जगातल्या कोरोनाबाधित देशांच्या यादीतलं आपलं स्थान काय सांगतंय याचा सांख्यिकी गोषवारा असा मांडता येईल. कोरोना संक्रमणाविषयक भाष्यात आकडेवारीला बरेच महत्व आहे. यात टेस्ट्सची संख्या, पॉझिटिव्ह रुग्णसंख्या, बरे झालेले रुग्ण आणि मृत्यूमुखी पडलेले रुग्ण यांच्यावर आधारित सूत्रानुसार आगामी काळात कोरोना साथीची स्थिती कशी असेल याचा अंदाज बांधता येतो.
आजघडीला जगातील कोरोना बाधितांच्या यादीत आपण बाविसाव्या स्थानी आहोत.
हा ब्लॉग लिहीत असताना जगातली एकूण कोरोना रुग्णसंख्या 1779099 इतकी आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 108770 आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 402709 अशी आहे.
यादीत 22व्या स्थानी असलेल्या भारताची कोरोना रुग्णसंख्या 8446 इतकी आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 288 आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 969 अशी आहे.
जगातल्या बाधितांपैकी 6.11 % रुग्ण मृत्यूमुखी पडलेत.
तर भारतातील बाधितांपैकी 2.93 % रुग्ण मृत्यूमुखी पडलेत.

या यादीत भारत 22व्या स्थानी, आयर्लंड 21व्या तर इक्वेडॉर 23व्या स्थानी आहे.
ब्लॉग लिहीपर्यंत भारतातील टेस्ट्सची संख्या 189111 आहे.
प्रति दशलक्ष लोकांमागे भारताने 137 टेस्ट्स केल्या आहेत.
टेस्ट्सच्या प्रमाणात 4.46 सरासरीने 8446 लोक बाधित आढळले आहेत.
प्रति दशलक्ष लोकांमागे कोरोना बाधितांचे प्रमाण 6 आहे.
एकूण बाधितांपैकी २८८ मरण पावलेत.
प्रति दशलक्ष लोकांमागे कोरोना मृत्यूमुखींची प्रमाण 0.2 आहे.
बाधितांपैकी बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या (969) पाहता एकूण बाधितांपैकी 11.42 टक्के लोक बरे झालेत.

आयर्लंडची आकडेवारी थोडी वेगळी आहे. त्यांचा ग्राफदेखील काहीसा वेगळा आहे. मात्र सक्रिय रुग्णांचा ग्राफ बऱ्यापैकी समांतर आहे.
आयर्लंडमधील कोरोना टेस्ट्सची संख्या 53000 आहे.
प्रति दशलक्ष लोकांमागे 10734 टेस्ट्स केल्या आहेत.
टेस्ट्सच्या प्रमाणात 16.84 टक्के सरासरीने 8928 लोक बाधित आढळलेत.
प्रति दशलक्ष लोकांमागे कोरोना बाधितांचे प्रमाण 1808 आहे.
एकूण बाधितांपैकी 320 लोक मृत्यूमुखी पडलेत.
प्रति दशलक्ष लोकांमागे कोरोना मृत्यूमुखींचे प्रमाण 65 आहे.
बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या फक्त 25 आहे. म्हणजेच तेथील बाधितांपैकी 0.28 टक्के लोक बरे झालेत

23व्या स्थानी असलेल्या इक्वेडॉर या देशाची आकडेवारी याच क्रोनॉलॉजीतली आहे मात्र तिचे सूत्र वेगळे आहे.
इक्वेडोरमधील कोरोना टेस्ट्सची संख्या 21568 आहे.
प्रति दशलक्ष लोकांमागे 1222 टेस्ट्स केल्या आहेत.
टेस्ट्सच्या प्रमाणात 33.64 टक्के सरासरीने 7257 लोक बाधित आढळलेत.
तर प्रति दशलक्ष लोकांमागे कोरोना बाधितांचे प्रमाण 1808 आहे.
एकूण बाधितांपैकी 315 लोक मृत्यूमुखी पडलेत.
प्रति दशलक्ष लोकांमागे कोरोना मृत्यूमुखींचे प्रमाण 18 आहे.
बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या फक्त 411 आहे. म्हणजेच तेथील बाधितांपैकी 5.66 टक्के लोक बरे झालेत.

दक्षिण कोरिया आपल्यापेक्षा तीन अंक वरच्या स्थानी आहे. कोरोनाचा नेटका मुकाबला केलेल्या देशांच्या यादीत दक्षिण कोरियाचे नाव अग्रस्थानी आहे. त्यामुळे इथे दक्षिण कोरियाची आकडेवारी पाहिल्यास तुलना अधिक काटेकोर होईल.
दक्षिण कोरियामधील कोरोना टेस्ट्सची संख्या 514621 इतकी मोठी आहे.
प्रति दशलक्ष लोकांमागे 10038 टेस्ट्स केल्या आहेत.
टेस्ट्सच्या प्रमाणात केवळ 2.04 टक्के सरासरीने 10512 लोक बाधित आढळलेत.
तर प्रति दशलक्ष लोकांमागे कोरोना बाधितांचे प्रमाण 4 आहे.
एकूण बाधितांपैकी फक्त 214 लोक मृत्यूमुखी पडलेत.
बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या फक्त तब्बल 7368 आहे. म्हणजेच तेथील बाधितांपैकी 70.09 टक्के लोक बरे झालेत.

या सर्व आकडेवारीचे अनुमान असे काढता येईल -
दक्षिण कोरियाने वेळेत टेस्ट्सना प्रारंभ करून त्यांची संख्या इतरांच्या तुलनेने खूप मोठी ठेवली. परिणामी रुग्णांत गंभीर लक्षणे दिसण्याआधीच त्याच्यावर उपचार सुरु करणे शक्य झाले. याचा दुसरा फायदा असा झाला की जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या होत गेल्याने प्रसारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आले. मृत्यूमुखी पाडण्याचे प्रमाण कमी राहिले आणि बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक राहिले.

इक्वेडॉर हा दक्षिण अमेरिकन देश असून 1 कोटी 71 लाख इतकी लोकसंख्या आहे. दरडोई उत्पन्न 6183 डॉलर आहे. तिथला मानवी विकास निर्देशांक 0.78 आहे.
युरोपस्थित आयर्लंडची लोकसंख्या 49 लाख आहे. दरडोई उत्पन्न 79259 डॉलर्स इतके अफाट आहे. मानवी विकास निर्देशांक 0.94 आहे.
पूर्व आशियामधील बलाढ्य देश अशी ख्याती असलेल्या दक्षिण कोरियाची लोकसंख्या 5 कोटी 17 लाख आहे. दरडोई उत्पन्न 16174 डॉलर्स आहे. मानवी विकास निर्देशांक 0.91 आहे.
आपली लोकसंख्या 135 कोटी 26 लाख इतकी अजस्त्र आहे. दरडोई उत्पन्न 2044 डॉलर्स आहे. मानवी विकास निर्देशांक 0.64 आहे. 2016 सालचा आरोग्य मानकांक 41.1 आहे.
दक्षिण कोरिया त्यांच्या जीडीपीपैकी 7.4 टक्के आरोग्यावर खर्च करतो तर आयर्लंड 7.8 टक्के खर्च करतो. तुलनेने इक्वेडॉरची जीडीपीमधून आरोग्यासाठीच्या खर्चाची टक्केवारी तब्बल 9.2 अशी विपुल आहे. आपलं चित्र निराशाजनक आहे आपण केवळ 4.7 टक्के इतकाच खर्च आरोग्यावर करतो कारण आपल्या प्रायॉरिटीज वेगळ्या आहेत त्यावर इथे लिहायला नको!

वरील आकडेवारीतून साधारण निष्कर्ष काढता येईल का ?
भारतातल्या टेस्ट्सचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. तर आरोग्यावरती आपल्यापेक्षा बराच खर्च करूनही वरील देशांत कोरोनाने हानी पोहोचवलीय. दक्षिण कोरिया पॅटर्न अवलंबला तर बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होईल आणि मृत्यूचे, बाधेचे प्रमाण लक्षणीय घटेल. टेस्ट्सच्या प्रमाणात बाधित असण्याचे प्रमाण कोरियाचे आपल्याहून निम्मे आहे तर आयर्लंडचे प्रमाण आपल्याहून चारपट अधिक आहे. इक्वेडॉरचे प्रमाण आयर्लंडपेक्षा दुप्पट आहे. याचा नेमका फायदा घेत प्रचंड वेगाने आपण टेस्ट्स वाढवल्या तर बाधित रुग्णांना रडारवर आणता येतील. जेणेकरून आपला ग्राफ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर उतरता येऊ शकेल. ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या थ्री - टी चा फायदा आताच घेणं अनिवार्य आहे. यात एका जरी आठवड्याचा विलंब झाला तर आपली इटली होऊ शकते किंवा आपला स्पेन होऊ शकतो. सरकार यावर विचार करत असेलच.

सरकारने घेतलेल्या निर्णयास आणि मेडिकोजच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत आपण लॉकडाउनला सर्वतोपरी सहकार्य करणं हाच सद्यस्थितीतला राष्ट्रधर्म आहे. घाबरून जाण्याजोगी स्थिती निश्चितच नाही मात्र सतर्कता तर बाळगलीच पाहिजे.

समीर गायकवाड यांचे ब्लॉग :

 BLOG | कोरोनाचे संक्रमण - इतिहासाची अनोखी पुनरावृत्ती


BLOG | गोष्ट एका डॉक्टरांच्या फोटोची...