कलरीपयट्टू हा ह्या धरतीवरचा कदाचित सर्वात प्राचीन मार्शल आर्टस् प्रकार असावा. सुरुवातीला ते मुळात अगस्त्य मुनींनी शिकवले, कारण मार्शल आर्टस् हे केवळ पायाने लाथा मारणे किंवा ठोसे लगावणे एवढेच नाही. ते आपले शरीर शक्य त्या सर्व प्रकारे कसे वापरता येईल, हे शिकण्यासाठी आहे. म्हणून त्यामध्ये केवळ व्यायाम किंवा चपळतेचा समावेश नाही तर त्यामध्ये आपली ऊर्जा व्यवस्था समजून घेणे सुद्धा येते. कल्लरी चिकित्सा आणि कल्लरी मर्मही आहे, ज्यामध्ये शरीराची गुपितं समजून घेऊन आणि विकार त्वरित बरे करून ते पुनर्नव स्थितीत ठेवणे याचा समावेश होतो. पुरेसा वेळ आणि लक्ष देणारे फार थोडे कल्लरी साधक आजच्या जगात आहेत, पण तुम्ही जर त्यात पुरेसे खोलवर गेलात तर तुम्ही स्वाभाविकपणे योगाकडे जाल कारण अगस्त्य मुनींकडून जे काही येते ते आध्यात्मिक असण्यावाचून दुसऱ्या कुठल्या स्वरूपाचे असूच शकत नाही. परम सत्याच्या शोधासाठी त्यांनी शक्य तो प्रत्येक मार्ग उघड करून ठेवला आहे.


शरीराचे न उलगडलेले पुष्कळ आयाम आहेत. काही कराटे मास्टर आहेत जे फक्त लहानश्या स्पर्शाने सुद्धा तुम्हाला मारू शकतात. स्पर्शाने एखाद्याला मारणे फार मोठी गोष्ट नाही. स्पर्श करून त्यांना भानावर आणणे ही मोठी गोष्ट आहे.


जर आपण फक्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठीच प्रयत्न करत असतो तर ते फार सोपे असते. मला ते फार मोठे आव्हान वाटत नाही. परंतु आपल्याला मानवी जीवनाचे गूढ आयाम उघड करायचे आहेत. यासाठी वेगळ्या स्तरावरचे समर्पण आणि लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादे पलीकडचे जीवन माहित करून घेण्यासाठी ठराविक प्रकारचे लोक आवश्यक आहेत. ९९.९९ % मानवजात त्यांच्या शरीराचा सुद्धा पूर्ण शोध घेत नाहीत. पण तुम्ही जर याचा शोध घेतला तर इथे नुसतं बसून राहून सुद्धा हे शरीर प्रचंड गोष्टी करू शकते. हा योगाचा मार्ग आहे. कल्लरी फक्त त्याची जास्त कृतीशील बाजू आहे.


वन्यजीवांचा सामना करण्यासाठी कल्लरीचा विकास झाला


मार्शल आर्टस् मुख्यतः दक्षिण भारतामध्ये विकसित झाले. अगस्त्य मुनी कमी उंचीचे होते परंतु त्यांनी निरंतर प्रवास केला. त्यांनी मार्शल आर्टस्चा विकास मुळात वन्य श्वापदांशी लढता यावे यासाठी केला. या भूमीमध्ये वाघांचा वावर फार जास्त होता - आता आपण त्यांची संख्या मोजू शकतो, फक्त हजाराहून थोडे जास्त शिल्लक असतील. पण एक काळ असा होता, ते शेकडो, हजारोंच्या संख्येने इतर धोकादायक जंगली श्वापदांसोबत वावरत होते. वन्य जीवांचा सामना करण्यासाठी अगस्त्य मुनींनी कल्लरीचा विकास केला – जर वाघ समोर आला तर त्याचा कसा सामना करावा. तुम्ही पाहाल, कल्लरीचा साचा अजूनही तोच आहे. हे केवळ माणसांबरोबर लढण्यासाठी नाहीये. तर प्रवास करत असताना वन्यजीवांचा सामना कसा करावा यासाठी, त्यांनी मार्शल आर्टस् थोड्या लोकांना शिकवले. ते अजूनही जिवंत आहे.


कल्लरी ते कराटे 


जेव्हा लोकांनी हिमालय पार केला तेव्हा त्यांना जंगली लोकांना सामोरे जावे लागले जे प्रवाशांवर हल्ला करत. वन्यश्वापदांचा सामना कसा करावा यासाठी ते जे काही शिकले त्याचा उपयोग त्यांनी ह्या जंगली माणसांवर केला. जेव्हा त्यांनी ह्याचा वापर माणसांवर करायला सुरुवात केली तेव्हा ह्या मार्शल आर्टस् मध्ये वेगळे परिवर्तन घडून आले. जे मार्शल आर्टस् “वाकून” केले जात ते “उभे राहून” केले जाऊ लागले, हे तुम्हाला भारतामधून चीन किंवा दक्षिण पूर्व आशियामध्ये जाताना दिसेल. जेव्हा तुम्ही माणसांबरोबर लढता तेव्हा मारण्यासाठी लढता. वन्य श्वापदांबरोबर तसे नसते. तुम्ही एकदा का दाखवून दिले की तुम्हाला भक्ष्य बनवणे फार कठीण आहे तर ते दूर निघून जातील. म्हणून नैसर्गिकरीत्या मार्शल आर्टस् चा विकास जंगली जीवांपासून संरक्षण करण्याच्या उत्तम पद्धतीपासून ते एखाद्याला मारून टाकण्याच्या पद्धतीपर्यंत झाला. हे परिवर्तन तुम्हाला कल्लरी ते कराटे मध्ये दिसेल.


कालांतराने भारतामध्ये सुद्धा त्यांनी माणसांबरोबर लढायला सुरुवात केली परंतु त्यांनी ह्या कलेमध्ये फारसा बदल केला नाही. त्याऐवजी त्यांनी शस्त्र उचलली. म्हणून तसं पाहायला गेलं तर कल्लरी लढण्यासाठी कराटे इतकं कार्यक्षम नाही कारण कराटे मध्ये ते दोन पायांवर सरळ उभे राहतात. कल्लरीमध्ये तुम्ही कमी उंची असलेल्याचा समाना करण्याचा प्रयत्न करता, कारण आपण त्याकडे दुसऱ्या माणसांबरोबर लढण्याचे साधन म्हणून पाहात नव्हतो, ते फक्त जंगली श्वापदांचा सामना करण्यासाठी होते. 


भारतातील अति प्रभावी अशा पहिल्या पन्नास व्यक्तींमध्ये सदगुरूंची गणना होते. ते योगी, द्रष्टे आणि न्यूयार्क टाइम्सचे सर्वोत्तम विक्री असलेले लेखक आहेत. भारत सरकारने २०१७ मध्ये त्यांना त्यांच्या असाधारण आणि प्रतिष्ठित कार्याबद्दल पद्म विभूषण हा पुरस्कार देऊन गौरवान्वित केले. त्यांनी 'कॉन्शीयस प्लॅनेट - माती वाचवा' ही जगातली सर्वांत मोठी लोक मोहीम सुरू केली आहे जिला ३.९ अब्ज लोकांनी पाठींबा नोंदविला आहे.


(या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखातील व्यक्त झालेली मते संबंधित लेखकाची स्वतःची आहेत. एबीपी माझा किंवा एबीपी नेटवर्कची ही मते किंवा भूमिका नाही.)