एक काळ होता धर्मेंद्र तेव्हा अत्यंत शांत, संयमी, सुसंस्कृत आणि काहीशा अबोल नायकाच्या भूमिका करायचा. तेंव्हा तो ‘ही-मॅन’ वगैरे काही नव्हता. एखाद्या किशोरवयीन मुलाच्या आईने हनुवटीस धरून केस विंचरून पाडलेला भांग पाडावा तशी त्याची हेअरस्टाईल होती. त्याचे नायक मितभाषी असत, किंचित मान झुकवून आणि खांदे तिरके करून बोलण्याची त्याची ढब भाव खाऊन जायची. स्मितहास्याच्या मुद्रेत तो कमालीचा लाघवी दिसायचा. त्याचा देह तेव्हाही बळकटच होता पण तेंव्हा तो राकट कणखर न वाटता सदृढ बलशाली वाटायचा. बेल बॉटमची फॅशन आली तरीही कमी बॉटमच्या तंग पँटस आणि बहुतांश करून लांब बाह्यांचे आखूड शर्ट या त्याच्या आवडत्या वेशात तो खुलून दिसायचा. अभिनयाच्या बाबतीत मात्र तो पूर्वपार ठोकळा होता तरीही या भूमिकांत त्याचे हे वैगुण्य झाकले जायचे. 'अनपढ', 'ममता', 'अनुपमा', 'बंदिनी', 'बहारें फिर भी आयेंगी' 'दिल ने फिर याद किया', 'दिल अपना और प्रीत पराई', 'आये दिन बहार के' अशा क्लासिक सिनेमातले त्याचे रोल अजूनही लक्षात राहावेत असे होते. अशाच धाटणीचा एक कॅमिओ रोल त्याने दिग्दर्शक असित सेनच्या 'खामोशी'मध्ये केला होता. यात तो पडद्यावर जेमतेम काही मिनिटंच दिसला पण तरीही तो लक्षात राहिला कारण त्याच्या रोलचे दोन तुकडे होते जे फ्लॅशबॅकमधले होते आणि विशेष म्हणजे त्याच्या ऍपिअरन्सची दोन्ही दृश्ये दोन अजरामर गाण्यातली होती. यातलं एक होतं 'वो शाम कुछ अजीब थी' आणि दुसरं होतं 'तुम पुकार लो तुम्हारा इंतजार हैं..' पैकी किशोरदांनी गायलेल्या दर्दभऱ्या 'वो शाम कुछ अजीब थी' या देखण्या गाण्यावर यापूर्वी एक स्वतंत्र पोस्ट लिहिली आहे. या ब्लॉगपोस्टमध्ये हेमंतदांच्या जादुई आवाजातल्या 'तुम पुकार लो' विषयी....


राधा (वहिदा) ही डॉ. कर्नलसाहब (नाझीर हुसेन) यांच्या मानसोपचार रूग्णालयातील परिचारिका असते. वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या केसेस केवळ मानसिक आधाराच्या जोरावर नीट करता येतात हे डॉक्टरांना दाखवून द्यायचे असते. असाच एक तरुण अविवाहित रुग्ण देव (धर्मेंद्र) यास त्यांनी बरं केलेलं असतं. डॉ. कर्नल साहेबांच्या सांगण्यावरून नर्स राधा देवच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून सर्वस्व झोकून देते. त्याच्या भावविश्वात शिरून त्याचा विश्वास संपादन करते, त्याच्या मनातील अंधकार दूर होण्यासाठी चोवीस तास झटते. या सर्वाच्या परिणामस्वरूप देव निराशेच्या गर्तेतून बाहेर पडतो. त्याची प्रकृती पूर्ववत होते आणि मनोवस्थाही प्रफुल्लीत होते. तो बरा झाल्यानंतर त्याचे आईवडील येतात आणि त्याला घेऊन जातात. देव बरा होतो पण राधाचं त्याच्यावर प्रेम जडतं. केवळ इलाजासाठी आलेल्या देवला राधाचं प्रेम उमगत नाही तो तिथून निघून जातो. तो बरा झाल्यावर त्याचं हरवलेलं प्रेम त्याला परत मिळतं ; त्याचं लग्न होतं. दरम्यानच्या काळात कर्नलसाहब देवसारखीच आणखी एक केस घेतात. जेणेकरून इलेक्ट्रिक शॉकशिवाय असे रुग्ण बरे होतात यावर शिक्कामोर्तब व्हावं. ही केस असते अरुणची (राजेश खन्ना), त्याला सुलेखाने प्रेमात दगा दिलेला आहे. अरुणला त्याच्या आयुष्यात कोणतीच स्त्री मंजूर नसते पण सुलेखा त्याच्या मेंदूतून बाहेर पडत नसते. डॉक्टर ही केस घेण्यासाठी राधाची विनवणी करतात पण ती त्यांना नकार देते कारण देवच्या अशाच केसमध्ये तिला प्रचंड मानसिक त्रास झालेला. ती त्याला विसरूच शकली नव्हती. तिचं प्रेम होतं आणि त्याच्यासाठीचा तिचा इंतजार अजून संपलेला नव्हता. राधाऐवजी अन्य नर्सेस प्रयत्न करून पाहतात पण अरुण कुणाला बधत नाही. अपघाताने राधाला त्या केसमध्ये पडावं लागतं. पुन्हा तोच खेळ होतो. काही महिन्यात अरुण बरा होतो. त्याचं तिथून आपल्या गावी परत जाणं निश्चित होतं आणि आपण पुन्हा या खेळात हकनाक आपला जीव गुंतवून बसलो हे राधाला उमगतं. हा धक्का ती सहन करू शकत नाही. त्याच रुग्णालयात तिला रुग्ण म्हणून राहावं लागतं. देव आणि अरुण यांच्यात ती स्वत्व हरवून बसते. यातून बाहेर यायला किती वेळ लागेल हे ठाऊक नाही पण बरा झालेला अरुण क्लायमॅक्सला राधाला ज्या खोलीत बंद केलेलं असतं तिथे येऊन सांगतो की, अखेरच्या श्वासापर्यँत तो राधाची प्रतिक्षा करेन. "मैं तुम्हारा इंतजार करुंगा" हे अरुणचे वाक्य राधाच्या कानात घुमत राहतं. रूमला असलेल्या जाळीच्या दरवाजापाशी ती कोलमडून पडते. शेवटी जाळीवरून घसरत जाणारे तिचे रिते हात दिसतात आणि सिनेमा संपतो.



'खामोशी'ची सुरुवात हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरील रुमच्या सज्जात वहिदा उभी असते तिथून होते आणि अंत रूम नंबर २४ मधील दारावरील जाळीवर हात खरडणाऱ्या वहिदाने होते. याच २४ नंबरच्या खोलीत कधी काळी धर्मेंद्र, नंतर राजेशखन्ना ऍडमिट असतात. हॉस्पिटलमधील खोल्या, कॉरीडॉर, आतले सज्जे, खोल्यांना लागून असणारी बाल्कनी, दरवाजे, रिकाम्या खुर्च्या, प्रशस्त टेबले, जाळीदार दरवाजे, फुलांची चित्रे असणारी बेडशीट्स, प्रशस्त कमनीय जिने, काचेच्या तावदानांच्या खिडक्या ही सगळी या सिनेमातील पात्रे वाटू लागतात. गाण्यांचे चित्रीकरण कसे असावे याचा कुणाला अभ्यास करायचा असेल किंवा प्रकाश रचना कशी असावी, कॅमेऱ्याचा टेक ऑफ कसा असावा, अँगल ऑफ व्ह्यू कोणता ठेवावा, सिनेमॅटोग्राफीचे बेसिक्स काय असतात हे कुणाला शिकायचे असेल तर त्याने 'खामोशी'ची गाणी पहावीत.

'तुम पुकार लो' हे गाणं सिनेमात एका फ्लॅशबॅकमधून समोर येतं. देव त्याच्या लग्नाची पत्रिका डॉ. कर्नलसाहेबांच्या हॉस्पिटलला पाठवतो. कर्नलसाहेबांचे जाणे नक्की नसते पण तिथल्या मेट्रन आणि नर्सेससह सर्वांची इच्छा असते की राधामुळे देवला नवे जीवन मिळाले आहे तेंव्हा तिनेच त्या लग्नाला जावे पण तिचा नकार असतो. या नकारामागे अनेक कारणे असतात. देववर एकेकाळी स्वतःच्या नकळत तिने मनापासून प्रेम केलेलं असतं, त्या स्मृती काही केल्या तिच्या मनातून जात नसतात. देव सारखीच आणखी एक केस राधाच्या भरवशावर कर्नलसाहेबांनी घेतेलेली असल्याने येणाऱ्या काळाबद्दल ती चिंतित असते आणि आपल्याला पाहून देवची रिएक्शन कशी असेल याचा तिला नेमका अंदाज नसतो. त्यामुळे देवच्या लग्नास जायचे ती काहीशा उदासीनेच टाळते. मात्र देवला त्याच्या लग्नासाठी शुभसंदेश देणारे पत्र लिहायला ती मेजावर बसते. 'मेरे देव, आपकी शादी तय हुई ... इतकेच लिहून ते पान फाडून फेकून देते. दुसरे पान उघडून त्यावर पुन्हा लिहू लागते - इन्सान जोचाहता हैं वो हमेशा ही पुरा नही होता, आपके शादी में मैं शामिल ना हो पाउंगी... आप तो जानते ही हो उसी दिन गुरुवारको मंथली चेकअप का दिन होता हैं... आशा हैं मुझे माफ कर देंगे... अप जहां रहे जैसे भी रहें मेरी दुवाएं हमेशा आपके साथ रहेंगी ... आपका विवाहिक जीवन सुख शांती से गुजरे... राधा ' ... इतका लिहून होतं आणि टेबल लॅम्पच्या फिकट उजेडात तिचे लक्ष टेबलाच्या कडेला ठेवलेल्या 'मेघदूत' या पुस्तकाकडे जाते, तिच्या डोळयात टचकन पाणी येतं. एखादी जिवाभावाची वस्तू हरवल्यागत तिचा चेहरा कावराबावरा होतो. तिच्या हातातले पेन ती बाजूला ठेवते आणि ते पुस्तक हाती घेते. त्याच्या पहिल्या पानावरच तिने कधी काळी लिहिलेलं असतं - "देव को, इस जन्मदिन पर जन्म जन्म की दुवाओंके साथ, राधा !" ... हा मजकूर वाचता क्षणी तिला तो दिवस आठवतो जेंव्हा तिने तो लिहिला होता...तिच्या मनात आठवणींचा प्राजक्त फुलून येतो. येथून फ्लॅशबॅक सुरु होतो.



आरशासमोर उभी असलेली सोनेरी काठाची आणि प्लेन काळ्या रंगाची साडी नेसलेली वहिदा रेहमान खूप मनमोहक आणि लाघवी दिसते. संपूर्ण सिनेमात वहिदा नर्सच्या पांढऱ्या शुभ्र वेशात दिसते. बंद गळ्याचे आणि कोपरापुढेही बाही असणारे ब्लाऊज तिला शोभून दिसतात. नर्सच्या चेहऱ्यावर असणारा सेवाभाव तिच्या ठायी अंगचाच असल्याने हा वेश तिला खुलतो. या सीनमध्ये मात्र ती काळ्या साडीत दाखवून दिग्दर्शक असित सेन यांनी तिच्या आयुष्यातली ही डार्क शेड असल्याचे सूचित केलेय. कारण काळा रंग हा शोक आणि पश्चात्ताप यांचे प्रतिक म्हणून वापरला जातो. इथे राधाला दुःखाच्या डागण्या देणारा प्रसंग दाखवण्याआधी तिला काळ्या साडीत दाखवून प्रतिभाशक्तीची चुणूक दाखवून दिलीय. गळ्यातल्या मोत्यांच्या सरी नीटनेटक्या करत एखाद्या फुलराणीसारखं आरशात न्याहाळत ती बुकशेल्फ जवळ येऊन बसते आणि देवच्या वाढदिवसानिमित्त त्याला भेट देण्यासाठी आणलेल्या मेघदुतचे पहिले पान उघडते. त्यावर लिहिते - "देव को, इस जन्मदिन पर जन्म जन्म की दुवाओंके साथ, राधा !" .. लिहित असताना कानात डुलणारी मोत्याची डुले तिच्यावर जाम फिदा असतात. ती अक्षरशः आनंदाचे पंख लावून मेघदूतचे पुस्तक हाती घेऊन देवच्या रूमच्या दिशेने जायला निघते. इतर नर्सेस तिच्या या अनोख्या मूडवरून तिची फिरकी घेतात पण त्यांना चकवत ती देवकडे जाते.

काही अंतर चालून जाते तोच जिन्यात तिची भेट देवच्या आई वडिलांशी होते. बऱ्या झालेल्या देवला वाढदिवसाच्या निमित्ताने ते भेटायला आलेले असतात. राधाला पाहून देवची आई खुश होते. मेट्रनजवळ राधाचाच विषय काढला असल्याचे ती सांगते. देवच्या वडीलांना मात्र पुढील प्रवासाची खूप घाई झालेली असते, ते तिथून निघण्यास उतावीळ असतात. तर देवची आई आणि राधा यांच्यातले संभाषण लांबतच जाते. देवची आई तिची खूप स्तुती करते आणि निघताना अखेरीस सांगते की, "देवकडून ही गोष्ट तुला सांगणं होत नही तेंव्हा मीच सांगते, ज्या मुलीमुळे देवच्या आयुष्यात इतके सारे रामायण झाले, त्याची मनस्थिती खालावली त्याच मुलीसोबत देवचा विवाह पक्का झाला आहे !" हे ऐकताच राधावर जणू वीजच कोसळते. हातातले मेघदूत ती उराशी गच्च आवळून धरते. मुलीकडच्या लोकांनीच आधी आक्षेप घेतले होते आणि आता तेच पुन्हा आपण होऊन तयार झालेत, शिवाय देवला याचा खूप आनंद झालाय असं देवच्या आईने सांगताच राधाचे श्वास खुंटतात, त्या जिन्यात ती जणू गोठून जाते. देवचे आईवडील लगबगीने निघून जातात आणि काही क्षण राधा तिथेच खिळून उभी राहते.

पुढच्याच क्षणाला हेमंतकुमार यांच्या आवाजातलं ‘तुम पुकार लो तुम्हारा इंतजार हैं’ च्या आधीचं अत्यंत दिलखेचक असं हमिंग (गुणगुणणं) कानी येऊ लागतं आणि राधा त्या जादुई आवाजाने भारल्यागत खेचली जाते. तिची पावले यंत्रवत जिना चढू लागतात. या मोमेंटला संपूर्ण हॉस्पिटलमधला बेस एरिया निर्मनुष्य दाखवला आहे, मधोमध असणारा मोठा प्रशस्त त्रिकोणी जिना आणि त्याच्या दोन्ही बाजूला रिकामे बाक, टेबल, कपाटे दाखवली आहेत. एक सन्नाटा तिथे जाणवतो. काही वेळापूर्वी फुलपाखरासारखी उडत आलेली राधा जेंव्हा फ्रेश मूडमध्ये तिथे होती तेंव्हा तो सगळा परिसर जसा जिवंत वाटत होता आता तो तसा वाटत नाही. हा मूड ज्या पद्धतीने दिग्दर्शकाने चेंज केला आहे त्याला हेमंतदांचा आवाज चार चांद लावतो. एखाद्या मंदिरात कुण्या ध्यानस्थ साधूने मन शांत करणारी जादुई धून छेडावी तसं फिलिंग हेमंतदांच्या स्वरांना येतं. अत्यंत संथ गतीने पावले टाकत राधा जिना चढत जाते हा सीन जिन्याच्या खालच्या बाजूने शूट केलाय, जिन्याच्या रेलिंगला असणारी चौकडयांची नक्षी मागेपुढे होत राहते, फिकट लाईट वाहिदाच्या मागोमाग प्रखर होत जातात आणि हमिंग संपून गाणं सुरु होतं. "तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार हैं, ख्वाब चुन रही हैं रात बेकरार हैं, तुम्हारा इंतजार हैं .."

पियानोच्या काळ्यापांढऱ्या कळा ज्या गतीत वाजतात त्याच गतीत राधा चालते हे विशेष आहे. जिन्यातून कॉरीडोर पार करून छातीशी मेघदूत गच्च धरून ती देवच्या खोलीपाशी येते, जाळीचे असलेला त्याच्या खोलीचा दरवाजा किंचित लोटलेला असतो. दाराच्या बाहेरील बाजूस अंधार आहे आणि आतल्या बाजूस किंचित उजेड आहे. एका जाळीदार आरामखुर्चीत रेलून बसलेला देव हलकेच उठून चौकोनी जाळी असलेल्या सज्जापाशी जाऊन उभा राहतो. पाठमोऱ्या देवच्या अंगात चौकड्या डिझाईनचे शर्ट आहे, खोलीचा दरवाजा सरकवून राधा आत येते. देव धीरगंभीर आवाजात गात असतो - 'होठ पे लिये किसकी बात हम जागते रहेंगे और कितनी रात हम ....' त्याचं गाणं ऐकणारी राधा खरं तर पूर्णपणे खचलेली आहे, तिची सगळी स्वप्न एका फटक्यात उध्वस्त झाली आहेत. पण तरीही ती आत येते. निमिषार्धासाठी विचार करत देवला भेट देण्यासाठी आणलेले देवदूत तिथेच टेबलावर ठेवते. इतक्यात देव राहिलेली पंक्ती पूर्ण करतो - "...जागते रहेंगे और कितनी रात हम मुख्तसर की बात हैं इंतजार हैं... तुम्हारा इंतजार हैं... तुम पुकार लो ...." टेबलावर ठेवलेले पुस्तक ती पुन्हा हातात घेते. या गाण्यातला धर्मेंद्रने साकारलेला देव कमालीचा सोज्वळ आणि सालस वाटतो, इतका की त्याचीही कणव येते ! राधा त्याच्या खोलीतून बाहेर जाते. जाळीदार दरवाजा आपल्या हाताने बंद करते. या क्षणाला दाराबाहेरचा आधी दाखवलेला अंधार लुप्त होऊन तिथं थोडासा फिकट उजेड दिसतो. राधा एकवार पाठमोऱ्या देवकडे डोळे भरून पाहते आणि जड अंतःकरणाने पावलं टाकू लागते.

"दिल बहल तो जायेगा इस खयाल से, हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से ...रात बेकरार थी, बेकरार हैं...तुम्हारा इंतजार हैं... तुम्हारा इंतजार हैं..."देव गात असतो आणि राधा एका प्रश्नचिन्हाच्या दिशेने जाते. या सीनमध्ये जे लाईट इफेक्ट्स दाखवले आहेत त्यावरून ब्लॅक अँड व्हाईटची खरी जादू कळते. एकीकडे अत्यंत प्रखर अशा हेडलाईटच्या झोतात काळ्या साडीतली सावकाश चालत जाणारी राधा, मोठी होत जाणारी तिची सावली आणि अर्धवट उजेडात असलेला विविध चौकोनांच्या नेपथ्यात गुरफटलेला देव ! प्रेमाची चौकट ज्याला ओलांडता आली नाही त्या देवच्या आसपास सदैव चौकोनी गोष्टी दाखवल्या आहेत. तर राधासाठी लाईट आणि वेषभुषा यांचा कॉन्ट्रास्ट वापरला आहे. अत्यंत बारकाईने हे सगळं आपल्यापुढे येत जातं. कारण गाण्याची गती कमालीची धीमी आहे आणि त्यात काहीच नाट्य घडत नाही. ती चालत येते आणि निघून जाते तर तो बसल्या जागेवरून उठतो आणि सज्जात रेंगाळतो ! इतकं संथ चित्रीकरण असूनही प्रेक्षक श्वास रोखून पाहतो कारण असं काही घडेल असं कुणालाच वाटलेलं नसतं. प्रेक्षकां मन हेलावून टाकण्यासाठी लाईट्स,शेडस, ड्रेसिंग आणि नेपथ्य याच्या आधारे देखील काम करता येतं, त्या साठी कोणताही गोंगाट वा आक्रस्ताळेपणा करावा लागत नाही हे 'खामोशी'त अनेकदा सिद्ध होतं. देवच्या खोलीतून बाहेर आलेली राधा कॉरीडोरमधून जिन्याजवळ येते तेंव्हा या गाण्यातली ती अजरामर शीळ कानी पडते. राधा देखील काही क्षण थबकते आणि पुन्हा पायरया उतरू लागते. हेमंतदांच्या आवाजातली शीळ हवेत विरत जाते आणि राधा फ्लॅशबॅकमधून बाहेर येते.

या गाण्यात औदासिन्य आहे पण ते हवेहवेसे आहे. या गाण्यात सहाच पंक्ती आहेत पण त्या आशयपूर्ण आहेत. धीरगंभीर स्वरातलं हे गाणं एकमेव असावं जे नायिकेच्या प्रेमभंगाच्या व्यथेचं आहे पण ते गातोय तो नायक आहे ! तुम पुकार लो हे तो त्याच्या हरवलेल्या प्रेमासाठी म्हणतोय पण ते त्याचं न वाटता तिच्या हातून निसटलेल्या प्रेमाचे आर्त प्रकटन वाटतं हे या गाण्याच्या सिच्युएशनचे यश आहे. कोणतं गाणं कुठं असावं आणि फ्लॅशबॅक कसे वापरावेत याचे हे आदर्श उदाहरण ठरावे. तुम पुकार लो ही प्रेमभंग झालेल्या लोकांसाठी एक प्रार्थनाच आहे, गाण्याच्या नोट्स इतक्या तरल आहेत की आपलं नितळ प्रतिबिंब स्वच्छ पाण्यात पाहत असल्याचा भास व्हावा. हेमंतदांच्यासाठी हे गाणं जन्माला घातलं असावं इतका त्यांचा आवाज चपखल बसलाय. तो खुलतही नही आणि झुरतही नाही, तो एका विशिष्ट लयीत गाणं टिपेला घेऊन जातो. गाण्याच्या सुरुवातीला असणारं हमिंग आणि शेवटची शीळ दोन्हीही जीवघेणे आहेत. प्रेमात एकाकी पडलेल्या माणसाच्या मनात आशेचा दीप जागवणारं हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकत राहावं इतकं श्रवणीय आहे.

विख्यात बंगाली साहित्यिक आशुतोष मुखर्जी यांच्या 'नर्स मित्र' या लघुकथेवर प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक असित सेन (कॉमेडियन असितसेन नव्हेत) यांनी १९५९ मध्ये प्रतिभाशाली अभिनेत्री सुचित्रा सेन हीला लीड रोलमध्ये घेऊन 'दीप ज्वले जाये' हा बंगाली चित्रपट बनवला होता. सिनेमा सुपरहिट झाला होता. विशेषतः बंगालच्या ग्रामीण भागात त्याने तुफान व्यवसाय केला होता. असित सेननी हीच कथा 'खामोशी'च्या रूपाने हिंदीत आणली. विशेष बाब म्हणजे याच कथेचे तेलुगु अवतरण पी.व्ही.रेड्डींनी 'चिवराकु मिगिलेदी' या चित्रपटातून केलं आणि त्याने सणकून मार खाल्ला होता. सिनेमा सुपरफ्लॉप ठरला होता. त्यामुळे असित सेननी आपल्या बंगाली सिनेमाला हिंदीत आणण्यास दहा वर्षे घातली. 'खामोशी'चे संवाद गुलजार यांनी लिहिले होते तर स्वतः असित सेननी त्याची पटकथा लिहिली होती. हेमंतकुमार यांनी संगीताची बाजू सांभाळली होती तर गीते गुलजारजींची होती. वहिदा रेहमान, राजेशखन्ना, धर्मेंद्र, नाझीर हुसेन, इफ्तिकार, ललिता पवार, देवेन वर्मा अशी मुख्य स्टारकास्ट होती. जेमतेम दहा महिन्यात याचं चित्रीकरण पुरं झालं होतं. 'खामोशी' रिलीज झाला होता २५ एप्रिल १९६९ ला. 'आया सावन झूम के' - धर्मेंद्र, 'धरती कहे पुकार के', 'जीने की राह' - जितेंद्र,'बंधन', 'आराधना','दो रास्ते'- राजेशखन्ना, 'तुमसे अच्छा कौन है' - शम्मी, 'तलाश' - राजेंद्रकुमार असे हिट नायकांचे हिट सिनेमे याचवर्षी आले होते त्यांना टक्कर देत वहिदाचा 'खामोशी' सुपरहिट झाला. हा काळ सुपरस्टार राजेशखन्नाचा सुवर्णकाळ होता. १९६९ ते १९७१ या दोन वर्षात सलग सतरा सुपरहिट सिनेमे त्याने दिलेले. त्यातले तब्बल पंधरा सिनेमे सोलो रोलचे होते ! हे सांगण्याचे कारण म्हणजे खामोशी हा नायिकाप्रधान चित्रपट होता ! काहींनी याचे श्रेय राजेशखन्नाला देण्याचा प्रयत्नही केला होता. वहिदाच्या इतकेच अन्य बिंदू जास्त महत्वाचे आहेत. असितसेन, गुलजार, हेमंतकुमार यांच्या जोडीने ते नाव होते कमल बोस यांचे !

सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर वहिदाने मोकळया मनाने सांगितलं होतं की, "तिचा परफॉर्मन्स सुचित्रासेनच्या ओरीजिनलच्या जवळपास जाणारा झाला आहे याचे तिला समाधान आहे मात्र तेलुगु रिमेक 'चिवराकु मिगिलेदी'मधील सावित्रीच्या दर्जाचा अभिनय आपण करू शकलो नाहीत." आजकाल बॉलीवूडमध्ये असा दिलदार प्रांजळपणा औषधालादेखील उरलेला नाही.

'खामोशी'च्या वेळेस वहिदाचं वय होतं एकतीस वर्षांचं, धरम होता चौतीसचा आणि हँडसम राजेशखन्नाचं वय सत्तावीस वर्षांचं. कथेतील ही तीनही पात्रं याच वयाची आहेत. चित्रीकरणादरम्यान वहिदा प्रचंड डिप्रेस्ड झाली होती. कारण गुरुदत्तला जाऊन जेमतेम चार वर्ष झाली होती. जो किस्सा तिच्यामुळे गुरुदत्तच्या आयुष्यात घडला होता तो तिला विरुद्धर्थाने निभावायचा होता. हा वहिदाच्या संपूर्ण करिअरमधला सर्वात सशक्त आणि सरस रोल ठरला. अख्खा सिनेमाभर तिचं अस्तित्व जाणवत राहतं. तिचं सावकाश चालणं, मान वेळावून बघणं, कपाळावरील महिरपीतून कानाजवळून रेंगाळणाऱ्या बटांना दुर्लक्षित उस्मरत राहणं कमालीचं भावतं. वहिदाच्या आयुष्यात जी वादळं येऊन गेली त्याची ही रिव्हर्स इमेज होती, जिला तिने समरसून न्याय दिला. हा कालखंड स्वातंत्र्योत्तर पहिल्या दोन दशकातला होता ज्यात आयडियालिझम आणि रोमँटीसिझमने पडदा व्यापला होता. त्याची छाप संवाद आणि पात्ररचनेत स्प्ष्ट दिसते. सामाजिक दृष्ट्या अगदी मागच्या दोनेक दशकापर्यंत आपल्याकडे 'नर्स' या घटकास समाजाने चारित्र्याच्या दृष्टीने नेहमी संशयाने पाहिले आहे. डॉक्टरांशी तिचे काहीतरी लफडे असू शकते किंवा अफेअर करणारं प्रोफेशन हाच दृष्टीकोन असायचा. त्याला टोकदार छेद देत आशुतोष मुखर्जींनी हे एक नोबल प्रोफेशन आहे हे बिंबवतानाच ती एक प्रेमसुलभ भावना असणारी विविध नात्यांनी बांधली गेलेली स्त्री आहे हा रिव्होल्यूशनरी अँगल मांडला. या सिनेमाला प्रचंड लोकाश्रय लाभला. एक धक्कादायक शेवट, शोकांतिका आणि स्त्रीप्रधान कथानक अशा फारशा उठावदार बाबी नसूनही 'खामोशी'ने इतिहास घडवला.