नुकतेच हिरानींच्या कृपेने 'संजू'चे किटाळ धुवून झालेय. आता या शृंखलेतील पुढील मान्यवर आहे सनी लिऑन. 'अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिऑन' नावाची तिच्या जीवनावर आधारित वेबसिरीज येऊ घातलीय. तिचे ट्रेलर रिलीज झालेय. यातल्या तुकड्यानुसार व याही आधी तिच्यावर लिहिल्या गेलेल्या कंटेंटनुसार कुमारवयातच तिची व्हर्जिनिटी कशी नष्ट झाली, अचानक ओढवलेल्या आर्थिक ओढाताणीचा तिच्यावर झालेला परिणाम आणि 'इझी मनी'चा तत्काळ उपलब्ध असलेला पर्याय म्हणून तिने स्वीकारलेलं पॉर्न स्टारडम, त्यात पैसे, नाव-कीर्ती (?) कमावल्यानंतर तिला मायदेशी परतावेसे वाटणे, बॉलीवूडमध्ये काही तरी करून दाखवण्याच्या जिद्दीने भारतात येणे, काही सिनेमे आणि जाहिरातीत काम करून झाल्यावर झटपट प्रसिद्धी मिळवून देणारी समाजसेवेची व्रते स्वीकारणे असा तिचा प्रवास आहे. हे सर्व करत असताना प्रेम आणि तिरस्कार (हेट्रेड) या दोन्ही भावनांनी तिचे जीवन व्यापून गेले वगैरे वगैरे...
तिच्या आयुष्याबद्दल आणि जीवनशैलीबद्दल कुणाला आक्षेप असायचे कारण नाही. काहींना तिचे आयुष्य संघर्षमय वाटते, काही अंशी त्यात तथ्य वाटते. रेड लाईट एरियात सनीपेक्षा डार्क लाईफ वाट्यास आलेल्या अनेक मुली पहिल्यात, त्यांच्यापुढे सनीचा संघर्ष तकलादू आणि वरवरचा वाटतो. तरीही त्यामागची तिची भूमिका पटते. तिने पॉर्नस्टार होण्यालाही आक्षेप नाही कारण पुरुष जर या इंडस्ट्रीत काम करत असतील तर कुण्या स्त्रीने तिथे काम करण्यास हरकत घेणे हा दुटप्पीपणा होईल. त्यात तिला बक्कळ पैसा मिळाला त्याच्या जोडीने बदनामीही मिळाली. पण ती तिने आपण होऊन स्वीकारलेली असली तरी त्यामागे तशी हतबलता होती असं फिल्म सूचित करते. हे खरे असेलही. तिने भारतात आल्यावर काही तद्दन फालतू आणि टुकार सिनेमे केले, यालाही हरकत असायचे कारण नाही. कारण फिल्मइंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी लोक कुठल्याही स्तराला जातात आणि त्यात कुणाला वावगे वाटत नाही. सनीची लोकांच्या मनातील ईमेज पाहू जाता तिला तशाच भूमिका मिळाल्या इथपर्यंत मी समजू शकतो. पण तिने केलेल्या जाहिराती तिला टाळता आल्या असत्या, त्या जाहिराती माईल्ड पॉर्न कंटेंटमध्ये मोडणारया होत्या. तिला बदलायचे होते तर तिने या जाहिराती का केल्या ? तिला पॉर्नचा शिक्का पुसायचा होता तर तिने तशाच भूमिका असलेल्या एकदोन सिनेमानंतर पुढील भूमिकांना नकार का दिला नाही ? ती येथे पैसे कमवण्यासाठी आली नव्हती असं तिनेच मागे सांगितले आहे, मग सगळ्या भूमिका आणि सगळे आयटेम सॉंग असेच का स्वीकारले ? या प्रश्नांच्या उत्तरावर चंदेरी वर्ख लावून मखलाशी केली असणार आहे.
रेड लाईट एरियातील स्त्रियांचे जेंव्हा पुनर्वसन केले जाते तेंव्हा काही काळ त्या सुखांत राहतात, पण लोक त्यांचा भूतकाळ हुंगत त्यांच्या चमडीबाजार पर्यंत येऊन ठेपतात तेंव्हा त्यांच्याकडून तीच अपेक्षा करू लागतात. एखाद्या घरात, बंगल्यात वा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पूर्वी वेश्या राहत असेल आणि ते निवासस्थान ती सोडून गेल्यानंतर त्या जागेत राहायला येणाऱ्या स्त्रीकडे परिसरातील लोक त्याच नजरेने पाहत असतात हे वास्तव आहे. त्यामुळे पुनर्वसन झालेल्या महिला या गाळात पुन्हा पुन्हा लोटल्या जातात हे सत्य आहे. अन्नाला महाग असणारया आणि डोक्यावर छत नसणारया या बायकांपुढे दुसरा पर्याय नसतो त्यामुळे अक्षरशः जीवावर येऊनही त्या तिथे आपलं आयुष्य कंठत असतात. इथे त्यांची मजबुरी असते की त्यांना तिच लाईफ जगावी लागते. सनीच्या बाबतीत अशी कोणतीच मजबुरी नव्हती की तिला माईल्ड पॉर्न टाईपच्या जाहिराती आणि सिनेमे करावे लागले. पण तिच्या वेब सिरीजमध्ये या बिंदूवर पांघरूण घातलेले असणार हे नक्की. शिवाय इंडस्ट्रीत येऊन जेमतेम पाचेक वर्षे झालेल्या सनीने 'भाईजान' टाईपची 'बिइंग ह्युमन' छाप समाजसेवा अंगीकारत मुले दत्तक घेतली असल्याने इंडस्ट्रीतली नवसाध्वी होण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला आहे. आता राहिलेली कसर या वेबसिरीजमधून पुरी होईल. बॉलीवूडची हीच खासियत आहे. असो. बॉलिवूडच्या बायोपिक्समध्ये काही गिमिक्स असतातच, क्वचित ते अगदी ब्लँकली समोर येतात.
जगात विविध व्यक्तींवर, नेत्यांवर, नायकांवर आणि खलनायकांवर सिनेमे बनवले गेलेत. अगदी हिटलरवरही सिनेमे येऊन गेलेत. अनेक क्रूरकर्मे, विकृत लिंगपिसाट हे ही चित्रपट नायक ठरलेत, इतकेच नव्हे तर इदी अमीन सारख्या नरभक्षक शासकावरही सिनेमे येऊन गेलेत. पण एक महत्वाचा मुद्दा आपण विसरतो तो म्हणजे या खलनायकांना किंवा समाजाचे ननायक ठरलेल्या लोकांना रुपेरी पडद्यावर दाखवताना त्यांची आरती ओवाळली गेली नाही की त्यांना हिरो ठरवण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. आपल्याकडे या आघाडीवर आनंदी आनंद आहे. 'हसीना', 'डॅडी', 'वन्स अपॉन टाईम', 'डी - डे', 'अब तक छप्पन्न', 'कंपनी', 'दयावान', 'शूट आऊट ऍट वडाला', 'रईस' अशा सिनेमातून त्या त्या लोकांचे उदात्तीकरण केले गेलेय. त्यांना सहानुभूती मिळवून देण्याचा तो नियोजनबद्ध प्रयत्न होता. जगाने खलनायक बनवलेल्या लोकावर सिनेमे बनवण्यात गैर काहीच नाही पण त्यांच्यावरील तथाकथित अन्याय समोर आणताना त्यांचा काळा चेहरा उजळ करण्याचा प्रयत्न करण्यास आक्षेप असण्यात गैर नाही. ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनावर आधारित बायोपिक्समध्ये नाट्यस्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही घुसडलेले असते त्यामुळे त्यावर लिहिण्यात काही अर्थ नाही. असो..
आपल्याकडे बायोपिक बनवले जाताना याची उदात्तीकरणाची नेटकी काळजी घेतली जाते. व्यक्ती हयात असताना निर्माण केलेले बायोपिक सादर करताना ही प्रवृत्ती अधिक दिसते. 'दंगल'चा नायक महावीर फोगट आणि त्याच्या मुली गीता, बबिता या श्रेष्ठच होत्या पण त्यांचे श्रेष्ठत्व अधिक ठसवण्यासाठी तिच्या प्रशिक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची करतूद केली गेलीय. 'मेरी कोम', 'एम.एस.धोनी', 'अझर' या चित्रपटात आणखी तटस्थता असती तर ते आणखी वास्तविक झाले असते. सिल्क स्मिताच्या जीवनावरचा 'डर्टी पिक्चर' तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी ठरतो पण सिनेइंडस्ट्रीच्या काळ्या बाजूवर पूर्ण ताकदीने प्रहार करत नाही. त्या उलट तिच्या कमजोर बिंदुना तो हायलाईट करतो. 'पानसिंग तोमर'मध्ये एका उमद्या एथलिटचा डाकू कसा होतो हे दाखवताना व्यवस्थेवर आणि राजकीय ताकतींवर कठोर प्रहार हवे होते, ते झाले नाहीत पण पानसिंगच्या जीवनातील खाजगी बाबींवरही लक्ष दिल्याचे दिसते. 'सिंधूताई सपकाळ', 'तात्याराव लहाने', 'बापू बिरू वाटेगावकर' हे अलीकडे मराठीत तयार झालेले बायोपिक होत. हे देखील अशा मोहातून सुटू शकले नाहीत.
शेखर कपूर दिग्दर्शित सीमा विश्वास अभिनित 'बँडीट क्वीन'मधून डाकू राणी फुलन देवीचा समग्र जीवनक्रम समोर येतो. तिच्यावर झालेला अन्याय अस्वस्थ करून जातो. एक असहाय्य कोवळी मुलगी ते एक निष्ठुर डाकू हे तिचे ट्रान्सफॉर्मेशन कसे झाले हे कळते, तिच्यावर झालेले जुलूम ग्लोरिफाय न करता थंडपणाने दाखवलेत. पण संपूर्ण सिनेमात तिची दहशत कुठेच दिसत नाही, व्यवस्थेच्या भीतीने वा सेन्सॉरच्या दडपणापायी सिनेमाचा प्राण हिरावला जातो पण वास्तवात ते आयुष्य जगलेल्या त्या व्यक्तीवर तो नकळत झालेला अन्याय असतो. 'भाग मिल्खा भाग'त मिल्खासिंगांचा संघर्ष काळजाला भिडतो पण क्रीडा अनास्थेवर चित्रपट काहीच भाष्य करत नाही, उलटपक्षी हे काम मिल्खासिंगांनी गेल्या दोन दशकात उस्फुर्तपणे पार पाडलेय. 'सरबजीत'ला चितारताना दिग्दर्शक त्याच्या व्यक्तीगत जीवनात इतका गुंतून पडला की दोन देशातील हाडवैरावर अणकुचीदार टोचण्या देण्यासच सिनेमा विसरला, आणि एका विरहकथेचे स्वरूप त्याला आले. हा सरबजीतवरचा अन्यायच. 'संजू'त हिरानींनी या उलट केलेय, कमालीच्या डागाळलेल्या काळ्या शेडसना त्यांनी फिकट रंगवले आहे, त्यामुळे त्याच्या वाईट गोष्टींना लोक हलकं घेतात.
१९९३ मध्ये आलेला 'सरदार' हा वल्लभभाई पटेल यांच्यावरील सिनेमा आणि २००४ मधला 'नेताजी सुभाषचंद्र बोस - द फरगॉंटन हिरो' या दोन्ही सिनेमात मुख्य पात्रांचे नेमके कर्तृत्व उत्तुंगपणे दाखवण्यात दिग्दर्शक कमी पडलेत. यामूळे हे दोन्ही सिनेमे मनाची पकड घेत नाहीत. पटकथेतील कमालीचा संथपणा आणि बजेटच्या मर्यादा याचा एकत्रित दुष्परिणाम जाणवतो. ही तांत्रिक कारणे झाली पण यामुळे त्या बायोपिकवर अन्याय होतो हे निर्मात्यांनी लक्षात घ्यायला हवे. रिचर्ड एटनबरोंचा 'गांधी' वर्ल्डवाईड सुपरहिट का झाला याची कारणे शोधली की 'सरदार' आणि 'नेताजी..'च्या उणिवा समोर येतात. या उलट आमीरखान अभिनित 'मंगल पांडे'त इतिहासाशी इतकी छेडछाड झाली की स्वातंत्र्यलढ्यातले जाज्वल्य मंगल पांडेच दृष्टीस पडत नाहीत. २०१६ मध्ये आलेल्या नीरजा भानोत या हवाई सुंदरीच्या जीवनावरचा 'नीरजा' हा बायोपिक आणि मुंबईत गोळ्या घालून ठार केले गेलेले पेशाने वकील असलेले मानवाधिकार हक्कांचे कार्यकर्ते शाहीद आजमी यांच्या जीवनावरील 'शाहीद' हा बायोपिक रंजक पद्धतीने मांडले गेलेत. यात जसेच्या तसे मांडण्याचा प्रयत्न झालाय. या दोन बायोपिकमध्ये एक बाब कॉमन आहे, ती म्हणजे पात्रांना असलेली दुःखाची झालर. हीच बाब 'संजू'मध्येही आहे पण नीरजा आणि शाहीद यांचे दुःख आरसपानी वाटावे म्हणून कुणाला खलनायक ठरवलेलं नाही हे विशेष आहे.
'२००८'मध्ये आलेला 'रंग रसिया' हा राजा रवीवर्मा यांच्यावर बनवलेला बायोपिक एकदम भरकटलेला होता. रवीवर्मांच्या चित्रकलेवर हायलाईट करायचे की त्यांच्या जीवनातील नाट्यास गडद करायचे यात सिनेमा गोंधळून गेला. 'पिकासो'मध्ये जो ठळक परिणाम जाणवला त्याच्या पासंगास देखील 'रंग रसिया' पुरत नाही. यामुळे महान चित्रकार रवीवर्मा लोकांना उमगतच नाही, उलट अकारण सेक्सचे वाद ओढवून घेतल्याने सिनेमाचा क्लास बदलला गेला. ही बॉक्स ऑफिससाठीची चाल होती की काय अशी शंका यावी असा तो प्रकार होता. पण या सर्व गदारोळात एका चांगल्या कथावस्तूवर विरजण पडले आणि एक बायोपिक वाया गेला. केतन मेहता दिग्दर्शित बिहारमधील दशरथ मांझी यांच्या जीवनावरील २०१५ मध्ये आलेला 'मांझी द माउंटन मॅन' आणि समलैंगिकतेच्या मळभात झाकोळून गेलेल्या प्रोफेसर रामचंद्र सिरस यांच्या जीवनावरचा 'अलिगढ' हे दोन्ही सिनेमे निर्माण करताना काही पॉइंट ऑफ व्ह्यूज फिक्स असावेत कि काय असा संशय येतो. कारण चित्रपट खुलेपणाने समोर येतच नाहीत. त्यामुळे या दोन्ही जीवांची घुसमट काळजास भिडत नाही. चित्रपटाच्या व्यवसायिक गणिताच्या बाजू, सामाजिक समीकरणे आणि मर्यादा उल्लंघनाच्या धाडसाचा अभाव यात जाणवतो.
२००२ मध्ये आलेला अजय देवगण अभिनित ' द लिजण्ड ऑफ भगतसिंग' हा सरदार भगतसिंग यांचा सिनेमा न वाटता अजय देवगणचाच सिनेमा वाटतो, कारण त्या पात्रात शिरण्याऐवजी त्याचा अभिनय करण्याचा केविलवाणा प्रकार यात झाला होता. '२३ मार्च १९३१ - शहीद' हा सनी - बॉबी देओल बंधूंचा सिनेमा याच थीमवरचा बायोपिक होता, आणि यातही तोच प्रॉब्लेम होता. २००७ मध्ये आलेला 'गांधी - माय फादर' हा महात्मा गांधीजींचे पुत्र हरिलाल यांच्या जीवनावरील बायोपिक होता. अक्षय खन्ना लीड रोलमध्ये होता. पण दिग्दर्शक फेरोज अब्बास खान यांना तो विषयच पेलला नाही. पितापुत्रातील संघर्ष टोकदार होताना दिसतच नाही, बापूंच्या व्यक्तीरेखेचे दडपण स्पष्ट जाणवते. संवाद आणि नेमक्या प्रसंगातूनही चित्रपट हरिलालला न्याय देऊ शकला असता पण तसे होताना दिसत नाही. हरिलाल हरतो आणि सिनेमाही हरतो. २००० मध्ये आलेल्या 'बाबासाहेब आंबेडकर' या बाबासाहेबांच्या जीवनावरील बायोपिकने इन्फ्रास्ट्रक्चर आणि होमवर्क दोन्हीत सणकून मार खाल्ला असल्याने तांत्रिक अंगाने सिनेमा असह्य झाला होता. त्यामुळे प्रेक्षकांनी सपशेल पाठ फिरवली. एका महानायकाच्या आयुष्यावर चित्रपट बनवताना कोणत्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे याचा संकेत असतो, लोक तोही पायदळी तुडवतात. याच साली आलेल्या राज बब्बर अभिनित 'शहीद उधम सिंग'ची ही अशीच दुर्गती झाली होती.
२०१७ मध्ये आलेल्या मालवथ पूर्णा या सर्वात अल्पवयीन एव्हरेस्ट वीरांगनेवरील 'पूर्णा'ला राहुल बोसने दिग्दर्शित केले होते. 'पूर्णा'तले कौशल्य हेरणाऱ्या डॉ. आर.एस.प्रवीणकुमार यांची भूमिका त्याने साकारली आणि तिथेच मूळ कथानायिकेचे पात्र थोडेसे झाकोळले गेले, हीच गत २०१६ मध्ये आलेल्या 'बुधिया सिंग - बॉर्न टू रन'ची झाली होती. जगातील सर्वात अल्पवयीन मॅरेथान विजेता बुधिया सिंगवरचा हा बायोपिक होता पण त्याच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेतील मनोज वाजपेयीवर कॅमेरा खूप रेंगाळतो. २०१४ मध्ये ब्रिटनच्या सहकार्याने निर्मिलेला तमिळ सिनेमा 'रामानुजन' मात्र या समस्येवर मात करतो आणि आपला प्रभाव टाकतो. २०१३ मध्ये 'सेल्युलॉइड' हा मल्याळी बायोपिक रिलीज झाला होता, यात मल्याळी सिनेमाचे भीष्म पितामह म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या जे.सी डॅनियल यांच्या जीवनाचा रोमांचक प्रवास वेधक पद्धतीने मांडला होता. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे डॅनियल यांच्या जीवनात पी.के.रोझी या अभिनेत्रीचा ट्रँगल खूप नितळपणाने मांडला होता. लोकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला होता. २०१६ मध्ये आलेला मास्टर भगवान यांच्या जीवनावरचा मराठी चित्रपट 'एक अलबेला' मात्र हा परिणाम साधण्यात अपयशी ठरला. नाकापेक्षा मोती जड झाला असे यामागच्या कारणाचे वर्णन करता येईल. यात विद्या बालनने साकारलेल्या गीताबालीस दिग्दर्शक साईडट्रॅक करू शकला नाही. आणि भगवानदादा पुन्हा एकदा कमनशिबी ठरले. २००९ मधल्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'ने मात्र अभ्यास पक्का करून परीक्षा दिली आणि दादासाहेब फाळके यांची यशोगाथा जशीच्या तशी लोकांपर्यन्त पोहोचली. व्यक्तिगत दादासाहेबांच्या जीवनातील संघर्ष आणि सिनेमावेडे दादासाहेब फाळके यांचे ध्येयनिश्चल स्वप्न यातली सीमारेषा हा सिनेमा दाखवून देतो. दादासाहेब फाळकेंनी केलेलं कार्य दाखवण्यासाठी त्यांचे उदात्तीकरण करण्याच्या भानगडीत सिनेमा पडत नाही हे इथे नमूद करावंसं वाटतं. २०१० मध्ये आलेल्या 'मोनेर माणूष'मध्ये बांग्ला लोकगायक, अध्यात्मिक कवी लालन यांच्या जीवनावरील यांची कथा मांडताना त्यांना दैवत्व बहाल करण्याचा मोह पटकथाकार आणि दिग्दर्शकास न आवरल्याने एक चांगला प्रयत्न वाया गेला.
२०१७ मध्ये आलेला अरुण गवळीच्या जीवनावरील अर्जुन रामपाल अभिनित बायोपिक 'डॅडी' व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या जीवनावरचा श्रद्धा कपूर अभिनित बायोपिक 'हसीना' आणि संजयदत्तवरील 'संजू'मध्ये एक साम्य आहे, मूळ व्यक्तीरेखा ग्लोरिफाय करण्याच्या प्रयत्नांत त्यांच्या आयुष्यातील काळ्या बाजू जशाच्या तशा समोर येत नाहीत. तर अरुणाचल मुरुंगाथम यांच्या जीवनावरचा अक्षयकुमार अभिनित 'पॅडमॅन' मूळ कथानायकाऐवजी अभिनेत्याचा जास्त प्रभाव सोडून जातो. बेन किंग्जलेने इतक्या ताकदीने गांधी साकारले होते की बापूंच्या वेशात लपलेला बेन किंग्जले कुठेच दिसत नाही, असे 'पॅडमॅन'मध्ये होत नाही ! नुकताच आलेला हॉकीपटू संदीप सिंगच्या जीवनावरील 'सुरमा'देखील याच समस्येने ग्रासलेला आहे. निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथाकारास बायोपिकमधून काय दाखवायचे आहे हे आधीच पक्के केलेले असल्याने याचे सर्वाधिक खापर त्यांच्यावरच फोडले जाते. मूळ घटना कशा दाखवायच्या, आयुष्य डार्क शेडेड दाखवायचे की त्याला कुठले वर्ख चढवायचे हे पूर्वनिश्चित असते. त्यामुळे बायोपिकमधून दाखवल्या गेलेल्या गोष्टी अनाहूतपणे मांडलेल्या असतात आणि काही दुवे चुकून राहून गेलेले असू शकतात या युक्तिवादात तथ्य नाही.
हेच तत्व अंमलात आणत इदी अमीन किंवा हिटलर यांच्यावर आपल्या निर्मात्या दिग्दर्शकांनी सिनेमे बनवले तर आपले पब्लिक त्यांना सिम्पथी देण्यास मागेपुढे पाहणार नाही, हेच चाणाक्ष बॉलीवूडने चांगले ओळखले असल्याने या प्रवृत्तीला पायबंद बसणार नाही. एखाद्या दिग्दर्शकाने आहे तसे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपले लोक त्या सिनेमाला स्वीकारत नाहीत आणि 'संजू'सारखा गल्ला देत नाहीत ही देखील एक बाजू आहे. 'बँडीट क्वीन', 'पानसिंग तोमर', 'अलिगढ' हे तिकिटबारीवर साफ कोसळले होते, कथेच्या डिमांडनुसार लीड रोलमधील कामे अप्रतिम साकारली गेली होती तरीही लोकांना ते पसंत पडले नाहीत. हिरानी किंवा नाडीयादवालांच्याकडे हे सिनेमे आले असते तर त्याला त्यांनी तो नेमका 'मिडास वर्ख' दिला असता. संजूचे जसे उदात्तीकरण झाले तसेच त्यांचेही झाले असते. आता ग्लोरीफिकेशनची वेळ सनीची आहे, तिला कल्हई करून पेश केलं जाईल. बायोपिकच्या आडून केले जाणारे हे सिम्पथी कॅचिंग गिमिक्स आहे. इंडस्ट्रीला अशा गोष्टींची हौस आहे आणि लोकांना कसं 'बनवायचं' हे बॉलिवूडवाल्यांना ठाऊक असल्याने असे होतच राहणार. तरीही काही आशेची किरणे अधून मधून तळपत राहतात ही त्यातल्या त्यात सुखावह गोष्ट आहे.
बायोपिक्समागचे गिमिक्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2018 08:42 AM (IST)
'बँडीट क्वीन', 'पानसिंग तोमर', 'अलिगढ' हे तिकिटबारीवर साफ कोसळले होते, कथेच्या डिमांडनुसार लीड रोलमधील कामे अप्रतिम साकारली गेली होती तरीही लोकांना ते पसंत पडले नाहीत. हिरानी किंवा नाडीयादवालांच्याकडे हे सिनेमे आले असते तर त्याला त्यांनी तो नेमका 'मिडास वर्ख' दिला असता. संजूचे जसे उदात्तीकरण झाले तसेच त्यांचेही झाले असते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -