स्पर्धा सुरू झाल्यापासून आज 44 दिवस झालं फिल्ड वर फिरतोय, स्पर्धेतली इतर कामे करता-करता अनेक हेलावणाऱ्या स्टोरीजही लिहिल्या, , पण कधी डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही,


आज मात्र आलं.

या फोटोतले हे तिघेजण.

उजवीकडचा, मतिमंद आहे. नाव : मुका.

(हे नाव त्याला नीट बोलता येत नाही म्हणून पडले की, त्याचं नाव खरंच ते आहे, कोणालाच माहिती नाही.)

याला हे काय काम चाललंय माहिती नाही. काही समजतही नाही , न जास्त बोलता येतं. हा गावात असंच इकडं-तिकडं वेड्यासारखा फिरत राहतो, एके दिवशी ह्याला गावाजवळ कायतरी खोदकाम चालू असताना दिसलं, काही दिवस तो तिथं रोज येऊन बसायचा. एके दिवशी त्यानं कसंबसं अडखत-अडखत विचारलं 'हे कायाय,?

'कोणतरी म्हणलं, 'पाणी आडवायल्याती पावसाचं'. त्यानं रात्रीत आपल्या (50 पेक्षा कमी IQ च्या) मेंदूत काय विचार केलता देव जाणे, दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या आधी आला, पडलेली कुदळ घेतली अन खांदायला लागला, जो खांदायला लागला तो दिवस, तो आजचा दिवस -- हा रोज जिथं काम सुरू असेल तिथ येऊन नुसता खांदत सुटतो!.अविरत. दुसरं काहीच नाही, मातीची पाटी उचलायची नाही की खोऱ्याने माती ओढायची नाही. फक्त खांदणे सुरू.

मधला आहे तो लिंबाजी कांबळे.

हा निराधार आहे, म्हणजे गावातलं एक बारकं घर अन कशेबशे चालू असलेले आपले तुरळक श्वास सोडलं-- तर याचं स्वतःचं असं या संपूर्ण जगात काहीच नाही. आई बाप बहीण भाऊ बायको पोरं नातेवाईक काहीच अन कोणीच नाही. याला गावानं आजवर जमेल तसं कोणपण करून एखादी दुसरी भाकरी देणार. त्यावरच ह्याची गुजराण. यालाही कोणतरी सहज एके दिवशी कामाच्या ठिकाणी घेऊन आलं, अन त्या दिवशी, 'हे' मतिमंद कायतरी काम करतंय बघून ह्यानेबी शेवटी कुदळ हातात घेतली. अन परत तेच , तो दिवस ते आजचा दिवस हा कुदळ हातातनं सोडायला तयार नाही. रोज फक्त खांदत राहणार. या गावात सध्या जवळ-जवळ 24 तास अविरत श्रमदान सुरुय. हा फोटो दुपारी 1 च्या कडक उन्हात घेतलाय, ह्याच्या पायात चप्पल नव्हती. कधीच नसते. शेजारच्या गावकरयाने माझ्याशी शर्यत लावली की 5 मिनीट ह्या सँडल शिवाय उभा राहून दाखवा. उभारलो. म्हणलं आपुनबी खेड्यातलंचंय.

दुसऱ्या मिनिटाला गरम तापल्या तव्याचा चटका बसावा तशे पाय भाजून निघाले. नाही उभा राहू शकलो. हरलो.  हा मात्र असल्या उन्हात पायाची बोटं वाकडी करत-करत कसं काम करतोय, देव जाणे.

हा सर्वात डावीकडचा छोटा, याचं नाव रामा.

ह्याचं एकच काम. त्याने ठरवून घेतलेलं. हा नेहमी ही दोघ जिथं खांदत असतील तिथली माती स्वतः खोऱ्याने पाटीत भरतो. अविरत.

या तिघांचं विशेष आहे की काम करताना जसं इतर लोक तासाला 5 मिनिटाचा वगैरे ब्रेक घेतात तसं यांचं नाही, हे कुदळ किंवा खोऱ्या हातातून 5 मिनिटही सोडत नाहीतच.

तो छोटा अन मधले लिंबाजी काही बोलायला तयार नव्हते, मतिमंद मुलगा 10 मिनिटाच्या प्रयत्नानंतर दोनच शब्द बोलला, "पाणी वाचव.$$.!, "

पुढं काही त्याला बोलता आलं नाही.

तो मला पाणी वाचव म्हणत होता की, मी वाचवतोय म्हणत होता कळालं नाही.

विशेष हे की या तिघातल्या एकाही जणाला एक इंच भर सुद्धा जमीन नाही, प्यायचं म्हणलं तर दिवसभर एका तांब्यात त्यांचं भागतय असं गाव म्हणतं. गरज अतिशय कमी. तरी हे 40 दिवस रोज घट्ट पडेपर्यंत काम करतायत. गावची लोकसंख्या 1429 आहे. आता समजत नाहीये की मतिमंद नेमकं कोणाला म्हणावं..?? "समोर मरणप्राय दुष्काळाचं संकट दिसत असूनही घरातला पाय उंबऱ्याबाहेर सुद्धा काढायला तयार नसलेल्या त्या 1389 जणांना???, का सगळे सेन्सेस गेलेल्या अन तरीही पाण्यासाठी म्हणून भर उन्हात मर-मर काम करणाऱ्या ह्या तिघांना..???

सचिन अतकरे यांचे याआधीचे ब्लॉग :

धमन्या पेटलेले 40 सैनिक...

जगावेगळ्या रोपवाटिकेची कहाणी

श्रमदानासाठी परदेशातून मदत करणारे सादिकभाई

सलाम दोस्तहो...

...हे वाचायला थोडीशी ताकद लागेल...!

द ग्रेटेस्ट वॉटर हिरो - अजित देशमुख