सकाळी 7-7.30 ची वेळ. राजधानी दिल्लीत अन लाल किल्ल्यावर प्रचंड कोसळत असलेला पाऊस. तरीही केवळ 'अटलजींचं म्हणून' भाषण ऐकायला लोटलेला अन समोर पावसाच्या थेंबांएवढा इतस्थ: पण शिस्तबद्ध-नक्षीत पसरलेला प्रचंड जनसमुदाय. सोबत भारताच्या नकाशाच्या आकारात अन तिरंगी कपड्यात समोर बसलेली शाळेची नेहमीची पोरं. भाषणाच्या 11 मिनिट अन 51 व्या सेकंदाने अटलजींच्या ओठातून निघालेल्या "त्या" शब्दांनी - पावसात इतका वेळ मिसिंग असलेली वीज समंत आसमंतात कडाडून टाकली. अन या गर्जनेवर भारतापेक्षा जग जास्त अवाक होतं.
पंतप्रधान म्हणून आपल्या लाल किल्ल्यावरच्या सहाव्या भाषणात अटलजींचे ते Exact अन आत्मविश्वासपूर्ण शब्द होते...
"विज्ञान्न के क्षेत्र में भारत एक ऊंची उडाण लेने के लिये अब तैयार है. मुझे ये बताने में बडी खुशी हो रही है की, कुछ ही सालों में भारत चंद्रमा पर अपना अंतरीक्ष यान भेजेगा. जिसका नाम होगा "चांद्रयान-प्रथम'..!!!
नंतर मात्र कित्येक वेळ नुसत्या कडाडून टाळ्या सुरु होत्या. (पावसात भिजलेल्या असूनही खणखणीत आवाज असलेल्या)
भारत यावर्षी "चांद्रयान मोहीम" हाती घेईल अन लवकरच चंद्रावर उतरणारा जगातला 200 पैकी केवळ चौथा देश ठरेल, असं अटलजी अन इस्रोचं स्वप्न होतं. यासाठी तयारी बरीच झाली. पण एकाच वर्षात म्हणजे 2004 ला वाजपेयींचं सरकार गेलं.
तरीही पुढं आलेल्या मनमोहन सरकारने किंवा इतर कुठल्याही सरकारांनी या मोहिमांमध्ये कुठलेच हस्तक्षेप किंवा बदल केले नाहीत, किंवा केले तर ते चांगल्यासाठीच केले. या सगळ्याची परिणीती होती... 22 ऑकटोबर 2008 ला पहाटे 6 वाजून 22 मिनिटांनी - माथ्यावर तिरंगा, राष्ट्रचिन्ह असेलेले चार तगडे सिंह अन इसरोचा अभिमानी लोगो घेत, 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास करायला भारताचं एक हजार, तीनशे ऐंशी किलोचं अवजड चांद्रयान-1, जगादेखत सतीश धवन स्पेस सेंटर- 'सेकंड लाँच पॅड' वरून, सरसरत अन पृथ्वीवरच्या भारताच्या क्षमतांवर असलेल्या सगळ्या शंकांना आपल्या शेपटीने आग लावत, मागे राख-धुराचे लोळ फेकत आकाशात झेपावलं. तेही फक्त 386 कोटी रुपयात बनलेलं, म्हणजे आजवरच्या कोणत्याही देशाच्या चंद्रमोहिमांमध्ये - सर्वात कमी खर्चात. नंतर ते यशस्वीरित्या चंद्रावर उतरलंही, मिशन मध्ये 720 दिवसात ठरवण्यात आलेल्या पैकी 95 टक्के गोष्टी फक्त 312 इतक्या रेकॉर्ड दिवसात त्याने पूर्णही केल्या. अन मग हिटिंगचा इश्यू आल्याने हे मिशन 28 ऑगस्ट 2009 ला संपल्याचे इस्रोकडून जाहीर करण्यात आले.. पण 95 टक्के गोष्टी अचिव्ह केल्याने भारताने चांद्रयान -1 ला ग्रँड सक्सेस मानलं. अन जगानेही याला टाळ्या वाजवत आदरयुक्त दुजोरा दिला. यात सर्वात महत्वाची गोष्ट होती. भारताने पहिल्यांदा जगाला "विथ सॉलिड प्रूफ" दाखवलं की हो चंद्रावर पाण्याचं अस्तित्व आहे!!!. चंद्राच्या मातीत असलेले H2O चे कण भारताने जगासमोर दिमाखात मांडले. आजवरच्या सगळ्या 'काल्पनिक थिअरीज' खोडत सायन्सला कायम अपेक्षित असलेलं चंद्रावर पाणी असल्याचं "प्रूफ" दाखवलं. अन आधी चंद्रावर असे प्रयत्न केलेलं सगळे जग भारतापुढे नतमस्तक होते.
दरम्यानच्या काळात म्हणजे चांद्रयान 1 च्या लॉन्चआधीच इस्रोकडून चांद्रयान -2 चं प्लॅनिंग सुरुही झालं होतं. पण यात अनेक अडचणी होत्या. पैकी सर्वात मुख्य म्हणजे कोणत्याही अवकाश मोहिमेत सर्वात महत्वाचे तीन पार्टस असतात - ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर.
यातल्या ऑर्बिटर अन रोव्हरची टेक्नॉलॉजी आपल्याकडे चांगली आणि प्रूव्हन होती पण लँडरचा खूप मोठा इशू होता. कारण आपल्याला चांद्रयान-2 साठी चंद्रावर "सॉफ्ट लँडिंग" करायचं होतं. (चांद्रयान -१ मध्ये भारतानं 'इम्पॅक्ट लँडिंग' केलेलं जे प्रचंड घातक असतं. कारण आदळण्याने लँडरच्या आतल्या रोव्हर आणि इतर महत्वाच्या वस्तू फुटून जाण्याची अन मिशन फेल होण्याची प्रचंड शक्यता असते. ते यावेळी इसरोला टाळायचंच होतं. म्हणजे लँडर अलगद चंद्राच्या जमिनीवर उतरवायचा होता. ही सगळ्यात अवघड फेज. त्याची फुलप्रूफ टेकनॉलॉजी आपल्याकडे नव्हती. अन ती आपण लाँचच्या ठरल्या तारखेपर्यंत वेळेत तयारही करू शकत नव्हतो. शेवटी नाईलाजाने आपल्याला रशिया पुढे 'नेहमीसारखे' हात पसरावे लागले.
इसरोने रॉस्कोमास (रशियन स्पेस एजन्सी) सोबत 12 नोव्हेंबर 2007 ला एक करार केला. यानुसार रशिया भारताला लँडर बनवून देणार होता. 18 सप्टेंबर 2008 ला मनमोहन सिंह यांनी 'चांद्रयान-2' मिशन अप्रूव्ह केलं. ऑगस्ट 2009 मध्ये स्पेसक्राफ्टच डिजाईन भारत आणि रशियन शास्त्रज्ञांनी मिळून फायनल स्वीकारलं. सगळं काही सुरळीत आणि प्लॅन नुसार चाललं होतं. परंतु हे फक्त भारताच्या बाजूने. कारण भारताने आपला पे-लोड, म्हणजे जी महत्वाची संशोधन सामुग्री वर अवकाशात न्यायची होती ते सगळं वेळेत तयार केलं पण रशियाने मात्र लँडर वेळेत तयार केला नाही. याचा फटका भारताला बसला कारण रशियाच्या या महाचुकीमुळं आपलं मिशन लॉन्च 2013 मध्ये पोस्टपोन करून 2016 ला रि-स्केड्युल करावं लागलं. बराच खर्च वाया गेला. दरम्यान रशियाची "फोबोस-ग्रन्ट" ही मंगळ मोहीम सपशेल फेल गेली. हा दोन्ही देशांसाठी खूप मोठा धक्का होता. भारतासाठी तर जास्तच. कारण ज्या प्रकारचा लँडर रशिया भारताला पुरवणार होता, आणि इतरही काही टेक्निकल गोष्टी ज्या आपण रशियाकडून घेतल्या होत्या त्याच प्रकारचा लँडर आणि इतर टेक्निकल गोष्टी रशियाने त्यांच्या या मिशन मध्ये वापरल्या होत्या. अन हे मिशन सपशेल फेल झालं होतं. चांद्रयान -2 वर याचा होणारा परिणाम आता आंधळ्या माणसालाही स्पष्ट दिसत होता. आपण पुरते फसलो अन अडकलो होतो. सगळंच आवाक्याबाहेरचं होतं असं वाटायला लागलेलं.
अन शेवटी तर उंच आकाशात उडायची स्वप्न पाहणारा भारत प्रचंड मोठ्या खड्ड्यात ढकलला गेला. कारण रॉस्कोमासने इसरोला कळवलं की आम्ही तुम्हाला लँडर पुरवूच शकत नाही. आधीच झालेला उशीर आणि त्यात आता तर लँडरच नाही. भारत अक्षरक्षः तोंडावर आपटला.
मिशन शेवटी पुन्हा एकदा पुढं ढकललं गेलं. ही झीज न भरून येणारी होती. वार भारताच्या अन इस्रोच्या वर्मी बसला होता. परंतु राखेतून फिनिक्स पक्षी उडतो त्याप्रमाणे (बॅकफूट वर गेलेल्या) इस्रोने इथून पूढं जगासमोर भीक मागनं सोडून द्यायचं ठरवलं. जवळचे, हक्काचे अन विश्वासातले मदत करायला नकार देतात तेव्हाच आपण 'स्वावलंबी' होतो अन तेव्हाच आपल्याला आपल्या क्षमता समजतात, हे माणसांसाठीच नाही तर देशांसाठीही खरं होतं. कारण याआधी जे आपण सपशेल तयारच करू शकणार नव्हतो ते आता मात्र तयार करायची संपूर्ण जबाबदारी इस्रोच्या सायंटिस्टसनी आपल्या खांद्यावर घेतली. भारताचं चंद्रावर जाणं आणि न जाणं यात फक्त एकच गोष्ट आड होती. "हा लँडर तयार करणं."
याआधी फक्त अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच पण (प्रगत देशांनी) चंद्रावर सॉफ्ट लँडिंग सक्सेसफुल केलं होतं. विशेष हे की या तिन्ही जणांनी यासाठी एकमेकांची मदत घेतल्याच्या बऱ्याच बातम्या त्यावेळी यायच्या. ते किती सत्य होतं माहीत नाही. पण भारत मात्र आता हे सगळं 'एकट्याने करणार होता.
सगळ्यात सगळ्यात अन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे चांद्रयान चंद्रावर घेऊन जायची संपूर्ण जबाबदारी घेणार होत्या या मातीत जन्मलेल्या इथल्या दोन रणरागिणी. "एकदा का काही समजून घेतलं आणि पदर खोचला" की भारतीय महिला काय करू शकते अन कुठवर जाऊ शकते याचा इतिहास घडत होता. GSLV मार्क-3 (टोपण नाव बाहुबली) या लाँच व्हेकलला तयार करण्यापासून ते 4 लाख किलोमीटर लांब असलेल्या चंद्रावर आपल्या लँडरला अलगद उतरवून अन नंतर तिथं पोहोचलेल्या लँडरमधून रोव्हरला बाहेर काढून अन नंतर त्या रोव्हरचेही पाय त्याच्या पोटातून बाहेर काढून त्याला चंद्रावर 14 दिवस फिरवत ठेवण्याची, अन तिथला सगळा डेटा कलेक्ट करून त्याचं विश्लेषण करून जगाला त्याचे फायंडिंग्स दाखवण्यापर्यंतची सर्व जबाबदारी होती इसरोच्या आयुष्यातली पहिली महिला 'प्रोजेकट डिरेक्टर' मुथय्या वनिता आणि 'मिशन डिरेक्टर' भारताची रॉकेट वुमन रितू करीधालची.
त्यातून या खूप काही अति प्रचंड शिकल्या होत्या, असही नाही. एक फक्त Electronics system इंजिनियर तर दुसरी फक्त Aerospace इंजिनियर. संपला विषय. पण जबरदस्त प्रॉब्लेम सॉलविंग स्किल्स, जीव दणाणून टाकणारं टीम मॅनेजमेंट आणि नेव्हर डायिंग अटीट्यूड या महत्वाच्या तीन गोष्टी मात्र या दोघींकडे भरभरून होत्या. म्हणून त्या नाही! म्हणत असतानाही इसरोने अत्यंत आत्मविश्वासाने ही मिशनची संपूर्ण जबाबदारी या दोघींवर सोपवली. असं मिशन लीड करण्याचा कोणताही अनुभव नसतानाही संपूर्ण टीममध्ये 30 टक्के महिला शास्त्रज्ञ होत्या हे विशेष.
वर्ष उलटत होती. अडचणी कमी व्हायच्या सोडून वाढतच होत्या, सरकारे बदलत होती, मंत्री बदलत होते, अधिकारी बदलत होते, वर्षच्या वर्षे बदलत होती, स्वतः इस्रोचे चेअरमनही बदलले. बजेट वाढत होतं. पण या सगळ्या शास्त्रज्ञांचे प्रयत्न एकलव्यासारखे सातत्य अन अर्जुनासारखा फोकस ठेवत चालूच होते. अन म्हणूनच शेवटी, यांच्या प्रयत्नांना प्रचंड यश आलं. सगळ्या टेस्ट्स सॅटिसफॅक्टरी आल्या. स्वप्न पूर्ण होणार होतं. वर्ष होतं फेब्रुवारी 2019. सगळं काही व्यवस्थित होतं. लाँन्चची डेट ठरणार होती. पण नेमकी एक महत्वाचीच टेस्ट निगेटिव्ह आली. अन सगळ्यांचा जीव तुटला. ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं होतं. (रशियाने नकार दिलेल्या अन म्हणून भारताने बनवलेल्या) लँडरचे एका टेस्ट दरम्यान 6 पैकी 2 पाय तुटले. सगळ्यांचीच धाकधूक वाढली.
पण "नेव्हर डाय" अटीट्यूड असलेल्या या दोघी अन टीममधल्या सगळ्यांनी हार न मानता, दिवसरात्र काम करत अन अत्यंत कमी वेळात याचं सोलुशनही डेव्हलप केलं. अन यान शेवटी लाँच साठी सज्ज झालं. लाँच डेट ठरली 15 जुलै 2019, रात्री 2 वाजून 51 मिनिटे. आख्ख जग या तारखेकडे रात्र असली तरी, डोळे लावून बसणार होतं. सर्वात जास्त म्हणजे नासा (अमेरिका), CNSA (चायना) आणि रॉस्कोमास (रशिया).
यानाचं वजन तब्बल 3850 किलो. म्हणजे जवळ-जवळ 3 कार आकाशात त्यातल्या पाण्याच्या बाटलीतलं पाणीही हलणार नाही अशा अलगद फेकायच्या. या यानात असणार होतं. ऑर्बिटर, त्याच्या पोटात लँडर (नाव विक्रम), अन त्याच्या पोटात रोव्हर (नाव प्रग्यान). ऑर्बिटरची जबाबदारी या दोघांना अवकाशात न्यायची, लँडरची अलगद चंद्रावर उतरायची अन रोव्हरची चंद्रावर फिरत महत्वाचा डेटा गोळा करायची. प्रवास होता 3 लाख 84 हजार 400 किलोमीटर एवढा प्रचंड. तिथं पोहोचून सगळ्यात हार्ड असलेलं - सॉफ्ट लँडिंग करायचं, 14 दिवस यान चंद्रावर फिरत राहिलं पाहिजे. जास्त वेळ घेतला तर चंद्रावर रात्र व्हायची भीती. मिशन फेल. अन जायचं कुठं तर याआधी गेलेल्या रशिया, चायना अन अमेरिका तिघांनीही जिथं अननोन मध्ये जायची ताकद अन हिम्मत दाखवली नाही तिथे. म्हणजे तिघेही गेलेले चंद्राच्या उत्तर भागावर. भारत पहिलाच देश जाणार. अन तो भाग म्हणजे चंद्राचा दक्षिण भाग. बऱ्याचदा अंधारात असलेला. यशस्वी होण्याची शक्यता 1 टक्क्यापेक्षा कमी. सोबत 13 उपकरणांच वजन. अन त्यांनी व्यवस्थित काम करावं ही धाकधूक. 978 कोटी रुपयांचा क्षणात चुराडा होण्याची भीती. त्यापेक्षा जास्त 12 वर्षांची मेहनत डोळ्यादेखत चुराडा होण्याची भीती. अन सर्वात मोठी भीती स्वतः तयार केलेला लँडर फेल होण्याची. याने भारताचं अन इसरोचं कंबरडचं मोडणार होतं.
त्यातून लँडरपुढचं अजून एक महत्वाचं आवाहन होतं की लँडरच्या मशिन्सने जर एखादा "पुढच्या क्षणी काय करायचं?" असा निर्णय पृथ्वीवरच्या इसरोला विचारला तर तो सिग्नल रोव्हरकडून, लँडरकडे मग तिथून ऑर्बिटरकडे आणि मग तिथून पृथ्वीकडे. असा प्रवास करत त्या सिग्नलला पृथ्वीवर श्रीहरीकोट्याला पोहोचायला वेळ लागणार होता 1.2 सेकंद. मग तो डेटा प्रोसेस करून (यासाठी अशक्यच असलेले 0 सेकंद जरी मानलं तरी) तसाच माघारी चंद्रावर सिग्नल जायला 1.2 सेकंद अधिक, म्हणजे टोटल 2.4 सेकंद. अन हे बिलकुल परवडणारं नव्हतं , कारण सेकंदाच्या एका भागाची चूकही लँडरला चंद्रावरच्या क्रेटर म्हणजे खड्ड्यात अडकवून ठेवू शकत होती.
मग त्यावर सोल्युशन काय?
"आर्टीफिशिअल इंटेलेजन्स."
लँडरने स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायचे. म्हणून इसरोने आर्टीफिशिअल इंटेलेजन्सची सर्व सिस्टम लँडरला बसवली, ज्याने तो स्वतःचा निर्णय स्वतःच घेईल. यानुसार लँडर चंद्राच्या जमिनीच्या 100 मीटर वर तरंगत राहून आपल्या डोळ्यातल्या सेन्सरने ही चंद्रावरची जमीन कंटीनिवस स्कॅन करत-करत पुढे सरकणार होता. इसरोने लँडरला आईचं ह्रदय अन बापाच्या भावना देऊन पाठवलं होतं. कारण जेव्हा लँडरला 1001 टक्के खात्री येईल की मी अन माझं पोटातलं हे पिल्लू (रोव्हर) चंद्राच्या कोणत्याही खड्ड्यात अडकणार नाही आणि हे समजेल की हे रोव्हर इथपासून अर्धा किमीपर्यंत कुठंही न अडकता जाऊ शकेल तिथंच मग हा स्वतःला लँड करुन घेणार. हे अद्भुत होतं. इसरो आपल्या लँडरला नाही तर जगाला मार्ग दाखवत होती. जी गोष्ट रशियाने भारताला दिली नाही ती भारताने अजूनच जबरदस्त अन प्रगत बनवली होती.
शेवटी सगळ्या टेस्ट्स समाधानकारक आल्या अन तो दिवस उजाडला --- 15 जुलै 2019, मग ती रात्रही आली, अन लाँचचं काउंटडाउनही सुरु झालं. लॉन्च होतं रात्री 2 वाजून 51 मिनिटांनी. जग कान टवकारून या काऊंटडाऊनकडं बघत होतं. सगळं व्यवस्थित होत असल्याच्या अपडेट्स जगाला मिळत होत्या, देश खूश अन excited होता. पण अचानक मिशन abort ची न्यूज आली. वीज कोसळावी तशी. 12 वर्ष वाट पाहिलेल्या लाँचला, लाँचच्या फक्त 54 मिनिटे अन 24 सेकंद आधी abort करावं लागलं. यानातल्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये हेलियम इंधन भरताना टेक्निकल issue आला होता. जग आतल्या आत कुत्सीत हसलं तर 130 कोटी भारतीयांचं ह्रदय मात्र यानाच्या खालच्या बाजूला लागणाऱ्या आगीसारखं पेटलं.
अनेकांना वाटलं की हे संपलं.
पण चित्ता प्रचंड मोठी झेप घायच्या आधी काही पावले मागे घेतो, गरुडही तेच करतो, वाघही, पाण्यातली मगरही तेच करते... अन इसरोनेही तेच केलं होतं.
कारण मोजून फक्त 7 दिवसात हा टेक्निकल issue दूर करून 22 जुलै 2019 च्या भर दिवसा 2 वाजून 43 मिनिटांनी 5,4,3,2,1 झालं आणि जगाला आपणच दिलेला शून्य कानावर यायच्या आत 1.3 बिलियन ड्रीम्सनी हे तमाम आकाश भेदत यानाने अवकाशात उंचच उंच अन क्षमतेपेक्षाही जास्त मोठी गरुडझेप घेतली... चंद्रावर फक्त अर्धा किमी अंतर चालण्यासाठी भारताचा रोव्हर 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतर कापणार होता.
यावेळी आकाशात जमा झालेले काळे ढग म्हणजे या मोहिमेत आलेल्या त्या करोडो अडचणी होत्या!! या सगळ्या अडचणींना स्पर्शता क्षणी, आरपार आग लावत या यानातल्या करोडो स्वप्नांनी हे शंकांचे डोंगर पूर्वापार छेदले.
यात स्वप्न होतं साराभाईंचं , होमी भाभांचं, नेहरुजींच्या सपोर्टचं, अटलजी, मनमोहनजी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अब्दुल कलामांचं...
आणि अशा दुर्मिळ आणि स्पेशल क्षणांच्या वेळी फक्त "एकच" श्वास घेणाऱ्या 1.3 बिलियन्स भारतीयांचंही......
आता 14 ऑगस्टला "ट्रान्सलुनार इंजेक्शन" थ्रू यान पृथ्वी कक्षेतून काढून चंद्राच्या कक्षेत फेकलं जाईल. मग 20 ऑगस्टला चंद्राच्या अतिशय जवळ नेलं जाईल अन मग 7 सप्टेंबरला भारत चंद्राच्या दक्षिण भागावर पाय ठेवणारा जगातला पहिला-वाहिला देश ठरेल. भारताच्या या मिशनमुळे अन यापुढे भविष्यात चंद्रावर मानववस्ती झाली तर त्याचं सर्वात महत्वाचं श्रेय हे अमेरिका, चीन किंवा रशियाला नसेल तर ते भारताला असेल......
म्हणूनच याला आता कारण आहे की, का भारतीय तरुण हल्ली सायंटिस्ट म्हणून नासापेक्षा इसरोला जास्त महत्व देतोय. एखाद्या (निव्वळ पडक्या) हॉलिवूड फिल्मसाठी लागणाऱ्या बजेट मध्ये भारत आपले यान चंद्रावर, मंगळावर, स्पेसमध्ये कसं पाठवतो हे अनेक देशांना अजूनही समजलेलं नाहीये. अन त्यातून नुसतं पाठवतोच असं नाही तर संपूर्ण मिशन यशस्वीही करतो. ते ही यासाठी लागणारं एक रूपयाचं सामानही इम्पोर्ट न करता.
इसरोला या उद्याच्या 15 ऑगस्टला 50 वर्ष पूर्ण होतील. अन इसरोचे जनक असलेल्या विक्रम साराभाईंना 100 वर्ष.
भारताला स्वप्न बघायला शिकवणाऱ्या. इसरोचो आज अब्जावधी शब्द लिहिले तरी कौतुक पूर्ण होऊच शकत नाही!!
(बाकी तुम्ही-आम्ही तरीही सवयीने कितीही खरडत राहूच ...!!! पण ते सगळं अपुरं आहे)
भारताच्या या अनहिता शोधाला अवकाशाइतकं विस्तृत आणि उदंड यश मिळो हि सदिच्छा...
चांद्रयान 2 मोहीमेचा खडतर पण अनोखा प्रवास!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2019 06:28 PM (IST)
पंतप्रधान म्हणून आपल्या लाल किल्ल्यावरच्या सहाव्या भाषणात अटलजींचे ते Exact अन आत्मविश्वासपूर्ण शब्द होते... "विज्ञान्न के क्षेत्र में भारत एक ऊंची उडाण लेने के लिये अब तैयार है. मुझे ये बताने में बडी ख़ुशी हो रही है कि, कुछ हि सालों में भारत चंद्रमा पर अपना अंतरिक्ष यान भेजेगा. जिसका नाम होगा…………… “चांद्रयान-प्रथम”..!!!
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -