रशियन डबल एजंट असलेल्या सेरजी स्क्रीपलवर झालेल्या हल्ल्यानंतर जगभरात हेरगिरीवर विविध लेखन छापून येत आहे. आपल्या गुप्तहेर संघटनेचा आढावा घेण्याआधी काही तुरळक नोंदी मांडाव्या वाटतात. 'रॉ' म्हणजे रिसर्च अॅनॅलिसिस विंग. 'रॉ' ही विदेशात हेरगिरी करणारी भारताची अधिकृत गुप्तचर संघटना. 'रॉ'चे एक संचालक बी.रमण यांनी ‘द काओबॉइज ऑफ रॉ’ हे बहुचर्चित पुस्तक लिहिलं आहे. यात 'रॉ'च्या माहितीसह गुप्तहेरांच्या सुरेल कथाही आहेत. त्यातच एक उल्लेख एका डबल एजंटचाही आहे. 2004 साली दिल्लीत ‘रॉ’चा रबिंदर सिंग हा उच्चपदस्थ अधिकारी त्याच्या कामाव्यतिरिक्त इतर खात्याचे कागद कॉपी करताना आढळला. 'रॉ'च्या वतीने त्याच्यावर गुप्त पाळत ठेवण्यात आली. त्याला रंगेहाथ पकडण्याची तयारी करण्यात आली, पण वरून आदेश मिळेपर्यंत बराच उशीर झाला आणि तो अधिकारी अमेरिकेत पळून जाण्यात यशस्वी झाला. चौकशीत असे आढळले की, तो सीआयएचा ‘मोल’ म्हणजे छुपा हस्तक होता. सेरजीच्या प्रकरणावरुन हा किस्सा लगेच आठवावा असा आहे. मागच्या वर्षी ज्याच्या जीवनावर भव्य हिंदी चित्रपट निर्मिला गेला होता. त्या सरबजीत सिंगची कहाणी मात्र रबिंदर सिंगच्या नेमकी उलटी होती.
ऐन तारुण्यात तो पकडला गेला. 26 वर्षे वय हे खरं तर जीवनाच्या आनंदात झुलण्याचं! आपल्या स्टेटमेंटसनुसार याच वयात सरबजीत सिंगकडून नशेच्या अवस्थेत आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली. नशेत असलेल्या सरबजीत सिंगने भारत-पाकिस्तानची सीमा रेषा पार केली. 28 ऑगस्ट 1990 रोजी पंजाबच्या तरनतारनमधील भिखीविंड गावाचा रहिवासी असलेल्या सरबजीतला पंजाब पाक सीमेवर अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचं पुढचं सगळं आयुष्य पाकिस्तानी कारागृहाच्या चार भिंतीत कैद झालं. सरबजीत हा 'रॉ' चा एजंट असल्याचा ठपका पाकिस्तानने ठेवला. आणि पुढे जाऊन चक्क कमाल करत 18 मे 1990ला लाहोरच्या एका चित्रपटगृहात झालेल्या बॉम्बस्फोटाचा आरोप त्याच्यावर लावला गेला. इतकेच नव्हे तर मुलतान, फैसलाबाद येथील बॉम्बहल्लेही त्यानेच केल्याचे म्हटले गेले. सरबजीत सिंग हाच मनजीत सिंग असल्यांच सांगण्यात आलं. तो तथाकथित मनजीत सिंग, ज्याने लाहोर बॉम्बस्फोटाचं षडयंत्र रचलं होतं! पाकिस्तानी तपास यंत्रणांनी खोटे साक्षीदार आणि बनावट दस्तऐवज तयार केले. सत्य लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. लाहोरच्या सत्र न्यायलयात सरबजीत विरुद्ध पुरावा म्हणून दिल्या गेलेल्या पासपोर्टवर ख़ुशी मोहम्मद असं नाव होतं. पण फोटो सरबजीतचा होता! 2005मध्ये पाकने एक व्हिडीओ जारी करत त्यात सरबजीत आपला गुन्हा कबूल करत असल्याचे दाखवले होते. (कुलभूषण जाधव प्रकरणातही हे साम्य आहे) ज्या साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे पाकिस्तानी तपास यंत्रणांनी सरबजीत हा मनजीत असल्याचं सिद्ध केलं होतं. त्या साक्षीदारांमध्ये मोहमद अली सलीम शौकत हा एक होता. ज्या लाहोर बॉम्बस्फोटाचा सरबजीत सिंगवर आरोप होता, त्या बॉम्बस्फोटात शौकतच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. भारतीय मीडियाने शौकतला शोधून काढून एक शॉकींग तथ्य जगापुढे आणलं, साक्ष देताना तो अल्पवयीन होता. शिवाय त्याच्यावर दबाव आणला होता, असेही त्याने सांगितले. सरबजीत सिंगचे वकील राणा अब्दूल हमीद हे देखील सरबजीत निर्दोष असल्याचा दावा अखेरपर्यंत करत राहिले. पण ते तथ्य वा पुरावे सादर करू शकले नाहीत. की त्यांना तशी परवानगी दिली नाही हे कळायला मार्ग नाही. न्यायालयाने पूर्वग्रहदोषित वृत्ती ठेवली की, पाक सरकारने दबाव आणला हे देखील आता कधी समोर येणार नाही. पण या सर्व कोर्ट कज्ज्यांमुळे पाकमध्ये सरबजीतची प्रतिमा अत्यंत मलीन आणि घुसखोर हमलावर अशीच झाली.
यामुळे पुढच्या धोक्याची भीती खरी ठरली. पाकिस्तानातील सर्व कागदपत्रांवर सरबजीतचा उल्लेख मनजीत सिंग असा केला गेला. त्याच्यावर खटला चालविण्यात आला आणि 1992 मध्ये लाहोर कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. सरबजीत सिंगने सर्व आरोप फेटाळले, इतकेच नव्हे तर आपले नावही मनजीत सिंग असल्याचे त्याने नाकारले. यावर निकाल देताना 'नावामुळे काय फरक पडतो, सरबजीत सिंगने आपला गु्न्हा कबुल केला आहे' असं सांगत लाहोर न्यायालयाने सरबजीत सिंगला फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयामागेही एक कॉनस्पिरसी होती. त्यात सरबजीत सिंगचे वकील सामील होते की नाही हे आजवर समोर आलेले नाही. 29 ऑगस्ट 1990मध्ये सरबजीतने एक तथाकथित जबाब दिला होता. त्यानुसार त्याने आपण पाकिस्तानात बॉम्ब तयार करण्यासाठी आलो नव्हतो तर दारूची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये आलो होतो असं जबाबात म्हटलं होतं.
नंतर पाकिस्तानने तमाम सोंगे-ढोंगे केली, न्यायदानाचे नाटकही केले. सध्या कुलभूषण यादव प्रकरणी जो खेळ चालू आहे, तोच खेळ सरबजीत सोबतही खेळला गेला होता. आपल्या शिक्षेविरुद्ध सरबजीत सिंगने पाकिस्तानच्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. पण निर्णय त्याच्या विरोधात गेले आणि कोट लखपत तुरुंगाची कोठडी कायमची त्याच्या वाट्यास आली. या नंतर त्याने दयेच्या अर्जासह पुनर्विचार याचिका दाखल केल्या. पण त्याची प्रत्येक याचिका फेटाळण्यात आली. या सर्व घडामोडीत अनेक वर्षे निघून गेली. त्यामुळे तुरुंग हेच त्यांच आयुष्य बनलं. या दरम्यान त्यानं भारत सरकारला अनेक पत्रं लिहिल्याचं सांगितलं जातं. पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगातून सरबजीतने आपल्या कुटुंबाला काही पत्र लिहिली होती. त्या पत्रात त्याने तुरुंगात आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली होती. एका पत्रात तो लिहितो की “सुटकेच्या आशेवर दिवस घालवणं किती कठीण असतं, हे माझ्यापेक्षा दुसरं कोण बंर सांगू शकेल ? पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी मी मनजीत असल्याचं सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सगळ्या जगाला माहित आहे. तुरुंगातील कर्मचारीही त्यात सहभागी आहेत. मी बॉम्बस्फोट केले असल्याचं काही कैदी देखील सांगत असतात. तुम्ही लवकर काही तरी हालचाली करा. सरकारकडे मदतीची याचना करा. माझी सुटका करा. इथे माझा दम घुटतोय. मला घरी यायचेय. मुलींना भेटायचेय. आपल्या मायदेशाच्या मातीचा गंध माझ्या मस्तकात कल्लोळ करतोय. मला येथून सोडवा. नाहीतर काहीतरी अनर्थ घडेल !” किती सार्थ आणि भावपूर्ण लिहिलं होतं त्याने ! तुरुंगात असताना एक डायरी लिहिल्याचा उल्लेख त्याने या दरम्यान केला होता. त्याचा आक्रोश तुरुंगाच्या चार भिंतीपलिकडे पोहचत नव्हता. कुटुंबा व्यतिरिक्त त्यांच्या वेदनेची दखल घेण्याची तसदी कुणी घेतली नाही. यावेळी भारत सरकारची अंतस्थ भूमिका काय होती, हे कळायला आणि सरबजीतचे नेमके सत्य बाहेर यायला कदाचित अनेक दशके लागतील किंवा सत्य बाहेरही येणार नाही वा आता जे सांगितलं जातंय तेच सत्य असू शकतं. पण सरबजीतचा भूतकाळ एक कोडं बनून राहिला होता हे कोणी नाकारू शकत नाही.
सरबजीत सिंगच्या प्रकरणात पाकिस्तानने सुरुवातीपासूनच सूडाची एकारली भूमिका स्वीकारली होती. अशा प्रकरणात जी आंतरराष्ट्रीय नीती आहे त्या नुसार मानवतावादी तत्वान्वये सरबजीतसिंगला भारतात पाठवण्याची विनंती केली होती. पण सरबजीत हा भारतीय गुप्तहेर आहे हे मान्य करण्यास ठाम नकार दिला होता. सरबजीतची बहीण दलबीर कौर यांनी सर्वप्रथम या प्रकरणाला अखेर देश पातळीवर आणले. सरबजीतच्या दोन मुलींना घेऊन त्यांनी थेट दिल्लीला कूच केले. या करिता जे जे अधिकारी, व्यक्ती आपल्याला मदत करू शकतील त्या व्हीआयपीसह सर्व हस्तींची त्यांनी भेट घेतली. सरबजीतला न्याय मिळावा यासाठी त्यांनी राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांना साकडं घातलं. या दरम्यान युपीएच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधीनांही त्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली. भारताने तसा दबावही आणायला सुरुवात केली पण पाक बधला नाही. इथेही हाय व्होल्टेज ड्रामा झाला. सरबजीतची सुटका करण्यात येणार असल्याचं वृत्त जाणीवपूर्वक पाककडून पसरवलं गेलं. पाकिस्तानचे राष्ट्रपती जरदारी यांनी सरबजीत सिंगची शिक्षा माफ केली, असं जाहीर केलं गेलं. या बातमीने देशभरात आनंद व्यक्त केला गेला. पण हा आनंद अल्पजीवी ठरला. धोकेबाज पाकने यू टर्न घेत सरबजीत ऐवजी सुरजीतची मुक्तता करण्यात आल्याचं सांगितलं. वास्तवात पाकिस्तान सरकारकडून नावात कोणतीच चूक झाली नव्हती, तर हे सगळं सरबजीत सिंग विरोधातचा पाताळयंत्री कावा होता. सरबजीतची मुक्तता केल्यास पाकिस्तानी जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल अशी पाक सरकारला भिती वाटत होती. त्यामुळे सरकारने आपला निर्णय फिरवला होता हेच सत्य होते की, यामागेही कोणती खेळी होती हे आता इतिहासाच्या पोटात दडून राहिलेय. असं असूनही त्याची मुक्तता होईल अशी त्याच्या कुटुंबियांना आशा होती.
सरबजीतचे असे हाल सुरु असतानाच या दरम्यानच्या काळात पाक दहशतवाद्यांनी मुंबईवर अनेक ठिकाणी एकाच वेळी हल्ले केले. यात जिवंत पकडला गेलेल्या अजमल आमीर कसाब आणि संसदेवरील हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी घोषित केलेल्या अफजल गुरुच्या फाशीनंतर सरबजीत सिंगच्या जीवाला धोका वाढला होता. तुरुंगात त्याचे वाढते हाल होऊ लागले. कोट लखपतचे तुरुंग कर्मचारी आणि कैदी त्याला सतत धमकावत होते. फाशीची शिक्षा झालेल्या आमीर आफताब नावाच्या पाकिस्तानी कैद्याने तर त्याला जीवे मारण्याची धमकीच दिली होती. या काळात लिहिलेल्या एका पत्रात सरबजीत म्हणतो की, “मागील 3-4 महिन्यांपासून मला जेवणातून काही तरी दिलं जात आहे. त्यामुळे माझे शरीर गलितगात्र झालेय. माझ्या डाव्या हातामध्ये वेदना होत आहेत. तसेच माझा डावा पाय कमजोर झाला असून चालतांना त्रास होतो. वेदनेमुळे मी रात्रभर रडत असतो. जेव्हा मी वेदनेनं तळमळत असतो तेव्हा मला औषध देण्याऐवजी तुरुंगातील कर्मचारी माझी चेष्टा करतात. तुझ्या शरीराचं एक हाड देखील भारतात जाणार नाही अशी धमकी मला दिली जातेय.” सरबजीत सिंगने व्यक्त केलेली ही भीती अखेर खरी ठरली. तुरुंगात कैद असलेला सरबजीत सिंग भेकड पाकच्या षडयंत्राचा बळी ठरला.
26 एप्रिलच्या सकाळी सरबजीत सिंग आपल्या कोठडीतून बाहेर आला. कोठडी बाहेर काही कैदी त्याची प्रतीक्षा करतच होते. सरबजीत सिंग बाहेर येऊन चहा पित होता, तेव्हढ्यात सहा कैद्यांनी त्याला गराडा घातला. त्यातील दोघांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि अचानकपणे सर्वांनी त्याच्यावर हल्ला केला. सरबजीत सिंगच्या डोक्यावर वीटांचे, लोखंडी सळयांचे घाव घातले गेले. हल्लेखोर इतक्यावरच न थांबता त्यांनी सरबजीतची मान आणि पोटावर ब्लेडने वार केले. थकलेल्या, श्रमलेल्या सरबजीतच्या जखमातून मोठा रक्तस्त्राव झाला. कैद्यांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर सरबजीतला उपचारासाठी जिन्ना रुग्णालायता भरती करण्यात आलं. सरबजीतला रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना त्याला भेटण्याची परवानगी दिली. त्याची पत्नी, दोन मुली आणि बहीण दलबीर कौर भेटायला आले होते. (नातलग भेटीची अशीच चाल पाकने काही दिवसापूर्वी कुलभूषण जाधव प्रकरणीही खेळली होती हे विशेष आहे) हल्ल्यानंतरचे सहा दिवस त्याने निकराची झुंज दिली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर सरबजीतची प्रकृती वेगाने ढासळत गेली. अखेर तो कोमात गेला. तरीदेखील त्याच्या कुटुंबियांना आणि देशवासीयांना एक वेडी आशा होती की सरबजीत या दुर्देवी संकटातून सहिसलामत वाचेल पण नियतीने पुन्हा एकदा सरबजीतवर घोर अन्याय केला. खरं तर या हल्ल्याआधीही कोट लखपत तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन कैद्यांनी सरबजीतवर हल्ला केला होता. आपल्याला धमकावलं जात असल्याचं सरबजीतने तेव्हा तुरुंगातील अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. तसेच या घटनेच्या 20 दिवस आधी त्याने धमकावणाऱ्या कैद्यांची नावं लिहून दिली होती. तरीदेखील पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केलं. त्या दोन कैद्यांची ओळख पटली असल्याचा तुरुंग प्रशासनाने दावा केला. पण ही देखील एक नौटंकी होती. प्रत्यक्षात हा एक पूर्वनियोजित प्लॅन होता. चौकशी ऐवजी उलट त्याच्यावर जीवघेणा हल्ला घडवून आणला गेला.
सरबजीतला भेटून त्याचे आप्त हताश मनाने मायदेशी परतले. सगळा देश त्याच्यासाठी प्रार्थना करत होता. पण 2 मे 2013 चा दिवस काळा दिवस ठरला. तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेवटी सरबजीत सिंगने मृत्यूला आपल्या कवेत घेतले, आणि तो अनंताच्या यात्रेस गेला. सरबजीतने अखेरचे श्वास घेतले, तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. सर्वत्र काळाकभिन्न अंधार दाटून आला होता, त्याचे प्राणपाखरू उडाले, तेव्हा सरहद्दीवरील पानाफुलांनी, पाखरांनी मौन पत्करले होते. त्याच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळले. सरबजीतचे प्राणपाखरू उडून गेले. त्याचे स्वप्न होते की, आपल्या मायदेशात परत जायचेच! पण त्याचे हे स्वप्न कधीच पुरे होऊ शकले नाही. भारतीय सीमांकडे जाण्याचा रस्ता पाकने त्याच्यासाठी खुला केला. पण त्याच्या जिवंतपणी नाही! तर त्याच्या कलेवरास नेऊ देण्यासाठी पाकने सीमेची दारे उघडली. हा एक निर्घृण खूनच होता. जो भारतीय गुप्तचरांच्या काळजावर कधीही न भरून येणारा वर करून गेला. सगळ्या देशात एक शोक लहर पसरली. तर इकडे पाकमध्ये सरबजीत सिंगला मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरांनी सगळ्यावर कडी करत, त्याचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं सांगितलं. सरबजीतला भेटून आल्यावर दलबीर कौर म्हणाल्या होत्या की, त्याच्या अंगठ्यावर शाईची निशाणी होती. पण पाकने यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. उलट सरबजीतचा मृतदेह भारतात आणल्यावर त्याची तपासणी करुन डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्या शरीरातले महत्त्वाचे अवयव गायब होते. पाकने अमानुषतेची क्रौर्यसीमा गाठताना नीचतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचे इथे स्पष्ट झाले.
सरबजीतच्या प्रकरणातून हेरांच्या आयुष्यावर सतत टांगती तलवार बनून पाठलाग करत असलेल्या अघोरी संकटाची टोकदार जाणीव होते. सरबजीतच्या बहिणीने आवाज उठवला नसता, तर देशाला सरबजीत समजला असता की नाही हे कळायला मार्ग नाही. त्याच्या कुटुंबाने सगळे उंबरठे झिजवून देशापुढे हे प्रकरण आणले. आणि मीडियासह राजकारण्यांना याची दखल घेण्यास भाग पाडले. खऱ्याआर्थाने यामुळेच अवघ्या देशाला सरबजीत सिंगची ओळख झाली. सरकारमधील लोकांनी सरबजीत सिंगच्या सुटकेसाठी आवाज उठवला खरा. मात्र त्यांच्या सुटकेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं स्वरूप अत्यंत तकलादू आणि तोकडं होतं. हे असं का झालं होतं, हे येणारा काळच सांगू शकेल. तेव्हा सरकारकडून सरबजीतच्या कुटुंबियांना केवळ आश्वासन दिलं जातं होतं. आणि तिकडं पाकिस्तानच्या तुरुंगात सरबजीत सिंगला हालअपेष्टा भोगाव्या लागत होत्या.
जर तो हेर असेल तर हेरगिरीच्या भाषेत तो पाकिस्तानात गेला तेव्हा तो नेकेड म्हणजे आधाराशिवाय गेला असावा. किंवा अटक झाल्यावर त्याला ‘रॉ’तर्फे थ्रो अवे म्हणजे वाया घालवण्यायोग्य किंवा डिसकार्ड अर्थात हेरांच्या शृंखलेतील इतरांना वाचवण्यासाठी गिव्ह अप करण्यायोग्य ठरवण्यात आले असेल. तो गुप्तचर होता की नाही, हा चर्चेचा विषय नाही, पण असलाच तर एखाद्या गुप्तचराचे वास्तविक आयुष्य कसे असते, याचा तो रसरशीत नमुना होता. काही दिवसांपूर्वी सलमान खानचा ‘एक था टायगर’ आणि त्या नंतर 'टायगर जिंदा है' हा चित्रपट पडद्यावर येऊन गेला. 'एक था टायगर'च्या मुख्य पात्राची कहाणी ‘रॉ’च्या एका गुप्तहेराच्या आयुष्यावर बेतली होती. ‘ब्लॅक टायगर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रवींद्र कौशिक या गुप्तचराने अनेकदा आगाऊ सूचना दिल्यामुळे पाकिस्तानचे राजस्थान सीमेवर हल्ले करण्याचे मनसुबे निष्फळ झाले होते. 1983 साली अटक झाल्यावर 2001 साली मुलतानच्या तुरुंगात त्याचा मृत्यू झाला.
सगळेच हेर असे ‘ब्लॅक टायगर’सारखे नसतात किंवा सरबजीत सिंगसारखा विवादही दरवेळी होतो असेही नसते. काही गुप्तहेर प्रलोभनाला बळी पडून किंवा इतर अनेक कारणांनी डबल एजंट बनतात किंवा डिफेक्ट होतात. लौकिक भाषेत सांगायचे झाले, तर डबल एजंट म्हणजे दोन्ही बाजूनं उडणारं कबूतर! एकाच वेळी दोन राष्ट्रांसाठी काम करणारा हेर. हे काम करता करता कधीतरी त्याचे पितळ उघडे पडते. आणि एकच पर्याय उरतो तो म्हणजे दोहोपैकी जे राष्ट्र वैयक्तिक स्वार्थासाठी सोयीचे असेल, त्या राष्ट्रात पलायन करणे. अर्थातच दुसऱ्या राष्ट्राची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होते. ब्रिटनमध्ये विषप्रयोग केला गेलेला सेरजी स्क्रीपल मुळचा रशियन. पण ब्रिटीश डबल एजंट होता. सेरजीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र कौशिकसह सर्व कावो बॉईजच्या थरारकथा अत्यंत भव्य आणि उदात्त जाणवतात.
(रवींद्र कौशिक आणि कावोबॉईजवरील लेखन पुढील भागात )
समीर गायकवाड यांचे इतर ब्लॉग
हेरगिरी - 'हेरा'फेरी !
स्तनत्यागिनी!
शिवशाही...
दोन हजाराची मौत आणि बारा हजाराची अब्रू !!
पाच रुपयाची नोट...
'जाग्रणा'तली गोडी...
आमच्या काळी असं नव्हतं (?)......
अस्सल लोकनायक - बापू बिरु वाटेगावकर
पवित्र ...
नवरात्रीची साडी…
गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध)
गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध)
उतराई ऋणाची…
स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव…
गीता दत्त – शापित स्वरागिनी
सरबजीत- भारतीय हेरगिरीची भळभळती जखम...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Mar 2018 02:45 PM (IST)
सरबजीतच्या प्रकरणातून हेरांच्या आयुष्यावर सतत टांगती तलवार बनून पाठलाग करत असलेल्या अघोरी संकटाची टोकदार जाणीव होते. सरबजीतच्या बहिणीने आवाज उठवला नसता, तर देशाला सरबजीत समजला असता की नाही हे कळायला मार्ग नाही. त्याच्या कुटुंबाने सगळे उंबरठे झिजवून देशापुढे हे प्रकरण आणले. आणि मीडियासह राजकारण्यांना याची दखल घेण्यास भाग पाडले. खऱ्याआर्थाने यामुळेच अवघ्या देशाला सरबजीत सिंगची ओळख झाली.
सोबतच्या छायाचित्रात कुंपणतारेलगत असणारे भूतपूर्व भारतीय गुप्तहेर - बलबीर सिंग, जगदीश लाल आणि कश्मीर सिंग, मध्य भागी सरबजीत सिंग. डाव्या बाजूस वरच्या चौकटीत असलेले बलविंदर सिंग आणि महिंदर सिंग. वरच्या मधल्या चौकटीत सरबजीत आणि त्याच्या भगिनी दलबीर कौर. खालच्या मधल्या चौकटीत सरबजीत आणि सुरजीत सिंग. खालच्या उजव्या चौकटीत सरबजीतवरील सिनेमाचे पोस्टर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -