची, सर्वत्र जंगलराज होते. त्याच्याविरुद्ध न दाद न फिर्याद. कारण ह्या बड्या धेंडांचा दबाव इतका असायचा की लोक तोंड बंद करून घरादाराची अब्रू वेशीला टांगली गेली तरी गुमान राहत.

इतका अमानुष दरारा होता टवाळखोर गुंडांची टोळी आपल्या दहशतीच्या जोरावर बारा गावच्या वेशी नासवत सुटायची. असेच थैमान बोरगावात देखील घातले गेले. त्यांच्या अरे ला कारे म्हणणारा कोणी नव्हता. त्यामुळे अशा अमानवी घटनांविरुद्ध आवाज उठला जाणं हे काजव्याने सूर्याला जाब विचारण्यासारखे होते. या लोकांविरुद्ध दाद मागायचे धाडस कोणात नव्हते. विषम परिस्थितीत त्याच गावच्या तांबड्या मातीत कुस्ती खेळणाऱ्या एका पैलवानाने जीवावर खेळून एकच झेप अशी घेतली की अनेकांना घाम फुटला, अनेकांच्या पाटलुणी पिवळ्या झाल्या. बापू बिरू वाटेगावकर हे त्या वाघाचे नाव.

तालमीच्या हौदातली तांबडी माती मर्दाच्या देहाला वादळी ताकद बहाल करते. अंगअंगात झुंज भिनवते. बंडाचे निशाण फडकावते. या मातीत आपली रग जिरवणाऱ्यास कधी कुणी लढ म्हणावे लागत नाही कारण लढणे हाच त्याचा गुणधर्म असतो आणि तिच त्याची ओळख असते. कंबरेला लांघ – लांगोटा बांधला की त्याच्या देहात दहा हत्तींचे बळ येते. बापूंच्या अंगात देखील असंच तुफान साठलं होतं, रोम रोमात विद्रोह होता आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात बदला आणि सुडाच्या ठिणग्या होत्या. अन्यायाविरुद्ध दोन हात करण्याचा लाव्हा त्यांच्या नसानसातून वाहत होता.

एकदा बोरगावमध्ये अशीच एका गावगुंडाने एका अबला नारीच्या इभ्रतीवर घाला घातला. तेंव्हा बापूंनी ठरवलं, आता बस्स... रंगा शिंदे हे त्या नरपिशाच्चाचे नाव, त्याला आता धडा शिकवायचाच या इराद्याने बापू पेटून उठले. हाडापेराने मजबूत असलेला अन काळजाने घटमुट असलेला हा पैलवान गडी हातात भालाकुऱ्हाड घेवून एकांड्या शिलेदारागत सुसाट निघाला आणि बघता बघता त्याने त्या नराधमाच्या देहाच्या चिरफाळया उडवल्या. कृष्णेचं पाणी लाल झालं, रक्तांचे पाट वाहिले. एका सामान्य माणसाने आपल्या मनगटाच्या ताकदीवर अन अस्मानी निश्चयाच्या जोरावर गावाला लागलेली विषवल्ली नेस्तनाबूत केली. कुऱ्हाडीचं पातं पण त्या दिवशी दमलं पण बापूंच्या हातांना कंप सुटला नाही कारण ही कीड नष्ट करताना कच खाऊन चालणार नव्हतं. या दिवसानंतर बापूंनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि मराठमोळ्या रॉबिनहूडचं काम सुरु केलं.

बापूंचा अन्यायाविरुद्धचा लढा अल्पावधीत सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात घुमला. कृष्णेपासून ते पूर्णेपर्यंत अन काळ्या मातीतल्या भीमेपासून ते तांबड्या मातीतल्या जगबुडीपर्यंत त्यांची किर्ती पसरली. लोकांना कळले की, असाही एक माणूस आहे की जो आपल्या कुऱ्हाडीच्या पात्याच्या जोरावर गुन्हेगारांना पळता भुई थोडी करतो त्यांची जिभ छाटतो, त्यांचे जिणे मुश्कील करतो तेही कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेविना. केवळ मायेपोटी आपल्या लोकांच्या स्नेहासाठी तो हे काम करतो याची कीर्ती दूरदूरपर्यंत झाली. लोक त्यांचा पत्ता हुडकत येऊ लागले. सरकारजवळ वा पोलिसांच्या जवळ आपली दुखणी न मांडता त्यांना आपल्या अंतःकरणातील सल दाखवू लागले तेव्हा उभ्या महाराष्ट्राने तोंडात बोटे घातली. जसजसे त्यांच्याकडे लोकांचे येणे वाढत गेले तसतसे त्यांच्या नावावरील सरकारी अपराध वाढत गेले. ज्या यंत्रणेला गुंडांचे राज्य संपवता आले नाही ती यंत्रणा बापूंना अटक करण्यासाठी जंग जंग पछाडू लागली. यादरम्यान पांढरपेशी वर्गाने नेहमीप्रमाणे तोंडात मिठाची गुळणी धरली तर ज्यांचे खाण्यापिण्याचे वांधे होते त्या भुकेकंगाल जनतेने मात्र बापूंना मनापासून पाठिंबा दिला. त्यांच्यावर अफाट प्रेम केलं. महाराष्ट्र पोलिसांनी अख्खा सातारा- सांगली जिल्हा पिंजून काढला पण हे वादळ कोणाच्याच हाती लागले नाही. जवळजवळ पंचवीस वर्षे पोलिसांना गुंगारा देत बापू बिरू वस्तादांनी बोरगावच्या पंचक्रोशीतील गुंडगिरी, सावकारी कायमची बंद केली. लेकी  सुनांचे नांदणे बसवले, कित्येकांची कर्जे मुक्त केली, कित्येकांच्या जमिनी सोडवून दिल्या. त्यांनी लोकांना खुशीची दुलई दिली अन् स्वतः मात्र काट्या कुटयातून अहोरात्र पळत राहिले. पोलिसांना गुंगारा देत राहिले. गुंडगिरी पुरती शमली असं ज्या दिवशी त्यांना वाटलं त्या दिवशी मात्र त्यांनी पोलीस यंत्रणेवर दया दाखवत आणि देशाच्या कायदा आणि संविधानावर भरवसा ठेवत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. कोणतीही शर्त अट न मांडता अन् कोणताही पब्लिसिटी स्टंट न करता त्यांनी सहजरित्या शरणागती पत्करली. भारतीय दंडसंहितेनुसार त्यांच्यावर अनेक गुन्हे आणि त्यानुरूप कलमे नोंदवली गेली. रितसर खटला चालवला गेला, न्याययंत्रणांनी कायद्यावर बोट ठेवले बापूंनीही आपला गुन्हा आधीच कबूल केला होता त्यामुळे विरोध असा फारसा झालाच नाही.

बापूंनी स्वतःला अटक करवून घेतल्याची बातमी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पसरली आणि अनेक चुली त्या दिवशी पेटल्याच नाहीत. अनेक बाया बापडयांनी नवस बोलले. बापूंना लोक आदराने ‘अप्पा’ म्हणत अप्पांच्या सुटकेसाठी बिरोबापासून ते खंडोबापर्यंत सर्वत्र भाग बांधले गेले अनेकांनी त्या दिवसापासून आपल्या मस्तकी भंडारा लावला नाही. लोकांनी उपास तपास केले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बापूंनी ती शिक्षा हसतमुखाने स्वीकारली जी कामे करुन त्यांनी लोकमानसात जगण्याचा नवा अर्थ बिंबवला होता, ज्यासाठी स्वतःच्या घराचे उंबरठे वर्ज्य केले होते, कुठल्याही अपेक्षेविना लोकशासन ज्यांनी राबवले, जे काम कायद्याने आणि प्रशासन यंत्रणेने करायला पाहिजे होते ते त्यांनी केले अन् त्याचे इनाम जन्मठेपेच्या रूपाने मिळाले... किती हा दैवदुर्विलास! पण कायदा हा गुन्हे आणि पुरावे पाहतो त्याला भाव भावनांशी घेणे देणे नसते. याच तत्वाने बापूंचा न्यायनिवाडा झाला होता. ज्याला त्यांनी स्वतःच कधी हरकत घेतली नव्हती या घटनेनंतर हा ज्वालामुखी निमाला.

तब्बल अडीच दशके पोलिसांना चकवणारे बापू तुरुंगात गेले तरी बोरगाव रेठरे हरणाक्ष, मसुचीवाडी, ताकारी या परिसरात पुन्हा कुठल्या गावगुंडाने तोंड वर काढले नाही. यावरुन त्यांचा दरारा उमगावा. कायद्याने दिलेली शिक्षा भोगून बापू बिरु काही वर्षापूर्वीच गावी परतले होते. त्या दिवसापासून ते अनेक सानथोरांचे आदर्श झाले होते. शेकडो किमी अंतर कापून लोक त्यांच्या पायावर डोकं ठेवायला येत अन् त्यांच्यापासून निर्भीडतेची, निस्पृहतेची चेतना घेऊन परत निघत. मात्र, यामुळे त्यांनी कधी सेलिब्रिटी झाल्याचा आव आणला नाही की कुठला डामडौल वाढवला नाही. त्यांच्यावर कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, बापू बिरु याच नावाने सिनेमा निघाला पण तरीही त्यांचे पाय सदैव मातीचेच राहिले. आपले उर्वरित जीवन भजन कीर्तन आणि प्रवचनात व्यतित करत त्यांनी जीवन प्रवास जारी ठेवला. एक सामान्य माणूस गुंडगिरीविरुद्ध दोन हात करण्यासाठी एकट्याच्या हाताचे सहस्त्रावधी हातात कसे रुपांतर करतो हे बापूंच्या जीवनाकडे बघितले की कळते. बापू अखेरपर्यंत सक्रीय होते. बोरगावच्या यात्रेत बापू स्वतः हजर असत एखाद्या पोराने कुस्तीचा फड चांगला रंगवला की त्यांचा हात नकळत खिशाकडे जाई, ओठावर भले बहाद्दराची शाब्बासकी येई. खिशात असतील तेवढे पैसे बक्षीस देत, मनमुराद कौतुक करत.

बापूंच्या हातून बारा खून झाले होते असे जरी म्हटले जात असले तरी बापू नसते तर गल्लोगल्ली खुनांचे पेव फुटले असते हे ही खरे. बापू नसते तर या भागातील लोकांचे जिणे झाल असते म्हणूनच लोक त्यांच्यामागे ठामपणे उभे राहिले. लोकमानसात त्यांची प्रतिमा नायकाचीच राहिली. ‘गरीबांनी मला कायम आधार दिला आणि त्यामुळेच मी इथंपर्यंत आलो’ असं बापू नेहमी सांगायचे. मी जरी दरोडेखोर असलो तरी गरिबांचा कैवारी आणि ढाण्या वाघ म्हणूनच जगलो आणि तसाच मरेन असं ते आज त्यांनी आपले म्हणणे खरे करून दाखवले वयाच्या शहाण्णव्या वर्षी निधन पावलेला हा माणूस म्हणजे कायदा हातात का घ्यावा लागतो याचे जसे प्रतिक होता तसेच योग्य वेळी कायद्याचा आदर कसा करावा हे सांगणारा अफाट माणूसही होता.

एक सच्चा ‘लोकनायक’ बापू बिरू वाटेगावकर. रॉबिनहूडला साजेशी दंतकथा वाटावी असं हेवा वाटणारं पण तितकंच त्रासदायक, कष्टदायक, क्लेशदायक आयुष्य जगलेला आभाळाएव्हढया उंचीचा माणूस. आज बापू देवापुढे गेल्यावर त्यांच्या तिथेही सुंबरान मांडलेलं असेल.

संबंधित ब्लॉग

रेड लाईट डायरीज : स्तनदायिनी... 




रेड लाईट डायरीज : तळतळाट...

रेड लाईट डायरीज : रेड लाईट एरियातलं न्यू इअर सेलिब्रेशन...

रेड लाईट डायरीज : पोलिस, प्रशासन आणि कुंटणखाने (उत्तरार्ध)

रेड लाईट डायरीज : पोलिस, प्रशासन आणि कुंटणखाने

पवित्र ...

रेड लाईट डायरीज : आज्जी आणि चाईल्ड सेक्स वर्कर्स....

रेड लाईट डायरीज : रंगरुपाचे रेड-लाईट लॉजिक...  

रेड लाईट डायरीज : रेड लाईट एरियातली नोटाबंदी 

रेड लाईट डायरीज : वेश्येतले मातृत्व ……

इंदिराजी …. काही आठवणी …

रेड लाईट डायरीज : गिरिजाबाई …..

रेड लाईट डायरीज : सेक्सवर्कर्सचे रॅकेट – 2

‘रॅकेट’ रेडलाईट एरियाचे…  

नवरात्रीची साडी…

रेड लाईट डायरीज – शांतव्वा….

रेड लाईट डायरीज – ‘धाड’!

गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध)

गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध)

उतराई ऋणाची…

स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव…

गीता दत्त – शापित स्वरागिनी