आता ह्यावर्षी मात्र काम करायचं म्हणून भरपूर खुश होतो, ट्रेनिंगला बी जाणार हुतो, पर गाव स्पर्धेत नव्हतं. लई निराश झालु, मन लागत नव्हतं. 8 तारखीला सगळी गावं काम करणार हुती, म्या रोज तालुक्याला 11 वीच्या तासाला जातूय मान दहिवडीला, तवा सगळी शेजारची गावं माळावर यिऊन कामाचं काय-काय नियोजन करताना बघून जीव करपून जायला लागला. आपल्या गावात का न्हाई असं.?? अन नेमकं एक आठवडा आधी आमिर खानचं ती तुफान आलंया! बघितलं, त्यात ती चिमणीची गोष्ट ऐकली, तवा डोसक्यात टुब पिटली की गाव स्पर्धत असू-नसू, गावातली लोकं कामाला यिऊ न यिऊ, पर आपुन मात्र रोज काम करणारच, शिवटी पाणी वाचण्याशी मतलब आपल्याला अन तीच आप्लं सगळ्यात मुठं बक्षीस बी. आपुण एकट्याच्या तर एकट्याच्या कष्टानं पर ह्या गावाला हिरवा शालू निसऊच. तरीबी दोन-तीन मित्राला ईचारून बघितलं की येताय काय, ती म्हणली येड लागलाय काय त्या माळावर गाव फिरकतंय तर का?? लांडगं कितीयती माहितीय ना?? फाडून खात्यालं.
लांडगं हुतं ही खरंय, तिकडं कोण जात नव्हतं ही बी खरंय... तिथं जिल्ह्यातली सगळ्यात मोठी दगड खान हाय. पण ती 5 वर्षांपासनं बंदाय. त्यात 5, 6 लांडगं राहत्याती.
मी म्हणलं मग कुणाच्या नादाला लागाया नकु, काम 8 तारखीला सुरू करायचं हुतं पर, घरात कुदळ खोऱ्या काय नव्हतं, मग इकी ठिकाणी गवंडी काम चालू होतं, त्यांच्या हाता-पाया पडलु , म्हणलं मला फक्त एक दिवस खोऱ्या अन कुदळ द्या. 8 तारखीला मग ती घिऊन कामाला गेलु. गावापासनं तीन किलोमीटर एक माळ आहे. तिथंच काम करायची दोन कारणं हुती. मला वाटायचं की आपल्याला जर लांडग्यानी घोरमाळलं तर आपण वराडल्यावर गावाला दिसु शकू, दुसरं म्हणजे मी रोज हिथं एकटा काम करतोय बघून तरी गावातले लोक कामाला येतील. म्हणून.
काम सुरू केलं. पहिल्याच दिवशी 2 CCT खांदलं.
मग रात्री घरी गेलू अन हाताला टरा-टरा फोड आलं, हेच्या आधी कधी काम केलं नव्हतं. घरी तर सांगितलं नव्हतं. रात्रीत त्यातलं एक दोन फुटलं, जेवताना नेमकं थोडं तिखट लागलं अन जी आग पडली, डोळ्यात पाणी तराळलं, आयला म्हणलं -- भाजी तिखटाय. दुसऱ्या दिवशी मग एका मेंढपाळ्याकडे गेलू, त्यानं हाताला लावायला कायतरी पाला दिला.
परत काम सुरू होतं, कॉलेज रोज सकाळी 11 ते 1.30 , मग 2 ला घरी आलो की जेवण करून माळावर जायचो. रात्री 7 पर्यंत काम करायचो. एकटाच त्या माळावर घुबडासारखा. 5, 10 कुदळ हानल्या की लांडगा येत्याती का उठून बघायचू. हिकडं लय त्रास हाय त्यांचा. मनून रोज लांडग्याची भीती होतीच... शेवटी लांडग्यावर विजय मिळवायचा म्हनून त्या मेंढपाळाकडं गेलू, त्यानं एक गोफण बनवून दिली, मला ती नीट चालवता येत नव्हती, रोज माळावर जाऊन आधी अर्धा तास गोफणीत दगड घेऊन मारायची सवय करायचो, मग काम. अशात 1 मे आलं, दर शनिवारी तुफान आलया बघतच हुतो, 1 मे च्या महाश्रमदानाची मोठी तयारी चालू हुती सगळीकडं, मला वाटलं आपल्या सोबतबी कोण आलं तर किती चांगलं हुईल.?? बाहेरचं तर नाहीच नाही पर गावातलं बी कोण आलंच नाही. मग मी माझा एक 8 वर्षाचा बारका चुलत भाऊ अन 9 वीतल्या बहिणीला "गोळ्या बिस्किटं देतो वर चला माळावर सोबत",, म्हणून घिऊन आलो. जेव्हा महाराष्ट्रातली हजारो लोकं येग्येगळ्या ठिकाणी महाश्रमदान करत हुती, तिथं आम्ही तिघं आमच्या माळरानावर महाश्रमदान करत हुतो. त्या दिवशी मात्र अखंड दिवस काम केलं. सकाळी 6 ते रात्री 6, 12 तास माळावरच हुतु, 3 मोठं CCT खांदलं. खोऱ्या कुदळीची अडचण अजून होतीच, रोज कुणा ना कुणा कडं मागावं लागायचो.
एके दिवशी जी भीती हुती ती खरी झाली. मी काम करत हुतो अन संध्याकाळी 6 ला नेमकं खाणीतनं 4,5 लांडगं बाहीर आल्यालं. घाबरून गिलू, बारकी भाऊ अन बहीण झाडाच्या बुंध्याला निवांत झोपल्याली. गोफण हातात धरायची भी शक्ती ऱ्हाईलं नाही, त्यांना उठवलं अन मंदिराच्या दिशेने तिघंबी पळत सुटलो, खचकून जोरात. तिथं एक म्हतार पुजारी हुतं. म्हताऱ्याकडं मुठी काठी जोती. पर लांडगं लय लांब पसतोर आलं नाहीत, निघून गेलं.
काही दिवसात मात्र फुटलेल्या फोडाचं घट्टयात रुपांतर व्ह्याला लागलं. मग दुखत नव्हतं. खोऱ्या कुदळ रोज उसनं आणण चालुच हुतं, पाटी सुद्धा नव्हती मग खोऱ्यानेच माती उचलून बर्म च्या पल्याड टाकायचो. एकानं कुणीतर मग उनाय मनून टुपीसाठी 200 रुपय दिलं.
गावात एक येडं फिरतय, फकस्त अंडरवेअर वर, दिसल त्याला दगडं हांतय, केस ईस्कटलेलं, केसाच्या जटा झालेलं. एके दिवशी ते माळावर वरवर यायलं लागलं, भाऊ बहीण घाबरत्याली म्हणून त्यांला सांगितलं की मंदिरात फोन आलाय अन पळवत वर नेलं, ती येडं गेल्यावर परत कामाला गेलू. रोज काय न काय अडचणी यायच्याच. लय न सांगण्यासारख्या.
CCT खणदून-खणदून हात लय दुखायला लागल्यालं आता, म्हणल एक माती नाला बांध करायला घ्यावं, पर ती एकट्याला कसा जमायचं, त्यालाच 40 दिवस गेलं असतं, शिवटी, काम होणं गरजेचं हुतं. मग एकी दिवशी रोड वरनं चाललेल्या एका ट्रॅक्टरला आडवा गिलू, त्यानं कचकन ब्रेक हाणला मग त्याला म्हणलं मला तिथं थोडी माती वढून द्या, नायतर मी हाटत नाही. ते बी माझी तळमळ बघून आलं शिवटी. त्यानं पुढं फळी लावून थोडी माती ओढून दिली, घोट्या ऐवढ्या बांधला, मग मी पुढं भाऊ अन बहिणीला सोबतीला घेऊन कमरेपर्यंत तो बांध आणला. एके दिवशी लांबनं दगडी आणायचं होतं. त्या 8 वर्षाच्या भावानं एक मोठा दगड डोक्यावर उचललं, अन हसत हसत यायला लागलं, पन ती दगड हुतं मुरमाचं, त्येनं डोक्यावर घेतलं अन ते मधनं तुटलं अन तेच्या डोक्यात धाडकन आपटलं, ते लागलं रडायला, एवढा टेंगुळ आलत, ते अजूनच जोर जोरात रडायला. मग आपलं त्याला सोबत घेतलं, दोन बिस्किटचं पुडं दिऊन शांत केलं, पर त्या 4 दिवसात खांद्यावर लांब-लांबनं दगडं आणून खांदा लय दुखायचा रोज रात्री बहीण चोळायची खांदा तेल लावून.
एकी दिवशी संध्याकाळी ही दोघं शेजारचा दगड काढताना त्याखाली दोन विंचू निघालं, तर ही दोघं त्यांला त्यांच्या अंगावर, काठीनं टोचवून पळवत होती, मारत होती. मला लय वाईट वाटलं, असं एखाद्या जीवाला करावं का सांगा??, तेव्हा ह्यांला रागात लय वराडलो, खवळलो. तर ती लागली रडायला, मग दुसऱ्या दिवशी दोघंबी आलीच न्हायती, तिसऱ्या बी नाही, एकटं काम करायची आता भीती वाटत हुती,, चौथ्या दिवशी दोन मोठं बिस्किटचं पुडं अन चॉकलेट घेऊन घरी गेलो, दोघाचीबी माफी मागीतली अन एक विंचु मारू द्यायच्या अटीवर ती यायला तयार झाली. मला दुःख अपार हुतं, पण पाणी सुडून दुसरं काय सुचत बी नव्हतं.
आता आज 45 वा दिवसाय, एक दिवस कामाला खंड न पाडता रोज एकट्यानच श्रमदान सुरुय, हितलं तालुका हेड सर म्हणलं तुझं अंदाजे 500 ते 700 मीटर CCT खणदून झाल्यात, म्हणजे टोटल 35 CCT, ह्यात कमीत कमी 1 कोटी 50 लाख लिटर पाणी जमिनीत मुरंल. अन एका माती नाला बंधाऱ्याचं 40 लाख लिटर. ऐकून मला लय आनंद झाला. उड्याच मारल्या मी.
मग मला आता वाटतंय की मी तर ह्यावडा बारकाय फक्त 16 वर्षाचा , अन एकट्यानं काम केलं तर 2 कोटी लिटर पाणी वाचलं,
मग सगळ्या गावांमधे तर इतकी लोकं राहत्याती, त्यांनी सगळ्यांनी केलं तर??
अन मग महाराष्ट्रात तर किती लोकं राहत असत्याली?? मग त्यांनीबी केलं तर??
ही कहाणी आहे दुष्काळाच्या "शेर से भिडे शेर की"...
नाव: रोहित बनसोडे.
गाव : गोंदवले खुर्द
ता: माण / दहिवडी
जि: सातारा.
यातलं बरंचसं काम कदाचित नसेलही तांत्रिक दृष्ट्या अचूक, किंवा नाहीही वाचणार 2 कोटी लिटर पाणी, पण यात सर्वात महत्वाचं हेच आहे की एकट्या पोराने जर मनात जिद्द ठेवली तर तो आपल्या गावातला दुष्काळ हटवण्यासाठी किती अन काय-काय करु शकतो हे मात्र सर्वानी नक्कीच घेण्यासारखं आहे...
स्पर्धेत असलेल्या गावांचे अनेक हिरो बाहेर जगासमोर आले, पण गाव स्पर्धेत नसतानाही 45 दिवस फक्त गावातला दुष्काळ हटावा म्हणून कोणी मित्र सुद्धा सोबत येत नसताना, एकट्याच्या पंजाच्या जोरावर काम केलेल्या या वाघाला महाराष्ट्राचा कडक सॅल्युट..!!!