घर चालवणं मुश्किल तिथं ह्याचं शिक्षण म्हणजे गरीबाच्या घराने "हौस मौज" केल्यासारखं वाटावं अशी स्थिती.
वडील लहानपणी वारलेत, आई तुटपुंज्या पगारावर खेडेगावात अंगणवाडी मदतनीस आहे. हाल सहन करत कसल्याही आधाराविना तरीही आईने पोराला शिकवलं. एक एक रुपया एका-एका श्वासारखा साठवला, जपला. आईच्या या अपरिमित कष्टाचं इमान राखत जिद्द लावून हाही शिकला. इंजिनिअर झाला. आईला सुखात ठेवायचं म्हणून धडपड धडपड करत शेवटी नौकरीही मिळवलीच. आईचा यावेळी झालेला आनंद फक्त तिच्या प्रत्येक पेशीलाच समजला असेल.


आईला वाटलं की याची नौकरी म्हणजे आपण 24 वर्ष न थकता केलेल्या कष्टाचं फळ. अन "यापेक्षा मोठा आनंद आता आयुष्यात कधीच येणार नाही."

पण ज्याची वाढ आईच्या दुधासोबत तिच्या अंगातनं पाझरलेल्या प्रामाणिकतेवर होते त्याच्या रक्ताचा रंगही वेगळीच चमक घेऊन निर्माण होत असावा...

यानं आईला आयुष्यात आपल्या नोकरीपेक्षाही मोठा आनंदाचा क्षण काल दिला.

देशातल्या सध्याच्या परिस्थितीमुळे एकही गरीब भुकेने मरू नये, माझे लहानपणी झालेत असे हाल मी अस्तित्वात असताना कोणाचे होऊ नयेत, बारक्या इवल्या लेकरांची पोकळ पोटं हवेने नाही तर अन्नाने भरावीत, या देशातला माणूस या आलेल्या साथीच्या रोगाने मरू नये, त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळावी, जीव वाचावे. मी झालो होतो पण यांची लेकरं अनाथ होऊ नयेत. हातावर पोट असलेल्या माणसाला 4-4 दिवस भूक लागून शेवटी आत्महत्येचे विचार त्याच्या मनात येऊ नयेत, म्हणून याने स्वतःची परिस्थिती नसतानाही चक्क एक लाख रुपयांची मदत पंतप्रधान कोरोना निधीला केलीय...

खरंतर रक्कम मोठी की छोटी हे खूपच रिलेटीव्ह असतं, ज्याच्याकडे मुळातच चतकोर भाकरी असते त्याने त्यातला फक्त एक घास स्वतःकडे ठेवून, उपाशी झोपत - सोबतच्याला मात्र उरलेली संपूर्ण भाकरी देऊन त्याची भूक भागवावी,
आणि कोणाकडे संपूर्ण हॉटेल असूनही त्याने दिवसाकाठी चांगलं ,, पण उरलं म्हणून सगळं अन्न कचऱ्यात फेकून द्यावं
या दोन गोष्टीत जमीन असमानचा फरक असतो...

यानेही आज देशाची गरज ओळखून छोटा घास स्वतःकडे ठेवत उरलेला मात्र देशाला दिलाय..."

जळगाव जामोद तालुकयातल्या जामोद या खेडेगावातला हा वीर आहे

गणेश महादेव दामधर.

अन सर्वात विशेष हे की याचं वय आहे अवघं 26 वर्ष...

या वयातही एवढी समज ज्याला असते त्याचं भविष्य सोन्यासारखं चमकत असतं यात तर शंकाच नाही...

गणेशला वाटतं की आपण प्रत्येकाने मोठा नसला तरी छोटा का होईना पण घास आज गरज असताना देशाला द्यावा...

सचिन अतकरे यांचे आणखी काही वाचनीय ब्लॉग