पहिल्या 4 लाईन्स वाचून काहीच नाही वाटलं. (फक्त नाव होतं)... शेवटच्या 4 ओळीतल्या प्रत्येक शब्दाने मात्र पुण्यात पोहोचल्यापासनं ह्रदयाला अक्षरक्ष: प्रत्येक ठोक्यागणिक तापल्या सळईच्या असंख्य डागण्या दिल्यात... यापेक्षा स्वतःच्या हाताने अंगावर कुठंतरी ब्लेड मारून घेऊ म्हणजे त्या 4 ओळींच्या मानसिक वेदनेकडे जास्त लक्ष न जाता, ते शारीरिक वेदनेकडे जाईल, असे अतिशय विकृत विचारही मनाला चाटून गेलेत...
गेल्या आठवड्यात उत्तर सोलापूर तालुक्यातल्या 'वडाळ्याला' श्रमदानाच्या ठिकाणी असलेलं एक लग्न कव्हर करायला गेलो होतो. लग्न गरीब घरचं होतं, फक्त दोन खोलीएव्हढा मंडप, थोडीच गर्दी, काही प्रतिष्ठीत मंडळीही होती. वऱ्हाडी होते त्या गर्दीत जाऊन स्टोरीसाठी लग्नाचे फोटो अन् व्हिडीओ काढायचे होते. सगळे खाली बसलेले, मी मात्र मधेच कसाबसा लोकांच्या आडवा उभा राहून फोटो काढत होतो. लक्ष देऊन काम करत होतो. तर खालून कोणतर शर्ट ओढतंय असं जाणवलं. बघितलं तर एक म्हतारं होतं. काहीतरी म्हणत होतं, पण अक्षदेच्या गोंगाटानं काही ऐकायला येत नव्हतं. तिसऱ्या वेळी त्याने परत शर्ट ओढला अन् मी अनावधानाने खेकसलोच--तसं ते गप्प बसलं. मी तेव्हा प्रतिष्ठित मंडळींचे फोटो काढण्यात मग्न होतो, या फाटके कपडेवाल्या म्हताऱ्याकडे बघायला खरंतर वेळ नव्हता किंवा ते सबकॉनशिअसमध्येच नव्हतं. लग्न झालं अन अजून एक दुसरा महत्वाचा इंटरव्ह्यू घ्यायला जायचं होतं, या म्हाताऱ्याच्या पायाला बहुतेक कायतरी लागलं होतं, त्यामुळं त्याला लवकर उठता येत नव्हतं... त्याची घालमेल अन उभा रहायची धडपड खाली चालूच होती. मी इतर लोकांशी बोलण्यात गर्क होतो. शेवटी या म्हताऱ्याने उठायचा प्रयत्न सोडून, अजून एकदा माझा शर्ट ओढून हातात एक कायतरी लिहिलेली चिट्ठी दिली. मी कशाला? म्हणून त्याला माघारी दिली, त्याने परत माझ्या हातात दिली अन खालनंच निराशेने हात जोडले. मी (उसनं सुद्धा) न हसत ती घेतली अन न बघता तशीच जीन्सच्या मागच्या खिशात टाकली.
नंतर पूर्ण दोन आठवडे पाणी फौंडेशनच्या कामात प्रचंड व्यग्र राहिलो. स्पर्धा संपली, अनेक भन्नाट वॉटर हिरोज जगासमोर आणायची संधी मिळाली, तमाम खुश होतो. एबीपी माझावर येणाऱ्या माझ्या ब्लॉगच्या वगैरे, आणि इतर उत्साहवर्धक मेसेजेसच्या गोंगाटात नकळत हवेत उडत राहिलो.
पैशे मागच्या खिशात ठेवायची सवय, पुण्याला निघताना शोकेस मधे पैशे ठेवले तो झुपका तसाच खिशात टाकला. त्यात चिठ्ठीही असावी. ऑफिसला पोहोचलो, पैशे काढून ड्रॉवरमध्ये ठेवताना परत ही चिठ्ठी दिसली, म्हटलं पहावी आता वाचून.
त्यात लिहिलं होतं.
"नाव (3 ओळीत)
वय 92!
हे सुद्धा
पाणी
फौंडेशन
येतात."
वाचलं अन एका सेकंदात टचकन डोळ्यात पाणी आलं. वॉशरुममध्ये गेलो, अन् मान खाली घालून रडत बसलो. त्या चिठ्ठीने आयुष्याला एक 'मिसिंग पीस' दिला. कायमचा. परत तो आता भरून निघणं नाही.
त्याला कोणीतरी सांगितलं होतं की मी 'लिहितो', अन् हे लिहिलेलं टीव्हीवर किंवा पेपरात छापून येतं. हे आजोबा ज्यांना नीट चालायचा सोडलंच, साधं उभारता येत नाही, काठीशिवाय कदाचित फरफटताही येत नाही, गुडघा या वयात किती वेदना देत असेल, अजून काय अन किती आजार असतील देव जाणे, शरीराकडं बघितलं तर अंग पोखरून निघालय असं वाटेल, हा माणूस स्पर्धा सुरू झाल्यापासनं किती तरी दिवस या कामावर येत होता, तो काही काम करत असेल का ?? कुदळ फावडं हातात घेत असेल का?? माहीत नाही!! (खरंतर गावाच्या बरोब्बर मधलं वडाचं, दोनशे वर्ष जुनं झाड काही फळं देत असतं का?? का त्याचं फक्त गावात असणं म्हणजेच गावासाठी जिवंत असल्याचा अनुभव देत असतं??) हे आजोबा एवढ्या त्रासातही कामावर रोज येत असतील तर काम करणाऱ्या तरुणांसाठी, स्त्रियांसाठी तो म्हतारा एखाद्या सावलीदार वडासारखा किती मोठा आधार वाटला असेल?
माझ्या ह्रदयात स्फोट झाला त्याचं कारण मात्र वेगळंच होतं,
अख्खी ह्यात ज्यांनी गावाच्या मातीत घुसळत घालवली, ज्यांनी विटी दांडू ही पाहिला अन् नातवाच्या हातात व्हिडीओ गेमही पाहिल्या, ज्यांनी देश स्वतंत्र होताना पाहिला, लहान असताना रेडिओ टीव्ही, बघितल्यावर ज्यांना आज आपल्याला 'स्पेसशीप" अचानक समोर उभी ठाकल्यावर जी भावना येईल ती भावना त्यांनी अनुभवली, एखाद्या नेत्याचं हेलोकॉप्टर जेव्हा गावाच्या आवारात सभेसाठी उतरणार तेव्हा ते बघायला जे काट्या-कुपाट्यातनं पायात खसकन काटा घुसला असताना पळाले, नेत्यांच्या गाडीच्या काचेतनं त्याचा चेहरा दिसावा म्हणून 1-1 तास जे गाडीच्या रस्त्यावर उभे राहिले,, अशा लोकांना "पेपरमध्ये माझं नाव येणं" म्हणजे स्वर्ग मिळाल्याचं आनंद देतात. आजही कित्येक खेड्यात अशे लोक संख्येने आहेत. याही आजोबांचं कदाचित तसंच असावं ,
"आयुष्याच्या संध्याकाळी सरते शेवटी एकदा तरी आपलं पेपरात नाव यावं, नातवानं ते आपल्याला वाचून दाखवावं!"
असं कदाचित त्यांना वाटलं असावं. म्हणून त्यांनी एका दुर्मिळ आशेने आयुष्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून, थरथरत्या हाताने कशीबशी ती चिट्ठी लिहून ओरडत असलेल्या, माझ्या हातात दिलेली की "हा म्हतारा एवढ्या वयाचा असूनही पाणी फौंडेशनच्या कामाला रोज येतोय."
मी मात्र नकळत दुर्लक्ष केलं.
तसं यांच्यावर स्टोरी केली असती का? ती छापून आली असती का? मला माहित नाही. पण खाली बसून त्यांना दोन शब्द बोललो जरी असतो तर काय बिघडलं असतं? त्यांना 30-40 दिवस कामाला आलो त्याचं अजून चांगलं वाटलं नसतं का?? का आपणही नकळत का होईना प्रतिष्ठीत समाजाकडेच झुकतोय असही वाटलं..
हे सगळे प्रश्न मनाला डागण्या देत असताना ती चिट्ठी सहज नकळत पालटली. अन ती होती दवाखान्याची 300 रुपये कसलीतरी तपासणी केल्याची फी दिल्याची!
उरलं-सुरलं अवसान गळून शेवटी मात्र स्वतःला रडण्यापासून थांबवू शकलो नाही... की उद्या काही कारणाने हे................... तर....
काळीज चिरणारी चिठ्ठी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 May 2018 07:57 PM (IST)
वाचलं अन् एका सेकंदात टचकन डोळ्यात पाणी आलं. वॉशरुममध्ये गेलो, अन् मान खाली घालून रडत बसलो. त्या चिठ्ठीने आयुष्याला एक 'मिसिंग पीस' दिला. कायमचा. परत तो आता भरून निघणं नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -